श्री संत एकनाथ महाराज—२१
एकनाथी भागवत - श्लोक २१ वा
उपर्युपरि गच्छन्ति सत्त्वेन ब्राह्मणा जनाः । तमसाऽधोऽध
आमुख्याद्रजसाऽन्तरचारिणः ॥२१॥
सत्वगुणाचें आयतन । मुख्यत्वें ब्राह्मण जन । ते न करुनि ब्रह्मार्पण
। स्वधर्माचरण जे करिती ॥९२॥ त्यांसी स्वधर्माच्या कर्मशक्तीं । ऊर्ध्वलोकीं होय
गती । लोकलोकांतरप्राप्ती । ब्राह्मण पावती ते ऐक ॥९३॥ स्वर्गलोक महर्लोक ।
क्रमूनि पावती जनलोक । उल्लंघोनियां तपोलोक । पावती सात्विक सत्यलोक पैं ॥९४॥
वाढलिया रजोगुण । शूद्रादि चांडाळपण । पुढती जन्म पुढती मरण । अविश्रम जाण भोगवी
॥९५॥ वाढलिया तमोगुण । पश्चादि योनि पावोन । दंश मशक वृक्ष पाषाण । योनि संपूर्ण
भोगवी ॥९६॥ प्राण्यासी अंतकाळीं जाण । देहांतीं जो वाढे गुण । त्या मरणाचें फळ कोण
। तेंही श्रीकृष्ण स्वयें सांगे ॥९७॥ अनन्य करितां माझी भक्ती । भक्तांसी अंतीं
कोण गती । तेहीविखींची उपपत्ती । श्र्लोकार्थी हरि सांगे ॥९८॥
एकनाथी भागवत - श्लोक २२ वा
सत्त्वे प्रलीनाः स्वर्यान्ति नरलोकं रजोलयाः । तमोलयास्तु निरयं
यान्ति मामेव निर्गुणाः ॥२२॥
संसारीं मुख्यत्वें त्रिगुण । तेथ वाढोनियां सत्वगुण । ज्यासी
प्राप्त होय मरण । तो स्वर्गभोगीं जाण दिव्य देह पावे ॥९९॥ सत्वें निमाल्या
सात्विक । ते पावती स्वर्गलोक । रजोगुणें निमाल्या देख । त्या मनुष्यलोक मानवां
॥३००॥ अंतीं वाढोनियां तमाधिक्य । तमोगुणें निमाल्या देख । ते भोगिती महानरक ।
दुःखदायक दारुण ॥१॥ सप्रेम करितां माझी भक्ती । माझिया भक्तांसी देहांतीं । हृदयीं
प्रकटे माझी मूर्ती । घवघविती निजतेजें ॥२॥ शंखचक्रगदादि संपूर्ण । पीतांबरधारी
श्रीकृष्ण । ध्यानीं धरुनि पावे मरण । तो वैकुंठीं जाण मी होयें ॥३॥ सर्वभूतीं मी
आत्मा पूर्ण । ऐसें ज्याचें अखंड भजन । ते जितांचि तिन्ही गुण । जिणोनि निर्गुण
पावती ॥४॥ त्यांचे देहासी दैवें आल्या मरण । मजवेगळें नाहीं स्थान । ते निजानंदें
परिपूर्ण । निजनिर्गुण स्वयें होती ॥५॥ माझें स्वरुप निजनिर्गुण । अथवा वैकुंठींचें
सगुण । दोन्ही एकचि निश्चयें जाण । सगुण निर्गुण समसाम्य ॥६॥ स्वर्ग नरक मनुष्यलोक
। प्राप्ति पावले निर्गुण चोख । त्यांच्या साधनांचें कौतुक । स्वयें यदुनायक सांगत
॥७॥
एकनाथी भागवत - श्लोक २३ वा
मदर्पणं निष्फलं वा सात्त्विकं निजकर्म तत् । राजसं फलसंकल्पं
हिंसाप्रायादि तामसम् ॥२३॥
सकळ कर्मक्रियाचरण । संकल्पेंवीण आपण। सहजें होय ब्रह्मार्पण । हें
निर्गुण साधन शोधितसत्वें ॥८॥ वर्णाश्रमधर्म सकळ । आचरे परी न वांछी फळ । माझे
भक्तीचें प्रेम प्रबळ । हें कर्म केवळ सात्विक ॥९॥ माझें भजन हाचि स्वधर्म । याचि
नांव गा निजकर्म । ऐसें ज्यासी कळे वर्म । सात्त्विक कर्म या नांव ॥३१०॥ स्वधर्म
आचरोनि सकळ । इंद्रादि देवां यजनशीळ । जो वांछी इहामुत्र फळ । हें कर्म केवळ राजस
॥११॥ जे कर्मीं प्रकट हिंसा घडे । कां आमिचारिक करणें पडे । स्वरुपें जें कर्म
