प्रारब्ध भाग १९ Vrishali Gotkhindikar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रारब्ध भाग १९

प्रारब्ध भाग १९

काही दिवसातच सुमनला ते काम सरावाचे होऊ लागले .
तिचे कस्टमर पण वाढायला लागले ,रोज तीन चार तरी कस्टमर होत असत.
त्यांच्याशी वागायची “खुबी” तिला चांगली जमू लागली .
तिला आता जास्त “मागणी” येऊ लागली आणि “रेट” पण जास्त मिळु लागला .
मावशी पण तिच्यावर चांगल्याच खुष होत्या
हल्ली तिची रोज पाच सात हजार कमाई होत असे .
अशी कमाई होऊ लागली तर लाख रुपये लवकरच जमतील असा तिला विश्वास होता .
मिळालेले तिने ते पैसे कपाटात वेगळ्या पर्समध्ये साठवायला सुरवात केली .
दागिने ठेवताना आलेले दहा हजार तिने आधीच बाजूला ठेवले होते.
पूर्ण पैसे साठले की आधी दागिने सोडवून आणायचे होते .
मग या धंद्याला ती रामराम ठोकणार होती .
सुमनला आणल्याबद्दल मावशींनी खुशीने मायाला दहा हजार रुपये कमिशनपोटी दिले .
शिवाय सुमन जोवर या धंद्यात राहणार होती तोवर दरमहा पाच हजार मायाला मिळणार होते .
आणि एकदा या धंद्यात बाई आली की तिचे परतीचे मार्ग बंद होत असत हे मायाला माहित होते .

परेशच्या सामान्य परीस्थितीमुळे आपल्यावर ही वेळ आली असे सुमनला वाटू लागले .
आजकाल तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते .
स्वयंपाक फक्त रोज जेवायला लागते म्हणून ती करीत होती .
मुंबईचे स्थळ म्हणून आपण हुरळलो त्यावेळी त्याच्या आर्थिक परिस्थितीची चौकशी
करायला हवी होती .
आपल्या सगळ्या इच्छाची राख झाली आहे .
इतके सामान्य जगणे हे आपले स्वप्न कधीच नव्हते
आपल्या वाट्याला असले आयुष्य येईल याची कल्पनाच नव्हती ..!!
परेशचा निर्व्यसनी साधा स्वभाव ,मेहनती वृत्ती किंवा त्याचे तिच्यावर असणारे प्रेम
याची तिच्या दृष्टीने काहीही किंमत नव्हती .
तिच्या आखडू वागण्या मुळे परेशची अवस्था तर अतिशय वाईट झाली होती .
दिवसातून संध्याकाळी फक्त जेवायला आणि झोपायला तो घरी जात होता .
सुमनने त्याच्याशी संपुर्ण असहकार पुकारला होता .
कधीतरी तिच्याशी बोलायचा तो प्रयत्न करीत होता .
सुमन मात्र एक शब्द सुद्धा बोलत नसे की त्याच्याकडे पाहत नसे .
ती असे का करते आहे हे मात्र त्याला बिलकुल उमगत नव्हते .
हल्ली तर ती रविवारी सुद्धा घरी थांबत नसे .
स्वयंपाक करून ठेवून ती जे बाहेर पडत असे ते संध्याकाळी परतत असे .
ती कुठे जातेय? का जातेय ?असले प्रश्न परेशला मनातच ठेवायला लागत होते .
दागिने मामीकडे ठेवताना मला सांगितले नाहीस इतक्या बोलण्यावर इतके
चिडण्या सारखे काय होते तेच त्याला कळत नव्हते .
शिवाय त्याने सांगितले होते की दिवाळीला जाऊ तेव्हा परत आणु.
तरीही ही असे का वागत होती ?..विचार करून डोक्याचा भुगा झाला होता त्याच्या .
आता जास्तीत जास्त वेळ तो ऑफिसमध्ये घालवत असे.
त्याच्या जवळचा असणारा आणि ज्याच्याजवळ तो आपल्या व्यथा बोलु शकत होता
असा त्याचा मित्र संतोष स्मितासोबत काही घरगुती कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशला त्याच्या घरी गेला होता .

हल्ली तर परेश रविवारी पण ऑफिसला जाऊ लागला .
आजकाल त्याची मैत्री ऑफिसमधील सुबोध सोबत वाढू लागली होती .
नुकताच महिन्याभरा पूर्वी सुबोध बदलुन या ऑफिसला आला होता .
सुबोध एकदम “अवलिया” माणुस होता .
सतत आनंदी ,उत्साही असणारा सुबोध अतिशय विनोदी होता .
त्याच्या आजूबाजूला सतत आनंदी वातावरण असे ..
सुबोध आणि तो जेवायला एकत्र असत ..चहा सुद्धा एकत्र घेत .
हळूहळू एकमेकांची ओळख पक्की होऊ लागली .
सुबोधच्या ओळखीनेच त्याला बँकेत लॉकर मिळाला होता .
सुबोध राहायला डोंबिवलीला होता त्यामुळे एकत्र लोकलने जाणे होऊ लागले .
कधीतरी बोलताना ते आपल्या कौटुंबिक गोष्टी एकमेकासोबत शेअर करीत .
तेव्हा परेशला समजले सुबोध विवाहित होता पण चार पाच महिन्यातच त्याचे बायकोशी पटेना झाले .
तिच्या अपेक्षांना सुबोध पुरा पडेना .
तिला फिल्ममध्ये करियर करायचे होते .
सुबोधचे म्हणणे होते लग्नानंतर हे करियर तितकेसे सुरक्षित नाही .
पण तिला हे काहीही ऐकायचे नव्हते ,तिचा विचार पक्का होता .
शेवटी एक दिवस तिने सुबोधचे घर सोडले.
यानंतर ती कुठे आहे काय करते आहे वगैरेची सुबोधनेही चौकशी केली नाही .
आणि त्याच्या बायकोने पण त्याच्याशी संपर्क तोडुन टाकला .
हे ऐकुन परेशला वाईट वाटले .
इतक्या थोड्या अवधीत सुबोधचे वैवाहिक आयुष्य संपले याचे त्याला वाईट वाटले.
सुबोध म्हणला,’अरे तु कशाला वाईट वाटून घेतोस ?
माझ्या नशिबात “वैवाहिक” सुख नव्हतेच त्याचे वाईट कशाला वाटून घ्यायचे ?
आपले आयुष्य आनंदी होण्यासाठीच्या वाटा आपण हुडकायच्या असतात .
मी माझा मार्ग शोधला आहे ..
“म्हणजे कोणता मार्ग ..?असे परेशने विचारताच
सुबोधने त्याच्याकडे बघुन एक डोळा बारीक केला
आणि म्हणाला ,”हे बघ स्पष्टच सांगायचे तर मला सेक्समध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे .
मी सेक्स शिवाय राहूच शकत नाही .
पण बायको निघून गेली म्हणून मी माझे मन का मारायचे ?
मी माझा मार्ग शोधला आहे मी हे सुख बाहेरून घेतोच “
बाहेरून म्हणजे ?..
परेशने असे विचारल्यावर सुबोध म्हणाला ..
“बाहेर म्हणजे मी बाहेरच्या बायकांकडे जाऊन हे सुख मिळवतो .
“तु वेश्यांकडे जातोस ..?परेशने नवलाने विचारले ..
“ए त्यांना वेश्या नको म्हणु बर का “सेक्स वर्कर” असे सन्मानाचे नाव आहे त्यांना .
आणि मी काही कुंटणखान्यात जात नाही .
अशा काही बायका असतात ज्यांना पैशाची गरज असते .
माझ्याकडे पैसे आहेत मी त्यांच्यावर पैसे खर्च करतो बदल्यात त्यांचे शरीर त्या मला देतात .
दोन गरजु व्यक्ती एका ठिकाणी भेटतात आणि आपापल्या गरजा पूर्ण करतात .
इतके साधे आणि सोपे आहे सगळे .
मात्र अशा दोन गरजु व्यक्तींना भेटवणारी मध्ये आणखीन एक व्यक्ती असते इतकेच ..”
त्याचे बोलणे ऐकुन परेश म्हणाला “मला तरी हे काही पटत नाही बघ म्हणजे तुझे बोलणे पटते
आहे पण त्यावरचा “तोडगा” जरा विचित्र वाटतो ..”
“हं सध्या तरी मला हेच बरोबर वाटते आहे “..सुबोध म्हणाला
परेशला आपल्या घरच्या गोष्टी कोणाला सांगणे फारसे आवडत नव्हते .
पण एकदा बोलण्याच्या ओघात तो सुमनच्या बदलत्या वागण्याविषयी सुबोधकडे बोलून गेला होता .
परेशसारख्या साध्या माणसासोबत त्याची बायको असे वागत आहे हे ऐकुन त्याला थोडे वाईट वाटले .
त्याने परेशला समजावले ..होईल सगळे निट..
माझी वहिनींशी ओळख झाली की मी बोलेन त्यांच्याशी .असे म्हणाला .
तुमच्या भागात मी रविवारी येत असतो तेव्हा येईन तुझ्याकडे .
सुमन आपल्याशी बोलत नाही ती याच्याशी काय बोलणार असे परेशच्या मनात आले .
आणि रविवारी मुळात ती घरीच नसते .
पण सुबोध चांगल्या भावनेने हे बोलला होता त्यामुळे परेशला थोडे बरे वाटले .
परेश जर एखाद्या रविवारी आपल्याकडे येतो म्हणाला तर मात्र तिला घरी राहा
अशी विनंती करावी लागेल असे त्याच्या मनात आले .

सुमनने एकदा आपल्या पर्समधील पैशांचा अंदाज घेतला .
आता तीन चार दिवस हे काम केले की साठतील आवश्यक ते पैसे .
मग मात्र लगेच मायाला घेऊन सोनाराकडे जायचे आणि ते दागिने आणायचे .
मायाला तिने फोनवर सोमवारी दागिने आणायची गोष्ट सुद्धा बोलून ठेवली .
तीन साडेतीन आठवड्यात तिचे एवढे पैसे साठले याचे तिला नवल वाटले .
पण सुमनला भरपूर कस्टमर मिळतात हे मावशींनी मायाला सांगितले होते.
दागिन्यांचे काम झाले की मात्र मावशींना सांगुन हे काम सोडायचे .
मग पुढे पाहु काय करायचे ते ..
परेशसोबत संसार करायची तिची आता अजिबात इच्छा नव्हती .
आणि आता गावी परत जाणेही शक्य नव्हते .
पुढे काय करायचे हे तिचे तिलाच समजत नव्हते .

क्रमशः