आधार बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आधार

आधार
गेल्या आठवडाभरात ट्रेनिंग आटोपून मी संध्याकाळीच
ट्रेनिंग सेंटरवरून सांगली गाठली आठवडाभरात मी एवढा कंटाळलेला होतो,की आणखी एक रात्रसुध्दा ट्रेनिंग सेंटरवरच्या बोर्डिंगमध्ये काढण्याची माझी इच्छा नव्हती. मी बस स्टाॅडवर पोहचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. थोडंफार जेवून मिळेल त्या गाडीने मला सावंतवाडी गाठायची होती. त्यामुळे मी बसस्टॅडसमोरच्या हाॅटेलमध्ये जेवलो.तसाच घाई गडबडीत पुन्हा बसस्थानकावर आलो. गाडीची चौकशी केली तेव्हा कळले की सावंतवाडीला जाणारी गाडी साडेअकरा वाजता होती आता कुठे नऊ वाजले होते. दोन-अडीच तास गाडीची वाट पहावी लागणार होती. आधिच मी त्या निरस ट्रेनिंगमुळे कंटाळलो होता. त्यामुळे गाडी उशिरा येणार हे ऐकून मी वैतागलो. पण गप्प बसण्याखेरीज दुसरा कोणताच उपाय नव्हता. मी तिथेच बाकड्यावर बैठक मारली. बॅग बाजूला ठेवून मी गप्प डोळे मिटून काही क्षण तसाच राहिलो. ज्यावेळी मी कंटाळलेला असतो ;निराश असतो त्यावेळी डोळे मिटून गप्प राहतो.
थोडा स्थिर झाल्यावर मी डोळे उघडले. सभोवार नजर फिरवली. बस स्टेशन ही जागा गंमतीशीर असते.इथे सतत काही ना काही घडत असत.तर्हेतर्हेची माणसं इथ येतातक्षणभर पाय लावतात,पुन्हा निघून जातात.धावणे...सतत..धावणे हेच इथलं ब्रीदवाक्य. प्रत्येकाच्या येण्याला व जाण्याला काहीतरी कारण असत.माणसांची घाई-गडबड बघून माझा कंटाळा चटकन

दूर पळाला.अगदी त्रयस्थपने इथली धावपळ बघताना मला गंमत वाटायला लागली.मी कोण? कुठला? ही माणसं ना माझ्या ओळखीची..
ना मी त्यांच्या ओळखीचा.पण काही काळासाठी आम्ही एकमेकांशी जोडले गेलो होतो. आजच्या दिवसासाठी ती माणस माझ्या आयुष्याचा भाग बनून गेली होती.
स्टेशनच्या समोर रस्त्याच्या पलीकडे पोलिसचौकी होती.त्याच्या बाजूला चहाची टपरी होती.एक पानपट्टी स्टॉल सुरू होता. टपरीवाला चहा ओतता ओतता समोर उभ्या असलेल्या एका लुकड्या मुलावर डाफरात होता.
त्याच्या घोगर्या आवाजाने माझे लक्ष तिकडे गेले.
" अरे बाब्या पुन्हा आलास... चल....आता नाही मिळणार दूध. "
"मालक अस काय करताय...मला..नकोय.. वाघ्याला पाहिजे."
" आर... दिवसातून चार- चार वेळा नेतोयास दूध....आणि त्या कुत्र्याच्या घशात ओततोस..."
" मालक वघ्याला तुमच्याकडेच दूध खूपच आवडत...बघा..द्या ना जरा." तो पोरगा काकुळतीने विनवत होता.
" घे....घे..बाबा...तुला नाही देऊन काय करू! घाल त्या कुत्र्याच्या घस्यात एकदा!"
"मालक कुत्रा नाही तो...माझा वाघ्या हाय" दुधाने भरलेला फुटका कप घेता घेता तो पोरगा टपरीवाल्याला म्हणाला. त्यावर टपरीवाला खळखळून हसला. पण त्या मुलाकडे पाहताना माझ कुतूहल चाळवलं गेलं. तो मुलगा आठ- नऊ वर्षांचा असावा....सावळा वर्ण.... हाडकुळा बांधा....अंगावर जुनाट काळी हाफ पँट ...वर चॉकलेटी फटका शर्ट..केविलवाणा चेहरा. दुधाचा कप घेऊन तो पोरगा माझ्या समोरच पायात मान खुपसून झोप काढणाऱ्या एका भटक्या कुत्र्याापाशी आला. त्या पोराची चाहूल लागताच कुत्र्याने अंग चाळवले.
" वाघ्या...दूध पायजेल का नाही?"
त्याच्या आवाजाबरोबर कुत्रा झपकन उभा राहिला.शेपटी हलवत तो पोराचे पाय चाटू लागला.आता तो पोरगा माझ्या समोरच उभा राहिला होता.अगदीच ओंगळवाणा दिसत होता.कुणास ठाऊक त्याने शेवटची आंघोळ केव्हा केली होती? त्याच्या हाता - पायांवर वेगवेगळे डाग पडले होते.पण त्याच्या डोळ्यात चमक होती..अगदी भोळे व निष्पाप डोळे होते ते!कुत्र्याच्या पाठीवर थोपटून त्याने कप खाली ठेवला....कुत्र्याच्या पुढ्यात तो उकिडवा बसला. कुत्रा नव्हे तो वाघ्या ..होता. वाघ्या जीभ लांब करून दूध चाटू लागला. वाघ्याल दूध पिताना बघून तो पोरगा सुखावला.दूध पिणारा कुत्रा व त्याला थोपटनारा तो मुलगा..हे दृश्य विलक्षण बोलकं होत.
मी झटपट माझी बॅग उघडली.माझ स्केचबुक व पेन्सिल बाहेर काडली.कुत्र्याशी खेळणारा तो निष्पाप व निरागस मुलगा मला माझ्या वहीवर रेखाटायचा होता.रेखाटन करण्याचा मला छंद आहे.अनेक निसर्ग चित्रे,व्यक्तिचित्रे मी यापूर्वी रेखाटली आहेत.पण समोर असलेल्या दृश्या सारखं जिवंत, चैतन्यदायी दृश्य मला काधीच रेखाटायला मिळालं नव्हत.त्या मुलाच्या चेहर्यावरील भाव....कुत्र्याच्या डोळ्यातील कृतज्ञता...लगबग...त्याची हालचाल....त्यांना एकमेकांविषयी वाटणार प्रेम मला रेखाटायच होत.पण हे सारं मला रेखाटनात दाखवता येईल की नाही याची माझी मलाच शंका वाटत होती.पण मला ही संधी घालवायची नव्हती.ती जोडगोळी अजून काही काळ तशीच राहणार होती यात शंका नव्हती.माझ्यासाठी एवढा वेळ पुरेशा होता. स्केचबुकवर माझी पेन्सिल झपाट्याने फिरायला लागली.उभ्या - आडव्या रेषांनी मी मुलगा व कुत्र्याची स्थिती झटपट रेखाटली. आता माझ्या डोळ्यांसमोर तो मुलगा व तो कुत्रा एवढाच दृश्य होत.मघाचा माझा वैताग व,नैराश्य यांचा आता मागमूस पण नव्हता.
एव्हाना जवळच्या पोलिस चौकीतील हवालदार माझ्याजवळ येऊन उभा राहिला होता.कदाचित मी काय करतो याच कुतूहल वाटून तो आला असावा.समोरच्या दृष्याची आऊट लाईन पूर्ण केल्यावर मी त्यातले बारकावे रेखाटायला सुरुवात केली.मुलाच्या चेहऱ्याचे शेडिंग मी जेव्हा पूर्ण केले तेव्हा हवालदाराच्या तोंडून उस्फ्रूर्तपणे उदगार आले.
