सार्या शहरात वादळापूर्वीच्या शांतता होती.प्रत्येकाच्या मनात भय दाटले होते.सर्वत्र तणाव होता.घराबाहेर पडायला सारे घाबरत होते.फोन घणघणत होते.पोलीस व्हॅन रस्त्यावर धावत होत्या. प्रत्येक चौकात लाठीधारी पोलीस तैनात होते.गरज लागल्यास खास पोलीस दल तैनात ठेवले होते.आज सकाळपासूनच जिल्हाधिकारी शहरात ठाण मांडून होते.पालकमंत्रीही संध्याकाळी येणार होते.अफवा उठत होत्या व विरतही होत्या. घुमसत असलेल्या ठिणगीची स्फोट कधी होईल ते सांगता येणार नव्हते. मोठे- मोठे धार्मिक नेते आवाहन करत होते.सर्वधर्मीय लोकांची तोडगा काढण्यासाठी बैठकही झाली होती. पण ती कोणत्याही निर्णयाविना संपलीही होती. येणार्या संकटाच्या शंकेने सामान्य माणूस घाबरला होता.
ज्याच्यामुळे हे घडले होते तो अवलिया मात्र शहराबाहेरच्या पडक्या मशिदीत चिरनिद्रा घेत पहुडला होता.एका चिरंतन प्रवासाला निघाला होता.ह्या अवलियाचा देह जाळायचा की दफन करावा यासाठी त्याचे हिंदू व मुस्लिम चेले झगडत होते.अवलिया मृत झाला हे कळताच त्याच्या हिंदू भक्तांनी तडक पडक्या मशिदीत धाव घेवून त्याच्या दहनाची तयारी केली.परंतु मुस्लिम बांधवांनी याला हरकत घेतली. त्यांच्यामते हा अवलिया मुस्लिम होता.सारे कुराण त्याला तोंडपाठ होते.त्याच दहन केल्यास कयामत येणार होती---धर्म बुडणार होता.हिंदूभक्तांच्या मते तो हिंदू होता.तो वेदांतील संस्कृत वचने धडाधड म्हणायचा.विठ्ठलाचे अभंग तन्मयतेने गायचा.रामाचे नाव घेवून दीन-दुबळ्यांना आशिर्वाद द्यायचा.त्याच दहन करणे योग्य असा युक्तिवाद त्यांनी केला.दोन्ही गट आपापल्या मतांवर अडून बसले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस तिथे दाखल झाले.दोन्ही गटांनी विचारविनिमय करून सुवर्णमध्य काढावा अस आवाहन त्यांनी केले.पण या नाजूक प्रश्नाला उत्तर सापडत नव्हते. त्यामुळे सारे घाबरून गेले होते.दोन्ही गटांच्या मंडळींनी त्या पडक्या मशिदीच्या आवारातच ठाण मांडली.अगरबत्त्या - धुप लावले. हिंदूनी रामनामाचा घोष सुरू केला. मुस्लिम बांधवांनी कुराण पठण सुरू केले.सगळीकडे एकच गोंधळ उडाला.
हा अवलिया ज्यावेळी पहिल्यांदा शहरात आलेला तेव्हा सारेजण त्याला वेडा म्हणायचे. वेडे वाकडे हातवारे करत रस्त्याने जाताना तो ' सब मिठ्ठीमे मिल जायेगा 'हे वाक्य तो मोठ्याने ओरडायचा. कधी झाडाखाली बसून अभंग म्हणायचा. त्याचा आवाज व उच्चार ऐकून सर्वांच्या मनात कुतूहल निर्माण झाले.सारे त्याला मिठ्ठीवाला बाबा म्हणायचे.कुणी त्याच्याजवळ गेल्यास तो त्या व्यक्तीवर खेकसायचा व म्हणायचा 'सब मिठ्ठीमे मिल जायेगा '.हळूहळू त्या अवलिया भोवती चमत्कारांच वलय तयार झाल.काही प्रतिष्ठित लोक त्याचे भक्त झाले. तो अवलिया रस्त्याने जायला लागला की लोक त्याला नमस्कार करायचे. हा अवलिया शहराबाहेरच्या जंगलानजिक असलेल्या जुन्या पडक्या मशिदीत राहायचा .रात्रीच्या वेळी आपल्या सुरेल आवाजात अभंग म्हणायचा किंवा कुराणातील वेचे म्हणायचा. काही भक्तमंडळी तिथे जमत पण हा अवलिया कुणालाही त्या मशिदीत रात्रीच्या वेळी थांबू द्यायचा नाही.
