मी आणि माझा मोगरा Supriya Joshi द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी आणि माझा मोगरा

"अती तिथे माती" ही म्हण किती बरोबर आहे असे आजकाल वाटायला लागले आहे. लहानपणापासूनच फुलांची भयंकर आवड. पण ह्या फुलांचा इतका भार होईल असे कधी वाटलेच नव्हत. आईने म्हणे मोगऱ्याच्या फुलाचे छोटेसे रोपटे आणून लावले आणि लगेच माझी चाहूल लागली. मी पोटात असताना माझी जितकी काळजी घेत होती तितकीच काळजी त्या रोपट्याची पण घेत होती. हळूहळू ते रोपटे माझ्याबरोबर वाढत होते. ज्या दिवशी माझा जन्म झाला त्यादिवशी त्या रोपट्यावर एक सुंदरशी कळी उमलली. मी जशी जशी मोठी होत गेले त्याबरोबर त्या रोपट्याचे झाडात रूपांतर होऊन अनेक फुलं यायला लागली होती. आई सांगायची तू लहान असताना त्या रोपट्याजवळ नेले की तू लगेच खुश व्हायचीस, कितीही रडत असलीस तरीही एक मिनिटात शांत व्हायचीस. बहुतेक मागच्या जन्माचे कुठलेतरी नाते घेऊन आम्ही दोघांनी ह्या जन्मात प्रवेश केला असावा.

शाळेत फुलं माळायची परवानगी नव्हती म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी आईने वर्गात सोडताना फुल काढून घेतले तर मी तापाने फणफणले होते म्हणे. त्यादिवसापासून आई रोज माझ्या केसांत फुल लावून नंतरच बाहेर कुठेही पाठवायची. माझी ही फुलांची आवड दिवसेंदिवस वाढतच होती. कुठेही फुले दिसली किंवा त्याचा सुगंध जरी आला तरी मी मोहरून जायची, तिथेच घुटमळायची. त्यामुळेच घराशेजारी असलेल्या बागेत तिथेच राहणाऱ्या माळीकाकांची खूप छान ओळख झाली होती. आम्ही दोघांनी मिळून ती बाग इतकी फुलवली की, नुसती मुलांची खेळायची बाग न राहता, वेगवेगळ्या तऱ्हेची, दुर्मिळ फुलांची बाग म्हणूनपण प्रसिद्ध झाली. खूपजण नुसती फुलेपण बघायला येत असत. त्यामुळे तर माळीकाकांची मी अजूनच लाडकी नातं झाले होते. खूपदा ते आमच्या घरी येऊन आमची बाग पण फुलवत असत.

मोगऱ्याच्या फुलाचे झाड होऊन त्याला अनेक रोप येऊन तीपण मोठी झाली होती आणि त्याला अजून रोपं येत होती. लग्न झाल्यानंतर सासरी येताना आईने त्यातलेच एक रोप मला दिले. माझ्याबरोबर घरातलाच एक सदस्य माझ्याबरोबर राहायला येत आहे असे वाटत होते आणि त्याने मला वेळोवेळी आधारसुद्धा दिला. मनातले सगळे गुपित मी त्याला सांगू लागले आणि ते छोटेसे रोपं मला धीर देत मान डोलवत माझे ऐकून कित्येकदा मला धीर होते. बघता बघता त्या मोगऱ्याच्या झाडाला खूप कळ्या यायला लागल्या आणि त्याबरोबर सासरी मी सगळ्यांना आवडू लागले. फुलांना बघून सगळ्यांना आनंद होत होता पण ते इवलेसे रोप इतक्या फुलांचा भार कसे सोसवत असेल ह्याचा विचार मात्र कोणीच करत नव्हते पण छोट्याश्या रोपट्यांना खूप कळ्यांचा भार सोसवेनासा झाला आणि माझ्या डोक्यावर सर्वांनी चढवलेला तो फुलांचा मुकुट आतून थोडासा काटेरी आहे हे जाणवायला लागले. पण रोपटे आणि मी त्याचा भार सोसवत नसूनही सगळ्यांपुढे हसरा चेहरा ठेवून अति झाले असले तरीही त्याची माती होऊ नये ह्याची काळजी घेत होतो. पण त्याची झलक मात्र चेहऱ्यावर दिसू लागली होती. कितीही छान पेहराव केला तरीही कपाळावरच्या आठ्या आणि ‘हासुमागचे आसू’ हे लपवता येईनात. हळूहळू शेजारीपाजारी आपापसात कुजबुज सुरु झाली आणि सासरी सुनेला खूप त्रास देतात तरीही सून हसतखेळत असते ह्या चर्चेला उधाण आले. सासरकडची मंडळी इतकी चांगली असूनही आजूबाजूला चाललेली ही कुजबुज ऐकून हिरमुसली, उदास झाली. सगळ्यांचे काहीही गैरसमज होऊ देत आपण एकत्रच राहायचे हा विचार करून स्वतःलाच बळ देऊ लागले. ह्या माझ्या सख्याने मोगऱ्यानेपण माझी खूप साथ दिली. घरच्यांचे मन रमावे म्हणून बिचार्याने स्वतःवरचा अजूनच भार वाढवून पूर्ण झाड फुलांनी बहरून टाकले आणि खरेच त्या वासाने घरातली मंडळी थोडीशी का होईना पण सुखावत होती. स्वतःचे कौतुक करून घायला, छान छान म्हणवून घायला कोणाला आवडणार नाही. हळूहळू सगळ्या गैरसमजांना फुल्लस्टॉप लागला.
आतातर त्या भाराचीपण सवय व्हायला लागली. भरपूर फुले कोणाला आवडणार नाहीत. मग त्यासाठी थोडीफार तडजोड तर करावीच लागणार ना! उमलत्या कळ्या सोसता याव्यात म्हणून रोपाने आपला आकार वाढवला, फांद्या मोठ्या व्हायला लागल्या आणि त्याच्यात ताकत आणली त्याप्रमाणेच मी माझ्या मानेचा व्यायाम करून ती अशी कणखर बनवली कि कितीही फुलं डोक्यावर चढू दे त्याचा भार हा सहन झालाच पाहिजे किंबहुना त्याचा भार न जाणवता आनंदच व्हायला हवा होता.
आता तर ह्या फुलांच्या मुकुटामध्ये १ उमलत असलेला गुलाब आणि नाजुकश्या जाईच्या कळीने प्रवेश केला होता आणि त्याचा भार तर एकदमच कमी झाला. आणि त्याच वेळी झाड्याच्या बाजूला पण अजून २ रोपांनी जन्म घेतला होता.

सुप्रिया कुलकर्णी