"व्वा!...छान..! खराखुरा बाब्ब्याच...! "
मी दचकून बाजूला बघितलं. गोबऱ्या गालाचे हवालदार माझ्या खांद्यावर थाप मारत म्हणाले...
"छान चित्रे काढताय राव....छंद आहे वाटत चित्रकलेचा ?"
" आ . अं..होय..! कोण आहे तो मुलगा? कुठे राहतो?"
"तो...होय.! बाब्या सकाळचा इकडे तिकडे भटकतो...कुणाची काम करतो. रात्री स्टेशनवर झोपतो."
"पण त्याचे आई- वडील...घर?"
"त्याची आई दोन वर्षांपूर्वी टी. बी. ने वारली...वर्षभरापूर्वी बाप कुठे गेला तो परत आलाच नाही."
" अरेच्या मग त्याच खाण - पिण ?"
" आम्ही देतो कधीतरी त्याला खायला....काम करून मिळालेल्या पैशांनी तो काही वेळा हॉटेल मध्ये जेवतो. पण या कुत्र्याला न चुकता दिवसातून तीन चार वेळा दूध पाजतो."
" म्हणूनच त्या दोघांमध्ये एवढी जवळीक आहे....बघा कसे एकमेकांशी कसे खेळतात ते...!"
" होय तर..तसे दोघेही भटकेच..म्हणूनच त्यांची जोडी जमलीय.पण तुम्ही कुठ जाणार?चला चहा घेऊया टपरीवर."
हवालदार माझ्या चित्राने भलतेच प्रभावित झाले होते.इतरांकडून चहा घेणारे..आज मलाच चहा द्यायला निघाले होते.मी वही मिटून तशीच हातात धरून हवालदारां बरोबर टपरीवर गेलो.जाता जाता मी हवालदारांना माझी माहिती सांगितली. इथल्या टपरीवर चहा पिण्याची सुद्धा एक गंमत असते. इथलं चहा भलताच खुमासदार असतो.पहिल्या घोटाबरोबरच मन आंदित होते. हवालदारानी चहाचे पैसे दिले व ते सिगारेट घेण्यासाठी बाजूच्या स्टॉलवर गेले. मी टपरीवरूनच दोन वडा पाव घेतले.मी पुन्हा माझ्या जागेवर आलो. बाब्याला मी जवळ बोलावले. तो भितभीतच जवळ आला.
" काय रे काय नाव तुझ ?"
" बाब्या...बाब्या ..!. ..सगळे मला बाब्या म्हणतात साहेब." तो निरागसपणे म्हणाला.
" हे..घे..खा." मी दोन्ही वडापाव त्याला दिले .बाब्याने जराही विचार न करता त्यातला एक वडा पाव वाघ्याच्या पुढ्यात ठेवला.वाघ्याने पुन्हा शेपटी हलवून त्याचे आभार मानले. वाघ्या वडा पाव चघळायला सुरुवात केली. दुसरा वडापाव बाब्या स्वतः खाऊ लागला.त्याचे खाणे संपेपर्यंत मी गप्प राहिलो.खाऊन झाल्यावर त्याने शर्टच्या बाहीने तोंड पुसले.माझ्याकडे बघताना कृतज्ञतेचे भाव त्याच्या चेहेऱ्यावर उमटले.खेळण्या बागडण्याच्या वयात तो एकटा या जगात वावरत होता.का कोण जाणे माझ्या मनातला एक कोपरा त्याच्यासाठी हळवा झाला होता.
" काय रे...तुझ्या घरी कोण कोण असत?" मला माहित असूनही मी उगाचच त्याला बोलतं करण्यासाठी विचारलं.बाब्या न बोलताच काही वेळ गप्प उभा राहीला. मग हवेत हात पसरून म्हणाला...
" हेच मझ घर आहे..!"
" तुझे आईवडील कुठे असतात?" मी दुसरा प्रश्न केला.
"आई दोनवर्षांर्पूर्वी देवाघरी गेली..." त्यानं आपल्या वडिलांच्या विषयी बोलणं टाळलं.
" शाळेत कधी गेलेलास?"
" नाही साहेब.... माझा एक मैतेर शाळेत जातो.पण खूप पैका लागतो म्हणे!"
" तुला शाळेत जायला आवडेल?"
बाब्या काहीच बोलला नाही. उदासवणा चेहरा करून गप्प उभा राहिला.पण त्याच्याकडे बघता- बघता माझ्या मनात काहूर उठले. ' सर्वांसाठी शिक्षण ' अस म्हणणार सरकार व माझ्यासारख्या शिक्षक यांना विचार करायला लावणारं बाब्याच आयुष्य होत.अशी कितीतरी मूल रस्त्यावर आयुष्य घालवत असतील. त्यांनी शाळेचं तोंड तरी बघितलं असेल काय? माझ्याजवळ अश्या प्रश्नांची उत्तरे नव्हती.खर म्हणजे मी आतापर्यंत बाब्याकडे कुतूहलाचा विषय म्हणून बघत होतो.पण आता त्याही पलीकडे....उगदी खोलवर तो माझ्या मनात रुतला होता.
मला अस्वस्थ करत होता.
मला गप्प बसलेला बघून बाब्या पुन्हा त्या कुत्र्याजवळ गेला.त्याच्या बरोबर खेळू लागला.आता दोघेही सारे विश्व विसरून खेळत होते.मी त्यांच्याकडे पाहत विचार करत होतो की, या बाब्याच अंतिम ठिकाण काय असेल?काय घडेल त्याच्या पुढील आयुष्यात?कोण आधार देईल त्याला?
अस म्हणतात की जन्माला येणारा प्रत्येकजण आपल भाग्य जन्माला घेऊनच येतो. बाब्याच्या भाळी काय लिहिलं असेल? त्याच रस्त्यावरच आयुष्य रस्त्यावरच संपून जाणार की न चिरडल्या जाणाऱ्या ईर्षेने तो खुरट्या झाडासारखं वाढणार होता? माझ्या मनातल विचारांचं वादळ थांबत नव्हते.कोण, खुठला बाब्या...पण मी त्याच्यासाठी अस्वस्थ झालो होतो.त्याला आधार देता येईल का...?त्याला शिक्षण देता येईल का..? याचाच विचार मी करत होतो.
मला माझी मुल बाळ, संसार यांचा व्याप सांभाळून आणखी एका मुलाचा सांभाळ कारण जमेल का? माझी बायको व मुल त्याचा स्वीकार करतील का? असे असंख्य प्रश्न माझ्या मनात घोंघावू लागले.
मी डोकं झटकून पुन्हा बाब्याकडेः पाहिले.त्याने कुठून तरी फाटकी चटई आणली व एका कोपऱ्यात अंथरली..त्याचे डोळे पेंगुळले होते. चटईवर तो आडवा झाला.त्याच्या बाजूला वाघ्याने बैठक मारली.बाब्याने आपल डोकं त्याच्या पाठीवर ठेवलं. उगदी उशीवर ठेवतात तस...!
एवड्यात गाडी आली.मी बॅग घेऊन गोंधळलेल्या मनान गाडीत शिरलो.बाब्या डोळे किलकिले करून माझ्याकडे बघत होता.त्याच्या डोळ्यात कृज्ञतेचे भाव होते .बॅग गाडीच्या रॅकवर ठेऊन मी मागच्या सीटवर बसलो. अजूनही माझ लक्ष बाब्याकडे होते. गाडी सुटायला अजून दहा मिनिटे होती. माझ्या मनाची घालमेल वाढली
अचानक मनाशी निश्चय करून मी उठलो.बाब्याला घेऊन जायचंय.त्याला घरी ठेवणं शक्य नसेल तर एखाद्या वसतिगृहात ठेवायचं.....त्याच्या शिक्षणाचा खर्च करायचा...त्याला शिकवायच एक आयुष्य वाचवायचं....अनंतात विलीन झालेली त्याची आई आपल्याला दुवा देईल.मी कंडक्टरला सांगून खाली उतरलो. बाब्याजवल गेलो. तो अजून झोपला नव्हता.त्याचा हात पकडुन मी म्हणालो...
