पुनर्भेट भाग ३ Vrishali Gotkhindikar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुनर्भेट भाग ३

पुनर्भेट भाग ३

रमाही खुप हुशार होती .

लहान वयात पाहिलेल्या आईवडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे जास्तच समंजस झाली होती .

अबोल असलेल्या रमाचे काका काकुंवर खुप प्रेम होते .

आई वडिलांच्या माघारी ते दोघेच तिची “दुनिया” होते .

उत्तम मार्काने रमा दहावी उत्तीर्ण झाली .

त्यानंतर तिने जिल्ह्याच्या गावी जाऊन आपले शिक्षण पुरे केले .

पदवीधर झाल्यावर नोकरी करावी आणि घरात हातभार लावावा असा तिचा विचार होता .

नोकरीसाठी जिल्ह्याच्या गावी जायची तिची इच्छा होती .

पण काकांना ते मान्य नव्हते .

रमाला ते आपल्यापासून लांब जाऊ द्यायला इच्छुक नव्हते .

आता काका काकू बरेच वृद्ध झाले होते .

त्यामुळे जी मिळेल ती नोकरी गावातच करावी असे त्यांचे म्हणणे होते .

मार्क्स चांगले असल्याने तिला घराजवळच एक बरी नोकरी मिळाली होती .

हे सगळे रमाला आत्ता आठवले ..

परिस्थितीच्या रेट्यामुळे तिला बालपण किंवा तरुणपण फारसे आनंदाने नाही काढता आले .

मेघनाला मात्र काही कमी पडू नये इकडे तिचा कटाक्ष असे .

विचार बाजूला ठेवून रमाने नाश्त्यासाठी पोहे करायला घेतले .

पोह्याच्या डिशमध्ये तिने मेघनाला एक लाडू पण वाढला .

“आई तु पण घे न एक लाडू ,कसला मस्त झालाय असे मेघनाने म्हणल्यावर

“नको ग सारखे ते पदार्थ करून माझी तर खायची इच्छा मरते बघ.

असे म्हणून तिने पोहे खायला सुरवात केली .

खाऊन झाल्यावर मेघना बाहेरच्या खोलीत गेली .
मैत्रिणीचा फोन होता त्यावर तिचे बोलणे चालू होते .
रमा पण बाहेर येऊन पेपर चाळत बसली .
“आज जेवायला काय करू ग मेघु ?
असे रमाने विचारताच मेघना म्हणाली,
“आई विसरलीस का आज रितूचा वाढदिवस आहे ते...
काल बोलले होते तुला मी .
आता माझे आवरून मी तिकडेच जाणार .
मला जेवायलाच बोलावले आहे तिकडे .
शिवाय संध्याकाळी आमच्या काही मैत्रिणींना तिने पार्टीला बोलावले आहे .
त्यामुळे मी जरा उशिराच घरी येणार आहे “
हे ऐकताच रमा म्हणाली, “हो ग तु बोलली होतीस मीच विसरून गेले बघ ..
जा तु ,घे आवरून ....
तिला गिफ्ट काय घेतले आहेस ?
एक रंगीत कापडात गुंडाळलेले खोके दाखवुन रमा म्हणाली ,
“हे बघ कालच आणले आहे ग ,तिचे आवडते सेंट ..
तुला काही पैसे हवेत का असे रमाने विचारल्यावर मेघनाने नकार दिला .
“आहेत ग पैसे तु दिलेले माझ्याकडे ,संपले की घेईन मागुन
असे म्हणून मेघना स्वतःचे आवरायला आत गेली .
दिलेले पैसे मेघना नेहेमीच नीट वापरत असे.

