पुनर्भेट भाग ६
तिने सतीशच्या ऑफिसला चौकशी केली तर तो रजेवर होता आहे समजले .
जवळ जवळ तीन चार आठवडे तो परतलाच नाही
रमाची अतिशय वाईट अवस्था झाली तेव्हा .
काका काकुंना पण काही सांगायची सोय नव्हती .
नंतर एके दिवशी सतीश परतला..
जणु काय काहीच घडले नाही असे वागू लागला .
इतके सगळे झाल्यावर रमाला आता आपले आणि मेघनाचे भविष्य अंधारात दिसायला लागले .
सतीश मात्र मजेत होता ,
कधीकधी त्याचे पिणे वगैरे कसे काय पण बंद असायचे .
त्यावेळी रमाला तो म्हणत असे ,”तु काळजी नको करू तुला पाहिजे ते दागिने ,घर सगळे सगळे
मी तुला घेऊन देईन .
आपण आपल्या मेघनाला खुप सुखात ठेवू .
पण आता सतीशच्या शब्दावर विसंबून राहता येणार नव्हते .
मेघना मात्र आता हळूहळू मोठी होऊ लागली होती
खुपच चलाख आणि देखणी झाली होती .
तिच्या कौतुकात सतीश रममाण होत होता .
अशातच मेघनाचा पहील्या वर्षाचा वाढदिवस जवळ आला .
सतीशचे खुप बेत चालू होते त्या विषयी .
बोलल्याप्रमाणे त्याने मेघनाचा वाढदिवस थाटामाटात केला .
ऑफिसमधले लोक,त्याचे कुठले कुठले मित्र त्याने बोलावले होते .
त्या लहान गावात एकच मोठे कार्यालय होते .
तिथेच त्याने हा कार्यक्रम केला होता .
काका काकु ,वाड्यातील माणसे,रमाच्या ऑफिसमधल्या मैत्रिणी ..
कोणा कोणालाही बोलवायचे बाकी ठेवले नव्हते.
मेघनाला महागडे कपडे ,रमाला आणि काकूला साडी , काकांना कपडे
मोठा केक ,उत्तम जेवण ,आलेल्या मुलांना भेटी
मेघनाला एक तीनचाकी सायकल सुद्धा आणली होती लाल रंगाची
रमा म्हणाली सुद्धा ,”अरे इतक्यात कशाला सायकल आणलीस
अजुन किती लहान आहे ती ..”
त्यावर सतीशचे उत्तर होते माझ्या मुलीला कोणतीही गोष्ट ती मागण्यापुर्वीच
मिळायला हवी .
कार्यक्रमाचा नुसता थाट उडवून दिला होता त्याने!!!!
काका काकु तर थक्कच झाले .
जावयाचे कौतुक करीत राहिले .
रमाने नशीब काढले म्हणून आनंदित झाले .
या खर्चासाठी इतके पैसे कोठून आणलेस या रमाच्या प्रश्नावर सतीश चूप होता .
परत काही दिवस सुरळीत गेले .
मेघना आता बोलायला लागली होती .
बाबा, दादा ,आबा असे छोटे छोटे शब्द तिच्या तोंडून ऐकताना सतीश
हरखून जात होता .
असेच एके दिवशी संध्याकाळी रमा स्वयंपाक करीत होती .
सतीश मेघनासोबत खेळत होता .
त्यांच्या घरात इतर सामानापेक्षा मेघनाची खेळणीच जास्त होती .
इतक्यात घराची बेल वाजली.
सतीशने दार उघडताच दोन आडदांड माणसे घरात शिरली .
काय रे इथे येऊन लपला आहेस होय ?
आमचे पैसे टाक आधी ..कुठ आहेत पैसे
असे ते दोघे सतीशला विचारू लागले
सतीश त्यांना पाहूनच घाबरला होता .
त्याची बोबडी वळली होती .
तो तोंड लपवून मटकन खाली बसला होता .
रमाने पटकन मेघनाला उचलले आणि कोपऱ्यात उभी राहिली .
सतीश काहीच उत्तर देत नाही असे पाहून त्यांनी रमाकडे पैशाची विचारणा केली .
कसले पैसे? काय ?असे विचारताच त्यांनी सांगितले
मागील काही आठवडे सतीश त्यांच्या गावी येऊन राहिला होता .
हे गाव थोडे लांब अंतरावरचे होते .
त्याच्या तिथल्या वास्तव्यात तो रोज जुगार अड्ड्यावर जात होता .
प्रथम काही रक्कम तो जिंकत होता .
नंतर मात्र हारत गेला होता आणि तिथे दोन लाख हारून जवळ परत करायला पैसे नसल्याने
तो तिथून पळून गेला होता .
हे सगळेजण त्यांच्या पैशासाठी त्याला शोधत होते .
बरेच दिवस शोध घेतल्यावर त्यांना पत्ता लागला होता की सतीश या गावात रहात आहे .
म्हणून ते ताबडतोब त्याच्या मागावर आले होते .
त्यांनी सतीशला बजावून सांगितले ही रक्कम व्याजासहित अडीच लाख होते आहे .
जर पंधरा तीन आठवड्यात ही रक्कम मिळाली नाही तर
सतीशचे हाल कुत्रा खाणार नाही .
बरोबर पंधरा दिवसांनी ते येतील पैसे मागायला तेव्हा पैसे तयार हवेत .
सतीशला गुपचूप होकार देण्याशिवाय पर्याय नव्हता .
मग ते दोघे निघून गेले .
म्हणजे मागल्या महिन्यात तिकडे होता तर सतीश ..
आता ही जुगाराची आणखी एक नवीन गोष्ट ऐकल्यावर रमा काहीच बोलु शकत नव्हती .
अडीच लाखाचा नुसता आकडा ऐकुन रमा हक्काबक्का झाली .
त्यानंतर सतीश गप्पच होता .
तो जेवला आणि झोपून गेला ,जणु काय काहीच घडले नाही.
मेघनाला झोपवून रमा न जेवताच रात्रभर जागीच राहिली .
विचारांनी तीच डोके फुटायची पाळी आली होती.
प्रत्येक वेळेस सतीशच्या नवनवीन करामतीची ओळख होत होती .
हे सगळे साध्या सुध्या रमाच्या विचारापलीकडचे होते.
आता ही रक्कम कोठून आणणार होता सतीश ..?
रमाच्या तर आटोक्या पलीकडे होते सर्वच ..
ती तर कोठून उभी करणार ही रक्कम ?
रात्रभर डोळ्याला डोळा नाही लागला तिच्या
सतीश काहीच नाही घडल्यासारखे शांत झोपून गेला होता.
सकाळी उठल्यावर अगदी नेहेमीसारखाच सतीश मेघना सोबत खेळत बसला .
सतीश अरे तुला ऑफिस नाही का आज ?
आज मी जाणार नाही ऑफिसला .
मेघनाला मी सोडतो काकांकडे तु जा ऑफिसला .
दोन सेकंद रमा बघतच राहिली त्याच्याकडे .
“तु ऑफिसला नाही जाणार मग कुठे जाणार आहेस ?
आधीच मागल्या महिन्यात रजेवर होतास न “
असे विचारताच ,”तुला काय करायचे आहे मी कुठे जातो त्याच्याशी?
आता तो भडकला होता .
“बर ते जाऊ देत पण तु त्या पैशाचे काय करणार आहेस ?
“कोणते पैसे ?त्याचा निगरगट्ट प्रश्न ...
“अरे काल ती माणसे तुझ्याकडे पैसे मागायला आली होती ते विचारते आहे मी “
“तुला काय पंचाईत त्याची ?तु आणणार आहेस का कुठून माझी गरज भागवायला ?
शब्दाला शब्द लागुन वाद नको व्हायला
आणि सकाळी सकाळी इतका वेळही नव्हता .
म्हणून पुढे काही न बोलता तिने मेघनाची पिशवी आवरून तयार ठेवली .
आपला डबा आणि पर्स घेऊन ती बाहेर पडली .
ऑफिसमध्ये तिचे लक्ष लागेना .
पुढे काय होणार ते समजेना ..मनात नुसता गोंधळ माजला होता .
शेवटी ती लवकर ऑफिसमधून निघाली आणि काकुकडे गेली .
मेघना झोपली होती .
तिला अचानक आलेली पाहून काकू म्हणाली
का ग बरे नाही की काय तुला ?
आणि चेहेरा पण उतरला आहे ..डोके दुखते आहे का ?
थांब चहा करून देते तुला आले घालून ,
घे आणी पडून राहा थोडा वेळ .
मेघना उठली की नाही झोपू द्यायची तुला .
रमाने काही न बोलता निमुट चहा घेतला आणि ती पडून राहिली .
तासाभराने मेघना उठली ,आईला बघुन ती तिलाच बिलगली .
मग थोडा वेळ थांबून रमा आपल्या घरी गेली .
त्या दिवशी परत रात्री उशिरा सतीश पिऊन आला .
आता त्याच्याशी या अवस्थेत बोलायचे बळ मेघनाच्या अंगात नव्हते .
तो पण तसाच झोपून गेला .
सकाळी मात्र रमाने विषय काढलाच ..
तेव्हा तो म्हणाला बघूया कुठे मिळतात का मागून ..
त्यावर रमा चिडून म्हणाली
“पण तु इतका जुगार खेळलास कशाला ..?
तुला आपली, आपल्या संसाराची ,आपल्या मुलीची काहीच काळजी नाहीय का ?
एक तर आपल्याजवळ काही पैसा नाही कुणाचे पाठबळ नाही .
त्यात तुला ही व्यसने ,कुठून आणणार आहोत आपण पैसे ?
कोणाच्या जीवावर आपण आपल्या मुलीचा सांभाळ करणार आहोत ?”
“हे बघ आता उगाच मला फालतुचे काही ऐकवत नको बसू
त्यांनी वेळ दिलाय न पंधरा दिवस बघीन मी कसे करायचे ते .
तु तुझ्यापुरते बघ ..यात तुझी काहीच मदत नाही होणार मला .”
असे म्हणून सतीशने रमाला झिडकारले.
म्हणजे अजुन पंधरा दिवस ही टांगती तलवार राहणार होती डोक्यावर .
काय करावे हेच समजत नव्हते रमाला
डोक्याचा नुसता भुगा झाला होता तिच्या
क्रमश: