माझ गोकुळ
मी समोरच्या छोट्या पण देखण्या वास्तूंकडे समाधानाने पाहिले. ' माझ गोकुळ ' या नावाचा तो वृध्दाश्रम होता तर त्याच्या डव्या बाजूला' फुलपाखरे ' हे मुलीचे वसतिगृह होते. या दोन्ही वास्तूंचे आज उदघाटन होत.रंगबेरंगी पताका सर्वत्र लावल्या होत्या. सनईचा मंद व मधुर स्वर मनाला सुखावत होता.मला खात्री होती की दूर अंतराळातून गोजिराबाई हे सारे आनंदाने पाहत असणार.एवढ्यात व्यवस्थापक भोसले व वकील नाईक माझ्याजवळ आले.
"सर या, सारी तयारी झालीय." भोसले म्हणाले.
" अगदी छोटेखानी कार्यक्रम करायचाय. तुम्ही नारळ वाढवा आणि वास्तुदेवतेची पूजा करा." नाईक म्हणाले.
"होय; चला." मी समोरच्या वास्तूंना नमस्कार केला. माझ्या डोळ्यासमोर गोजिराबाई उभ्या राहिल्या.
बरोबर तीन वर्षांपूर्वी मी बीएड झाल्यावर शिक्षणसेवक म्हणून 'देवसावर ' गावातल्या हायस्कूल मध्ये हजर झालो होतो. सावंतवाडी पासून सुमारे साठ किलोमीटरवर हे गाव होत.रोज येणं जाणे शक्य नव्हते म्हणून गावात राहायचं ठरवलं.आईने बॅग भरून दिली होती. सोबत दोन वेळ पुरेल एवढा डबा दिला होता. शाळेतले ज्येष्ठ शिक्षक तेली यांनी त्या सायंकाळी मला आपल्या घरी नेले.रात्री चांदण्यात अंगणात बसून त्यांनी मला बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या.नव्या शिक्षकाना कोणत्या अडचणी येतात, त्यावर कशी मात करायची. सिनिअर शिक्षकांचे स्वभाव ...त्यांच्याशी कस वागायचं.. वैगेरे. ज्या आजही मला उपयोगी पडताहेत.मी त्यांना म्हणालो ' मला एखादी खोली भाड्याने मिळेल का बघा. माझ्या ओळखीचा इथ कुणी नाही."
सर थोडा वेळ विचार करून म्हणाले.
" उद्या शाळेत जाताना, खडककारणीला विचारुया, बहुतेक काम होईल."
" खडककारीण?"
सर हसले. " गोजिराबाई नाव तिच !पण तिच्या घराच्या बाजूला भलामोठा खडक आहे म्हणून तिला ' खडककारीण' म्हणतात.पूर्वी 'मुलांणी 'सर तिथेच राहायचे."
दुसऱ्या दिवशी आम्ही चालत शाळेत जात होतो.सुमारे वीस मिनिटांची पायवाट होती. वाटेत तेली सर एका पाणंदीत शिरले .मी पण त्यांच्या सोबत गेलो.समोर एक टुमदार घर होत. स्वच्छ सारवलेल अंगण... छान मातीची तुळस..आजूबाजूला झाड असूनही कुठेही कचरा नव्हता...समोर माडीच घर.. चिर्याच्या भिंती...वर मंगलोरी कौले...दरवाज्यासमोर रांगोळी काढलेली होती. आम्ही आत गेलो.आमची चाहूल लागताच एक आजी बाहेर आली.सत्तर एक वर्षाची असावी... थोडी स्थूल अंगकाठी.. गोबरा चेहरा... हसरे डोळे....नऊवारी निळी साडी.....वर पांढरा ब्लाऊज...चंदेरी केस व भरगच्च आंबडा...लगबगीने चालणे....अस भारदस्त व्यक्तिमत्व होत आजीच.
" तेली सर , तुम्ही होय .? या बसा. काय काम काढलात ?"
" आज्जे,. हे नवीन सर. कालच शाळेत हजार झालेत. 'मुलांणी ' सर राहत ती खोली यांच्यासाठी मिळेल ? तुम्हालाही सोबत होईल.यांचीही सोय होईल." तेली सर म्हणाले.
" मी कुठे नाही म्हणते ! सोबतीच म्हणाला तर..मला आता एकट राहायची सवय झालीय." तिच्या आवाजात थोडा विषाद होता.मी माझी बॅग तिथेच ठेवली. इथून शाळा अवघ्या पाच मिनिटांवर होती. चालत जाण सोपं होत.
वाटेत तेलीसर म्हणाले. आजीला दोन मुलगे व एक लग्न झालेली मुलगी आहे.पण आजीला कुणीच बघत नाहीत. मुलगे मुंबईला असतात.चांगल्या नोकरीला आहेत. मुलगे इथली सारी जमीन व घर विकायला तिच्या पाठीमागे लागलेत.मधे मधे येऊन सतत तिच्याशी भांडत असतात. पण गोजिरी आजी मोठी खमकी तिने इथली जमीन विकायला ठाम नकार दिला. मुलांशी संबंध तोडला.शेती, झाडे व घर स्वतः सांभाळते. फारशी कुणाशी बोलत नाही पण स्वभावाने निर्मळ आहे.
संध्याकाळी शाळेतून घरी परतताना डोक्यात रात्रीच्या जेवणाचे काय ? हा विचार आला.मला जेवण करता येत नव्हत आणि साहित्यही नव्हत.
" जेवणाची काळजी नका करू .आजी सगळं बघेल."
जणू माझ्या मनातला विचार ओळखून तेली सर म्हणाले.
मी खडककारणीच्या घरी गेलो.माझी खोली कुठची तेही मला माहित नव्हते. एवढ्यात आजी बाहेर आली. व्हरांड्यातला उजवीकडचा दरवाजा उघडत म्हणाली..
" सर , ही बघा तुमची खोली. पाठीमागे न्हाणीघर आहे."
मी खोलीत शिरलो अन थक्क झालो. खोलीत एक पलंग होता. त्यावर चादर अंथरली होती.पांघरून ठेवलं होत. पाणी भरलेली कळशी व तांब्या ठेवला होता. खोली अगदी साफ व स्वच्छ होती. पुस्तके ठेवण्यासाठी छोट टेबल ठेवल होत. मी हातपाय स्वच्छ धुतले व बेडवर बसलो. एवढ्यात चहा घेऊन गोजिराआजी हजर झाली.
" सर,चहा घ्या...आणि हो तुम्ही काय काय खाता ते सांगा.म्हंजे बघा; मुलांणी सराना कोबी व बटाटे अजिबात आवडत नव्हते. तस् तुमचं काही आहे का?"
" आजी एक सांगू ?...मला सर म्हणू नका ..माझ नाव बाळकृष्ण आहे. मला सगळे ' बाळा ' म्हणूनच हाक मारतात आणि मी सगळे पदार्थ खातो."
आजी हसली.
" सर तर तू आहेसच. ही खोली तूला आवडली ? ...ठीक आहे 'बाळा 'म्हणेन मी तुला.." मला क्षणभर वाटले की आजीच्या डोळ्यात पाणी तरळले.
त्या रात्री झोपायच्या अगोदर आजी वाटीतून खोबरेल तेल घेऊन आली. मी थोडा विचारात पडलो.
"हे घे, डोक्यावर घाल.शांत झोप लागते. केस चांगले राहतात."
" पण मी कधीच तेल लावत नाही. म्हणजे तेलाची सवय नाही. "
" अरे, हेच चुकत बघ तुमच्या तरूणांच. ..अगदी तरुणपणात केस विरळ झालेले अनेकजण मी बघतेय."
मी गुपचूप वाटी घेतली. डोक्यावर कित्येक दिवसानी तेल घातले.पण खरच त्या रात्री मला छान झोप लागली. दुसऱ्या दिवशी मी उठलो तेव्हा अंघोळीच गरम पाणी तयार होत. आजीनं घरातली व बाहेरची सारी काम आटोपली होती. मला खूपच अवघडल्यासारखं झालं होत.