पण याला अपवाद होते पक्या व फंटूश हे भुरटे चोर.या दोघांचे कुणी नातेवाईक नव्हते.त्यांची जात व घर्म त्यानांच माहिती नव्हता. पण त्यांचे हस्तलाघव विलक्षण होते.हातोहात ते माल लंपास करायचे.पोट जाळण्यासाठी चोरी करण्याशिवाय त्यांचा जवळ कोणताच उपाय नव्हता. कधी-कधी ते उपाशीपोटी या मशिदीत यायचे.अवलिया त्यांना आपल्या जवळची भाजी भाकरी द्यायचा म्हणायचा 'सब मिठ्ठीमे मिल जायेगा ' मग ते दोघे त्या मशिदीच्या पडवीत झोपायचे.
खर म्हणजे त्या अवलियाच्या भोवती चमत्कारांच गूढ वलय आणखी दृढ झाले ते एका विलक्षण घटनेने! तो बाजाराचा दिवस होता. शहराच्या गाडीतळाजवळ एक भल्या मोठ पिंपळाच झाड होत. त्याच्या लांब फांद्या दूरवर पसरल्या होत्या. बाजाराला आलेले खेडूत लोक त्या पिंपळाच्या सावलीत पहुडले होते. अचानक तिथे ' मिठ्ठीवाला बाबा 'आला व हातातल्या चिमट्याने पिंपळाच्याखाली बसलेल्यांना मारत म्हणाला ' चलो उठो---सब मिठ्ठीमे मिल जायेगा. ' त्याचा तो भयानक अवतार बघून सारे घाबरले व तिथून उठून पळाले.त्या नंतर काही मिनिटांनी त्या पिंपळाची एक भली मोठी फांदी मोठ्याने आवाज करत खाली कोसळली.थोडा जरी वेळ झाला असता तरी काही जणांचे प्राण गेले असते.त्यानंतर त्या अवलियाच्या नावावर अनेक खर्या खोट्या चमत्कारांची नोंद झाली. असा हा अवलिया आज अनंतात विलीन झाला होता.
निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदा उठवण्यासाठी सारेच सज्ज झाले होते. खान मोहल्ल्यातील जावेद भाईंच्या खोलीत भाईचे चेले जमले होते.जावेदभाई सर्वांना सूचना देत होता.
" ममद्या! देख बे---लाखभर रूपये जमायला हवे."
"हां भाई , पूरी तैयारी झालीय."
"और देखो-कल शामतक कुछ नही हुआ तो हल्ला-गुल्ला सुरू करायचा --- दोन चार मर्डर झाले तरी चालतील."
" हां---हां तलवारी --- स्टीक सब तैयार है."
"हां---और देख---- सार्या पोरांना एरीया वाटून दे---तू स्टेशनजवळ जा--- अबदुल्लाला गांधीचौक एरीया दे--- समझ्या का?"
"हा भाई---"
'हो---आणि हे बघा जमेल तेवढा माल लुटून घ्या---काय!साला ऊस फकीर को जलाने दो या दफनाने दो अपना क्या जाताय! हात धुवून घ्यायचे---समझ्या. "
-----
अगदी हिच कथा प्रताप चौकातल्या तालीमीत सुरू होती.शंकरदादा आपल्या पोरांना दंगल उसळली तर काय करायचे ते सांगत होता.
"सावळ्या काय म्हणतेय परिस्थिती?"
"दादा कधी भडका उडेल सांगता येत नाही.---उद्या हिंदू संघटनांनी बंद पुकारलाय."
" हां---तिकडे जावेदची माणसं तयार आहेत म्हणे--- त्यांच्यावर लक्ष ठेवा---सोडावाॅटरच्या बाटल्या--- तलवारी ---सारा स्टाॅक बाहेर काढायचा."
