पुनर्भेट भाग २
थोड्याच वेळात सुजाता आली ..
दोघी कामात गर्क होऊन गेल्या
यानंतर सहा कधी वाजले तिला समजलेच नाही .
सुजाता आणि ती दोघी दुकान बंद करून बाहेर पडल्या .
सुजाता जवळच रहात होती ,रमाचा निरोप घेऊन ती निघून गेली .
उद्या रविवार असल्याने आता सोमवारीच दोघी भेटणार होत्या .
रविवारी तेथील कॉलेज शाळा बंद असत .
शिवाय रविवारी रमाला इतर कोरडे पदार्थ ,त्यांची तयारी ,आणि ते तयार करणे ही कामे असत .
मेघना पण रविवारी घरीच असे .
त्यामुळे रमा रविवारी दुकान बंदच ठेवत असे .
रमा घरी पोचली तेव्हा मेघना काही वाचन करीत बसली होती .
आईला बघताच ती उठली आणि म्हणाली ,
“आलीस आई ,हातपाय धुऊन घे मी चहा टाकते तोवर .”
रमा हसून आतल्या खोलीत वळली .
रोज संध्याकाळचा हा मायलेकींचा शिरस्ता होता .
आई आली की मेघना चहा करीत असे ,दोघी चहा घेत दिवसभराच्या गप्पा करीत .
कपडे बदलुन बाहेरच्या खोलीत आलेल्या रमाच्या हातात मेघनाने मस्त आले घातलेला
वाफाळलेला चहा आणून दिला .
लेकीने प्रेमाने दिलेला तो गरम चहा पोटात जाताच रमाचा शीण पळून गेला.
थोडा वेळ दोघी इकडच्या तिकडच्या गप्पा मारीत बसल्या .
नंतर मात्र रमा संध्याकाळच्या स्वयंपाकाकडे वळली .
मेघनाचा नुकताच अकरावीचा निकाल लागला होता .
ती चांगल्या मार्काने पास झाली होती .
सध्या सुटीचे दिवस होते पण बारावीचे क्लासेस मात्र सुरु झाले होते.
सकाळी अकरा ते चार तिचे क्लासेस चालायचे.
फिजिक्स, केमिस्ट्री ,गणित तीन विषयांचे क्लास असत .
ते संपले की क्लासजवळ असलेल्या कॉलेजच्या स्टडीरूम मध्ये मेघना अभ्यास करीत बसे .
त्यांचे घर दोनच खोल्याचे आणि लहान असल्याने अभ्यासाला जागाच नव्हती घरात.
तशात घर एका वाड्यात होते त्यामुळे सतत लोकांची वर्दळ ,मुलांचे खेळणे ,गप्पा चालू असत .
अभ्यासाला लागणारी शांतता,एकाग्रता तिथे अजिबात मिळत नसे .
म्हणून मेघना तिचा अभ्यास स्टडी रूममध्येच आटोपून सात साडेसात पर्यंत घरी येत असे .
तिची मैत्रीण रितूपण तिच्यासोबतच अभ्यास करीत असे .
खरेतर रितुचा मोठा बंगला होता ,तिच्याकडे तिची स्वतंत्र रूम होती .
पण तिला मेघनासोबत अभ्यास करायला आवडत असे .
अगदी शाळेच्या पहील्या इयत्तेपासून दोघी पट्ट मैत्रिणी होत्या .
शिवाय मेघना खुपच हुशार असल्याने तिच्यासोबत अभ्यास करणे रितुलाही फायद्याचे वाटे .
एकमेकींची घरे जरी दूर असली तरी त्या कायमच सोबत असत .
नुकतीच रितुच्या वडिलांनी तिला स्कुटी घेऊन दिली होती .
त्यामुळे कुठेही जायचे असले की रितू स्कुटी घेऊन येत असे
आणि परत जाताना मेघनाला घरी सोडुन जात असे .
त्यांच्या मैत्रीमुळे रमा निर्धास्त असे .
मेघना आणि रितूची मैत्री अगदी बालपणापासून पक्की होती .
रितुच्या घरचे लोक तर मेघनाला अगदी रितुच्या बहिणीप्रमाणे समजत .
सुंदर ,हुशार आणि गुणी असणारी मेघना रितुपेक्षा जास्तच लाडकी होती त्यांच्या घरात .
ही मात्र खरोखरच एक जमेची बाजु होती रमाच्या आयुष्यात !!
आतापर्यंत रमाने आयुष्यात खुप काही पाहिले आणि भोगले होते .
आता फक्त आणि फक्त मेघनाच्या चांगल्या आयुष्याची स्वप्ने ती पाहत होती .
अतिशय हुशार असलेल्या मेघनाला चांगले शिक्षण द्यायचे होते .
यासाठी ती दिवसरात्र कष्ट करीत होती .
सासर माहेर दोन्हीकडून तिला कोणाचाच आधार नसल्याने
प्रपंचाची धावपळ तिलाच करावी लागत असे .
हे दुकान चालू केल्यापासून मात्र घरखर्च भागून चार पैसे ती शिल्लक टाकू शकत होती .
मेघना पण गुणी मुलगी होती .
आईच्या कष्टांची तिला चांगली जाण होती .
आईला शक्य तितकी मदत करण्याकडे तिचा कल असे .
