Fulfillment books and stories free download online pdf in Marathi

पूर्तता

पूर्तता
माणसांनी तुडुंब भरलेल्या त्या हाॅलमध्ये पाऊल ठेवताच माई थोड्या बावरल्या---तेवढ्याच गहिवरल्यासुध्दा.आपल्या मुलाच्या कर्तुत्वाचा त्यांना अभिमान वाटला.नाहीतरी आपण कोण?कुठल्या?आज आपली ओळख आहे ती पुरूषोत्तम दळवीची आई म्हणून!होय!' जन्मदात्री आई ' बस्स एवढेच ! माईंना थोडा विषादही वाटला.आज त्यांचा साठावा वाढदिवस साजरा होत होता.त्यासाठी पुरूषोत्तमाने मुंबईतल्या व्हि.टी.सारख्या पाॅश एरीयात कार्यक्रम ठेवला होता. निमंत्रण मिळालेले व न मिळालेले लोक सुध्दा---नुसत्या ऐकिव बातमीवरुन आले होते. पुरूषोत्तमाचा लोकसंग्रह अफाट होता. सहकार क्षेत्रातल्या त्याच्या कर्तृत्वाने वेगळीच उंची गाठली होती. मुंबईतील एका मोठ्या सहकारी बॅंकेचा अध्यक्ष---अनेक सहकारी संस्थांचा संचालक व कामगार चळवळींशी संबधित असल्याने अनेक मातब्बर मंडळींशी त्याची ओळख होती.म्हणूनच आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सहकार क्षेत्रातल्या नामवंता बरोबरच दोन आजी आमदार व एक माजी आमदार हजर होते त्यामुळे माई बावरल्या होत्या.
माईनी सभोवताली नजर फिरवली. हाॅलमध्ये त्यांना गावाकडची मंडळीही दिसली.त्यांना थोड बर वाटल.हाॅलमध्ये मंद संगीत वाजत होत.अत्तरांचे गंध मन धुंद करत होते.फुलांनी सारा हाॅल व स्टेज सजवलेले होत.रंग-बेरंगी विद्युत दिव्यांनी हाॅल उजळून निघाला होता.
सगळीकडे ऊत्साह व आनंद भरून उरला होता.पुरूषोत्तमने माईना हात धरून स्टेजवर नेले.सारेजण आदराने ऊठून उभे राहिले. माई बसताच सारे बसले.समई प्रज्वलित करण्यात आली.सुवाशिनिंनी माईना ओवाळले. आधुनिक रिवाज म्हणून केक कापण्यात आला.टाळ्यांच्या कडकडाट झाला.पुष्पगुच्छ देवून माईना शुभेच्छा दिल्या गेल्या.पुरूषोत्तमाने आजच्या दिवसाची आठवण म्हणून साठ शालेय विद्यार्थांच्या दहावी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च आपण उचलू असे जाहीर केले.आभार व्यक्त करण्यासाठी माईंचा पुतण्या सदानंद उभा राहिला पण माईंनी त्याला खुणा करून थांबवल.आपल्याला बोलायच आहे अस खुणावल. पुरूषोत्तम व सदा आश्चर्यचकित झाले.माई यापूर्वी अगदी घरगुती समारंभात सुध्दा बोलल्या नव्हत्या.माईंच बरसच आयुष्य गावात गेलं होत.कधितरी मुंबईला यायच्या पण फारश्या बाहेर पडायच्या नाहित. कदाचित त्यांना सर्वांचे आभार स्वतः मानायची असतील अस सर्वांना वाटल.
माई बोलायला उभ्या राहिल्या. सारे गप्प राहिले.सदाने माईक स्टॅंडवर अडकवून माईंच्या समोर ठेवला. माईनी चेहर्यावरून हात फिरवला.त्यांच्या मनातली खळबळ चेहर्यावर स्पष्ट दिसत होती.थरथरत्या शब्दात त्यांनी सुरूवात केली.
' पोरांनू मी कोकणात वाढले. त्यामुळे थोडे शब्द ईकडे-तिकडे होतील.संभाळून ध्या.काही कळेल न कळेल.पण मला आज बोलायच आहे.गेल्या बेचाळीस वर्षे मनात-ऊरात जे दाटून राहिलंय ते मोकळ करायचंय.पुरूषोत्तमाकडे एक मागण मागायचय.आज बोलले नाही तर मनातल मनात राहिल. 'माई किंचित थांबल्या. टेबलावरचा पाणी पिऊन त्यांनी पुन्हा बोलायला सुरूवात केली.पुरूषोत्तम,सदानंद सदानंदाची आई शारदा व घरातली इतर मंडळी माईंकडे टक लावून पाहत होती. काय सांगायचय माईना?पुरूषोत्तमाकडे कसल मागण मागणार आहेत त्या? असे प्रश्न त्यांच्या मनांत निर्माण झाले होते.
'मुलांनो ! दूर कोकणात एक गाव आहे. डोंगर-कपारीत वसलेल. बेचाळीस वर्षांपूर्वी अनेक रूढी,परंपरा व अंधश्रद्धा मध्ये अडकलेल.त्यामुळे सर्व वाटा अंधारलेल्या---कोती---पिचलेली मने घेवून सारे जगत होते.देव-धर्म,सगे-सोयरे यांच्या बंधनात अडकलेले. घाण्याच्या बैलाप्रमाणे त्याच त्या मार्गावरून फिरणारे. या गावात एक नवविवाहित जोडप---सुखावलेल---सु-स्वप्नात हरवलेलं होते. कारण त्यांच्या संसार वेलीवर एक फूल उमलणार होत. घरातली सारे आनंदीत झाले होते. बाळाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली होती.सारे डोहाळे कोड-कौतुक पुरवले जात होते.जरा कुठं दुखले खुपल की सर्वांची घालमेल होती. त्या मातेला गर्भातील बाळाच्या हालचाली जाणवत होत्या. तिला अपार सुख होत होत.नऊ महिने तिने त्या मुलाला आपल्या गर्भात जोपासल-वाढवला.बाळाच हसर तोंड बघायला मिळणार---त्याच्या कोमल कांतीच्या स्पर्शाने किती आनंद मिळेल या कल्पनेने ती मोहरत होती.अखेर एका पावसाळी रात्री तिला वेदना जाणवू लागल्या. धावपळ सुरू झाली. कुणीतरी पंचांग बघून सांगितले -आज अमावस्या आहे.---त्यात योगही चांगला नाही. आज बाळ जन्माला आलतर सर्व कुळाला त्याचा त्रास होईल.सारे आजचा दिवस टळू दे म्हणून देवाचा धावा करू लागले. हे ऐकून वेदनेने तळमळणारी ती माता दुखी -कष्टी झाली.मनोमन देवाला साकडे घालू लागली.बस्स---आजची रात्र टळू दे रे बाबा!---हे मागणं मागू लागली. तिचा पती उदास व भयभित झाला.
