पुनर्भेट भाग ९ Vrishali Gotkhindikar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुनर्भेट भाग ९

पुनर्भेट भाग ८

रमा मात्र हे अजिबात ऐकेना हे पाहून आता काकांनी या संभाषणात भाग घेतला .

“रमा पोरी ऐक तुझी काकु काय म्हणते ते ..

तुझ्या पगारात कर्जाचा हप्ता नको लावुन घेऊस ..

आता तुझ्या पदरात ही लहान लेक आहे ..

तुझा नवरा परत कधी येईल ठाऊक नाही

उगाच तुझ्या कमाईत खंड पाडून घेऊ नकोस ..

मध्ये मेघना आजारी होती तेव्हा किती गोंधळ झाला होता आठवते न ?

तुझी नोकरी असल्याने तु दवाखान्याचे बिल भागवू शकलीस

नाहीतर आमची काहीच ऐपत नव्हती ग तुला मदत करायची .

आणि लग्नाआधी तूच तर हे घर चालवत होतीस .

आता सुद्धा बारीक सारीक मदत असतेच की ग

तुझी काकू म्हणते ते ठीकच आहे तुझ्या अडचणीला आम्हाला पण उपयोगी पडू देत “

काकांचे बोलणे ऐकुन रमा खरोखरच भानावर आली .

दोन लाखाच्या कर्जाचे हप्ते जर तिच्या पगारातून गेले असते

तर ती काय खाणार होती ?
आणि मेघनाला कशी मोठी करणार होती ?

सतीशने तर सगळाच खोटा डोलारा उभा केला होता .

भाड्याचे घर ,खोटे दागिने, ..

भविष्यासाठी तिच्याकडे तिची नोकरी आणि नियमित येणारा पगार इतकेच तर होते .

तशात सतीशचे चमत्कारिक वागणे ,त्याची व्यसने ..

त्याच्याकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करणेच चुकीचे होते ..

तरी तिने अजुन काकांना सतीशचे भाड्याचे घर ,त्याने केलेले खोटे दागिने,त्याची व्यसने
याविषयी काहीच सांगितले नव्हते .
इतकेच नाही तर त्याची मानसिक अवस्था पण लपवली होती .
सध्या तरी काकांची टेन्शन्स वाढवण्यात काहीच अर्थ नव्हता .
मग रमाने ती काकुने दिलेली ती पेटी ताब्यात घेतली .
आणि मेघनाला घेऊन घरी गेली.
दुसऱ्याच दिवशी मेघनाला सकाळी काकुच्या घरी सोडुन
तिने स्वतःच्या ऑफिसमध्ये रजा कळवली .
आणि सतीशच्या ऑफिसमध्ये गेली .
मोहनला भेटून तिने सर्व सांगितले आणि मोहनला तिच्या सोबत सोनाराकडे येण्याचा आग्रह केला .
त्या छोट्या गावात सोनाराचे एकच दुकान होते
मागच्या वेळेस सोनाराकडे गेली असताना तिचे दागिनेच खोटे निघाले होते .
त्यामुळे तिच्या मनात टेन्शन होते .
शिवाय हा असा व्यवहार करताना सोबत कोणी पुरुष माणूस असेल तर बरे .
मोहन तयार झाला आणि साहेबांना सांगुन ऑफिसमधून बाहेर पडला .
दोघे मिळुन सोनाराकडे गेले .
काकूचे दागिने जुने असल्याने सोने चोख होते आणि दागिने वजनदार होते .
बांगड्या आणि अंगठी मिळुन दोन लाखाच्या वर रक्कम मिळाली .
ती दोन लाखाची रक्कम मोहनच्या ताब्यात ती देऊ लागली .
पण मोहनने सांगितले हे पैसे तिनेच येऊन साहेबांना द्यावे आणि
सदर रक्कम घरीच मोहनने ठेवली होती असे सांगावे .
ते जास्त सयुक्तिक ठरेल.
दोघे परत ऑफिसमध्ये गेले ,रमाने ती रक्कम साहेबांना देऊन सांगितले की
सदर रक्कम बँकेत भरण्यास मोहनला उशीर झाला होता .
म्हणून त्याने ही रक्कम घरी आणली होती .
रक्कम त्याने घरीच ठेवली होती ,तिने शोधल्यावर ती सापडली होती .
खुद्द सतीशची पत्नी असा जबाब देत होती
आणि ती एक महिला असल्याने साहेबांनी ते मान्य केले .
व सदर प्रकरण मिटवले गेले .
रमाने पुन्हा पुन्हा मोहनचे आभार मानले .
हे प्रकरण मोहनच्या सहकार्याने कसेतरी मिटले होते .
आता मोहन तिला म्हणाला सतीशला जाऊन आता तीन चार दिवस होऊन गेलेत .
थांबून चालणार नाही तो हरवल्याची पोलीस तक्रार करायला हवी .
पोलिसांचे नाव काढताच रमाला परत “हबकी” बसल्यासारखे झाले .
रमाची ती अवस्था पाहून मोहन म्हणाला
मी येतो तुमच्यासोबत...
आज सतीश हरवल्याची पोलीस तक्रार नोंदवून टाकू .
त्याचे बरोबर होते ,शिवाय या प्रकरणात काकांच्या जीवाला त्रास देण्यात अर्थ नव्हता .
त्यांचे वय आणि मनाची हल्लक अवस्था पहाता अशा गोष्टीत त्यांना गुंतवता येत नव्हते .
त्यामुळे रमा मोहनसोबत पोलीस चौकीत गेली .
रमाच्या मोबाईल मध्ये सतीशचा फोटो होताच .
तो दाखवून पोलीस तक्रार नोंद केली .
पोलिसमध्ये मोहनची ओळख असल्याने फारसे प्रश्न विचारले गेले नाहीत .
रमा तर इतकी बुजली होती की तिच्या वतीने बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मोहननेच दिली .
आता घरी जा ,पत्ता लागला की कळवतो असे पोलिसांनी सांगितले.
दोघे तेथुन बाहेर पडले .
रमाच्या डोळ्यात पाणी आले ती मोहनला म्हणाली ,’खुप केले तुम्ही माझ्यासाठी .
मोहन म्हणाला “वहिनी मला जे जे शक्य ते तुमच्यासाठी मी केले .
काळजी करू नका आणखी काहीही मदत लागली तर सांगा .
तुमचा भाऊच समजा मला “!!!
मोहनचे वारंवार आभार मानून रमा घरी आली.
घरी आल्यावर या सोनेविक्री व्यवहारातले दोन लाख रुपये ऑफिसात परत केल्यावर काही पैसे
उरले होते ते पैसे तिने काकुच्या ताब्यात दिले .
“हे ठेव आता उरलेले पैसे ..
तुमच्या दोघांची खुप मदत झाली ..
नाहीतर मी काय करणार होते ?
“पोरी असे बोलु नकोस ग आम्हाला जे शक्य होते ते केले आम्ही “
मग रमाने सतीशच्या हरवण्याची तक्रार नोंदवल्याचे काकाकाकूंना सांगितले .
काका काकु पण गहिवरले ..
या सर्व गोष्टीत मोहनची फार मदत झाली असे रमाने सांगितल्यावर
काका म्हणाले खरेच मोहनच्या रूपाने एक देवदूतच तुझ्या मदतीला आला ग !
मेघनाला घेऊन रमा आपल्या घरी निघून गेली .
झोप तर आता कायमचीच उडाली होती .
येणारा रोजचा दिवस काय घेऊन येईल सांगणे मुश्कील होते .
तिने तसेच डोळे बंद करून घेतले .
प्रत्येक नवा दिवस काहीतरी नवेच घेऊन येत होता .
त्यानंतर रोजचे रुटीन सुरु होतेच .
सकाळी मेघनाला काकुकडे सोडुन ती ऑफिसला जात असे .
ऑफिस झाले की संध्याकाळी परत मेघनाला घेऊन घरी ..
सतीश नसल्याने काकु तिला जेऊन जायचा आग्रह करीत असे .
एकटीसाठी तरी ती काय करणार होती ?
आणि घरात एकटीला तिला घासही गिळत नव्हता .
त्यामुळे ती सर्व आवरून घरी येत असे.
घरी आल्यावर एकटीला तिला ते घर खायला उठत असे .
तशात आजूबाजूस शेजापाजार पण नव्हता .
रविवारी पण ती काकुकडेच थांबू लागली,
कारण मेघना एकटी असली की रडायला सुरु करीत असे .
तिला कायम आजूबाजूला माणसे हवी असत
दिवसे दिवस ती आणखी चलाख होऊ लागली होती .
कधी कधी बाबा, बाबा असे म्हणून ती बाबाची आठवण काढत असे .
सतीशने वाढदिवसाला दिलेली तीनचाकी सायकल ती आता हळूहळू चालवायला लागली होती .
काका काकूंना पण आजी ,अब्बा असे हाक मारायला लागली होती .
नक्षत्रासारखी मुलगी ...पण तिचे कौतुक म्हणावे तसे होत नसे .
तिघांचेही मन नाराज आणि धास्तावलेले होते .
त्यांनाच वाईट वाटत होते ,पण मेघना मात्र खुष असायची .
पोरीचे कौतुक करायला तिचा बाबा हवा होता ..
पण बाबाच कुठे परांगदा झाला होता कोण जाणे ..
दर आठ दिवसांनी मोहन पोलीस स्टेशनला चौकशी साठी जात होता
पण अजुन काहीच पत्ता लागत नव्हता
आता तर एक महिना उलटून गेला होता .
अजुन किती दिवस वाट पहायची हे काहीच आकलन होत नव्हते .
आला नाही तर काय करायचे हे ही समजत नव्हते .
तरी बरे पैशाची व्यवस्था झाल्याने आणि मोहनच्या सहकार्याने बाकीचे संकट तरी टळले होते .
मागच्या वेळेस असाच बेपत्ता झाला होता तेव्हा जुगारात हरला होता
आणि ते पैसे मागायला ते गुंड घरी आले होते .
पैसे परत केले नसते तर त्यांनी सतीशला जीवे मारण्याची धमकी दिली होती .

क्रमशः