किती सांगायचंय तुला - ५ प्रियंका अरविंद मानमोडे द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किती सांगायचंय तुला - ५

रात्रभर विचार करत होती दिप्ती.. शिवा सोबत तिची झालेली अनपेक्षित मैत्री तिला तिच्या भूतकाळात घेऊन आली होती. किती तरी आठवणी पुन्हा ताज्या झाल्या होत्या. सगळ किती अचानकपणे झालं होत, तिला नव्हत पडायचं पुन्हा या सगळ्यात. पण म्हणतात ना काळापुढे कुणाचं काही चालत नाही तसे दिप्ती च झालं असते.. रात्री विचार करता करता तिला बाल्कनीत च झोप लागली असते आणि जाग येते ती अलार्म वाजतो तेव्हा.. अलार्म च्या आवाजाने ती उठली तर होती पण मन मात्र काल झालेल्या प्रसंगात अडकून होत. किती तरी वेळ ती तशीच सोफ्यावर बसून राहते. पण विचार करून काही फायदा नाही म्हणून मन नसतानाही आपल डेली रूटीन साठी रेडी होते.
शिवा जिम मध्ये येऊन दिप्ती ची वाट बघत असतो. त्याला सवय झाली होती तिची. कारण दिप्ती ची पण तीच जागा होती वर्कआऊट करायची. तिला छान वाटायचं तिथे आणि ह्याला तिचा चेहरा बघितल्यावर प्रसन्न वाटायचं. शिवा जिम मध्ये तर आला असतो पण तो ही काल झालेला प्रसंग आठवून स्वतःशीच हसत असतो. त्याला छान वाटत होत ते सगळ. मुलींना भाव न देणारा शिवा दिक्षित त्याच्या ही नकळत आपोआप दिप्ती कडे ओढला जात होता.
तो स्वतःशीच विचार करत असतो की "अस का होतंय मला,एवढ्या मुली माझ्यावर फिदा आहे आणि दिप्ती माझ्याकडे बघत सुद्धा नाही तरी मला का मैत्री करावी वाटली त्यांच्याशी?"
किती तरी प्रश्न असतात त्याच्या मनात असे.. पण त्याची उत्तर मात्र वेळ आल्यावर मिळणार होती त्याला. तो असाच त्याच्या विचारात हरवलेला असतो.. दिप्ती शेडमध्ये येते आणि वर्कआऊट सुरू करते.. शिवा च लक्ष तिच्यावर जाते.. तो असाच थोडा वेळ तिच्या कडे बघत असतो. बाहेर पावसाची रिपरिप सुरू असते.. पण अचानक पाऊस चांगला बरसायला लागतो.. आता शेड मध्ये पाऊस येत असतो.. दिप्ती थोड्या वेळ पडणाऱ्या पावसाकडे एकटक बघत असते आणि काही वेळानंतर शेड च्या बाहेर जाते. जणू काही तो पाऊस तिला बोलवत आहे.. आपोआप तिचे पाय शेड बाहेर पडतात.. मनसोक्तपणे ती पावसात भिजत असते.. शिवा हे सगळ जिम मधून बघत असतो.. तिला अस भिजताना बघून तो ही भान हरपून गेला असतो.. नकळत तो पण जिम मधून बाहेर येतो. दिप्ती बेभान होऊन पावसात चिंब भिजत असते.. आपले दोन्ही हात हवेत मोकळे सोडून गोल फिरत असते.. शिवा फक्त तिचा चेहरा न्याहाळत असतो.. किती दुःख होत तिच्या चेहऱ्यावर, काल ढोल वाजवत असताना डोळ्यात आनंद झळकत होता तिच्या.. पण आज, आज ती ह्या पाऊसाच्या थेंबामध्ये स्वतःचे अश्रू लपवत असते.. शिवा ला तिच्या डोळ्यात वेदना दिसत असतात.. आज तो दिप्ती चे नवीन रूप अनुभवत असतो..
अचानक दिप्ती दोन्ही गुडघ्यांवर खाली बसते. दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून किती तरी दिवसांचे दुःख, त्या वेदना ती आश्रु रुपात बाहेर आणत असते.. हुंदके देऊन रडत असते.. शिवा हे सगळ बघत असतो.. त्याला कळत नव्हतं की काय झालं ते..