"हं---समजल दादा. "
"आपली गल्ली सोडून सगळीकडे जमेल तसा हात मारा.प्रत्येकाने दहा पंधरा हजार आणले पाहिजेत.उद्या बंदच्या वेळी संधी साधायची--- दंगल उसळली की गर्दी करून घूसायच."
---
या रण धुमाळीत राजकिय पुढारी मागे नव्हते. स्थानिक आमदारांनी पत्रक प्रसिद्ध केलय त्यात हिंदू व मुस्लिम मतदारांच भान ठेवलय .तोडगा न निघाल्यास कोर्टात याचिका दाखल करून त्वरीत निर्णय द्यायची विनंती करायची अस त्यांनी सुचवल होत. असंख्य स्वयंघोषित पुढारी विविध तोडगा सुचवित होते पण निर्णय होत नव्हता. वर्तमानपत्रांनी सकाळ दुपार व संध्याकाळी आवृत्या प्रसिद्ध करून आपला फायदा करेन घेतला.अवलियाचे चरित्र--- ऐकिव चमत्कार---लोकांचे अनुभव यांनी पेपर भरून टाकलाय.
पोलिस अधिकारी--- तहसीलदार यांनी बैठक घेवून अवलियाचा देह असलेल्या खोलीला बाहेरून कुलूप ठोकावे तसेच बाहेरच्या पडवित भजन-पठन चालू ठेवावे असे ठरवले. रात्री पोलिस बंदोबस्तात वाढ करावी---सशस्त्र पोलिसांनी गस्त घालावी --मशिदी बाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवावा अशी सूचना पालकमंत्र्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्याना दिली.
त्या रात्री कुणालाच झोप आली नाही. काहीतरी अशुभ घडेल या भितीने सारे सावध राहिले.गल्लीतील तरूण मंडळी लाठ्यां काठ्या घेवून जागत राहिली.बघता-बघता दुसरा दिवस उजाडला. खास पुरवण्यांणी सजलेली वर्तमानपत्र हातोहात खपली.पुढे काय घडणार याची सारे उत्सुकतेने वाट बघू लागले.
सकाळी दहा वाजता वरिष्ठ पोलिस अधिकारी, पालकमंत्री भक्तगण व दोन्ही समाजाचे नेते यांच्या उपस्थितीत मशिदीच्या दरवाज्याचे कुलूप उघडले गेले.अवलियाच दर्शन घेण्यासाठी व त्याच्या मृतदेहाची सद्यस्थिती पाहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
दरवाजा उघडताच--- समोरचे दृश्य बघून सार्यांचे डोळे विस्फारले. हिंदू-मुस्लिम भाई-भाईच्या घोषणा निनादल्या.जयराम-श्रीराम---अल्ला हो अकबरचा उस्फूर्त जयघोष सुरु झाला.समोर अवलियाचा मृतदेह नव्हता---तर एका स्वच्छ हिरव्या व भगव्या--- रूमालावर----जूईची सुंदर व नाजूक फूल होती.
"या अल्ला उसने खुद ही फैसला किया."
"अरे,हा तर चमत्कारच---!आपण उगाचच झगडलो."
शहरावर काळ सजावट क्षणात दूर झाल---आणखी एक चमत्कार ' मिठ्ठीवाला बाबा ' च्या नावे जमा झाला.
--------
अगदी त्याच वेळी मशिदीच्या पाठीमागे असलेल्या जंगलात बाबांच्या मृतदेहावर अखेरची माती ओढून---तो पालापाचोळ्याने व्यवस्थित झाकून घामेघूम झालेले पक्या व फंटूश बसले होते.काल रात्री पठण व भजनाच्या गदारोळात त्यांनी अवलिया चा मृतदेह अलगद मागच्या बाजूच्या पडक्या भिंतीतून जंगलात नेला होता व त्या ठिकाणी फुले ठेवली होती.
"बाबा ---तूच म्हणाला होतास 'सब मिठ्ठीमे मिल जायेगा '
अरे,या क्षुद्र देहाला जाळल काय किंवा गाडल काय ,अखेर मातितच मिसळावे लागणार---हे त्या लोकांना कधीच समजणार नाही. माफ कर त्यांना--- आणि आम्हालाही! "
पक्या आसवांना पुसत म्हणाला.
-----------समाप्त--------------------