२९ जून २०६१ - काळरात्र - 5 Shubham Patil द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

२९ जून २०६१ - काळरात्र - 5

सक्षमच्या हातात एक बॉक्स होता. चावीने बंद केलेला बॉक्स होता तो. अनि खूप संतापलेला वाटत होता. त्याच्या कपाळावर जखम झाली होती आणि त्यातून रक्त येत होतं. सक्षमच्या हातातला बॉक्स बघून तो त्याच्या अंगावर धावून गेला आणि संतापात ओरडला, “तुला कुणी शहाणपणा करायला सांगितला होता? का उचललास तो बॉक्स?”

सारंग आणि शौनक त्याला मागे ओढत शांत बसवू लागले. अनि असा अचानक अंगावर धावून आल्यामुळे सक्षम घाबरुन अक्षरशः खाली कोसळला होता. रचनाने त्याला उठवण्यात मदत केली. अनिचा असा रुद्रवतार बघून सर्वजण घाबरून गेले होते. शौनक अनिला एका बाजूला घेऊन गेला आणि तिकडे काय पहिलं? असं विचारलं. अनि काहीच बोलायला तयार नव्हता. तो थोडा घाबरलेला वाटत होता. शौनककडून तो शांत होत नाही असं बघून आर्या अनिजवळ गेली. त्याचा हात हातात घेत ती काळजीयुक्त स्वरात म्हणाली, “अनि, काय झालं सांगशील का प्लीज? आणि तुझ्या कपाळाला काय झालं? काय लागलं दाखव बघू.”

अनि शांत झाला. त्याने मागे वळून बघितलं आणि सक्षमला “सॉरी” म्हटला. सक्षमने ‘इट्स ओके’ म्हणत स्मितहास्य केले आणि म्हणाला, “माझीच चूक होती. मी नको उचलायला हवा होता तो बॉक्स.” दोघं समोरासमोर आले आणि एकमेकांची गळाभेट घेतली. ताण कमी झाला आणि सर्वांना हायसं वाटलं.

सक्षमने सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, “आम्ही बाहेर पडलो आणि आपल्या घरच्या दोन घर दूर असलेल्या घराजवळ गेलो. तिथे हा बॉक्स ठेवला होता. मी खाली वाकून बॉक्स बघत होतो तेव्हा अनि त्या घरच्या खिडकीतून डोकावला आणि काही क्षण मध्ये बघून काहीतरी भयंकर बघितल्यासारखं बघून जोरात पळत सुटला. पळत असताना तो रस्त्यावर खाली पडला आणि त्याला लागलं. त्याच्या मागे मी धावत आलो. आता तरी सांग अनि तू असं काय पहिलंस की असा जिवाच्या आकांताने पळत आलास?”

“तुम्हाला ऐकायचंच आहे ना, तर ऐका मग, मी त्या घरात जाण्याआधी खिडकीतून पहिलं. ते या घरासारखंच घर होतं. मी हॉलच्या खिडकीतून बघितलं. मी एक टेबल बघितला, त्यावर वाईन ग्लास आणि कॅन्डल्स होत्या. तिथं आठ जणांचा डिनर सेट रेडी केलेला होता. आणि मी तेच बघितलं जे आता बघतोय....” असं म्हणून अनि डोक्याला हात लावून डायनिंग टेबलच्या एका खुर्चीवर बसला.

“एक, एक मिनिट. आता जे बघतोय तेच बघितलं म्हणजे? म्हणजे तिथं आपण होतो? आपण सर्व? जसेच्या तसे?” शौनकने विचारलं.

अनिने मान हलवून होकार दिला. सर्वजण गंभीर झाले.

“काय बरळतोयस अनि. तू हेच घर किचनच्या खिडकीतून बघितलं असशील. तिथं तू आणि सक्षम होता का?” सारंगने अनिला विचारलं.

“मी तेच सांगतोय तुम्हाला. मी हे घर ओलांडून दोन घरं पुढे गेलो आणि हॉलच्या खिडकीतून बघितलं. हॉल आणि किचनची खिडकी न समजण्याइतका दूधखुळा नाहीये मी. मला माहितीये तुम्ही मला वेड्यात काढाल म्हणून मी तुम्हाला संगत नव्हतो.” अनि जोरात ओरडला. सर्वजण शांत झाले. काही वेळ असाच गेला.

सक्षमने आणलेला बॉक्स डायनिंग टेबलवर ठेवलेला होता. तो लॉक होता. शौनकने आर्याकडे पिन मागितली. तिने लगेच केसांतली पिन काढून दिली. शौनक पिन वापरुन बॉक्सचं लॉक उघडायला जाणार तोच अनिने त्याला तसं करण्यास मनाई केली. पण शेवटी सर्वांच्या हट्टापुढे नमत त्याने परवानगी दिली. शौनकने पिन लावली आणि लॉक उघडलं गेलं. हंसीकाने शौनकच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याला सावकाशपणे बॉक्स उघडायला सांगितला. त्याने बॉक्स उघडला. सर्वांच्या नजारा त्या बॉक्सवर होत्या. सर्वांचं कुतूहल जागृत झालं होतं. बॉक्समध्ये एक ‘रूबिक्स क्युब’ होता. सोबत एक एन्व्हलप सुद्धा होते. एकामागून एक करत सर्वांनी रूबिक्स क्युब पाहिला आणि बाजूला ठेऊन दिला. आता एन्व्हलप ओपन करण्याची वेळ होती. शौनकने एन्व्हलप उघडलं. त्यात त्या सर्व आठ जणांचे फोटो होते.....

सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचे फोटो त्या बॉक्स मध्ये काय करत होते? त्यात हंसीका आणि शौनकचा फोटो आधी एकच असावा असं दिसत होतं. म्हणजे एका फोटोचे दोन तुकडे केले होते. एका तुकड्यात शौनक होता आणि दुसर्‍या तुकड्यात हंसीका... या सगळ्यात कहर म्हणजे सारंगचा फोटो लहान साईझचा होता आणि त्यावर तारीख होती, ‘२९ जून २०६१...’ म्हणजे तो फोटो आजच काढलेला होता. सारंगने तो फोटो पहिला, त्यात त्याची हेयर स्टाइल, कपडे सर्वकाही आजच्या लुकशी अगदी तंतोतंत मिळतं जुळतं होतं. इतकंचं काय तो ज्या ठिकाणी उभा होता ते ठिकाण सर्वांच्या नजरेसमोर होतं. त्याच्या मागे एक निसर्गचित्र होतं. जे आता या क्षणाला त्यांच्या समोरच्या भिंतीवर लावलेलं होतं. तो भांबावलेल्या नजरेने त्या फोटोकडे पाहू लागला. सर्वजण भेदरलेल्या नजरेने एकमेकांकडे पाहू लागले.

“सारंग, तुझा हा फोटो आज काढलाय हे मात्र नक्की आहे. अँड मेन थिंग इज दॅट यू आर लूकिंग अॅट द कॅमेरा पर्पजफुली,” आर्या म्हणाली.

“हो, ते तर आहे. पण मी आणि रचना सर्वांत शेवटी आलो. आमच्या आधी तुम्ही सर्वजण आला होतात आणि आपण लगेच पार्टीला सुरुवात केली. माझाच काय मी आल्यापासुन इथं कुणीच कुणाचाच फोटो काढला नाहीये. त्या फोटोत जे शर्ट आहे ते मी आज सायंकाळी इथं येण्याच्या आधी घेतलंय.” सारंग प्रश्नार्थक मुद्रेने म्हणाला.

त्याच्या ह्या प्रश्नाचं कुणाकडेही उत्तर नव्हतं परत सर्वजण शांत बसले. हंसीकाने सर्व फोटो हातात घेतले आणि नीट बघितलं. नंतर तिने फोटोंची मागची बाजू बघितली त्यावर लाल रंगाच्या मार्करने काही अंक लिहिले होते. तिने सर्वांना ते दाखवलं आणि आर्याकडे एक नोटबुक आणि लाल रंगाचा मार्कर मागितला. हंसीका एक निष्णात न्यूमरोलॉजिस्ट होती आणि तिचं कसब वापरुन तिला आता हे कोडं सोडावायचं होतं. आधी अंक आणि त्याखाली नाव असं एकामागून एक ती लिहीत गेली. सर्वांना त्यांच्या बर्थ डेट, पासपोर्ट नंबर आणि अजून बरेच क्लू विचारून झाले. तिने आतापर्यन्तचा तिचा सगळा अनुभव पणाला लावला पण त्या अंकांचं कोडं मात्र सुटत नव्हतं.

ती त्या गोष्टीवर विचार करत होती तोवर इकडे रचना आणि आर्या मिळून अनिची जखम स्वच्छ करत होत्या. जखम स्वच्छ झाल्यावर बॅडेज लावायचं होतं. तिथं कॉटन, रेग्युलर आणि प्लॅस्टिक बॅडेज होते. रचनाने अनिला कोणतं बॅडेज लावू असं विचारल्यावर अनि म्हणाला, “रेग्युलर.” जखमेला बॅडेज लावून झाल्यावर अनि, रचना आणि आर्या डायनिंग टेबलकडे गेले आणि सर्वजण मिळून फोटोमागे लिहीलेल्या नंबर्सचा विचार करू लागले.

सारंग एकाएकी उठला आणि किचनकडे जाऊ लागला. तेव्हा सक्षमने त्याला विचारलं, “काय झालं?”

“काय सुरू आहे मला काहीच समजत नाहीये. आय नीड वाईन.” असं म्हणत तो किचनमध्ये गेला. त्याच्यामागोमाग सक्षम, आर्या, रचना आणि अनि हे सर्वजण गेले.

हॉलमध्ये असलेल्या डायनिंग टेबलवर आता फक्त हंसीका आणि शौनक होते. हंसीका एकटकपणे त्या नंबर्सकडे बघत होती. ती अचानक शौनकचा चेहरा त्या फोटोंकडे वळवत म्हणाली, बघ हे माझं हँडरायटींग आहे. असं वाटतंय की हे मीच लिहिलंय. तिने फोटोवर लिहिलेले नंबर्स आणि नोटबूकमध्ये लिहिलेले नंबर्स आजूबाजूला ठेवले. शौनकचा त्याचा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. कारण ती दोघं ठिकाणची अक्षर अगदी शंभर टक्के सारखी होती.

“काहीच समजत नाहीये. काय सुरू आहे? आय एम लूसिंग माय माइंड.” हंसीका शौनकच्या डोळ्यात पाहत म्हणाली आणि तिने शौनकच्या खांद्यावर डोकं टेकवलं. शौनक तिच्या डोक्यावरुन हात फिरवू लागला.

तिकडे किचनमध्ये उर्वरित लोकं वाईनचे ग्लास रिकामे करत होते. काही वेळापूर्वी आनंद साजरा करण्यासाठी ते वाईन घेत होते आणि आता तणावाला आधार म्हणून...