आजी ,माझी आईसारखी काळजी घेत होती. हे ती अगदी सहजच करत होती.त्यात कृत्रिमपणा अजिबात नव्हता.
दिवस जात गेले तशी गोजिराआजी हळूहळू मला कळत गेली.आपल्या मुलांच्या वागणुकीमुळे ती मनातून खंतावली होती.गावाकडचा हक्काचा जमीन जुमला कोण बघणार या चिंतेने कुढत होती.ती सतत कोणत ना कोणते काम करत असायची. कधितरी जुणी भावगीते गुणगुणायची .ती भल्या पहाटे उठायची.असच एकदा मी झोपेत असताना 'घनःश्याम सुंदर श्रीधरा अरुणोदय झाला 'ही भूपाळी ऐकू आली. तो आवाज एवडा सुरेल होता की मी डोळे मिटून भारावल्यासारखा ऐकत राहिलो.आजीची कितितरी गाणी तोंडपाठ होती.
मी दर शनिवारी शाळेतून घरी सावंतवाडीला परस्पर जायचो.घरी वडील आजारी असायचे , आईवर कामाचा भार यायचा;म्हणून मला घरी जावच लागे. गोजिरा आजीला त्याच कोण कौतुक ? म्हणायची ' बाळ, अरे आई वडिलांना विसरु नकोस. तू जातोस ना तर आठवड्याचा बाजार आणून ठेव .आईला त्रास नको. सोमवारी तिला डबा करायला नको सांगूस.मी डबा तयार ठेवते .जाताना इथून घेऊन जा."
खर म्हणजे मला घरून कोणतीच वस्तू आणावी लागत नव्हती. सार आजीच द्यायची.आठवड्याच्या बाजाराला तालुक्याच्या ठिकाणी गेली की आठवणीने भजी घेऊन यायची.गणेशचतुर्थी आधी चार दिवस मी शाळेतून आलो तर आजी शिडीवर चढून भिंत रंगवत होती.
" आजी, हे काय मी कशाला आहे? खाली उतरा..मी रंगवीतो.. '
मी ब्रश व रंगाचा डबा हाती घेत म्हणालो. मी उरलेले सार घर रंगवल. गणपतीच्या भींतीवर मी चित्र कढायचं ठरवलं.
" कोंणते चित्र काढू ?"मी आजीला विचारले.
" गोकुळ... !...कृष्ण..आणि गोपाळ...जमेल?"
चित्रकलेची देणगी मला वडीलाकडून मिळाली होती.
" बघतो , प्रयत्न करून.."
मी दोन रात्री जागून यामुनेकाठी खेळणारे कृष्ण..गोपाळ व गोपिका काडल्या.अगदी मन लावून मी चित्र काढल.आजी माझ्यासाठी चहा घेऊन यायची. समोर बसून माझ चित्र रंगवने पाहायची.चित्र तयार झाल्यावर आजी कितीतरी वेळ चित्राकडे बघत राहिल्या.तिच्या डोळ्यांतून पाणी ओघळू लागले.
" बाळ, माझे गोकुळ माझ्यावर रुसल होत.पण तू आज ते पुन्हा माझ्या समोर आणलस."
सहज म्हणून मी तिला विचारले .
"आजी ,यंदा गणपतीला तुमची नातवंड येणार ना?"
आजी अचानक गंभीर झाली.थोडावेळ गप्प राहिली.
मला वाटल मी उगाचच हा प्रश्न विचारला. एक सुस्कारा टाकून आजी म्हणाली...
"अरे, मी दरवर्षी गणपतीला त्यांची वाट बघते पण त्यांच्या आई त्यांना इकडे पाठवत नाहित. गावाकडची ओढ कुणालाच नाही."
" तुमचे मुलगे?"
"ज्यांना आपल म्हणावं ते आपले नसतातच मुळी. ते तर आईला 'आई 'मानतच नाहीत. शिवाय त्यांच आपसात पटत नाही. पण एका गोष्टीवर दोघांच एकमत आहे, ते म्हणजे इथलं सार विकून टाक.मुंबईला ये. मग माझी अवस्था अश्रीतासारखी होईल.एकाकडून दुसर्याकडे फेर्या माराव्या लागतील. मी त्यांना चांगलीच ओळखते."
तो विषय मी तिथेच बंद केला.पुन्हा कधिही तिच्या मुलांचा विषय काढला नाही.
सहामाही परीक्षेपूर्वी जवळपासचे विद्यार्थी म्हणाले सर आमचा जादा वर्ग घ्या. आमचा गणित विषय सुधारेल. मलाही ते पटल इथे गावात मुलांना आवश्यक ते मार्गदर्शन मिळत नाही. पालकही फारसे शिकलेले नसतात.मी आजीला विचारले.
" आजी ,काही विद्यार्थी इथे क्लासला आले तर चालेल.?"आजी प्रसन्नपणे हसली म्हणाली...अरे ,चालेल काय !...मला आवडेल? मुलांची किलबिल ऐकायला कान अधीर झालेत माझे."
त्यानंतर मी अंगणात मुलांचा क्लास सुरू केला.मुलांच्या आवाजाने घर हसू खेळू लागले.मुलांना शिकवताना मला कळलं की आजी पूर्वीच्या काळातल्या मॅट्रिक पास आहेत.क्लास संपल्यावर मुलांच्या हाती खाऊ ठेवायची. त्यांच्या बरोबर बोलायची. बघता बघता दोन वर्ष झाली.मे महिन्याच्या सुट्टीत मी सावंतवाडीला आलो.माझ्या मित्र परिवारात रमलो. पण पंधरा दिवसांनी तेली सरांचा फोन आला.
" खडककारणीची तब्येत बिघडली आहे .तिला तालुक्याला अॅडमिट केलंय. तुमची आठवण काढतेय ....स्थिती गंभीर आहे. लवकर या."
" पण नेमक अस अचानक काय झालंय?"
" तिचे दोन्ही मुलगे आले होते. पण नेमक काय घडलंय ते सांगता येणार नाही."
मी त्वरित मोटारसायकलने हॉस्पिटल गाठले.आजीला अतिदक्षता विभागात ठेवले होते.त्यांना तीव्र हार्टअॅटॅक आला होता. डॉक्टरांनी मला बघताच विचारले.
" तुम्ही सर ना ?"
"होय. "
"त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. त्या फार काळ काढतील अस वाटत नाही."
माझा कंठ दाटून आला.खूप रडावसं वाटत होत.अखेर मी दक्षताविभागामध्ये गेलो. मला बघताच तिचे डोळे चमकले.
" बाळ रडतोस काय? कुणी जाताना हसत निरोप द्यावा. माझ्या जवळ वेळ कमी आहे.ऐक ..कणकवलीच्या नाईक वकिलांना भेट..ते तुला पुढे काय करायचं ते सांगतील."
मी शून्यात बघत राहिलो. आजी निरोपाची भाषा बोलत होती.दोन वर्षात घडलेले सगळे प्रसंग मला आठवले.मी रात्रभर तिथेच बसून राहिलो.सकाळी आजीने डोळे मिटले.
आणि सारी बंधन झुगारून मी ढसाढसा रडू लागलो.
"पुढे काय करायचं ?" डॉक्टरांनी विचारले.
" आजीच्या मुलांना बोलवूया...बघूया ते काय म्हणतात ते."
मी त्यांच्या दोन्ही मुलांना फोन लावले. घडलेली घटना सांगितली.दोघांनीही आपल्याला येणे शक्य नाही अस सांगितलं. मुलीनेही तेच उत्तर दिलं. मी अखेर नाईक वकिलांना फोन लावला.
" सर, मी येतो हॉस्पिटलमध्ये. डॉक्टरांशी बोलतो..तुम्ही तिथेच थांबा."
अर्ध्या तासात नाईक वकील आले. डॉक्टांशी बोलले.मग मला म्हणाले
" सर, पुढचे सारे विधी तुम्हीच करायचेत ..गोजिराबाईंची तशी इच्छा आहे.तिने आपल्या मृत्युपत्रात तस लिहिलंय."
