सुवर्णमती - 14 Mrs. Mrinmayee Shirgaonkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सुवर्णमती - 14

14

आता काही वेळेस चंद्रनाग आणि जेन दोघेच घोडसवारीस जाऊ लागले. रात्री भोजनानंतर जेन आणि चंद्रनाग नृत्याचे धडे या दोघांना देऊ लागले. प्रथम ते काही पावले नाचून दाखवत आणि मग या दोघांना करावयास सांगत.

प्रचंड अवघडलेल्या स्थितीत दोघेही नृत्याचे धडे गिरवू लागले. जेन शेवटी म्हणाली, “कुवंर ती पत्नी आहे तुमची. हक्काने कवेत घेवू शकतां तुम्ही.” चंद्रनाग आणि जेन यावर दिलखुलास हसू लागले. सूर्यनाग आणि सुवर्णमतीने मात्र गोरेमोरे होऊन एकमेकांकडे पाहिले. मग क्षणात त्यांनी नजरा दुसरीकडे वळवल्या.

कधीकधी रात्री तिघे मेजवानीविषयी चर्चा करत तेव्हा सूर्यनागही तपशील पाहू लागला, काही वेगळे वाटले तर बदल सुचवू लागला. राज्यासाठी, ही मेजवानी महत्वाची आहे हे त्याला कोणी वेगळे सांगण्याची गरज नव्हती.

एकदा दोघेच कक्षात एकटे असताना सुवर्णमती म्हणाली, “मेजवानी दरम्यान लॉर्ड कार्टन यांच्याशी आपला अधिक परिचय झाला तर बरे होईल. सध्या आपल्या दोन्ही राज्यांच्या दृष्टीने त्यांचा परिचय असणे फार महत्वाचे आहे. ही मैत्री अधिक घट्ट व्हावी यासाठी काही योजना मनी आहे, आपली संमती असेल तर सांगेन.” यावर सूर्यनाग काही बोलणार एवढ्यात सेवक, राजाजींनी बोलावणे केले असल्याचा निरोप घेऊन आला आणि बोलणे तिथेच थांबले.

सुवर्णमतीच्या डोक्यात काय शिजतंय ते जाणून घेण्याची सूर्यनागाला प्रचंड उत्सुकता होती. ‘राज्यहिताच्या नावाखाली ही आपल्यावर काही दबाव तर आणणार नाही ना लॉर्डतर्फे ? तसे केले तर नंतर पस्तावेल. पण ते न कळण्याइतकी मूर्ख नाही वाटत ती. कारण हे परकीय कोणाचेच सगे नाहीत.’

पण आपणहून त्याने परत विषय काढला नाही. त्याने तिच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होतेच. तिच्या कक्षातून बाहेर जाणारा एक न एक कागद तपासला जात होता. बऱ्याचदा तिच्या दालनात चाललेले बोलणे तो बाहेरून ऐकत राही. कधी आतील दालनात उपस्थित असे पण दालन बाहेरून बंद दिसे. त्याच्या हाती मात्र एवढे करूनही काही लागत नव्हते.

इकडे मेजवानीचा दिवस जसजसा जवळ येत चालला तशी चंद्रनागाची हुरहूर वाढली. मेजवानीनंतर जेन वडिलांबरोबर निघून गेली असती. पण त्याला काय इलाज होता? शेवटी न राहवून तो सुवर्णमती बरोबर बोलण्याचा विचार करू लागला. आणि तशी संधीही लवकरच चालून आली.

जेन सौमित्रासह बाहेर बगिच्यात झोके घेत होती. सुवर्णमती आपल्या कक्षाबाहेरील दालनात काही लिहीत बसली होती. चंद्रनाग तेथे आला आणि त्याने सरळच विषयाला हात घातला. म्हणाला, "तू मला राज्यनाचक्कीच्या भितीने डावललेस आणि मी पार भरकटून गेलो. सर्व सोडून परदेशी जाण्याचा मानस राजाजींना सांगितला. विवाहापर्यंत थांबण्याची त्यानी अट घातली, म्हणून थांबलो. तद्नंतर इथे राहणे मरणप्राय वाटत होते. मग जेन भेटली आणि पुन: जगण्यास अर्थ मिळाल्यासारखे वाटले. आता परत तेच घडणार, मेजवानीनंतर ती निघून जाईल, यावेळेसच्या माझ्या भावना फार तीव्र आहेत. यातून सावरणे मला शक्य होणार नाही. का माझ्याच बाबतीत हे असे घडत राहते?"