मेघना आवरून बाहेर आल्यावर रमा तिच्याकडे पहातच राहिली!!
गुलाबी रंगाचा सलवार कुर्ता ,त्यावर शोभेसे कानातले आणि गळ्यातले .
एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात ब्रेसलेट .
किती मोठी झालीय पोरगी ..!!
आणि केवढी सुंदर दिसते आहे
चेहेऱ्यावर फक्त हलकी पावडर ,डोळ्यात काजळ,आणि कपाळाला छोटीशी टिकली .
कोणत्याच मेकअपची हीला गरज नाही .
गोरा चमकदार रंग
उंचनिंच कमनीय बांधा
लांबसडक जाड पण रेश्मासारखे मऊ केस
मोठे मोठे काजळ घातल्याप्रमाणे वाटणारे डोळे
कमानदार गुलाबी जाडसर ओठ ..
आणि उजव्या गालावर थोडा खाली असणारा थोडा गडद तीळ
तिचे केस रमासारखे लांबसडक होते .
बाकी सर्व मात्र अगदी सतीशची प्रतिकृती ..!!
मेघनाच्या जन्माच्या वेळी तिच्या उजव्या गालावरचा पुसट तीळ पाहून तो सुद्धा म्हणाला होता .
बघ माझ्याप्रमाणे माझ्या लेकीला सुद्धा गालावर तीळ आहे की नाही ?
तिचे काळेभोर डोळे पाहूनच त्याने तिचे नाव मेघना ठेवायचे ठरवले होते.
मेघनाला पाहिल्यावर सतीशला ओळखणाऱ्या कोणालाही सहज समजले असते
की ही त्याचीच मुलगी आहे असे !!!
“सतीश” ..रमाचा नवरा आणि मेघनाचा पिता !
सतीशचे नाव तोंडात येताच आणि त्याची आठवण येताच रमाच्या तोंडात एक
कडवट चव गोळा झाली .
कशाला आली आपल्याला ही आठवण .....
“आई अग किती वेळ पहाते आहेस माझ्याकडे ...
काय झालेय तुला ?”
मेघनाचे शब्द ऐकुन रमा भानावर आली .
“काही नाही ग तुलाच बघत होते ..
दृष्ट काढुन टाकावी की काय तुझी ...
असा विचार आला मनात ..”
“चल ग आई काहीतरीच तुझे ..इतका काही मी नट्टा पट्टा केलेला नाहीये .”
रमा हसली आणि तिचा गालगुच्चा घेऊन म्हणाली
“माझी परी आहेस तु ..लाडकी ..!!!
मेघना एकदम गोड हसली ..
“झाले का तुझे कौतुक ..जाऊ का मी आता ?
“थांब जरा ताजे लाडू आणि चिवडा देते केलेला
रितूला खुप आवडतो ..”
मग रमाने पाच सहा लाडू आणि थोडा चिवडा बॉक्समध्ये दिला बांधून .
खरेतर तुलाही बोलावले आहे रितुच्या आईने,पण तु येत नाहीस ना कुठेच कार्यक्रमाला .
“नको ग ..आणि मला आता बाजारात पण जायचे आहे.
जेवण करून निघेन .
रितूला फोन करून देईन मी आशीर्वाद “
“चालेल विसरू नकोस बर का ..
असे सांगुन चप्पल घालून पर्स घेऊन मेघना बाहेर पडली .
रमा पण स्वयंपाकाला लागली .
आता तिच्यापुरताच भात आमटी करायची होती .
आत्ताच दोन पोळ्या संध्याकाळच्या करूनच ठेवाव्यात .
मेघना आता संध्याकाळी सुद्धा काहीच जेवणार नाही .
स्वयंपाक आटोपून गेले म्हणजे बाजार पण होईल निवांतशीर
आले की जेवण करून पडता येईल जरासे .
अशा विचाराने रमा स्वयंपाकाला लागली .
पण सतीशचे विचार तिचा पिच्छा सोडेनात ..
सतीश म्हणजे तिच्या आयुष्यातले एक काळे “पर्व” होते .
मेघना सारखी देखणी आणि हुशार मुलगी सोडता
लग्न झाल्यापासुन आजपर्यंत त्याने फक्त डोक्याला ताप आणि तापच दिला होता .
कोणत्या मुहूर्तावर त्याच्याशी लग्नगाठ मारली गेली होती कोण जाणे....
धड चौकशी पण केली नव्हती त्याची काकांनी आणि ....आपणही .
काकांचे तेव्हा वय झाले होते आणि आपली जबाबदारी त्यांना पार पडायची होती .
पण आपण एवढ्या सुशिक्षित होतो ..
निदान आपण तरी पुढे होऊन त्या स्थळाची चौकशी करायला हवी होती.

त्याच्याविषयी लग्नानंतर एक एक समजायला लागल्यावर मग पश्चात्ताप झाला होता
पण काहीच उपयोग नव्हता आणि काही करता पण येत नव्हते
कारण एव्हाना मेघनाचा जन्म झाला होता .
रमाची अवस्था दगडाखाली हात अडकल्यासारखी झाली होती .
अचानक पोळीची वाफ हातावर आल्यावर रमाने स्स... हाय... असा उद्गार काढला .
आणि सतीशचे विचार डोक्यातून काढुन टाकायचा प्रयत्न करू लागली .
पण एकदा मन जे अस्वस्थ झाले होते ते परत जाग्यावर येईना .
आणि परत परत भूतकाळात जाऊ लागले .
एक वर्षभर नोकरी केल्यावर काकांचा आता लग्न कर असा तगादा रमाच्या मागे सुरु झाला .
शेजारी,पाजारी,ओळखीच्या लोकांकडे रमासाठी स्थळ पहा असे निरोप द्यायला त्यांनी सुरु केले
रमासाठी सतीशचे स्थळ आले तेव्हा ते नक्की कोणी सुचवले ते समजलेच नाही .
एके दिवशी सतीश स्वतःच एका मित्रासोबत घरी आला होता .
रमा तर घरी नव्हती.
काका काकूंवर मात्र त्याने आपली चांगलीच छाप पाडली .
उंचनिंच ,एकदम देखणा ,गोड बोलणारा ,एका सरकारी ऑफिसमध्ये नोकरीला असणारा
हा सतीश काकांना आवडला .
सतीश समर्थ असे त्याने आपले नाव सांगितले
मात्र सोबत घरचे कोणी कसे आले नाही असे विचारल्यावर
आपल्याला आईवडील नाहीत
आपण अनाथाश्रमात वाढलो आहोत .
आपण आपली काळजी घ्यायला समर्थ असल्याने हे आडनाव आपण घेतले आहे
असे त्याने स्पष्टच काकांना सांगितले.
काकांना त्याचा प्रांजळपणा पटला आणि आवडला .
अनाथ असणे ही काही त्या व्यक्तीची चुक तर होऊ शकत नाही ना .
मग त्याने आपली सर्व माहिती स्वतःच काकांना सांगितली ..

क्रमशः