.पण आपणाला पाहिजे ते घडेल अस नाही. देव आपली परीक्षा बघत असतो. तोच आपल्याला अशा प्रसंगातून धडा शिकवत असतो.अंधश्रद्धा,रूढी व परंपरा किती तकलादू आहेत ते काळच आपल्याला शिकवत असतो.गेल्या नऊ महिन्यांपासून ज्याची सारे आतुरतेने वाट बघत होते तो बाळ आता परका झाला होता.नकोसा झाला होता.त्या काळ्या-कभिन्न ओल्या रात्री अखेर त्या घरात रडू उमटल.त्याने आपल्या आगमनाची जाणीव सर्वांना करून दिली. पण आज त्याच मुख-कमल बघायला कुणीच तयार नव्हते.जणू त्या अजाण बालकाच तोंड बघितल्यावर मोठ पातक लागणार होत.घरात खल सुरू झाला ,हे बालक घरात ठेवायच नाही अस ठरलं.अमावस्येला जन्मलेले हे बाळ कुळाच्या मुळावर येईल.सर्वांना त्याचा त्रास होईल. त्यापेक्षा त्याला दूर कुठेतरी सुरक्षित ठिकाणी सोडूया.सर्वांच एकमत झाल.त्या बाळाच्या आईनेही होकार दिला.खर म्हणजे तिच्या हाती काहीच नव्हते. तिच एक मन आक्रंदत होत---अपराधीपणाच्या भावनेने विव्हळत होत.गेल्या कित्येक महिने ती ज्या सोनेरी क्षणाची वाट बघत होती तो क्षण आला होता. पण काळा-कभिन्न कोळसा होवून!सारंच संपलं होत.मनातल्या अंधश्रद्धानी ममत्वावर मात केली होती. तिने भित-भित एकदाच ते गोर गोमट रूप दूरूनच डोळ्यात साठवून घेतलं.कपड्यात गुंडाळलेल ते नाजूक बाळ तिच्या कुशीतून विहिणीने टोपलीत ठेवलं व बाहेर घेवून गेली.त्या क्षणी घायाळ झालेली ती आई धाय मोकलून रडू लागली.तिच्या अश्रूंचा बांध फुटला होता.त्या बाळाचा काय होईल या भयाण जाणीवेने ती घाबरली होती.
पण अमावस्येला जन्मलेला तो बाळ प्रचंड इच्छाशक्ती घेवून आला होता. जगण्याची---वाढण्याची---फुलण्याची प्रचंड उर्मी त्याच्या मनी होती. ईश्वराला वेगळाच खेळ खेळायचा होता.टोपली घेवून त्या बाळाचे पिता व आजोबा अंगणात आले.एवड्यात अंधारातूनत्यांच्या समोर छोट्या बाळाचा मोठा काका व काकी जे मुंबईवरून त्याच क्षणी आले होते ती दत्त म्हणून हजर झाले.पाऊस व वारा या मुळे ती दोघं नखशिखांत भिजली होती. सारा प्रकार समजताच ते प्रचंड संतापले. टोपलीतले ते बाळ आपल्या बायकोच्या हाती देत म्हणाले 'घे!आपली दोन्ही बाळ देवाने जन्मताच हिरावून नेली.पण आज हे बाळ त्याच देवाने तूझ्या ओटीत टाकलय. तू त्याची आई व्हावं अस नियतीला वाटतय. चल आपण इथे थांबायचे नाही-आत्ता याक्षणी आल्यापावली मुंबईला जाऊ. '
त्यांच्या बायकोने आनंदाने ते मूल आपल्या कुशीत घेतलं.आत त्या बाळाच्या आईला हे ऐकून आनंद वाटला.कुठंही का असेना तो सुखरूप राहणार होता. त्यांची खूशाली कळणार होती. अंधार्या रात्री जन्मलेला तो बाळ आपल्या काका काकूंसाठी पौर्णिमेचा शितल प्रकाश घेवून आला होता.त्या दांपत्याला पुढे मुलगा झाला व जगला सुध्दा!जणु या अवलक्षण ठरलेल्या बाळाचा तो पायगुण होता. त्याच्यावरच त्यांच प्रेम आणखीनच वाढल---दृढ झाल.बाळ वाढत गेल तशतशी त्या जोडप्यांची प्रगती होत गेली.कष्टाचे दिवस संपून सोन्याचे दिवस आले.जिथं हात लावावा त्याच सोन होवू लागल.बाळ शाळेत जावू लागला. तो हुषार होता.काही वर्षांनी ती मंडळी गावी आली.मुलाच्या खर्या आईने त्याला जवळ घेतलं पण मुलाच्या डोळ्यात परकेपणा होता. त्याला अजून कुणी सांगितले नव्हते की त्याला जवळ घेणारी त्याची खरी आई आहे म्हणून !तो तिला काकी म्हणायचा.पुढे मोठा झाल्यावर त्याला सार समजल.पण त्याने त्या अभागी मातेला कधीच 'आई ' म्हणून हाक मारली नाही.तो ज्यावेळी यायचा तेव्हा वाकून नमस्कार करायचा हव नको ते विचारायचा ते त्वरित द्यायचा.तो मुलगा यशाची एक-एक पायरी चढत गेला.त्याची खरी आई दूरूनच सार बघत होती.सुखावत होती.आपल्या इतर मुलांना त्याच्यासारखा बनण्याची प्रेरणा देत होती.पण ती आतल्या आत तडफडत होती.फक्त एक शब्द ऐकण्यासाठी आसुसली होती. '
माई आवडे बोलून थबकल्या---त्यांनी एक दीर्घ उसासा टाकला.सारे स्तब्ध झाले होते.सर्वांचे डोळे पाणावले होते.माई पुढे म्हणाल्या "होय!पोरांनू--- होय मीच ती अभागी आई!जिने आपल्या मुलाला कुलक्षणी समजून जन्मताच दूर लोटले होते. खर म्हणजे 'आई ' या शब्दाला कलंक लागेल अस मी वागले होते.नाही विरोध करू शकले मी त्यावेळी!तो भितीचा अंधश्रद्धेचा पगडा मी दूर करू शकले नाही. आज सार सहज---सुरुळीत वाटतय पण त्या वेळी तस नव्हत.आज माझा तो अधिकार नाहीत पण माझे कान एक शब्द ऐकण्यासाठी आतुर झालेत.मला पुरूषोत्तमाच्या तोंडून 'आई 'ही हाक एकदाच ऐकायचीय!---फक्त एकदा!' माई धाप लागल्याने थांबल्या. पुरूषोत्तमाकडे भरल्या डोळ्यांनी बघत त्या खुर्चीवर बसल्या.
सारे चित्रासारखे स्तब्ध झाले होते.भावनांचे हिंदोळे सर्वांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होते. पुरूषोत्तमाच्या अगदी जवळच्या व्यक्तींनाही त्याच्या जन्माची ही कहाणी माहीत नव्हती. त्यामुळे माईंचा कथा ऐकून सारेच थक्क झाले. अशा या भावुक कसोटीच्या क्षणी पुरूषोत्तम काय करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.पुरूषोत्तम एवड्या मोठ्या समारंभात लहान मुलासारखे रडू लागला. रडतोस तो उभा राहिला. रडवेल्या स्वरात तो बोलू लागला. "माई,---खूप अवघड व कठीण मागणं तू आज मागितलस. तुझ्यासाठी माझ्या ह्रदयात अगदी पवित्र व आदराच स्थान आहे.पण ते एका मुलाच्या ह्रदयात त्याच्या आईसाठी असत तस आहे का?हे सांगता येणार नाही. खर म्हणजे हे स्थान फक्त तिलाच आहे जिने मला पहिल्यांदा मुलगा म्हणून कुशीत घेतलं.आईच्या उबदार स्पर्शाचा अनुभव दिला.दुध भरवलरांगायला-बोट धरून चालायला शिकवलं.माझे बोबडे बोल ऐकून जी सुखावली. मी पडलो तर व्याकुळ होवून रडणारी.मला घरी परतताना उशीर झाल्यास जिच्या जीवाची घालमेल व्हायची...फक्त तिच मला ' आई ' म्हणून जाणवली---भावली.माझ्या प्रत्येक यशाबरोबर हरखून जाणारी---एखाद्या अपयशाने खचून जाऊ नकोस अस सांगून पुन्हा उभ राहण्याची प्रेरणा देणारी---जिला मी बबड्या बोलात पहिली हाक दिली ' आई '!फक्त तिलाच मी 'आई ' म्हणून शकतो." भावनातिरेकाने त्याचे शरीर कापत होते. तो पुन्हा बोलू लागला.
" माई तुझ्याविषयी माझ्या मनात कोणतीही कटुता किंवा राग नाही. तू जे केलंस ते भितीच्या भावनेतून---कुळाला त्रास होईल या अंधश्रध्देतून. अन् त्या काळी एखाद्या स्रीला विरोध करण्याच,आपल मत मांडण्याचा अधिकारही नव्हता.तू मला सतत वंदनीय व पूजणीय आहेस.पण माझ्या ओठांवर तुझ्यासाठी'आई ' हा शब्द येत नाही. कदाचित जिच्या नुसत्या चाहुलीने सुध्दा माझ्या ओठांवर आपोआप 'आई 'अशी हाक येते,तिच्यावर अन्याय होईल या भितीने असेल मी तुला आई म्हणू शकत नसेन.खरच मला कळत नाही मी काय कराव ---या वेळी.
क्षणभर थांबून तो यशोदाबाईंकडे बघत म्हणाला "आई,तूच सांग परीक्षेच्या या कठीण वेळी मी काय कराव. माझ्या प्रत्येक श्वासावर तूझा अधिकार आहे.तू सांगशील ते मी करेन!"
सगळ्या नजरा यशोदा बाईंकडे वळल्यावर.सारे सभागृह गंभीर बनले होते.यशोदा जिने पुरूषोत्तमाला जन्मापासून सांभाळला अगदी फुलापरी जोपासला-क्षणभरही चुकूनही जिच्या मनात विचार आला नाही की हा आपला पोटाचा मुलगा नाही म्हणून!अगदी पुढे तिला दोन मुल झाल्यावरही कुणालाही कळल नाही की पुरूषोत्तम तिचा पोटाचा मुलगा नाही हे. यशोदाबाई उभ्या राहिल्या. त्यांनी सगळ्याचे पाहिलं.सारे चेहरे गंभीर व तणावात असलेले तिला दिसले.त्या मंद हसल्या-
"अरे,पुरूषोत्तमा कृष्णाप्रमाणे तू भाग्यवान आहेस.तुझ्यासमोर एक जन्म देणारी आई व दुसरी जन्मल्याबरोबर कुशीत घेवून वाढवणारी---जपणारी आई आहे!कृष्णाच्या सर्व लीला गोकुळात झाल्या---त्यांचे व्यक्तिमत्व फुलले गोकुळात पुढे होणार्या घटनांसाठी ते पोषक होते.तो नियतीचा खेळ होता.तूझ्या बाबतीतही तेच घडले. जणू नियतीला दाखवायचं होत की श्रध्दा व अंधश्रद्धा यांच्या सीमारेषा किती धूसर असतात.ज्याला अपशकुनी म्हणत होते---तो भाग्याची पावलं घेवून आला होता. पुढची नाट्य घडले ते मुंबईत,कदाचित काळाला तूझ्या भावी वाटचालीसाठी तेच घडण आवश्यक होत.तू एक सुंदर व यशस्वी जीवनाचा आस्वाद घेतोयेस ते माईंमुळेच आणि माई या शब्दात काय आहे! तर माझी आई हाच भावार्थ. कृष्ण ज्यावेळी परत देवकी समोर आला तेव्हा त्याने तेवढ्याच उत्कटतेने हाक मारली असेल 'मैया ' म्हणून जशी तो यशोदेला हाक मारायचा---यात विचार कसला करायचा?मी व माई आम्ही दोघानंही तूझं वाढण व फुलण बघितलंय तुझ्या कर्तृत्वाने आम्ही दोघी सारख्याच सुखावलो---पण मी हे बोलून दाखवलं --- वेळोवेळी तूझं कौतुक केल---तर माई गेली कित्येक वर्षे हा ताण-दडपण व अपराधीपणाची भावना घेवून जगताहेत. तूझ्या एका हाकेने---तिच मन शांत होईल---सारा ताण नाहिसा होईल.भरून पावेल ती सार!"
यशोदाबाई अगदी सहज म्हणाल्या.
पुरूषोत्तम जो अगदी चित्रासारखा स्तब्ध उभा होता अचानक वाकला माईंच्या पायांवर डोक ठेवलं व म्हणाला-' आई'! क्षणभरातच सारा ताण निवळला---सभागृहातल वातावरण प्रसन्न झाले.
एकच शब्द तिथे पुन्हा-पुन्हा गुंजत राहिला---आईआई-आई!

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED