Brother's stone books and stories free download online pdf in Marathi

भावाचा धोंडा

भावाचा धोंडा
दिपक भाऊबिजेसाठी बहिणीकडे कोकणात आला
होता. सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीच्या पायथ्याशी
असलेल्या एका सुंदर खेडेगावात त्याच्या बहिणीचे सासर
होते. सभोवताली सह्याद्रीच्या डोंगररांगा----मध्ये खोलगट
जागेत वसलेल गाव---मोकळे वातावरण व सतत वाहणारा
हलका वारा.इथली हवा स्वच्छ व प्रसन्न होती.गावात पाऊल
टाकताच दिपकच्या अंगात उत्साह संचारला--मन प्रसन्न
झाले.परिसर हिरवागार होता.डोंगर उतारावर नाचणी,कूळीथ
या पिकांची शेती दिसत होती.विविधरंगी मनमोहक रानफुले
वाटेत लक्ष वेधून घेत होती.शहर व गावातला फरक
दिपकच्या चटकन लक्षात आला.दिवाळी असल्याने गावात
उत्साह होता.प्रत्येकाच्या अंगणात सुंदर रांगोळी घातली
होती.आकाशकंदिल टांगलेले दिसत होते.गुरांचे गोठे सजवलेले
होते.हे वातावरण बघून खूष झालेला दिपक गुणगुणतच
आपल्या बहिणीच्या घरी पोहचला.
"ताई,आपल्याला तूझं गांव भारी आवडल बुवा."
"मग काय विचार आहे?इथलीच एखादी मुलगी तुझ्यासाठी
बघुया,मग वारंवार इथे यायला मिळेल. " भावोजींनी त्याची
मस्करी केली.
दिपक खळखळून हसत म्हणाला "पण मला आजसायंकाळी
कोल्हापुरात पोहचायच, भाऊबिज लवकर आटोपून घेवूया. "
"अरे,अशी घाई का करतोस?आता गावातल्या सगळ्या
बहिणी सीमेवरच्या भावाच्या धोंड्याला ओवाळायला जाणार
आहेत.ते झाल्याशिवाय गावात भाऊबिज होत नाही,"
"म्हणजे?"
"गेल्या तिनशे वर्षांची परंपरा आहे,तुझी ताई सांगेल तूला नंतर
त्याची कहाणी'
एवड्यात ताशांचा आवाज ऐकू येवू लागला,
"हे बघ सगळे आलेच चल येतोयस?" ताई ओवाळनीच ताट
घेत म्हणाली,
"आवडेल मला यायला, माझा विषयच आहे 'भारतीय परंपरा
व लोकसाहित्य'मला यामुळे मदतच होइल,"
दिपक, ताई सोबत बाहेर पडला,गावातल्या बायका सजून
सवरून बाहेर पडल्या होत्या, ओवाळनीची ताटे हातात घेवून
ओव्या गात चालल्या होत्या, ह्या सगळ्या धामधुमीत लहान
मुलही गलका करत मागेपुढे धावत होती, एका गावकर्याच्या
हातात सजवलेले ताट होते.त्यात पांढराशुभ धोतरजोडा
होता.दिपक व त्याची ताई मनिषा त्या घोळक्यात मिसळल्या,
"अगो, मनिषा भाव ईलो वाटता भाऊबिजेक?" कुणी शेजारच्या
बाईने विचारले.
"होय काकू हा काय,"
"ताई,ह्या भावाच्या धोंड्याची कथा सांगणार होतीस ना?"
"होय,थोड माग राहूया, नाहितर या आवाजात ऐकायला येणार
नाही, ऐक
खुप वर्षापूर्वी सोनगाव व पारगाव हि गाव मधल्या जंगलामुळे
वेगवेगळी झाली होती. एका गावातून दुसर्या गावात जंगलाच्या
पायवाटेने जावं लागे वाट


चढ-उताराची,पायघसरणीची. जंगली श्वापदांचा वावर
असलेली.सकाळी बाहेर पडल की सूर्य डोक्यावर येईपर्यंत
एका गावातून दुसर्या गावात पोहचणे व्हायचं..
पारगावात एका शेतकरी कुटुंबात दोन मुलगे व एक मुलगी
हसत खेळत राहायची. एकत्र खेळायची ,मस्ती खोड्या
करायची,दोघा भावांचा बहिणीवर खूप जीव! ती मागेल ते
आणून देण्यासाठी ते प्रयत्नांची शिकस्त करत.खेळताना
बहिणीला साधं खरचटले तरी भावांच्या डोळ्यात पाणी
यायच.चंदन मोठा ,मधली चंद्रिका तर सर्वात लहान चंद्रा.
बधता-बघता तिघं मोठे झाले.चंद्रिकाने तारूण्यात पदार्पण
केल.ती दिसायला सुंदर अगदी अप्सरा जशी.तिच्या रूपाची
किर्ती पंचक्रोशीत पसरली.सोनगावच्या जमिनदाराच्या
मुलाच्या मनात भरली.तो तिच्यासाठी झुरू लागला.मग
बापानं चंद्रिकेच्या घरी सांगावा धाडला. सोयरीक जुळली.
वाजत-गाजत लग्न झाल.दोघे भाऊ बहिणीच्या वरातीत
आनंदाने नाचले.पण चंद्रिका सासरी जाते म्हणून उदास
झाले.काळाच्या ओघात आई वडीलांची साथ सुटली. चंदन
हुषार,काळाची पावलं ओळखून वागणारा.राजाकडे कामाला
लागला.अक्कलहुषारीने एक एक पायरी चढत गेला.दरबारी
चांगला हुद्दा मिळाला.राहायला वाडा व फिरायला घोडा
मिळाला. चार चौघात ऊठबस वाढली.चंदन चुकून कधितरी
गावात यायचा.चंद्रिका आता जमिनदारीन झाली होती.नवरा
तिच्या मुठीत होता अन् गावात शब्दाला मान होता.दोन मुलांची
आई झाली होती. कोजागिरीच्या पौर्णिमेच्या चांदण्या प्रमाणे
तिच सौंदर्य अधिकच खुलल होत.घराचे सारे निर्णय तिच
घ्यायची.
धाकट्या चंद्राचे मात्र भाग्य अजून उजळले नव्हते.शेतीत
राब-राब राबायचा तेव्हा कुठे तोंडात घास जायचा.शेतीतला
अर्धा वाटा चंदनाला दिला होता.तो त्याने दुसर्याला कसायला
दिला होता.पण तरीही चंद्रा समाधानाने राहायचा.त्याची
कारभारीन तुळशी, कष्ट करणारी होती.नवरा बायको शेतात
राबायची. सायंकाळी दमून भागून घरी यायची.तुळशीने दिलेले
गूळ व गरम पाणी पिऊन त्याचा शीण नाहीसा व्हायचा.
त्यांच्या छोट्या घरात त्यांच्या दोन मुलांच्या मस्तीचा आवाज
गुंजायचा.चंद्राला तर त्याच बालपण आठवयच. चंदन व
चंद्रिका यांची आठवण यायची.चांदण्या रात्री अंगणात बसून
तो मुलांना गोष्टी सांगायचा.त्यात बहिण-भावाच्या अतूट
नात्याच्या,नागदेवतेच्या व सूर्य व चंद्र या जुळ्याभावांची
कथा असायची.मित्रासारखे राहणारे हे एकदा भांडतात
व एकमेकांच तोंड न बघण्याची शपथ घेतात.त्यामुळे सूर्य
दिवसाचा तर चंद्र रात्रीचा बाहेर पडायचा.त्याच्या मुलांना ही
गोष्ट फार आवडे.गरिबीतही चंद्रा आनंदाने राहत होता.भल्या
पहाटे तुळशी जात्यावर दळण दळायची. तिच्या सुरेल
ओव्यांनी चंद्राला जाग यायची. गरमागरम भाजी भाकरी
खाऊन तो शेतात जायचा. दुपारी तुळशी जेवण घेऊन शेतात
यायची.काही वेळा तिच्या सोबत मुल पण यायची.मग सार शेत
हसरे व्हायच.
असच त्या वर्षाची दिवाळी आली.याच वर्षी चंद्रिका
जमिनदारीन झाली होती. चंदन राजाचा कारभारी झाला
होता. घोड्याच्या जागी घोडागाडी आली होती. चंद्रा आपल्या
भावाची व बहिणीची प्रगती बघून सुखावला.यंदाची दिवाळी व
भाऊबिज आनंदाने साजरी करायची अस त्याने ठरवले.
लोक उगवत्या सूर्याची पूजा करतात मावळत्या नाही, ही
जगाची रीत आहे हे तो विसरला. लकाकत्या सोन्याने लोकांचे
डोळे दिपतात पण ते सोन ज्या मातीत असत त्या मातीचा
गंधही कुणालाही जाणवत नाही.
भाऊबिजेचा दिवस उजाडला.चंद्रा लवकर उठला,आंघोळ
करून तयार झाला.तोपर्यंत तुळशीने दिवाळीसाठी तयार
केलेला फराळ बांधून दिला.भाऊबिजेसाठी घेतलेलं लुगडे
तिने व्यवस्थित घडी करून दिले.चंद्राने ठेवणीतले धोतर
व त्यावर साधा सदरा घातला. डोक्यावर पांढरीशुभ्र टोपी
घातली. तो खूष होता खूप दिवसांनी आपल्या बहिणीला तो
भेटणार होता.तिच्याशी गप्पा मारणार होता.आनंदाचे क्षण
पुन्हा अनुभवणार होता.त्याला घाई झाली होती.सोनगावाला
जाऊन कधी एकदा बहिणीला बघतो अस त्याला झाल
होत.बायको मुलांचा निरोप घेवून तो बाहेर पडला.गाण
गुणगुणत तो झपाझप बाट चालू लागला.चंद्रिकेशी काय काय
बोलायच ते ठरवू लागला. बघता-बघता वाट संपली.वेस
ओलांडून सोनगावात पाय ठेवता न ठेवता त्याच्या समोरून
एक घोडागाडी धुरळा उडवत गेली.त्याला वाटल त्याचा दादा
चंदन तर नसेल ना?नाहीतरी या आडगावात घोडागाडी
चुकूनच
दिसायची.दादा आला तर त्याचाही भेट होईल.घामेघूम झालेला
चेहरा धोतराच्या सोग्याने पुसत तो उताविळ होउन चालू
लागला.
इकडे जमिनदारांच्या वाड्यासमोर घोडागाडी उभी राहिली.
रेशमी वस्त्रे परिधान केलेला चंदन त्यातून उतरला.त्यापाठोपाठ
त्याचा सेवक हाती छत्री घेवून उतरला.
दरवाज्यावर चंद्रिका हाती गूळपाणी घेवून तर भावोजी
हात जोडून उभे होते.चंदनचे स्वागत करत त्याचा हात
धरून चंद्रिका त्याला आत घेवून गेली.दिवाणखान्यात धूप
अगरबत्ती जळत होती. मखमखली गालीच्यावर ठेवलेल्या कोरीव
लाकडी आसनावर तिने दादाला बसवले.तिने दादाची व
दादाने तिची विचारपूस केली.नक्षीदार चंदनी पाटावर दादाला
बसवल,सभोवताली छान रांगोळी घातली होती. चांदीच्या
ताटात चांदीच निरांजन पेटवून चंद्रिकेने दादाला ओवाळल.
कुंकूम -तिलक लावला.भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना
केली. दादाने जरतारी पैठणी व सोन्याची अंगठी भाऊबिज
म्हणून दिली.चंद्रिका हरखून गेली. तिने मिठाईचा पहिला घास
चंदनला भरवला. तेव्हयात तिची सेविका घाईघाईत आत
आली.चंद्रिकेने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
सेविका तिच्या कानी कुजबुजली. तशी ती सेविकेसोबत बाहेर आली.
"मालकिणबाई बहुधा तुमचा लहान भाऊ येतोय."
"कसा येतोय?"
"त्याचा वेष कसा आहे?"
"धुळीने भरलेल धोतर,जुना सदरा व डोईवर टोपी."
"अरे देवा,तू त्याला प्रवेशद्वाराजवळ थांबव.ही दिवाळीची
भेट त्याला दे.त्याला सांग ताईने तिच्या पतिसाठी व्रत
घेतलय की ती काही दिवस एकांतात ईश्वरचिंतनात राहणार
आहे.कुणालाही भेटणार नाही."
सेविका भेटीचं ताट घेवून लगबगीने बाहेर गेली.
चंद्रिकेच्या डोळ्यांवर श्रीमंतीचा धुरळा बसला होता. तिला
भोळ्या भावाचे प्रेम दिसले नाही. सेविकेने चंद्राला वाड्याच्या
आवारा बाहेरच्या दारावरच थांबवल.चंद्रीकेने सांगितले
त्याप्रमाणे तिने चंद्राला सांगितले. चंद्रा उदास झाला.हातातला
फराळ व सुती लुगडे त्याने सेविकेच्या हाती दिले.धुळीने
माखलेला चेहरा व डोळ्यातली आसवे पुसत तो म्हणाला "ताई
व भावोजींना दीर्घायुष्य लाभो. सर्वांना ही दिवाळी सुखाची
जावो..
चंद्रा भोळा होता पण खुळा नव्हता. बहिणीच्या दारात उभी
असलेली घोडागाडी,गाडीवान व बाहेर उभा असलेला सेवक
हे बघूनच तो सार समजला.त्याची ताई पालखीतून
व दादा धोडागाडीने फिरतात. त्यांच्या तोलामोलाची त्याची श्रीमंत नव्हती.
.ताईने जागरहाटी प्रमाने विचार केला. श्रीमंत
भावाची चांदीच्या ताटाने ओवाळनी तर गरीब भावाची दारावरून बोळवन!
त्याच्य स्वाभिमानाची थट्टा झाली होती, एकाएकी त्याला विरक्ती
आली.तसाच चालत तो वेशीवर आला. एका आम्रवृक्षाखाली तो
ठाण मांडून बसला
सायंकाळ झाली नवरा अजून आला नाही म्हणून
तुळशी चिंतित झाली रात्र झाली तसा तिने विचार
की बहिण -भावाची खूप दिवसांनी भेट झाली,गोष्टी करता
करता वेळ निघून गेला असेल,तिने भावाला थांबवून घेतलं
असेल, असो ! तेवढाच आपल्या पतीला आराम मिळेल,
नाहीतरी दिवसभर शेतात राबत असतो,पण दुसर्या
दिवसाची सायंकाळ झाली तरी चंद्रा आला नाही तेव्हा ती
घाबरली.मुलांना शेजारी ठेवून बाहेर पडली वेशीवर येताच
झाडाला टेकून बसलेला चंद्रा तिला दिसला,
"अहो, इथ काय बसलात? चला घरी मुल वाट बधताहेत. "
चंद्रा काही न बोलता तसाच समोर बघत बसला, तुळसी शाहाणी
होती.ती समजली बक्षिणीघरी भावाचा अपमान झालाय ती
नंणदेला दोष देवू लागली.चंद्राने तिला हाताने थांबवले,
तुळशी चंद्राला वारंवार घरी चालण्याविषयी विणवू लागली,
पण तो हलेना, तुळशीनेही तिथेच बस्तान मांडल,जिथ पती तिथे
पत्नी अन्न नाही पाणी नाही . त्या दिवशी मध्यरात्री तुळशीचा
डोळा लागला. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलीने तिला जाग
आली. कुशीवर वळून पतीकडे बघते तर पती नाही, त्या जागी
एक मोठा धोंडा माणसाच्या आकाराचा ती धाय मोकलून रडू
लागली, ती ईकडे-तिकडे शोधू लागली,हाका मारू
लागली. तिचे भान हरपले. एवड्यात शेजारी मुलांना घेवून
आले. तुळशी त्या धोंड्यावर डोक ठेवून रडत होती. मुलांकडे
बघता बघता ती जीवाच्या आकांताने म्हणाली 'यापुढे या
भावाच्या धोंड्याला ओवाळनी केल्याशिवाय सोनगावातली
भाऊबिज होणार नाही.. '
बोलता बोलता तुळशीने तिथेच प्राण सोडले. ती प्रतिव्रता सती
झाली. गावकर्यानी 'भावाच्या धोंड्या शेजारी सतीची तुळस
बांधली.
चंद्रिकेच्या कानी सारी गोष्ट पडली.तिला पश्चात्ताप
झाला आपली चूक समजली.ती तशीच भावाच्या धोंड्यापाशी

धावत आली.पश्चात्तापांच्या अश्रूनी ती शिळा
भिजवली . भावजय तुळशीने तिला माफ केलं की नाही ते
माहित नाही अस सांगतात की चंद्रिका आली तेव्हा सतीच्या
तुळशीतील तुळशीची पान उलट दिशेने फिरली होती. पण
चंद्राने तिला निश्चित माफ केलं होतं कारण चंद्रिका भावाच्या
धोंड्याला कवटाळून रडत असताना एक हुंकार ऐकू आला.
चंद्रिकेने आयुष्यभर पालखी वापरली नाही. साधेपणाने
राहीली. पुढे चंद्राच्या मुलाने व मुलीने मोठेपणी परिसरात
नाव कमावले व सुखी झाली. आई वडीलांची छाया त्यांच्यावर
सदैव राहिली.
तर अशी ही 'भावाच्या धोंड्याची 'कहाणी जो ऐकेल त्याच्या
डोळा येई पाणी
बोलता बोलता हिरव्यागार शेताच्या बांधावरून सारे जण
वेशीवर पोहचले.दिपक व मनिषाताई 'भावाच्या धोंड्या समोर
उभे राहिले. कहाणी ऐकताना दिपकच्या डोळ्यात खरच पाणी
आल होत.त्याने समोर पाहिलं बसलेल्या माणसाच्या उंची
एवडा तो धोंडा होता.साधारण माणसाची ठेवण असलेला!
त्याच्याकडे बघताना दिपकच्या डोळ्यासमोर चंदन,चंद्रा,चंद्रिका व तुळशी उभी राहिली. त्याने नकळत हात जोडले.

बाळकृष्ण सखाराम राणे
सावंतवाडी.
(सदर कथा पूर्णतया काल्पनिक आहे)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED