श्री संत एकनाथ महाराज- - १९ Sudhakar Katekar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्री संत एकनाथ महाराज- - १९

श्री संत एकनाथ महाराज १९

स्लोक १२

सत्त्वं रजस्तम इति गुणा जीवस्य नैव मे । चित्तजा यैस्तु भूतानां सज्जमानो निबध्यते ॥१२।।

बांधोनि नाणितां आया । जेवीं देहाधीन असे छाया । तेवीं भगवंताधीन माया । नातळोनियां वर्तवी ॥९२॥ माया वर्तविता निवर्तविता । स्वामी भगवंत तत्त्वतां । यालागीं मायाअध्यक्षता । त्यासीचि सर्वथा वेद बोले ॥९३॥ सूर्य अंधारातें नाशी । परी तो संमुख न ये त्यापाशीं । तेवीं मायनियंता हृषीकेशी । परी माया देवासी दृष्ट नव्हे ॥९४॥ माझें जें देखणेपण । तेंचि मायेचें मुख्य लक्षण । मजपाशीं माया जाण । गुणाभिमानेंसीं नाहीं ॥९५॥ मायाबिंबित चैतन्य । त्यासी बोलिजे जीवपण । त्या जीवासी त्रिगुणीं बांधोन । देहाभिमान दृढ केला ॥९६॥ जीवासी लागतां देहाभिमान । तो झाला मायाधीन । मायानियंता श्रीनारायण । तो स्वामी जाण जीवाचा ॥९७॥ जीव गुणाभिमानें बद्धक । यालागीं झाला तो सेवक । आत्मा गुणातीत चोख । बंधमोचक जीवाचा ॥९८॥ यापरी सेव्यसेवकभावो । विभाग दावोनियां पहा हो । त्रिगुणगुणांचा अन्वयो । विशद देवो स्वयें सांगे ॥९९॥ गुण तिन्ही समसमान । त्यांमाजीं क्षोभोनियां जाण । जो जो वाढे अधिक गुण । तें तें लक्षण हरि सांगे ॥२००॥ ब्रह्म निर्मळत्वें प्रसिद्ध । कर्म शोधकत्वें अतिशुद्ध । येथ कर्मी उपजे कर्मबाध । तो चित्तसंबंध गुणक्षोभें ॥१॥ कर्मब्रह्मीं दोष नाहीं । दोष चित्तवृत्तीच्या ठायीं । तोही गुणक्षोभें पाहीं । घाली अपायीं पुरुषातें ॥२॥ येचि अर्थीचें निरुपण । सांगीतलें मिश्रलक्षण । आतां वाढल्या एकेक गुण । गुणलक्षण तें ऐक ॥३॥ जो गुण वाढे अतिउन्नतीं । इतर त्यातळीं वर्तती । ते काळींची पुरुषस्थिती । उद्धवाप्रती हरि सांगे ॥४॥

एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

यदेतरौ जयेत्सत्त्वं भास्वरं विशदं शिवम् । तदा सुखेन युज्येत धर्मज्ञानादिभिः पुमान् ॥१३॥

समूळ फळाशा त्यागूनी । निर्विकल्प निरभिमानी । जो लागे स्वधर्माचरणीं । तैं रज तम दोनी जिणे सत्व ॥५॥ जैं भाग्याचें भरण उघडे । तैं हरिकथाश्रवण घडे । मुखीं हरिनामकीर्ति आवडे । तेणें सत्व वाढे अतिशुद्ध ॥६॥ कां दैवें जोडिल्या सत्संगती । श्रवणीं श्रवण लांचावती । वाचा लांचावे नामकीर्ती । अतिप्रीतीं अहर्निशीं ॥७॥ ऐसऐशिया अनुवृत्ती । रज तम दोनी क्षीण होती । सत्व वाढे अनुद्वेगवृत्तीं । त्या सत्वाची स्थिति समूळ ऐक ॥८॥ भास्वरत्वें प्रकाश बहुळ । विशदत्वें अतिनिर्मळ । शिव म्हणिजे शांत सरळ । हें सत्वाचें केवळ स्वरुप मुख्य ॥९॥ हे सत्वाची सत्ववृत्ती । आतुडे ज्या साधकाहातीं । ते काळींची पुरुषस्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥२१०॥ तैं विवेकाचें तारुं आतुडे । वैराग्याचें निजगुज जोडे । सर्वेंद्रियीं प्रकाश उघडे । शिगे चढे स्वधर्म ॥११॥ ते काळीं जन अधर्मता । गर्व अभिमान असत्यता । बलात्कारेंही शिकवितां । न करी सर्वथा अधर्म ॥१२॥ निकट असतां दुःखसाधन । सात्विक सदा सुखसंपन्न । बलात्कारें क्षोभवितां मन । सात्विक जाण क्षोभेना ॥१३॥ ऐशिया निजसत्व दृष्टी । सुख सुखा येतां भेटी । त्यासी स्वानंदें कोंदे सृष्तीं । शुद्ध सत्वपुष्टी या नांव ॥१४॥ ऐसें विशद सत्व जयांपाशीं । शमदम सेविती तयांसी । वैराग्य लागे पायांसी । शुद्ध सत्वराशी ते उद्धवा ॥१५॥ तैसेंचि सत्व तम जिणोन । जैं वाढे गा रजोगुण । तैं राजसाचें लक्षण । ऐक संपूर कथा हरि सांगे ।।

श्लोक १४ वा

यदा जयेत्तमः सत्त्वं रजः सङंग भिदा बलम् । तदा दुःखेन युज्येत कर्मणा यशसा श्रिया ॥१४॥

रजोवृद्धीचें कारण । देहीं उपजे ज्ञानाभिमान । पदोपदीं देखे दोषगुण । वांछी सन्मान प्रतिष्ठा ॥१७॥ नवल रजोगुणाची ख्याती । ज्ञातेपणें कामासक्ती । नाना भोग वांछी चित्तीं । तेणें रजाची प्राप्ती अनिवार ॥१८॥ ऐसेनि रजोगुण वाढोनि वाढी । सत्वतमांतें तळीं पाडी । त्या रजाची स्वरुपतामोडी । ऐक निरवडी सांगेन ॥१९॥ श्लोकीं त्रैपदीं प्रबळ । रज संगभिदाबळ । बोलिला रजोगुण केवळ । तेंचि विवळ हरि सांगे ॥२२०॥ संग म्हणिजे देहाभिमान । भेद म्हणिजे मीमाझेपण । बळ म्हणिजे काम गहन। आग्रहो पूर्ण प्रवृत्तीचा ॥२१॥ देहाभिमानें दुःख उठी । भेदें भय लागे पाठी । त्या नश्वर देहाचिया पुष्टी । काम्यकामाठी कर्माची मांडी ॥२२॥ ज्या कर्माचेनि कैवाडें । यश श्री उदंड जोडे । तें तें कर्म वाढवी पुढें । हें रजोगुणें घडे आचरण ॥२३॥ मी एक पवित्र त्रिजगतीं । माझीच उत्तम कर्मस्थिती । प्रवृत्ति मान्यता आसक्ती । जे जाणवी स्थिती राजस ॥२४॥ रजाचें बळ उद्भट । कर्म आदरी अचाट । वाढवी कर्मकचाट । तो जाण श्रेष्ठ राजस ॥२५॥ बाहेर दिसे सात्विकस्थिती । अंतरीं कर्मवासना द्रव्यासक्ती । ज्यासी प्रिय आवडे चित्तीं । तो जाण निश्चितीं राजसू ॥२६॥ जेव्हां सत्व रज दोनी गुण । जिणोनि तम वाढे पूर्ण । ते काळींचें पुरुषलक्षण । स्वयें नारायण सांगत ॥२७॥

एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

यदा जयेद्रजः सत्त्वं तमो मूढं लयं जडम् । युज्येत शोकमोहाभ्यां निद्रया हिंसयाऽऽशया ॥१५॥

रज सत्व करुनि गूढ । जैं तमोगुण होय रुढ । तैं तो पुरुषातें सदृढ । करी जडमूढ अतिस्तब्ध ॥२८॥ विश्वासूनि वाडेंकोडें । जैं परद्रव्य बुडवणें पडे । कां परदारागमन घडे । तैं तेणें वाढे तमोगुण ॥२९॥ स्वमुखें परापवाद बोलणें । स्वयें साधुनिंदा करणें । संतसज्जनां द्वेषणें । तैं तमाचें ठाणें अनिवार ॥२३०॥ धुईचेनि आलेपणें । पडे सूर्यासी झांकणें । तेवीं विवेकाचें जिणें। तमोगुणें ग्रासिजे ॥३१॥ सत्वगुण प्रकाशक । रज प्रवृत्तिप्रवर्तक । दोनींतें गिळूनि देख । तमाचें आधिक्य अधर्में वाढे ॥३२॥ करितां पूज्याचें हेळण । साधूचे देखतां दोषगुण । तेणें खवळला तमोगुण । त्याचें स्वरुप पूर्ण तें ऐक ॥३३॥ तमोगुण वाढल्या प्रौढ । स्फूर्तिमात्र होय मूढ । लयो उपजवोनि दृढ । करी जड जीवातें ॥३४॥ कार्याकार्यविवेकज्ञान । ते स्फूर्ति अंध होय पूर्ण । या नांव गा मूढपण । ऐक चिन्ह लयाचें ॥३५॥ जागृतीमाजीं असतां चित्त । अर्थ स्वार्थ परमार्थ । कांहीं स्फुरेना कृत्याकृत्य । लयो निश्चित या नांव ॥३६॥ समस्ताही इंद्रियवृत्ती । अनुद्यमें स्तब्धगती । निःशेष लोपे ज्ञानशक्ती । जडत्वप्राप्ती या नांव ॥३७॥ मूढत्वें पावे शोक दुःख । जडत्वें मिथ्या मोह देख । मोहास्तव होय पातक । अतिअविवेक अधर्मी ॥३८॥ ऐक लयाचें कौतुक । अहोरात्र निद्रा अधिक । निद्रेवेगळें ब्रह्मसुख । नावडे देख तामसा ॥३९॥ पूर्ण वाढल्या तमोगुण । ऐसें होय पुरुषलक्षण । वाढल्या सत्वादि गुण । फळ कोण तें हरि सांगे ॥२४०॥