viman books and stories free download online pdf in Marathi

विमान

विमान
जानबा काठी टेकत सावकाश चढ चढून वर आला.
समोर सड्यावर काम चालू होत.अनेक भलेमोठे बूलडोझर ...रोलर....डंपर...तसच हेल्मेट घातलेले अनेक कामगार धावपळ करत होते.जवळपास शंभर एकरचा परीसर सपाट करण्याच काम चालू होत.जानबाने सारा परीसर न्याहळला. अनेक इंजिनिअर लाल पिवळा जॅकेट घालून धावपळ करत होते. मुख्य इंजीनियर एका खुर्चीवर बसला होता.जानबा त्याच्या जवळ गेला.
" विमान कवा येणार ?"
" आजोबा, आत्ता कुठं काम सुरू झालय. अजून सहा सात वर्षे लागतील."
"आर देवा...,! अगा रावणागत मिशिनी आणल्यात अन् सहा वरीस लागलं म्हणता?" जानबा उसासा सोडून म्हणाला.
माळावर काम सुरू झाल्यापासून जानबा दर दोन तीन दिवसांनी येऊन ' विमान कवा येणार?' हा एकच प्रश्न तिथल्या माणसाना विचारायचा.सर्वांना त्याची सवय झाली होती.सड्यावरचा माळ म्हणजे पडीक जागा.कातळाची जागा असल्याने इथ कसलीच झाड जगत नव्हती.या लांबच लांब माळावर गावकरी सकाळी गुरे चरायला सोडायचे. सायंकाळी गुरे आपणच सडा उतरून खाली यायची.जानबाची इथ जवळपास पाच एकरहून अधिक जागा होती.तरूणपणात जानबा चांगलाच दणकट गडी होता.त्याला वाटल या माळावर काजू व आंब्याची लागवड करायची.....नाचणी पेरायची...पण कातळांवर झाड कशी जगणार? पण जानबा डगमगला नाही. खाली गावातून तो रोज सकाळी व संध्याकाळी दोन पोती माती पाठीला मारून चढ चढून आपल्या जमिनीत पसरायला लागला.सारे त्या वेड्यात काढू लागले.अगदी त्याच्या बापानेही त्याला ' खुळा कारे तू?' अस विचारले. पण जानबाने आपल काम सुरूच ठेवलं. अगदी ढोर मेहनत करून.एक दोन एकरच्या परीसरात बर्यापैकी माती पसरली. पावसाच्या सुरूवातीला काजू व आंब्याची कलमे लावली. उन्हाळ्यात गावातून दोन्ही हातात दोन कॅन पाणी घेऊन वर जायचा. जानबाने चौथीतून शाळा सोडली होती. 'मले हे जमणार नाही. 'अस त्याने बापाला सांगीतले. पण मेहनत करण्यात तो वाघ होता.
संपूर्ण सड्यावर फक्त त्याचीच जागा हिरवीगार होती.काम करत असताना कधीतरी वरून आवाज करत विमान जायचं.जानबा खुळ्यागत विमान दिसेनासे होईपर्यंत बघायचा. लहानपणी तो भिंगरी पकडून तिच्या शेपटीला दोर बांधून सोडून द्यायचा उडणाऱ्या भिंगरी पाठोपाठ तो पळत राहायचा.त्याला विमानाचं भारी कौतुक एकदा तरी जवळून विमान बघायच अशी त्याची इच्छ होती.तो कधी मुंबईला गेला नव्हता.त्यामुळे विमान बघता आल नव्हत.
शेतात त्याने माचाण उभारल होता.रात्री तो माळावर एकटाच झोपायचा. लुकलुकणारे आकाशातले तारे बघायचा.अभंग गायचा.पौर्णिमेच्या रात्री माळभर भटकायचा.त्याला कशाचेही भय वाटत नसे.विशीत असतानाच त्याच लग्न झाल.त्याची जोडीदारीणही त्याच्या सारखी मेहनत करणारी होती.
माळावर त्याने बाग फुलवली. माळाच्या दुसऱ्या टोकाला एक छोटा झरा होता.अगदी होळी पौर्णिमे पर्यंत ते पाणी राहायचे.पाट काढून त्याने पाणी आपल्या शेतापर्यंत आणले.
