13
दुसरे दिवशी प्रभातीच दोघे सारथ्यासह निघाले. सोबत अर्थातच काही सैनिकही होतेच. काही अंतर उरल्यावर दूताकरवी फौजप्रमुखांच्या भेटीची परवानगी मागावी आणि मग पुढे जावे असे ठरले.
प्रवासात दोघे कामापुरतेच बोलले. ठिकाण जवळ आल्यावर दूतास पाठवून परवानगी मिळवली आणि पुढे कूच केले. सुवर्णमती भेटीस येते आहे हे कळल्यावर जेन चा आनंद गगनात मावेना. तिने तिच्या स्वागताची जय्यत तयारी करवून घेतली.
मोटरगाडी बंगलीसमोर पोहोचताच सर्व औपचारिकता बाजूला ठेवून जेन धावतच बाहेर आली आणि आपल्या बालमैत्रिणीला घट्ट आलिंगन दिले.
सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची, सडपातळ बांध्याची गुलाबी गोरी जेन सुवर्णमतीपेक्षा चार बोटे उंचच होती. पण तरीही एखाद्या बाहुलीसारखी नाजूक आणि सुंदर होती.
चंद्रनागाची तिच्यावर खिळलेली नजर सुवर्णमतीच्या नजरेतून सुटली नाही.
सर्वजण आत आले. दोघी मैत्रीणींना किती बोलू आणि किती नको असे झाले होते. मग सुवर्णमतीने तिची आणि चंद्रनागाची ओळख करून दिली. चंद्रनाग विलायतेत शिक्षण घेऊन आले आहेत हेही सांगितले.
तेवढ्यात लॉर्ड येत असल्याची वर्दी आली. लॉर्ड सुवर्णमतीस ओळखत होतेच. विवाहाबद्दल त्यांनी तिचे अभिनंदन केले. चंद्रनागाची ओळख करून घेतली. दोघे काहीवेळ बोलले. मग लॉर्ड सुवर्णमतीस तिच्या मातापित्यांविषयी, गंगानगरीविषयी विचारपूस करू लागले आणि जेन आणि चंद्रनाग यांच्या विलायतेविषयी गप्पा रंगल्या.
भोजन झाल्यावर सुवर्णमतीने खास मेजवानीविषयी सांगून दोघांनाही आग्रहाने येण्याचे निमंत्रण दिले. चंद्रनागानेही अगत्याने निमंत्रण दिले आणि जेनला खास आमंत्रण दिले.
मग अचानक सुवर्णमती म्हणाली की “आपण शेषनगरी येणारच आहात तर मी आताच जेनला आमच्यासवे घेऊन जाते. मेजवानीपूर्वीचे काही दिवस आम्हा मैत्रिणींना एकत्र घालवता येतील. आता परत तुम्ही या बाजूला केव्हा याल देवासच ठाऊक. कृपया आपण संमती द्यावी”. यावर लॉर्ड म्हणाले “विचार तुझ्या मैत्रिणीस, तिची इच्छा असेल तर माझी ना नाही.” दुसऱ्या दिवशी जेनसह सर्व निघाले.
परतीच्या प्रवासात चंद्रनाग बराचसा मोकळा झाला होता. मग बराच वेळ विलायतेविषयी गप्पा होत राहिल्या. परतीचा प्रवास बराच सुखकर झाला.
शेषनगरीस आधीच दूत पाठवून जेनच्या येण्याची खबर पोहोचली होती. तिच्या राहण्याची सोय सुवर्णमतीच्या कक्षाशेजारच्याच कक्षात करण्यात आली. काही सेविका तिच्यासाठी तैनात करण्यात आल्या. आल्याबरोबर सुवर्णमतीने शेषनाग आणि राणीसरकारांची भेट घेऊन, त्यांना न विचारता परकीय पाहुणीस महाली आणल्याबद्दल क्षमा मागितली. परंतु राज्यहिताच्या दृष्टीने ते योग्यच ठरेल अशी ग्वाहीही दिली. चंद्रनागाचा बदललेला नूर भोजनसमयी सर्वानाच सुखद धक्का देऊन गेला. प्रथमच सूर्यनागाच्या चेहऱ्यावरचा ताणही काहीसा सैलावला.
सौमित्रा आणि जेनची गट्टी जमण्याची लक्षणे दिसू लागली, फक्त अडचण होती भाषेची. मग सुवर्णमती म्हणाली धाकट्या कुंवरनी दुभाष्याची जबाबदारी घ्यावी. जी चंद्रनागाने आनंदाने स्विकारली.