"चल उठ ..येतोस माझ्याबरोबर...?"
" कुठ साहेब?"
" अरे...शिकायचं ना तुला? इथ राहून नाही शिकणार तू..मी तुला शिकवीन."
त्याचे डोळे लकाकले.आकाशातल्या लक्ष तारका त्याच्या डोळ्यात लकाकल्याचा भास मला झाला.
" चांगला कपडे..शाळा...पुस्तके...खेळण्यासाठी मित्र..सगळं मिळेल तुला..!"
मी त्याच्या समोर एक देखणं स्वप्न उभ केलं.तो उठला व माझ्या सोबत गाडीत आला.मागच्या रिकाम्या सीटवर बसला.
" इथ झोप सकाळपर्यंत आपण सावंतवाडीला पोहचू.". मी त्याला म्हणालो.
मला आता शांत शांत वाटत होत.
एवढ्यात मागच्या सीटच्या खिडकीच्या पत्र्यावर ठोकल्या चा आवाज आला.त्या पाठोपाठ वाघ्याच्या केविलवाणा आवाज.बाब्या झपकन उठला.खिडकीजवळ आला.वाघ्या खिडकीजवळ...पत्र्यावर पाय उंचावून उभा राहिला होता.बसण्याच्या चेहऱ्यावर करुणा ओथंबून आली .
त्याचा चेहरा ताणला गेला.गाडी सुटायला आली होती.
कंडक्टर घाई करत होता. एवढ्यात बाब्या ओरडला,
" मास्तर वाईच थांबा...मी उतरतो."
बसण्याचा या आकस्मिक पावित्र्यांने मी गोंधळलो.
" पण..बाब्या तुझी शाळा.." मी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला.
" नाही साहेब. मी गेल्यावर वाघ्याच कास होणार? त्याला कोण बघणार? त्याला खायला कोण देणार?इथ कुठच्या गाडीखाली सोडून तो मारून जाईल." बाब्या प्रवाश्यांना दकलातच दरवाज्याजवळ पोहचला.बंद दरवाजा उघडून त्याने बाहेर उडी मारली. वाघ्या झटकन त्याच्या जवळ आला व त्याला बिलगला. गाडीत उभा राहिलेला मी त्राण संपल्यासारखा सीटवर कोसळलो. मी बाब्याला आधार द्यायला निघालो होतो.पण त्याने तर त्याच्या सारख्या एका भटक्या जीवला आधार दिला होता.त्याला तो आधार अर्ध्यावर मोडायचा नव्हता.माझ्या पायात मणामणाच्या बेड्या ठोकल्याचा भास मला झाला. सून्नपणे मी खिडकीतून बाहेर पाहिले. बाब्या मघासारखा वाघ्याच्या पाठीवर डोकं ठेऊन झोपला होता. अगदी विश्वासाने दोघेही एकमेकांच्या उबेत सारं विसरून झोपण्याचा प्रयत्न करत होते.
" जाऊ द्या साहेब..ही रस्त्यावरची पोर....सरस्त्यावरच वाडनार अन् एक दिवस रस्त्यावरच मरणार." कंडक्टर माझ्याकडे बघून म्हणाला. पण माझ्या डोक्यात त्याच्या बोलण्याचा अर्थ घुसलाच नाही. मला दिसत होत - बाब्या व वाघ्याच्या एकमेकांविषयचा विश्वास!

बाळकृष्ण सखाराम राणे
8605678026