त्यावर सुवर्णमती म्हणाली, "चंद्रनागा, आपण मला आपले मनोगत आपुलकीने सांगितलेत, तर एक कबुलीजबाब मलाही द्यायचा आहे. माझी आपल्यावर कधीच प्रीति नव्हती. अगदी कळायला लागल्यापासून मी आपल्या बंधुंच्या कर्तृत्वाच्या, हुशारीच्या, न्यायशास्त्रातील पारंगततेच्या कहाण्या किस्से ऐकत आले आणि त्यांची जणू भक्तच बनले. पंचमनगरीचे आक्रमण आणि तहासाठी त्यांनी ठेवलेली अट, यातून कुंवरनीच आम्हास सोडवले. त्यानंतर तर मी मनोमन त्यांनाच वरले. त्यांचाच प्रस्ताव माझ्यासाठी यावा यासाठीच मनोकामना केली. परंतु भेटीला आलात तुम्ही दोघे. आल्या क्षणापासून ते माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करत होते. तुमच्या बंधूंचा 'स्व' थोडासा डिवचावा या हेतूने मी तुमच्याशी जरा अधिक हसून बोलून वागत राहिले हे खरे. आपण शर्यत लावल्यावर राजकुवराना राहावणार नाही, आणि ते आपणहून शर्यतीत सामील होतील असा अंदाज मी बांधला, परंतु त्यांनी तो खोटा ठरवला. अत्यंत वेगाने घोडे दौडत असताना राजकुंवर पाठीमागून का होईना येत आहेत ना हे पाहण्यासाठी मी मान वळवली आणि तोल जाऊन पडले.

त्यादिनी वनमंदिरी जे घडले तो केवळ अपघाताचा परिणाम होता. आपण मला कवेत घेतले, भयभीत अवस्थेत मी तशीच काही काळ का होईना थांबले, आणि त्याची मला लगेचच पुरेपूर जाणीव होऊन, माझी मलाच शरम वाटली. आपण मात्र त्यास प्रीत समजलात. अर्थात यात तुमची काहीच चूक नव्हती.

विवाहप्रस्तावानंतर तडक मला भेटावयास आलात. तेव्हा तुम्हाला खरे सांगून टाकावे असा विचारही मनी आला. परंतु तुमची उत्कटता आणि बोलण्यातील आवेग पाहून, रागाच्या, दु:खाच्या भरात तुम्ही काही विपरित करू नये म्हणून तुमचा भ्रम तसाच ठेवणे उचित वाटले. आणि आता मागे वळून पाहताना केले ते योग्यच होते असे वाटते. कारण आज तुम्हाला खरी प्रीत आणि आकर्षण यातील फरक समजू लागला असेल अशी आशा करते. अर्थात त्या खोटे बोलण्याची, तुमच्या बरोबर नाटकी वागण्याची, पुरेपूर शिक्षा मला मिळालीच आहे". खिन्नतेने सुवर्णमतीचे मन भरून आले.

चंद्रनाग म्हणाला, “म्हणजे मी समजलो नाही, कसली शिक्षा?”

“सध्या ते महत्वाचे नाही. आणखी एक सांगते, राग मानू नये, आपली आणि जेनची भेट मी जाणीवपूर्वकच घडवून आणली. आपल्या दोघांमधे स्नेहबंध निर्माण होतील अशी खात्री पहिल्यापासून मला वाटत होती.

आता प्रश्न आहे जेनचा. जेनलाही तुम्हाविषयी तेच वाटते का? जे तुम्हास वाटते आहे? जर खात्री नसेल तर खात्री करून घ्या. विलायतेत पुरूषाने स्त्रीस मागणी घालायची पद्धत आहे, हे मी तुम्हास सांगावयास नको. अर्थात प्रथम स्वत:च्या भावना तपासून पाहा. कारण मी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे आपणांवर प्रथम अधिकार राज्याचा, मग मातपित्यांचा आणि शेवटी आपला स्वत:चा. जेनचा विवाह आपल्या सोबत होणे राज्याच्या दृष्टीने फारच हितावह आहे. ते काम तेवढे सोपेही नव्हे. पण त्यासाठीचे सर्वतोपरी प्रयत्न मी करेन. परंतु आपणा दोघात वितुष्ट येणे राज्याच्या दृष्टीने भयंकर हानीकारक ठरेल. म्हणून, मनाशी नीट विचार करून, मगच पुढचे पाऊल उचला. शिवाय जेन माझी अतिशय लाडकी सखी आहे. एकदा उचललेले पाऊल, मागे घेता येणार नाही हे ध्यानी असावे. तिने स्वीकार केला तर पुढचे माझ्यावर सोपवा".

चंद्रनाग या विलक्षण स्त्रीकडे पाहतच राहिला. मग काही विचार करून बाहेर पडला. त्याची चाहुल लागताच बाहेरून इतका वेळ सर्व ऐकणारी व्यक्ती, पट्कन दरवाजाआड गेली आणि नंतर चंद्रनाग बाहेर पडताच विरूद्ध दिशेने दिसेनाशी झाली.

काही वेळाने नित्याप्रमाणे जेन आणि चंद्रनाग मेजवानीविषयी चर्चा करण्याच्या वेळेस कक्षात आले. परंतु येताच जेनने तिला आलिंगन दिले आणि ‘चंद्रनागाने प्रस्ताव दिला आणि आपण तो स्वीकारला असून आता लॉर्डची परवानगी घेणे कसे महत्वाचे आहे’ हे सांगितले. सुवर्णमतीने तिला दीर्घ आलिंगन देऊन दोघांचे अभिनंदन केले. तिच्या योजना मूर्तरूप घेऊ लागल्या होत्या. फक्त एक सोडून.

मग सुवर्णमतीने दोघांनाही सर्व समजावले. मेजवानीच्या दुसऱ्या दिवशी चंद्रनागाने लॉर्डकडे त्यांच्या लेकीचा हात मागावा असे सुचवले.