बागता बघता तो तीन मुलांचा बाप झाला.त्याची मुल लहानपणी माळावर यायची पण मोठी झाल्यावर ती फारसं वर येत नसत.जानबाचा आपल्या शेतावर....जमिनीवर भारी जीव. माळावरच्या शेतात तो रमायचा.मुलांचं शिक्षण...त्यांची लग्ने त्याने याच शेताच्या जीवावर उरकली.दोन्ही मुली चांगल्या घरात पडल्या होत्या ...समाधानी होत्या.धाकटा मुलगा...सरकारी ऑफिसात कारकून होता.तालुक्याच्या ठिकाणी राहायचा.जानबाला त्याच भारी कौतुक!
कधीतरी मुलगा व सून गाडीवरून घरी यायची.मुलाला गाडी चालवताना बघून त्याचा उर अभिमानाने भरून यायचा.आयुष्याच्या एका वळणावर त्याची घरवाली त्याला सोडून गेली.तो आता एकटा पडला.आता सारा वेळ तो माळावर कढायचा. एकदा शेतात काम करत असताना...माळावर अनेक गाड्या आल्या..काही लोक आले. जमीन मोजणी करू लागले .कागदावर काहीतरी रेखाटने काढु लागले.
जानबा घाबरला...काहीतरी चुकीचं घडतंय अस त्याला वाटले. काही लोक त्याच्याही जमिनीवर खुणा करू लागले.
" का हो..! कश्या पायी मोजणी करताय?"
" काका...अहो आहात कुठे? इथ विमानतळ होणार आहे." त्यातला एकजण बोलला.
"पर माझी जमीन ...माझ शेत?"
" अहो सरकार सारी जमीन ताब्यात घेणार...त्याचा मोबदला देणार..समजलं!"
" ते मला काय ठांव नाय पर म्या माझी जमिन नाय देणार"
तो सरकारी माणूस हसला.गावात बातमी पसरली.सारे खुश झाले.पडीक...कामाची नसलेली जमीन गेली म्हणून कुणालाच वाईट वाटत नव्हते.उलट बक्कळ पैसा मिळणार म्हणून सारे खुश होते साऱ्यांनी कागदावर सह्या केल्या.पण जानबा कसाच तयार होईना.जमीन द्यायची या कल्पनेने तो कासावीस झाला.त्याला आपल बालपण..तरुणपण..केलेली मेहनत आठवली..घरकरणी सोबत घालवलेले दिवस आठवले.काजू ..आंबा..नाचणी ...नागली यांनी हिरवागार झालेला मळा आठवला. पुन्हा एकदा साऱ्यांनी त्याला खुळ्यात काढल. अखेर त्याचा मुलगा व सून तालुक्यावरून आली.
" बाबा..अस काय करतोयस...सरकारी काम हाय..सही द्यावीच लागेल. दिल्लीहून नोटिसा आल्यात.ते जमीन ताब्यात घेणारच."
" नाय बा..मले मंजूर नाय! म्या माझी जमीन नाय देणार त्या परीस तिथंच बसून उपाशी मरीन.'जनाबा म्हणाला.
"आर पण विमानतळ होतोय...गाव सुधारेल..सकाळ ...संध्याकाळ..विमान भिरभिरत येतील..आपल्या जमिनीवर उतरतील."
'विमान उतरतील ' हे ऐकताच जनाबाचे डोळे लकाकले.
मघापासून मान खाली घालून बसलेला जानबा तरतरी आल्यागत सरळ बसला.
" विमान आपल्या माळावर येईल म्हणातो ? भिंगरीवाणी भिरभिरत येईल? खरंच ..?"
" होय तर." सूनबाई म्हणाली.
" विमान येतंय तर देतो सही..पण मी माझी जमिन माझी आय इकानार नाय..फुकाट देईन."