"दिप्ती, आर यू ओके ?"- न रहावुन शिवा दिप्ती च्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो..
त्याच्या स्पर्शाने ती मागे वळून बघते तसा शिवा उभा होतो.
दिप्ती पण उठून त्याला मिठी मारत म्हणते. " सॉरी शिवा, खरचं.. मी जे चूक केली त्यासाठी सॉरी पण खूप लहान आहे. माझ्या एका चुकीमुळे मी तुला गमावलं, तेव्हा तुझ ऐकुन घेतल असत तर आज तू माझ्या जवळ असता, पण आता तू आला ना परत. मी नाही जाऊ देणार तुला, प्लीज माफ कर मला "- दिप्ती रडत म्हणते..
तिच्या अश्या अनपेक्षित जवळ आल्यामुळे तो गोंधळला असतो.. आता काय करू असा प्रश्न त्याला पडला असतो.. पण ही आपल्याला कोणत्या चुकी बद्दल सॉरी म्हणत आहे हे त्याला कळत नव्हते. किती तरी वेळ दिप्ती तशीच होती त्याच्या मिठीत. दोघेही पूर्ण चिंब भिजले असतात.. शिवा ला तिचा स्पर्श आपलासा वाटत असतो.. किती तरी दिवसांचे दुःख ती त्याच्या मिठीत मोकळे करत असते.. मात्र अस भिजल्याने दिप्ती आजारी पडेल हा विचार शिवा च्या मनात येतो. तसा तो दिप्ती च्या खांद्यावर हात ठेवून तिला हाक मारतो. पण दिप्ती भानावर नसते.
तिच्या कानाजवळ जाऊन शिवा हळूच " दिप्ती ठीक आहात ना तुम्ही?" म्हणतो.
तशी ती भानावर येते. स्वतःला शिवाच्या मिठीत बघून ती थोडी दचकते आणि मागे सरकते. आपण हे काय केलं ह्या भावनेने तिचे डोळे शरमेने भरले असतात.
दिप्ती सॉरी म्हणून परत जाण्यासाठी वळते पण शिवा लगेच तिचा हात पकडतो.
"काय म्हणत होत्या तुम्ही, कशाची माफी मागत होत्या, मला कळल नाही काही. आणि काल आपली मैत्री झाली, मग मी कधी सोडून गेलो तुम्हाला.?"- शिवा
त्याच्या मनात किती तरी प्रश्न निर्माण झाले असतात. थोड्यावेळ आधी जे काही त्याने पाहिलं होत त्या प्रसंगाने असे प्रश्न निर्माण होण साहजिक होत. त्याच्या ह्या प्रश्नावर दिप्ती काहीच बोलत नाही..
तिला अस शांत बघून शिवा पुढे म्हणतो.." माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही तुमच्याकडे की तुम्हाला मला उत्तर द्यायचं नाही हे ठरवल आहे तुम्ही?"
" सध्यातरी मी तुमच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत. आणि जमेल तेवढं दूरच ठेवा स्वतःला माझ्यापासून. काल जे झालं तो फक्त योगायोग होता बाकी काही नाही ." - शेवटचं वाक्य बोलताना तिचा आवाज जड होतो आणि ती पुढे काहीही न बोलता निघून जाते.
शिवा तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तसचं उभा असतो. त्याला वाटत की तिला थांबवावं, पण आताची परिस्थिती पाहता तो स्वतःला सावरतो.
एवढ्या वेळ मागे उभी असलेली श्रुती शिवा च्या जवळ येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते," दादा काय झालं?"
शिवा तिला काल झालेली त्यांची मैत्री आणि आज जे त्याने पाहिलं होत ते सगळ सांगतो. श्रुती ला कळायला वेळ लागत नाही की दिप्ती का अशी वागली ते. दिप्ती चा भूतकाळ श्रुती ला माहित होता. कारण तीच दिप्ती ची जिवलग मैत्रीण होती. जिच्या सोबत दिप्ती सगळ शेअर करत होती. पण श्रुती शिवा ला काहीच सांगू शकत नव्हती कारण दिप्ती ला प्रॉमिस केलं होतं तिने की कोणाला काहीच सांगणार नाही म्हणून.
"मी बघते तिला काय झालं ते, तू नको काळजी करू"- अस म्हणून श्रुती दिप्ती च्या रूम कडे जाते.
शिवा मात्र तसाच उभा असतो.
दिप्ती रूम मध्ये येऊन खूप रडत असते. तिला स्वतःला कळत नव्हतं की आपण का अस वागलो, "का मला मिस्टर दिक्षित मध्ये माझा शिवा दिसला, का मी नेहमी त्यांच्या डोळ्यात हरवून जाते, किती सावरते स्वतःला की नाही बघायचं त्यांच्याकडे मग का पुन्हा पुन्हा ते माझ्या समोर येतात. प्लीज बाप्पा मला दूर राहायचं आहे ह्या सगळ्यांपासून, मला नाही पडायचं ह्यात पुन्हा, खरचं."
तिच हे सगळ बोलण श्रुती रूम बाहेर उभी राहून ऐकत असते. तिला कळत होती दिप्ती ची अवस्था, पण तिला हे ऐकुन थोडा आनंद ही झाला असतो की दिप्ती ला तिच्या दादा मध्ये तिचा शिवा दिसतो. श्रुती ला फक्त दिप्ती आनंदी रहावी, ती पूर्वीची दिप्ती परत यावी अस वाटत असते.. आणि तिच्या दादा( शिवा) मुळे जर हे शक्य होणार असेल तर श्रुती त्या दोघांना एकत्र करण्यासाठी काहीही करायला तयार असते..
"दिप्ती.."- श्रुती रूम च्या आत येत दिप्ती ला आवाज देते.
दिप्ती तिचा आवाज ऐकुन पटकन मागे वळते आणि श्रुती ला घट्ट मिठी मारून मनसोक्त रडते. श्रुती पण तिला तसं रडू देते. किती तरी दिवसानंतर दिप्ती अस मनमोकळ रडत असते. एवढ्या वर्षाचं तीच दुःख आज ती अश्रू रूपाने का होईना पण बाहेर काढत असते.
" बस झाल दिप्ती आता, एवढं नको ना ग रडु. तू रडली की मला नाही चांगलं वाटत. माहित आहे ना तुला, मग शांत हो प्लीज"- श्रुती दिप्ती च्या पाठीवर हात फिरवत म्हणते.
" श्रुती तुला...."- दिप्ती तीच रडू आवरत म्हणते.
" माहित आहे मला तु का रडत आहे ते, दादा ने सांगितल मला सगळ."- श्रुती तिला मध्येच थांबवत म्हणते.
" दिप्ती विसर आता सगळ, किती दिवस अशीच मनावर मळगट ठेवून जगणार आहेस.. मला माहित आहे तू नाही विसरू शकत सगळ एवढ्या सहज, जे झालं ते चांगलं नाही झालं, पण तूच नेहमी म्हणतेस ना की सगळ विसरून नवी सुरुवात करावी माणसानं नाही तर त्यालाच त्रास होतो.. मग आता तूच अस वागत आहेस? "- श्रुती दिप्ती ला समजावत म्हणते.
" मला माहिती आहे ग, हळूहळू विसरत होते मी सगळ पण इथे आल्यावर.."- अस बोलून दिप्ती मध्येच थांबते.
" इथे आल्यावर काय दिप्ती?"- श्रुती
" काही नाही, असच बोलून गेले मी"- दिप्ती विषय सांभाळत म्हणते.
श्रुती ला माहित होत की दिप्ती ला काय म्हणायचं होत ते. पण दिप्ती ची सध्याची परिस्थिती पाहून ती गप्प बसते.
"चल आवर तुझ आज तुला ऑफिस ला जायचं आहे ना, उशीर होईल नाही तर"- श्रुती
दिप्ती मान हलवून हो म्हणते.
" आणि रडत बसू नको, रडताना तू मुळीच चांगली नाही दिसत."- श्रुती दिप्ती चे गाल ओढत म्हणाली.
मनात नसतानाही दिप्ती फक्त श्रुतीला बर वाटावं म्हणून खोटं खोटं हसते.
श्रुती तिला बाय करून निघून जाते. दिप्ती मात्र तशीच बसलेली असते.. तिला शिवा सोबत घालवलेला पावसाळ्यातील तो क्षण आठवतो, ज्या क्षणामुळे तिचे पाय आज नकळत पावसात भिजण्यासाठी वळले होते.

(भूतकाळ).....

"दिप्ती बघ काय मस्त पाऊस पडत आहे, चल ना भिजू "- शिवा ( भूतकाळातील)
" काय शिवा, तुला माहित आहे ना मला नाही आवडत पावसाळा, आणि तू भिजण्याची गोष्ट करतोय"- दिप्ती थोडी वैतागून म्हणते.
"चल ना ग प्लीज, माझ्यासाठी. फक्त थोड्यावेळ प्लीज"- शिवा तिला लाडीगोडी करत म्हणतो.
दिप्ती मान हलवून नाही म्हणत दुसरीकडे बघते.
शिवा तिला ओढतच बाहेर घेऊन जातो. दिप्ती खूप चिडते त्याच्यावर, आणि परत जाण्यासाठी वळते पण वळत असताना तिचा तोल जातो.. तसा शिवा तिला डाव्या हाताने तिच्या कंबरेला पकडुन आणि दुसरा हात तिच्या पाठीवर ठेवून तिला पकडतो. दिप्ती चे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर पडतात. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले असतात.. किती तरी वेळ दोघेही तसेच उभे असतात. पावसात चिंब भिजत. एकमेकांच्या मिठीत हरवले असतात, जगाच कुठलही भान न ठेवता..
दिप्ती ने तो क्षण आज पुन्हा अनुभवला होता पण शिवा मात्र तो नव्हता. त्याचाच तिला जास्त त्रास होत असतो. नाव सारखी आहे हा यागायोग असू शकतो पण डोळे... त्याचं काय? ह्या शिवा चे डोळे बघितल्यावर तिला तिचा शिवा आठवायचा. म्हणून तर ती त्याच्याकडे बघण्याच टाळायची.. असे किती तरी विचार तिच्या डोक्यात सुरू असतात.. तिची विचार शृंखला तुटते ती मोबाईल च्या रिंगटोन ने. ती लगेच कॉल घेते. थोड बोलून कॉल कट करून रेडी होते. लवकर आवरून ती खाली येते.
खाली सगळे बाप्पा च्या आरती साठी जमलेले असतात.
आरती झाल्यावर सगळे नाश्ता करायला डायनिंग टेबल कडे वळतात. रोज सारखी दिप्ती आज पण सगळ्यांसाठी कॉफी बनवून आणते. सगळे कॉफी आणि नाश्ता संपवत गप्पा मारत बसलेले असतात. श्रीकांत आणि शिवा त्यांच्या आज होणाऱ्या मीटिंग बद्दल बोलत असतात. सुचित्रा ताई, मयुरी आणि काव्या एकमेकांशी बोलण्यात मग्न असतात.
दिप्ती आदिश्री ला भरवत असते. आणि श्रुती कधी शिवा कडे तर कधी दिप्ती कडे बघत असते. त्यांच्या हालचाली, हावभाव सगळ नीट बघत असते. दिप्ती आदिश्री सोबत बोलण्यात मग्न असते. ती शिवा कडे बघत सुद्धा नाही.पण शिवा मात्र श्रीकांत सोबत बोलताना मधून मधून दिप्ती कडे बघत असतो. त्याचं अस दिप्ती ला चोरून चोरून बघणे श्रुती च्या नजरेतून सुटत नाही.
ती मनातच खुश होऊन म्हणते, "एैसा लगता है एक तरफ आग लग चुकी है, बस अभी दुसरी तरफ लगाना बाकी है और यह काम तो हमे ही करना पड़ेगा, बाप्पा प्लीज़ हेल्प करा मला. कस आणू ह्या दोघांना एकत्र?"
