पुनर्भेट भाग ५
मेघना रितूकडून परत घरी आली तेव्हा आठ वाजले होते .
आली तेव्हा खुपच खुशीत होती ती !!
“आई इतकी मजा आली न रितुकडे .
आणि जेवण सुद्धा मस्त केले होते मावशींनी, खुप पदार्थ केले होते .
संध्याकाळी पण आम्हा मुलींसाठी बाहेरून पिझा ,केक, पास्ता असे पण मागवले होते .
अगदी पोट फुटेपर्यंत खाल्ले बघ .
आणि खुप दंगा ,धमाल केली ग ..
कसला जबरदस्त वाढदिवस साजरा झाला रितूचा ..!!
बर आई तु जेवलीस का ?
आणि हा केक दिलाय बघ तुझ्यासाठी डब्यात रितुने
रितुच्या आई तर बरेच पदार्थ देत होत्या
पण तु फक्त केक दे म्हणलीस न ”
“हो ग झाले माझे जेवण आत्ताच ,पण खाते मी आत्ता ....
उरलेला उद्या खाईन ”
असे म्हणून रमाने थोडा केक खाल्ला आणि डबा आत ठेवून दिला .
“आई तुझ्या लक्षात आहे का पुढल्या शनिवारी माझा पण वाढदिवस आहे ते “
आईच्या शेजारी बसून तिच्या गळ्यात हात टाकत मेघना म्हणाली .
“म्हणजे काय मेघु ?ही का विसरायची गोष्ट आहे ?
काय हवेय तुला या वर्षी माझ्याकडुन ?”
“खास काही नको ग ,एखादा चांगला ड्रेस घेईन
पण माझ्या मैत्रीणी मला पार्टी मागत आहेत ग
खुप दिवस झाले माझ्या मागे लागल्या आहेत .
“पार्टी करता येईल ग मस्त ,खर्चाची पण फारशी चिंता नाही
पण आपल्या या लहान घरात ते कसे शक्य होईल ग ?
रमाच्या स्वरात थोडी काळजी आणि निराशा होती .
लेकीची ही इच्छा आपल्याकडून पुरी होत नाही याचे वाईट वाटले तिला
“मला समजते आहे ग आई म्हणूनच मी त्यांना अजुन होकार नकार नाही सांगितला .
पुढील वर्षी बारावी झाल्यावर आमचे सगळ्यांचेच मार्ग वेगळे होतील
ही शेवटची पार्टी त्या मागत आहेत ,आणि मलाही द्यावी वाटते आहे
मलाही वाटते आहे सर्वांच्या सोबत हा वाढदिवस साजरा करावा“मेघना म्हणाली.
“तु नाराज नको होऊ ,आपल्या घरी तर नाही करू शकत आपण पार्टी
पण तु एखाद्या चांगल्या हॉटेलात घेऊन जा त्यांना ,करू आपण खर्च “
आईच्या बोलण्यावर मेघना म्हणाली,
“खुप खर्च होईल ग आई हॉटेलमध्ये ...माहित आहे न तुला
आणि खरेतर घरी तु सर्व इतके छान करतेस
बाहेर कशाला पैसे घालवायचे असे वाटते “
तिचे असे शहाण्यासारखे बोलणे ऐकुन रमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला .
“किती शहाणी आहे ग माझी बाळ..
पण जाउदे न ते मेघु तुझ्यापुढे पैशाचे काय ग ?
कर प्लानिंग पार्टीचे .
आहेत पैसे माझ्याकडे बर ..
अगदी दणक्यात साजरा करू बघ तुझा वाढदिवस
तुला माहित आहे मी कधी हॉटेलमध्ये जात नाही
पण तुझ्या वाढदिवसाला नक्की येणार बर का हॉटेलमध्ये ..
डोळे मिचकावत बोलणाऱ्या रमाकडे बघताच ..
मेघनाने आईचा गालगुच्चा घेतला
“आणि मेघु मोह्नमामाला पण फोन कर आधीच ..
तो तर येतोच दर वर्षी तुझ्या वाढदिवसाला .”..
“आमचे फोन तर आधीच झालेत आई ..येणार आहे तो ..”
असे म्हणून खुष होऊन कपडे बदलायला आत गेली .
गेली दहा वर्षे मोहन नियमित मेघनाच्या वाढदिवसाला गिफ्ट घेऊन येत असे .
कित्येक वर्षाचे ते नाते अजूनही त्याने त्याच ताजेपणाने जपले होते
आता रमाचे पुन्हा विचारचक्र चालू झाले .
आज भूतकाळ तिची पाठ सोडत नव्हता .
आणि तिला आठवला मेघनाचा पहिला वाढदिवस !!
किती हौस होती सतीशला मेघनाच्या वाढदिवसाची ..
मुळात मेघनाच्या जन्माच्या वेळेस तो खुप हरखला होता
त्याला हवी होती तशी मुलगी झाली होती .
ती सुद्धा हुबेहूब त्याच्यासारखीच दिसणारी ..
सतीशसोबत लग्न झाल्यावर मेघना खरोखर खुप खुष होती .
लग्नानंतर दोन महिने सर्व ठीक चालले होते .
आणि रमाला दिवस राहिले ,सतीशच्या आनंदाला पारावर नव्हता .
आणि त्याच रात्री तो भरपूर पिऊन घरी आला .
त्याला असे पिऊन आलेले रमाने पहिल्यांदाच पाहिले .
पिऊन तर्र असा त्याचा अवतार, त्याचे बोलणे ,पाहून ती घाबरली होती .
जेवण तयार होते ते सोडुन त्याने शरीरसुखाची मागणी केली .
तिच्या होकार नकाराची पर्वाही न करता त्याने तिचे कपडे अक्षरश: ओरबाडून काढले
आणि तिच्यावर तुटून पडला .
तो मात्र झोपून गेला नंतर ,पण रमा हमसाहमशी रडत राहिली .
एवढे दिवस आपल्याला फुलासारखे जपणारा,काल बाळाच्या आगमनाची बातमी ऐकुन
आनंदाने आपले कौतुक करणारा हाच का तो ?असे तिला वाटले .
पण मग दुसऱ्या दिवशी मात्र त्याने रीतसर माफी मागितली .
पुन्हा असे करणार नाही असेही म्हणाला .
पण तरीही अधून मधून हे घडत राहिले .
रमाच्या लक्षात आले हे दारूचे व्यसन सुटणारे नव्हते .
कोणाला सांगणार होती ती हे ?
आपल्याच मनात ही गोष्ट ठेवून ती शांत बसली .
हळूहळू पैशाची अडचण भासू लागली,कारण सतीश हल्ली घरखर्चाला काही पैसेच देत नव्हता .
इतके दिवस तिने तिच्या पगाराला हात लावला नव्हता .
पण आता नाईलाज होता .
एरवी ठीक असणारा सतीश पैसे मागितले की आरडा ओरडा करीत होता .
ठीक असताना मात्र तिची काळजी,बाळाची काळजी दाखवत होता .
पुढचे मोठे मोठे प्लान करीत होता .
रमाच्या बाळंतपणाची वेळ जवळ आल्यावर काका स्वतः घरी येऊन तिला घेऊन गेले .
तेव्हा सतीशने सज्जनपणाचा“बुरखा” घेतला होता .
काकांची ऐपत नव्हती पण रमाचे पहिले बाळंतपण करायची त्या दोघांना हौस होती.
आता रमा काकांच्या घरी राहायला गेली .
तिथूनच ती नोकरीला जात होती .
सतीश दिवसाआड तिची खुशाली विचारायला येत असे .
काका काकु पण त्याचे जावई म्हणून कौतुक करीत होते .
पोटातल्या बाळाच्या काळजीने रमा चूप होती.
एके दिवशी रमाने एका सुंदर गोंडस मुलीला जन्म दिला .
मुलीच्या जन्माची बातमी ऐकताच सतीश धावत पळत आला होता .
भरपूर बर्फी ,मुलीला खेळणी ,कपडे घेऊन आला .
खुप कौतुक केले तिचे .
दोन महिने होताच त्याने गडबड सुरु केली ,रमाला घरी चल असा आग्रह करू लागला
तु घरी आलीस की मी आता दारू सोडुन देणार आहे असे सांगू लागला .
अगदी त्या वेळेस रमाला त्याने तसे वचन सुद्धा दिले.
रमाने विचार केला आपल्या तिकडे जाण्याने आणि मुलीच्या पायगुणाने याची दारू सुटणार असेल
तर उत्तम होईल .
तिने पण काका काकूंकडे घरी जायची इच्छा व्यक्त केली .
इतक्या लहान बाळाला घेऊन इतक्या लवकर कशाला घरी परत जातेस?
अजुन तुझी तब्येतही सुधारली नाही .
असे काका काकूंनी तिला टोकले सुद्धा .
खरेच या काही महिन्यात तिची तब्येत खुप खराब झाली होती .
काकूला वाटत होते बाळंतपणाच्या त्रासामुळे असेल पण खरी गोष्ट फक्त रमालाच ठाऊक होती .
पण मग जावयाच्या आग्रहामुळे काकांनी बाळाचे बारसे घरीच थोडक्यात आटोपून घेतले.
बलाचे नाव सातीशनेच मेघना ठेवले त्याच्या आवडीचे म्हणून
आणि मेघनाला घेऊन रमा तिच्या घरी परतली .
घरी आल्यावर काही दिवस सतीश अगदी सांगितल्याप्रमाणे वागत होता .
त्याने खरेच दारू सोडली असावी असे वाटत होते .
रमाने आणखी दोन तीन महिने रजा वाढवुन घेतली होती.
तिची रजा तशी शिल्लक होतीच.
मुलीच्या कोडकौतुकात मात्र सतीशने काहीच कमी ठेवली नव्हती .
फार म्हणजे फार लाडकी होती मेघना त्याची.
“प्रिन्सेस” म्हणायचा लाडाने तो तिला ..
मेघना सहा महीन्याची झाल्यावर रमा तिला काकुकडे ठेवून ऑफिसला जाऊ लागली .
काकूला तसे फारसे काम होत नव्हते .
पण तिला हौस होती रमाच्या बाळाला सांभाळायची .
मग रमानेच दिवसभर एक मुलगी काकुकडे कामासाठी ठेवली.
मदतीला आणि बाळाकडे लक्ष ठेवायला.
त्यानंतर परत सतीश पिऊन यायला लागला .
एक दोन दिवसाआड घरी आरडा ओरडा कधी मारहाण,असा तमाशा होऊ लागला .
एकदा तर सतीश घरी आलाच नाही ..
क्रमशः