मुलानं आपल्या बायकोकडे तिरक्या नजरेने बघत इशारा केला. सुनेने जानबाची सही कागदांवर घेतली. ती दोघं कागद घेऊन तालुक्याला गेली.त्या दिवसांपासून जानबा दोन चार दिवसांनी 'विमान कवा येणार ' हे विचारायला.माळावर जाऊ लागला.विमान बघण्याच आपल स्वप्न पुर होईल याची त्याला आशा वाटू लागली. पण काम संथ गतीनं पुढे सरकू लागल. काहीजण पैशांसाठी काम बंद करण्याच्या धमक्या देऊ लागले. जानबा आता थकू लागला होता.पण रोज नव्या आशेने तो माळ चढायचा.पण पदरी निराशाच पडायची. हळूहळू जानाबला माळावर जाण कठीण होऊ लागलं.आता तो दहा - बारा
दिवसांनी वर जाऊ लागला.माळावर भलमोठ विमान उतरल..आणि आपण आनंदाने नाचतोय अस स्वप्न त्याला वारंवार पडू लागल.तो दचकून जागा होऊ लागला.
जमीन घेतल्यापासून सहा वर्ष झाली होती. आता काम पूर्ण होत आल होत.धावपट्टी तयार झाली होती.पण अजून पर्यावरण... व अन्य परवानग्यांसाठी काम अडलं होत. पण आता जानाबाला तो दमवणारा चढ चढता येईना. गावातच तो कुणाकडे तरी चौकशी करी.." विमान कवा येणार?."
गाववाले हसत व .' विमान आल ' अस म्हणून त्याची टर उडवत. तो त्यांच्याकडे लक्ष देत नव्हता.
काही दिवसांनी त्याचे घराबाहेर पडणं बंद झालं. ओसरीवर बसून विमानाचं आवाज कानी पडतो काय ते तो ऐकत राही.बघता बघता तो अंथरुणाला खिळला....आणि बातमी आली...विमानतळावर पाहिलं विमान उद्या उतरणार. गाववाले विमान उतरताना बघायला जाण्याची तयारी करू लागले. जानबाचा जीव तळमळू लागला. त्याचे डोळे खोल गेले होते प्राण कंठाशी आले होते. घश्यात घरघर सुरू झाली होती.पण विमानाची घरघर त्याला ऐकायची होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी...सारे गावकरी नटून थटून बाहेर पडले.माळावर...चौघडा झडत होता. केंद्राचे नागरी उड्डयन मंत्री यायचे होते. राज्याचे मुख्यमंत्री..स्थानिक आमदार खासदार...येणार होते.शामियाना उभारला होता.जानबाचा मुलगा आला होता. तो बापाला बघायला घरी गेला.पाहतो तो काय जानबा निपचित पडला होता..त्याचे प्राण देह सोडून गेले होते. गावाचं स्मशान वर माळाच्या एका टोकाला होत ते मात्र तसच शाबूत होत.
वर माळवर गडबड सुरू होती.पाहिलं प्रवासी विमान थोड्याच वेळात येणार होत. त्या विमानातून खाली पुष्प वृष्टी होणार होती. सारे मंत्री...आमदार..खासदार...पुढारी लोक पुढे शामियान्यात बसले होते.जमिनी देणारे गावकरी काटेरी कुंपणाच्या बाहेर उभ राहून गंमत बघत होते.
" आल् आल....तो बघा ठिपका.'
" ते बघा. हळूहळू जवळ येतंय." लोक ओरडू लागले.
त्याच वेळी तिथून थोड दूर एक चिता धडधड जळत होती. धुराचे लोट.. गरगरत वर जात होते खाली उतरणाऱ्या विमानाला कवेत घेत त्याच्याही वर जात होते.
चौघडा वाजत होता. टाळ्या पिटल्या जात होत्या. चितेसमोर उभ्या असलेल्या जानाबाच्या मुलाच्या डोळ्यासमोर बापला न कळता बँकेत ठेवलेल्या लाखो रुपयांच्या एफडी फेर धरून नाचत होत्या .आता विमानातून पुष्पवृष्टी सुरू झाली.वाऱ्याबरोबर काही फुले उडत उडत जळणाऱ्या चितेवर जाऊन पडली. विमान चितेवरून गिरक्या घेत खाली उतरले. सुवासिनी ओवाळणी घेऊन पुढे झाल्या.गुलाल उडाला.वर वर जाणाऱ्या धुरातून एक आवाज...एक नाद हळुवारपणे आल्यागत वाटला.
' विमान आल का बा?"
-----*------*------*****"----
समाप्त.

बाळकृष्ण सखाराम राणे
8605678026

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED