सुवर्णमती - 5 Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सुवर्णमती - 5

5

तिच्या नाजूक कंकणांनी आधीच तिच्या येण्याची वर्दी दिली. नकळत सर्वांच्याच नजरा प्रवेशद्वारावर आधीच खिळल्या होत्या. सुवर्णमतीचे पहिले पाऊल आत पडताच दोन्ही कुवंर, झटकन आसनावरून उठून उभे राहिले. यात शिष्टाचाराचा भाग किती आणि सुवर्णमतीच्या सौंदर्याचा किती, हे त्यांचे त्यांनाही सांगणे जमले नसते. सुवर्णमतीच्या सौंदर्याची ख्याती आधीच त्यांच्यापर्यंत पोहोचली होती, पण तरीही, समोर जी स्वर्गीय सौंदर्यखणी उभी होती तिला पाहताच आपण जे वर्णन ऐकले, ते किती अपूरे आणि तोकडे होते असेच त्या चौघांनाही वाटले. सूर्यनाग क्षणभर अवाक होऊन, तिच्या तेजस्वी सुंदर मुखाकडे पाहतच राहिला. एक अत्यंत अनोखी लहर त्याच्या शरीरभर उमटली. मनोमन 'हीच ती, जिची छबी तारुण्यात प्रवेश केल्यापासून आपल्या मनाच्या दर्पणात सहचारिणी म्हणून उमटत होती' , अशी खात्री पटली, आणि दुसऱ्याच क्षणी, आपण काय ठरवून आलो होतो, त्याचे महत्व, आपले राज्य, आपले कर्तव्य, हे सर्व आठवून, ही आपल्याला नाहीच म्हणाली असती, हीदेखील खात्रीच पटून, एक अत्यंत गहिरी वेदना त्याच्या नजरेत साठून आली.

चंद्रनागाची अवस्था फारशी निराळी नसली तरी, एक सुंदर स्त्री समोर आल्यावर वाटावा तो आनंद एवढाच त्यात भाग होता. विलायतेत असता तर चंद्रनाग तिचा तळहात हाती घेऊन तो चुंबण्यासाठी नक्कीच पुढे आला असता. पण इथली गोष्टच निराळी होती.

सूर्यनागाच्या डोळ्यात क्षणभरच एक वेदनेची रेष तरळून गेली, अर्थात इतर कुणालाच ते जाणवू न देण्याचे कसब त्यास नक्कीच अवगत होते. शेषनागाच्या नजरेतून मात्र ते सुटले नाही. यावेळेस आपण सूर्यनागाचे ऐकावयास नको होते असा क्षणिक विचार त्यांच्या मनास चाटून गेला. पण क्षणभरच.

दोन्ही राजे एकमेकांकडे पाहून सूचक हसले. सुवर्णमती हलकेच चालत आपल्या मातापित्याकडे गेली आणि त्यांनी खुणावताच पुढे होऊन राजे शेषनाग आणि राणीसरकारांपुढे अभिवादनासाठी झुकली. राणीसरकारांनी वरचे वरच तिला खांद्यास धरून उठविले. दोघांनीही तिला, आयुष्यमानभव असा तोंडभरून आशीर्वाद दिला.

त्यांच्याबरोबर आलेल्या सेवकांनी, नजराण्याची तबके समोर आणली. राणीसरकारांनी, माणिक आणि पाचूजडित हार असलेली, लाकडी, खास रंगीत नक्षीकाम केलेली पेटी, सुवर्णमतीच्या हातात दिली. सुवर्णमतीने एक कटाक्ष, जणू संमतीसाठी, आपल्या मातेकडे टाकला आणि मग स्वीकार केला.

राजा शेषनागांनी मग आपल्या पुत्रांचा परिचय सुवर्णमतीस करून दिला. प्रथम सूर्यनागाचा, तिने हात जोडून त्यास अभिवादन केले, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक प्रसन्न स्मित उमटले. सूर्यनागानेही हात जोडले, आणि लगेचच त्याने चंद्रनागाकडे हात केला. चंद्रनागाचा परिचय करून देताच चट्कन त्याचा हात हस्तांदोलनासाठी पुढे आला पण सुवर्णमतीचे हात जोडलेलेच होते, त्यामुळे त्यानेही सावरून घेत हात जोडले.

सुवर्णमतीस सूर्यनागाची ही थंड प्रतिक्रिया खेदाश्चर्यात टाकून गेली. आजतागायत कोणत्याही तरुण पुरुषांकडून इतका थंड प्रतिसाद तिला मिळाला नव्हता. आणि ज्या व्यक्तीकडून असा प्रतिसाद अपेक्षित नव्हता त्या व्यक्तीकडूनच तो आल्यावर तिच्या मनात खळबळ माजली. परंतु तसे मुखावर किंचितही दिसू न देता सुवर्णमतीने, स्वत:, सर्वांना केशरी सरबताचे चषक दिले. सूर्यनागाने हातानेच नको म्हणताच "खास वाळाकेशराचे सरबत आहे, प्रवासाचा शीण लगेच कमी करेल" असे म्हणत आग्रहाने त्यास घ्यायला लावले. सूर्यनाग या वैयक्तिक आग्रहाने मनोमन सुखावला. चंद्रनागाने चहा घेण्यास संमती दर्शवताच, सुवर्णमतीने अगदी विलायती पद्धतीने चहा बनवत शर्करेचे प्रमाण विचारले. त्याने चतुराईने, "तुझा हात यास लागला आहे तर शर्करेची काय गरज" अशी विचारणा, फक्त तिलाच ऐकू जाईल अशी केली. सुवर्णमतीचा गोरामोरा झालेला सुंदर मुखडा पाहत आपण एक गुण मिळवल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसला.

समोरचा खेळाडू तितक्याच ताकदीचा असला की खेळात काही वेगळीच मजा असते. इथे तुल्यबळ खिलाडी भेटला होता. सुवर्णमतीच्या डोळ्यातही एक खास चमक होती. खेळ रंगणार होता. विजय ती मिळवणारच होती पण आता विजय मिळाल्यानंतरची खुमारी वाढणार होती यात शंका नव्हती.