जानकीसाठी एक एक दिवस मोठा कठीण चालला होता.घरापासून दुरावण्याचं दुःख तर होतच पण त्याहीपेक्षा आपल्या माणसांना फसवण्याचं दुःख त्यापेक्षाही जास्त होत.तिच्या मनात बरेचदा आलं की मानसी जवळ सगळं सांगून मोकळं व्हावं पण तिची हिंमत होत नव्हती. दोन्ही लग्न घरी तर उधाण आलं होतं.मधल्या दिवसात अग्निहोत्रींकडे देव कुटूंबीय व्याही भोजनाला येऊन गेले होते. लग्न पत्रिका वाटून झाल्या होत्या.लग्न घरी पाहुणे मंडळी येणं सुरू झाले होते.कामातून कुणालाही सवड नव्हती.प्रत्येक जण म्हणत होता की जानकीला खूप चांगला नवरा आणि खूपच छान सासर मिळालं.देवांच्या घरीही पाहुणे येऊ लागले होते.
सवाष्णीनीं मिळून लग्नाची हळद दळली होती.जानकीला प्रत्येक जण घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शिकवत होते.उखाणे पाठ करायला लावत होत्या.जानकीची चांगलीच तारांबळ उडाली होती. माई आणि अण्णांना जानकी जाणार या विचाराने रात्री झोप येत नसे .पाहता पाहता आठ दिवसावर लग्न आलं . दोन्ही घरी देवीचा कुळाचार पार पडला. देव देवकांची स्थापना झाली.हिरवा मंडप दारी पडला.मेहंदीच्या दिवशी जानकीने सुंदर महेंदि रंगाची साडी नेसली होती.त्यावर फुलांची ज्वेलरी घातली होती. वधूला चढणार तेज तिच्या चेहऱ्यावर चढल होत.आधीच सुंदर असलेली जानकी आता अधिक सुंदर दिसत होती. जानकीच्या हाता पायावर महेंदी काढण्यात आली.त्यात रघुवीर च नाव कोरल होत.हातभर हिरवा चुडा भरला.रघुवीर ने ही छोटीशी मेहंदी काढली होती त्याच्या हातावर जानकीच नाव कोरल होत. ही रात्र जानकीची त्या घरातली शेवटची रात्र होती. घरचे सगळे जानकीच्या खोलीत गेले.जानकी तिच्या खोलीला न्हाळत होती..
" जानू .." अण्णांनी थरथरत्या स्वरात आवाज दिला.तसे जानकीने डोळ्यातले अश्रू पुसले.
"रडतेय का जानू तू?" माई म्हणाल्या.
"नाही ग माई " जानकी स्वतःला सावरत म्हणाली.
अण्णा,माई,अनंतराव,अरुताई, जयंतराव, जयुताई,मीनाताई,चैतन्य, मनु,ओंकार, मंदार सगळे जानकीच्या भवती जमा झाले.जुन्या आठवणींना उजाळा देतांना कधी चेहऱ्यावर हसू तर कधी डोळ्यांत अश्रू येत होते.त्यांची लाडाची लेक सासरी जाणार होती त्यामुळे प्रत्येकाच मन गहिवरून आलं होतं..
दुसऱ्या दिवशी सकाळी हळद होती.पिवळ्या रंगाची साडी आणि पिवळ्या फुलांचे दागिने जानकी ने घातले होते. तिच्या गोऱ्या अंगाला हळद लागली.नाच ,गाणं धमालमस्ती सुरू होती..जानकीची उष्टी रघुवीरसाठी ठेवली होती.त्याच रात्री देव मंडळी सीमांत पूजेसाठी अकोला येणार होते.पाहुणे मंडळी तयार झाली.रघुवीरला औक्षवण केलं आणि वऱ्हाड निघाले अकोल्याला.. अग्निहोत्री मंडळी अधिच हॉलवर स्वागतासाठी तयार होते. लग्न हॉल सुसज्ज केला होता. सगळे अगदी नटून थटून होते.संध्याकाळी सातच्या सुमारास देवांचे वऱ्हाड अकोल्याला हॉलवर पोहचले..त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.फुलहार,पुष्पगुच्छ ,पाहुण्यांचे पाय धुतल्या गेले.अगदी वाजत गाजत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. वधू वर पक्षाची कामांची लगबग सुरूहोती.
काही वेळाने सीमांत पूजेला सुरुवात झाली. अरुताई आणि अनंत रावांनी रघुवीरचे पाय धुतले.कपडे दिले,पाच सवाष्णी ने त्याला ओवाळले.त्यानंतर जानकी आली.मोरपंखी रंगाची वर्क असलेली साडी तिने घातली होती.
त्याला मॅचिंग ज्वेलरी. नेहमीप्रमाणे केसांची लांब सडक वेणी आणि त्यावर भरपूर गजरे तिने लावले होते..सीमांत पूजेचा कार्यक्रम पार पडला.भेटी गाठीचा कार्यक्रम पार पडला.जेवणे आटोपली.दुसऱ्या दिवशी गोपाळ मुहूर्तावर जानकी आणि रघुवीरच लग्न लागणार होतं.
रागिणी लग्नाला जावं की नको या विचारात होती पण तिने शेवटी लग्नाला जायच ठरवलं.लग्नाचा दिवस उजाडला.वधुकडच्या महिलां जानकीची उष्टी हळद घेऊन रघुवीरला लावायला गेल्या.गणेश पूजन झालं. नवरदेव तयार झाला.वराकडली मंडळी वाजत गाजत मारूती च्या दर्शनाला जाऊन आली.पुन्हा त्यांच अग्निहोत्री कुटूंबाने स्वागत केलं.लग्न मंडपी कसलीच कमतरता नव्हती.रुखवत सजवले होते.. अग्निहोत्रींनी पाहुण्या मंडळींची चांगली बडदास्त ठेवली होती.सगळी व्यवस्था चोख होती. रघुवीर लग्न मंडपी जाऊन उभा झाला. लाल आणि सोनेरी रंगाचे वेस्टो इंडियन त्याने घातले होते.जानकी मूकपणे आंबा शिंपीत होती.तिचे मामा तिला मंडपात न्यायला आले.हिरवा कंच जरीकाठी शालू तिने नेसला होता. अंगावर सोन्याचे सुंदर दागिने ,केसांचा अंबाडा तिने गजऱ्यानी सजवला होता.कपाळावर ठसठशीत चंद्रकोर ,नाकात ठसठशीत पुणेशाही नथ घातली होती ,डोळ्यांत काजळभरले होते. ती साक्षात लक्ष्मी दिसत होती. रघुवीर तर डोळे फाडून तिच्याकडे बघत राहिला.रागिणी हॉलवर तिथे पोहचली होती.तिला सुध्दा जानकीचा हेवा वाटू लागला.जानकी आणि रघुवीर एकमेकांसमोर उभे राहिले मधात अंतरपाट धरला . गुरुजींनी मंगलाष्टके सुरू केली.मंगलाष्टक संपल्यावर अंतरपाट दूर झाला.वधू वराने एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या.त्या दोघांना एकत्र बघून रागिणीचा जळफळाट झाला..
दैवाने बांधलेली रघुवीर आणि जानकीची लग्न गाठ आयुष्यभर घट्ट राहील की त्या दोघांत झालेल्या करारामुळे तूटेल??
क्रमशः..