हे सर्व बोलणे होत असताना सूर्यनागाची नजर सुवर्णमतीवर खिळली होती. तिचा हा कोणता नवा पवित्रा आहे हे त्याच्यासारख्या मुरब्बी मुत्सद्यालाही लक्षात येत नव्हते. वरवर पाहता तरी हे सर्व राज्यहिताचे, चंद्रनागाची मन:स्थिती सुधारण्यास पोषक, असेच सर्व ती करत आहे असे भासत होते. पण ज्या सुवर्णमतीस तो ओळखत होता, तिची, ही केवळ धूळफेक असण्याचीच शक्यता जास्त वाटत होती. पण मग खरा हेतू काय असावा? विचार करकरून मस्तक दुखू लागले पण खरे काही कळेना. आता हिच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागणार असे दिसते. त्याने तसे करण्याचे मनोमन ठरवले.
दुसऱ्याच दिवसापासून सुवर्णमतीने आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार, सौमित्रा जेनला शेषनगरीची महत्वाची स्थळे दाखवू लागली. सोबत दुभाष्याचे कार्य करण्यास चंद्रनाग होताच.
इकडे मेजवानीची संपूर्ण जबाबदारी सुवर्णमतीने आपल्या शिरी घेऊन स्वत:ला कामात इतके गुंतवून घेतले की दुसऱ्या कोणत्याही विचारास वावच मिळू नये. तिच्या आजपर्यंतच्या विलायती वाचनाचा पुरेपूर उपयोग तिने या मेजवानीसाठी करण्याचे ठरवले. योजना तयार झाली की प्रथम ती त्याच रात्री जेन आणि चंद्रनागास वाचून दाखवे, त्यांचे मत विचारे आणि त्यात आवश्यक ते बदल करी. तिच्या कामाचा आवाका पाहून सूर्यनागही आश्चर्यचकित झाला.
मेजवानीचे पदार्थ, पेय, त्यांना वाढण्याची आणि खाण्याची विशिष्ट पद्धत, मेज सजविण्याची पद्धत, यासाठी लागणारे विशिष्ठ, तज्ञ आचारी, वाढपी, यांची नियुक्ती. भोजनानंतर नृत्य..... इथे तिची गाडी थोडी अडखळली ... मग अर्थातच जेन आणि चंद्रनाग मदतीस आले. विशिष्ठ संगीत, ते वाजवणारे वादक ...... सूची वाढत होती आणि त्याबरोबर सुवर्णमतीचे कामही.
मग जेन म्हणाली “ज्यांच्या विवाहाप्रित्यर्थ ही मेजवानी आहे, त्या वधुवरांना नृत्य करणे बंधनकारक आहे.” सुवर्णमती म्हणाली “मला हे विलायती पद्धतीचे नृत्य नाही करता येत.” त्यावर चंद्रनाग म्हणाला “परंतु तसे न करणे शिष्टाचारास धरून होणार नाही. मी आणि जेन एक दोन दिवसात तु्म्हा दोघांना शिकवू हा नृत्यप्रकार.” तेवढ्यात सूर्यनाग कक्षात आला. मग जेन आणि चंद्रनागाने त्यास वरवधूच्या आवश्यक नृत्याविषयी सांगितले.
सूर्यनागाने फक्त एक छद्मी हास्यने भरलेली नजर सुवर्णमतीकडे टाकली. तिच्या ती जिव्हारी लागली. डोळे भरून येतात की काय अशी भिती वाटली. मग विषादाची जागा प्रचंड संतापाने घेतली. घसा खाकरून ती म्हणाली , "कुंवर किती व्यस्त आहेत तुम्हाला माहीतच आहे आणि या मेजवानीच्या बाकीच्या तयारीत मलाही सवड मिळणे कठीण. शिवाय, मी एकवेळ त्वरेने नृत्य आत्मसात करेनही, परंतु कुंवरना ते कितपत शक्य होईल......," असे म्हणून ती काही क्षण थांबली. "यामुळे आम्ही दिलगीरी व्यक्त करू पाहुण्यांसमोर" असे म्हणून तिने एक आव्हानात्मक नजर सूर्यनागाकडे टाकली. इतर कोणताही प्रसंग असता तर सूर्यनागासारखा स्थिरबुद्धी अशा जाळ्यात नक्कीच सापडला नसता. परंतु प्रेमज्वर, वर संशयाच्या जंतुने बाधित, तो झट्कन म्हणाला "तशी शिष्टाचाराची गरजच असेल तर करू आम्ही नृत्य". जेन आणि चंद्रनागासारख्या सरळ मनाच्या व्यक्तींना हे अंतर्प्रवाह लक्षात येणे शक्यच नव्हते. ते दोघेही आनंदले. मग रोज रात्री नृत्यसराव करण्याचे नक्की करण्यात आले.
प्रत्येक दिवशी शेषनाग आणि राणीसरकारांना सुवर्णमती सर्व गोष्टींचा आढावा देई. सासूसासरे बहूवर बेहद्द खुश होते.