रमा शक्यतो तिच्या मदतीला नकार देत असे .
आपल्या नशिबी आले ते आपल्या लेकीने करू नये असे तिला वाटे .
तिने फक्त स्वतःच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे एवढीच तिची इच्छा होती .
शिवाय मेघना घर आवरणे इतर किरकोळ कामे हे तर करीतच असे .
इतकी मदत रमाला भरपूर वाटत असे .
स्वयंपाक झाल्यावर रमाने लेकीला गरम गरम भाकरी वाढली .
आणि मग दोघींची जेवणे झाली .
टेबल आवरून दोघी बाहेरच्या खोलीत टीव्ही पाहत बसल्या .
दहाच्या सुमारास दोघीही झोपून गेल्या .
दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजता रमाला नेहेमीप्रमाणे जाग आली .
शेजारी मेघना गाढ झोपली होती ,झोपेत तिच्या अंगावरचे पांधरूण सरकले होते .
ते सारखे करीत रमा हलकेच उठली .
आणि आतल्या खोलीत जाऊन तिने मधले दार बंद केले .
आज तिला बेसन लाडू आणि चिवडा करायचा होता .
जसे जसे दुकानातले पदार्थ संपतील तसे ती थोड्या प्रमाणात आणि ताजेच तयार करीत असे .
त्यामुळे पदार्थांची चव टिकून रहात असे .
तिने स्वतःचा चहा करून घेतला आणि त्यानंतर आंघोळीला गेली .
आंघोळ झाल्यावर तिने एकीकडे चिवड्याची तयारी करीत
लाडूसाठी बेसन भाजायला घेतले .
बेसन भाजून झाल्यावर ते गार करीत ठेवले
आणि दुसरीकडे मोठ्या पातेल्यात चिवडा फोडणीला टाकला .
चिवडा झाल्यावर तो थंड करायला ठेवला आणि लाडू वळायला घेतले .
पन्नास साठ लाडू होईपर्यंत घड्याळाचा काटा नऊ कडे सरकला होता .
आता मेघनाला उठवावे असे म्हणून रमाने दरवाजा उघडला .
नुकतीच मेघना उठून अंथरूण पांघरूण घडी करीत होती .
रमाला पाहताच ती म्हणाली ,
“अग आई मला उठवले का नाहीस ,नऊ वाजले बघ ..
“तु छान झोपली होतीस आणि आज रविवार आहे क्लास नाही तुझा
म्हणून नाही उठवले ग ..”
चहा टाकू का तुझा ?दात घासून घे पाहु ..”
आत शिरताच मेघना म्हणाली .”आहा काय भन्नाट वास सुटला आहे ग
या वासानेच झोप चाळवली बघ माझी..
टेबलावर असलेला लाडू चिवडा बघताच ती म्हणाली
“अग एवढे सगळे कधी केलेस ?
मला का नाही उठवलेस ग मदतीला ?
“असु दे ग मेघु एकाच दिवस असते सुट्टी जरा निवांत आवरून घे ,आराम कर “
मेघनाला आत्तापर्यंत रमाने कोणतीच झळ लागू दिली नव्हती .
आपल्या नशिबात असे लहानपण आणि तरुणपण सुद्धा नव्हते .
तिला आठवले ..
एका छोट्या तालुक्याच्या गावात तिचा जन्म झाला होता .
तिला थोडेसे समजु लागले तोवर एका मोठ्या अपघातात एकाच वेळेस
तिचे आई आणि वडील दोघेही दगावले .
त्यानंतर रमाचा सांभाळ तिच्या काका काकूंनी केला .
काका थोडे भविष्य वगैरे पहायचे ,जमेल तशी भिक्षुकीची कामे करायचे
बाकी उत्पन्नाचे साधन काहीच नव्हते .
मित्राच्या एका वाड्यात ते दोन खोल्यात अगदी नाममात्र भाड्याने रहात होते .
त्यांच्या मित्राने त्यांच्यावर हे उपकारच केले होते .
रमाचे वडील मात्र चांगल्या सरकारी नोकरीत होते .
त्यांचा पगार चांगला असल्याने ते पूर्वी काका काकूंना सर्व मदत करीत .
एका गावात जरी रहात नसले तरी त्यांनी नाते टिकवले होते .
चुलत भाऊ असला तरी वडील तसे कधी मानत नसत.
घरच्या सारखेच नाते ठेवले होते त्यांनी .
म्हणूनच त्यांच्या आकस्मिक मृत्युनंतर काका ताबडतोब तिला घरी घेउन आले होते
काका काकूंना अपत्य काहीच नव्हते .
काका रमाच्या वडिलांच्यापेक्षा वयाने दहा पंधरा वर्षांनी मोठेच होते .
त्यामुळे रमाच्या आई वडिलांच्या मृत्यू वेळी त्या दोघांनी पन्नाशी ओलांडली होती .
रमा तेव्हा पाचव्या इयत्तेत होती .
काका काकू दोघेही प्रेमळ होते .
वडिलांचा आलेला थोडा पैसा आणि काही साठवलेली पुंजी मिळुन तिघांचे बरे चालू लागले .
रमा आपल्या भावाची “अमानत” आहे
तिचा सांभाळ करणे तिला शिकवणे ही आपली जबाबदारी आहे याची काकांना जाणीव होती .
क्रमशः