" पण तिची मुले असताना?"
" होय, त्यांच्या मुळेच हे सारं घडलय. आताच सांगतो गोजिरबाईंनी आपल्या सर्व मालमत्तेचे वारस तुम्हाला केलंय.त्यांच्या मुलांना काहीही करता येणार नाही."
माझा माझ्या कानावर विश्वास बसेना.मी एका विचित्र प्रसंगात अडकलो होतो.काय करायचं ते कळत नव्हते.मी जगाचा फारसा अनुभव नसलेला तरुण होतो.माझ्या मनात असंख्य विचाराचा संघर्ष चालला होता.
अखेर आजीच्या ईच्छे नुसार मी तिच्या देहाला अग्नी दिला.दिवस कार्यही केलं. बाराव्या दिवशी तिची तिन्ही मुल आली.सगळ्यांचा माझ्यावर राग असल्याचे मला जाणवले.नाईक वकिलांनी साऱ्यांना आजीच मृत्युपत्र वाचून दाखविले. सारीच गप्प झाली.
" इथ राहून आईला मूर्ख बनवलं... सरांनी." मुलीने मनातल गरळ ओकल.
मी व्यथित झालो. नाईक वकिलांना बाजूला घेत मी म्हणालो..," हे बघा, वकीलसाहेब...तुम्ही सारी प्रॉपर्टी तिघांमध्ये वाटून टाका. मला खूपच ओशाळवाण वाटतेय."
नाईक म्हणाले " त्यानं त्यांचं समाधान होईल? ...उलट अधिकच भांडण होतील....हाडही चघळून खाणारी माणस ती! शिवाय आजीला ते आवडणार नाही. मुख्य म्हणजे तस करता येणार नाही."
मी गप्प झालो.सायंकाळी सारी मंडळी गेली.पण जाताना मला ' बघून घेऊ .' अशी धमकी देऊन गेली.
त्या रात्री मी एकटाच त्या घरात होतो.क्षणाक्षणाला आजीची आठवण येत होती. तिच्याविना घर उदासवाण वाटत होत.सार गोकुळ रुसल्यासारख वाटत होत.तिच्या असण्याने...आवाजाने त्या घराला अर्थ आला होता....तिच्या स्पर्शाने तिथली झाड...अंगण सजीव होत होत.आज सगळं कस निर्जीव व उदास वाटत होते. रात्रभर मी झोपलो नाही.मनात असंख्य विचारांचा गुंता झाला होता. खर म्हणजे मला कुठच्याही मालमत्तेचा हव्यास नव्हता.सावंतवाडीला माझ घर होत.....जमीन होती.तीच सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत होती.अस वाटल की आजींनी मला नको त्या संकटात लोटलय. अचानक माझ्या मनात एक विचार आला...हो...हो असच करावं ! अस मी ठरवून टाकलं.मनावरचं मळभ दूर झालं होत.वाटल गोजिराआजीने यासाठीच मला सारे अधिकार दिले असणार.
मी दुसऱ्या दिवशी सकाळीच नाईक वकिलांकडे गेलो. नाईक आपल्या कार्यालयातच बसले होते. मी त्यांना माझ्या मनातला विचार सांगितला.
ते काही वेळ माझ्याकडे बघत राहिले.
" गोजिरबाईंनी ,तुमच्या सारख्या त्रयस्थ व्यक्तीस वारस केले तेव्हा ;मी सुद्धा विचारात पडलो होतो. पण आज कळलं सर, आजीला माणसांची पारख होती.मुले मुंबईला परत गेली त्याच्या दुसऱ्याच दिवशी तिने येऊन मृत्युपत्र केलं अगदी हुशारीने. खर म्हंणजे ही प्रॉपर्टी तिला तिच्या आईकडून मिळाली होती.त्यावर तिच्या मुलांना हक्क सांगता येणार नाही."
" पण मी ठरवले ते बरोबर आहे ना?"