श्रुती तिच्या विचारात मग्न असते.. तेवढ्यात दिप्ती तिला आवाज देते. तशी श्रुती तिच्या विचारातून बाहेर येते.
" ऐक ना श्रुती, मला ऑफिस ला जाव लागणार आहे लवकर. मघाशी फोन आला होता, नऊ वाजता पोहचायचे आहे."- दिप्ती
तीच ऐकल्यावर श्रुती ला एक कल्पना सुचते.. दिप्ती आणि शिवा ला कस जवळ आणायचं ह्याची.. ती मनातच बाप्पा ला थँक्यु म्हणते.
दिप्ती तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवून तिला भानावर आणते.
" कुठे हरवते ग सारखी?"- दिप्ती हसत तिला विचारते.
"काही नाही, असच. मग तू कशी जाणार आहे? एक काम कर, तू ना दादा सोबत जा. तो सोडेन तुला व्यवस्थित "- श्रुती
" त्याची काही गरज नाही आहे, मला गाडी घ्यायला येणार आहे ऑफिस ची. तेच म्हणत होते मी तुला की मला पत्ता सांग पूर्ण इथला म्हणजे मला ऑफिस मध्ये सांगता येईल."- दिप्ती
हे ऐकुन मात्र श्रुती ची निराशा झाली असते.. पहिलाच प्लॅन फ्लॉप झाला होता तिचा.
थोडी नाराजीच्या सुरात ती म्हणते. " ठीक आहे सांगते."
श्रुती दिप्ती ला पत्ता लिहून देते. इकडे सगळे आपापल्या कामी लागलेले असतात. शिवा आणि श्रीकांत पण ऑफिस साठी तयार व्हायला निघून जातात. दिप्ती पण तीच आवरायला रूम मध्ये निघून जाते.
थोड्यावेळ नंतर शिवा तयार होऊन खाली हॉल मध्ये येऊन श्रीकांत ची वाट बघत असतो..
श्रीकांत तिथे येतो आणि शिवा ला म्हणतो, " शिवा तू हो पुढे. मी येतो थोड्या वेळाने. मला ते सक्सेना सोबत बाहेर जायचं आहे साईट वर. मी डायरेक्ट ऑफिस मध्ये भेटतो तुला."
शिवा ठीक आहे म्हणून मान हलवतो. शिवा ऑफिस ला जात असतो की त्याला आठवत की त्याने आज च्या मीटिंग ची फाईल तर घेतलीच नाही.. म्हणून तो रूम कडे जाण्यासाठी परत मागे फिरतो तर त्याला दिप्ती पायऱ्या उतरताना दिसते. तिला बघून तो तसचं जागीच उभा राहतो. एवढे दिवस ज्या दिप्ती ला तो बघत होता तिच्या पेक्षा किती तरी वेगळी दिसत असते आज दिप्ती त्याला. नेहमी सलवार कुर्ता घालणारी दिप्ती ला शिवा आज आर्मी युनिफॉर्म मध्ये बघत असतो.. रोज केसांच्या घातलेल्या वेणी ची जागा आज जुड्याने घेतली असते.. ज्या खांद्यावर ओढणी असायची त्या खांद्यावर आज स्टार असतात.. रोज हातात असणाऱ्या बागड्या आज नव्हत्या. त्याच्या ऐवजी आर्मी प्रिंट ची प्रोफेशनल घडी असते.. रोज खाली मान घालून चालणारी दिप्ती आज डोळ्यात वेगळीच चमक घेऊन एक एक पायरी उतरत असते.. ती जशी जशी पायरी उतरत असते तसा शिवा च्या काळजाचा ठोका चुकत असतो.. तो भान हरपून आणि थोडा आश्चर्यचकित होऊन तिला एकटक बघत असतो.. दिप्ती पायऱ्या उतरून सरळ किचन कडे जाते. सुचित्रा ताई ला सांगायला. शिवा तरीही दिप्ती कडेच बघत असतो. श्रुती त्याला हाताला कोपराने मारून भानावर आणते.
"काय बघत होता रे तू?"- श्रुती मिश्कीलपणे विचारते.
" ह्या आर्मी ऑफिसर आहेत..?"- शिवा आश्चर्याने विचारतो..
" मग तुला काय वाटल कोण आहे दिप्ती?"- श्रुती त्याची मज्जा घेत म्हणते.
" म्हणजे ह्या इव्हेंट प्लॅनर नाहीत..?"- शिवा आताही चकित होऊन म्हणतो..
" नाही. नाही आहे ती इव्हेंट प्लॅनर."- श्रुती थोडी हसून म्हणते..
" मग तू मला खोटं सांगितल त्या दिवशी?"- शिवा थोडा चिडून म्हणतो.
" मी खोटं नाही सांगितलं, तुझा गैरसमज झाला तसा."- श्रुती स्वतःची बाजू सांभाळत म्हणते.
" मग तू दूर करायचा होता ना गैरसमज"- शिवा कमरेवर हात ठेवून म्हणतो..
" मुद्दाम नाही केला "- श्रुती नाक मुरडत म्हणते.
"का पण? हा..."- शिवा तिचा कान पिळत म्हणतो.
"आई ग...सोड मला दादा, नाहीतर बाबांना आवाज देऊ का?"- श्रुती कळवळून म्हणते.
बाबांचं नाव ऐकताच शिवा लगेच तिचा कान सोडतो.
" का नाही सांगितलं मला तू?"- शिवा हाताची घडी घालून म्हणतो.
" आज जे तुझे भाव होते ना चेहऱ्यावरचे, ते बघायचे होते मला. म्हणून नाही सांगितल. शॉक झाला ना तू? कसा बघत होता दिप्ती कडे"- श्रुती त्याला चिडवत म्हणते.
" काही शॉक वगैरे नाही झालो मी आणि कसा बघत होता म्हणजे काय?... काही बघत नव्हतो मी त्यांच्याकडे"- शिवा नजर चुकवत म्हणतो.
" हो का? नव्हता बघत तिच्याकडे. मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलं मी सगळ. बघायचं आहे कसा बघत होता ते..?"- श्रुती त्याला मोबाईल मधला व्हिडिओ दाखवत म्हणते.
मोबाईल मध्ये व्हिडिओ बघून शिवा श्रुती चा मोबाईल घेण्यासाठी पटकन हात समोर करतो पण श्रुती तेवढ्याच वेगाने मागे सरकते आणि हसते. शिवा तिच्या मागे धावतो तशी श्रुती पण स्वतःला वाचवण्यासाठी धावते. दोघेही डायनिंग टेबल भोवती फिरत असतात.
" डिलिट कर आधी तो व्हिडिओ"- शिवा मध्ये मध्ये तिला उपदेश देत म्हणतो..
श्रुती हातातला मोबाईल हलवून त्याला चिडवत म्हणते "नाही करणार, जा"
आता मात्र शिवा पार वैतागून जातो. तो त्याची सगळी ताकद लावून तिच्या मागे धावतो आणि तिला पकडणार असतो तेवढ्यात दिप्ती समोरून येते. श्रुती एका बाजूला निघून जाते आणि शिवा सरळ दिप्ती च्या दिशेने येतो. त्याची स्पीड जास्त असल्या कारणाने त्याला स्वतःला थांबवता येत नाही आणि तोल जाऊन तो दिप्ती वर आदळणार असतो तशीच दिप्ती पटकन बाजूला होते आणि एका हाताने शिवा चा हात घट्ट पकडून त्याला सावरते. थोडक्यात त्याचं डोकं समोरच्या टेबल वर लागण्यापासून वाचवते.
श्रुती पटकन त्याचा जवळ येऊन त्याला विचारते " दादा, लागलं नाही ना तुला कुठे?"- थोड्यावेळ आधी त्याची मजा घेणारी श्रुती आता डोळ्यात पाणी आणून काळजीच्या स्वरात म्हणते.
शिवा पण तिला जवळ घेत काही नाही झालं म्हणून सांगतो.
ह्यालाच तर म्हणतात ना भाऊ बहिणीच नात.. रुसवा, लाड, प्रेम, एकमेकांची मस्करी. पण त्याहून जास्त एकमेकांसाठी वाटणारी काळजी. असच नात शिवा आणि श्रुती च पण होत.
शिवा श्रुती ला थोडा बाजूला करून म्हणतो, " ह्यांनी वाचवलं मला , नाहीतर आता डोक फुटल असत माझ."- शिवा दीप्ति कडे बघुन म्हणतो.
" थँक्यू सो मच दिप्ती, बर झाल तू वाचवलं ह्याला, नाहीतर जेवढ डोकं आहे तेवढ पण उरलं नसत आज."- श्रुती शिवाची खेचत म्हणते.
शिवा तिच्या कडे रागात बघतो. तशी श्रुती कान पकडून त्याला हसत सॉरी म्हणते. तिला बघून तो ही हसतो. दिप्ती शांत राहून दोघांनाही बघत असते.
" तुला उशीर होईल ना, इथेच का उभी आहे.?"- श्रुती दिप्ती ला म्हणते.
"हो जात होते आता"- दिप्ती
"दादा ला सोबत घेऊन जाणार आहे?"- श्रुती हसत म्हणते.
शिवा तिला नजरेनेच काय चाललय म्हणून विचारतो.
"अरे तुझा हात आता पण धरून ठेवला आहे ना तिने, म्हणून म्हटलं मी"- श्रुती दिप्ती च्या हाताकडे इशारा करत म्हणते.
दोघांचही लक्ष हाताकडे जात. दिप्ती पटकन शिवा चा हात सोडून सॉरी म्हणते.
" इट्स ओके, मी सोडू का तुम्हाला? जर तुम्हाला काही हरकत नसेल तर"- शिवा
" तिच्या ऑफिस मधून गाडी येणार आहे, तू जा तुझ्या ऑफिस मध्ये"- श्रुती
अस म्हटल्यावर शिवा चा चेहरा उतरतो आणि तो पुढे काहीच न बोलता दोघींना बाय करून निघून जातो.
दिप्ती पण श्रुती ला बाय करून तिच्या ऑफिस ला जाण्यासाठी निघते. श्रुती तिला बाहेर पर्यंत सोडायला तिच्या सोबत येते. शिवा पार्किंग मधून परत येत असतो आणि वाटेत दोघींनाही भेटतो. दिप्ती ला कॉल येतो म्हणून ती बाजूला जाऊन बोलत असते.
" तू गेला नाही आता पर्यंत?"- श्रुती
" फाईल विसरलो होतो, तीच घेण्यासाठी परत आलो."- शिवा
" आता आठवलं तुला?"- श्रुती
" मघाशीच आठवलं होत, पण तुझ्या मुळे पुन्हा विसरलो मी "- शिवा डोळे मोठे करत म्हणतो.
" माझ्यामुळे विसरला की..."- श्रुती दिप्ती कडे इशारा करून शिवा ला चिडवत म्हणते.
" जास्त बोलते तू आजकाल, मार पाहिजे का तुला?"- शिवा तिला डोक्यावर टपली मारून म्हणतो.
"कोणाला मार खायचा आहे, या मी खाऊ घालतो."- सयाजी राव दोघांजवळ येत म्हणतात.
" बाबा दादा मारणार होता मला"- श्रुती खोटं खोटं घाबरत म्हणते.
सयाजी राव डोळ्यांनीच शिवा ला काय म्हणून विचारतात.
" गम्मत करत होतो तिची मी, खरचं नाही मारणार होतो."- शिवा थोडं चाचरत म्हणतो.
सयाजी राव आणि श्रुती दोघेही एकमेकांकडे बघून हसतात.
" बघितल, एवढा मोठा बिसनेस मॅन असून सुद्धा घाबरतो मला."- सयाजी राव टीशर्ट ची कॉलर वर करत म्हणतात.
तसे तिघेही हसतात.
शिवा फाईल आणण्यासाठी निघून जातो. दिप्ती कॉल वर बोलण संपवून सयाजी राव आणि श्रुती जवळ येते.थोडी टेन्शन मध्येच असते ती.
तिला अस बघून श्रुती म्हणते.."काय झालं दिप्ती, असा चेहरा का पडलाय तुझा?"