" शंका नका ठेऊ, मी अनेक माणस बघितली जी आपल्याच नव्हे तर इतरांच्या प्रॉपर्टी साठी झगडतात. आणि फुकट मिळालेल्या प्रॉपर्टी बद्दल तर विचारूच नका. पण तुम्ही सहजपणे हे टाळलात. लोकाचे टोमणे...दडपण व मनावरचा ताण..या पासून मोकळे झालात." नाईक म्हणाले.
" बरं, ह्या सगळ्याची कायदेशीर बाजू तुम्ही बघा अन् वृध्दाश्रमाचे ट्रस्टी पण व्हा."
" पण हे वृध्दाश्रमाचे व वसतिगृहाचे कस सुचलं?"
"अहो, आजीसारख्या अनेक स्त्रीया व वृध्द असतील ज्यांची मुले त्यांना सांभाळत नसतील...त्यांचं काय? या विचाराने मी त्रस्त झालो होतो. आणि हे सुचलं. आजीला घरात गोकुळ नांदाव अस वाटत होत.माझ्याकडून तिने भिंतीवर गोकुळाच चित्र कडून घेतल आहे. आमच्या शाळेचा पटसंख्येच्या प्रश्नही वसतिगृहाने सुटेल व मुलांमुळे घरात गोकुळ नांदेल.आजीची इच्छा पुरी होईल."
"छानच ,सर. आपण आतापासूनच कामाला लागू.इथले व्यावसायिक भोसले आपल्याला मदत करतील.मी त्याच्यांशी बोलतो."
"होय, आपण काम सुरू करूया.मदत मिळत जाईल. गोजीराआजीच स्मारक आपोआपच होईल." मी म्हणालो.
हे शिवधनुष्य पेलणे सोपं नव्हते. अडचणी येणार होत्या. पण मला त्याची फिकीर नव्हती.आजीच्या मुलांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला.पण नाईकांनी कायदेशीर बाजू संभाळत काम बंद पडू दिल नाही. आणि आज हा कृथार्थतेचा क्षण आला होता.एक रिवाज म्हणून मी आजीच्या तिन्ही मुलांना कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाठवली. मला खात्री होती ते येणार नाहित व कोणताही प्रतिसाद देणार नाहीत. खरच त्यांच्यापैकी कुणीच आल नव्हत.ते मोकळ्या मनानं आले असते तर त्यांच्या चुकांच थोडंफार परिमार्जन झाल असत.
माझ्या डोळ्यासमोरून सर्व प्रसंग तरळून गेले. डोळे पाणावले.गेले वर्षभर आम्ही सारे झपटल्यासारखे काम करत होतो. आजीने लावलेली झाडं ..तशीच ठेवून.. वृध्दांसाठी बाग.. फिरण्यासाठी मोकळी जागा.....हवेशीर खोल्या.. ...छोटी पण छान इमारत. वसतिगृहात वाचनालय...टि.व्ही. ....खेळण्यासाठी अंगण ...फुलझाडे..जमेल तेवढं केलं होत. यासाठी आजीचे पैसे....व मी थोडे पैसे दिले . उरलेला खर्च भोसलेंनी केला. एकूण सात पुरुष व दोन महिला इथे दाखल झाल्या होत्या. वसतिगृहात दहा मुली राहत होत्या.गोकुळ पुन्हा हसले होते.
" सर , कुठे हरवलाय? गोजिरा आजी आठवतेय?"
" होय.. आज असली असती तर तिला किती आनंद झाला असता."
" ती इथेच आहे. 'माझं गोकुळ' बघून ती सुखावली असणार. चला नारळ वाढवता ना?"
" होय. चला.." मी समाधानाने म्हणालो.नारळ वाढवून ' माझा गोकुळ ' या पाटीवरचं फित मी कापली.
" माझ गोकुळ " च्या पाटीवर बाजूलाच गोजिरा आजीचा हसरा चेहरा चितारलेला होता.जणू तिच हे हास्य कायमस्वरूपी तिथे स्मारक रूपाने उरणार होते.
-------*****---------*******----
समाप्त