" जी गाडी येणार होती घ्यायला ती बंद पडली मध्येच, आणि एवढ्या कमी वेळात दुसरी गाडी यायला वेळ लागेल म्हणत होते. कशी जाऊ मी?"- दिप्ती टेन्शन मध्ये येऊन म्हणते..
" दुसरी गाडी घेऊन श्रीकांत गेला आहे साईट वर, नाही तर ड्रायव्हर ने सोडले असते तुला."- सयाजी राव
तेवढ्यात शिवा पण फाईल घेऊन तिथे येतो.
त्याला बघून सयाजी राव म्हणतात.." शिवा, जाताना दिप्ती ला सोड तिच्या ऑफिस ला"
हे ऐकूनच श्रुती चे डोळे आनंदाने मोठे होतात "आपल तर ऐकलच नसत हिने बर झाल बाबांनीच म्हटल ते. आता दिप्ती नाही म्हणुच शकत नाही"- ती स्वतःशीच विचार करते.
" मी जाईल काका टॅक्सी ने"- दिप्ती
" अग टॅक्सी ने कशाला, सोडेल तो. त्याचं मार्गाने जातो तो, सोडशिल ना शिवा?"- सयाजी राव शिवा कडे बघून म्हणतात.
" हो हो सोडतो ना"- शिवा ला आनंद झाला असतो पण तो स्वतःला सावरतो.
दिप्ती ला आता नाही म्हणता येत नाही तिचा नाईलाज होतो सयाजी रावांसमोर.
" निघायचं?"- शिवा दिप्ती ला विचारतो.
दिप्ती फक्त मान हलवून हो म्हणते. दोघेही सयाजी राव आणि श्रुती ला बाय करून निघतात.
दिप्ती कार जवळ येऊन मागे बसण्यासाठी कार चे दार उघडते..
तसा शिवा तिला म्हणतो " कॅप्टन, तुम्ही जरी ऑफिसर असल्या तरी मी ड्रायव्हर नाही तुमचा.समोर येऊन बसा"
दिप्ती शांतपणे समोर येऊन बसते.
" सीट बेल्ट लावा, माझी ड्रायव्हिंग खूप फास्ट आहे. काही झालं तर बाबा मला ओरडतील.."- शिवा हसत म्हणतो.
दिप्ती त्याच्या कडे आश्चर्याने बघते.
तिच्या मनातल ओळखून शिवा तिच्या डोळ्यात बघून म्हणतो," तुम्हाला काय वाटल, आज सकाळी जे झालं त्याचा राग आला असेल मला? मला माहित नाही सकाळी तुम्ही का अश्या वागल्या आणि मला ते माहिती पण नाही करून घ्यायचं आहे. मी कालच तुम्हाला म्हटल होत की एकदा मी कुणाशी मैत्री केली तर त्याचा हात मरेपर्यंत सोडत नाही. तुम्ही मला मित्र माना वा नका मानू पण मी तुम्हाला माझी मैत्रीण मानल आहे."
दिप्ती त्याच्या डोळ्यात हरवलेली असते. शिवा तिच्या डोळ्यासमोर हात हलवतो तशी ती भानावर येते.
"गाण ऐकणार?"- शिवा कार चा रेडिओ स्टेशन ऑन करत म्हणतो.
दिप्ती फक्त गोड हसून मान हलवून हो म्हणते आणि गाडी च्या बाहेर बघते. रेडिओ वर गाण सुरू होते.

तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
क्या ग़म है जिसको छुपा रहे हो
तुम इतना...

आँखों में नमी हँसी लबों पर
क्या हाल है क्या दिखा रहे हो
क्या ग़म है...

बन जायेंगे ज़हर पीते पीते
ये अश्क़ जो पीते जा रहे हो
क्या ग़म है...

दिप्ती च्या सीचूएशन ला बरोबर फिट बसत होत गाण.. शिवा गाडी चालवताना मधून मधून तिला बघत असतो.. पण दिप्ती मात्र आपल्याच विचारात गाडी च्या काचेतून बाहेर बघत असते.

******क्रमशः