कुडें । तें जाण धडपुडें तामस ॥१२॥ जेथ दांभिक कर्माचरु । जेथ साधूंसी अतिमत्सरु ।
जेथ निंदेचा प्रबळ भरु । तो कर्मादरु तामस ॥१३॥ आतां त्रिगुण आणि निर्गुण । यांचें
चतुर्विध लक्षण । या श्लोकीं श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥१४॥
एकनाथी भागवत - श्लोक २४ वा
कैवल्यं सात्त्विकं ज्ञानं रजो वैकल्पिकं च यत् । प्राकृतं तामसं
ज्ञानं मन्निष्ठं निर्गुण स्मृतम् ॥२४॥
देहीं असोनि देहातीत । भूतीं भूतात्मा भगवंत। भूतां सबाह्य सभराभरित
। हें ज्ञान निश्चित सात्विक ॥१५॥ भिन्न खाणी भिन्नाकार । भिन्न नांवें भिन्न
व्यापार । तेथ वस्तु देखे अभिन्नाकार । हें ज्ञान साचार सात्विक ॥१६॥ करुनि
वेदशास्त्रपठन । निर्धारितां निजज्ञान । सवेंचि विकल्पी आपण । विकल्प पूर्ण रजाचे
॥१७॥ करुन वार्तिकान्त व्युत्पत्ती । अद्वैतनिश्चयो नाहीं चित्तीं । आपण विकल्पी
आपुल्या युक्ती । तें ज्ञान निश्चितीं राजस ॥१८॥ करुनि वेदशास्त्रश्रवण । होय
शिश्नोदरपरायण । इंद्रियार्थी श्रद्धा पूर्ण । तो केवळ जाण राजस ॥१९॥ एक निश्चयो
नाहीं चित्तीं । विकल्प उपजती नेणो किती। हे रजोगुणाची ज्ञानवृत्ती । ऐक निश्चितीं
तमोगुण ॥३२०॥ महामोहो गिळी ज्ञानस्फूर्ती । मी जड अंध मानी निश्चितीं । नश्वर
पदार्थी आसक्ती । तें ज्ञान निश्चितीं तामस ॥२१॥ आहार निद्रा भय मैथुन । केवळ
पशुप्राय जें ज्ञान । तें निश्चयें तामस जाण । ऐक निर्गुणविभाग ॥२२॥ कार्य कर्ता
आणि कारण । त्रिपुटी त्रिगुणेंसी करुनि शून्य । केवळ जैं चैतन्यघन । तें निर्गुण
ज्ञान उद्धवा ॥२३॥ सत्वाचेनि निजउल्हासें । सर्वेंद्रियीं ज्ञान प्रकाशे । तें
ज्ञानचि मानी वायवसें । मी ज्ञानरुपें असें अनादि ॥२४॥ सिंधुजळें सरिता वाहती ।
त्या आलिया सिंधूप्रती । तेणें उल्हासेना अपांपती । तेवीं ज्ञानस्फूर्ती श्लाघेना
॥२५॥ रजोगुणें आलिया सकाम । त्यासी क्षोभूं न शके काम । म्हणे माझेनि चाले काम्य
कर्म । शेखीं मी निष्काम निजांगें ॥२६॥ होतां काम्य कर्माचा सोहळा । जेवीं सूर्या
न बाधी उन्हाळा । तेवीं काम्य कर्मी मी जिव्हाळा । माझेनि सोज्ज्वळा काम सवेग ॥२७॥
तमोगुणाच्या झडाडा । पडिला महामोहाचा वेढा । न करितां मोहाचा निझाडा । मोहनिर्णय
गाढा आपण पैं जाणे ॥२८॥ सूर्यो न दिसे जिकडे । अंधारु व्यापी तिकडे । तेवीं
स्वरुपनिष्ठेपुढें । न बाधी सांकडें मोहाचें ॥२९॥ अंगीं आदळतां तिन्ही गुण । जो
गजबजीना आपण । ते निजनिष्ठा निजनिर्गुण । उद्धवा जाण निश्चित ॥३३०॥ अज्ञानाच्या
अवसरीं । ज्ञानाची चाड न धरी । प्रवर्ततां कामाचारीं । निष्कामाचा न करी पांगडा
॥३१॥ आदळतां मोहाचीं झटें । ज्याचा बोध कदा न पालटे । त्रिगुणीं निर्गुणत्वें
राहाटे । माझिया निष्ठें मद्भक्त ॥३२॥ त्रिगुणांचा त्रिविध वास । निर्गुण
निजरहिवास । येचि अर्थी हृषीकेश । विशद विलास सांगत ॥३३॥
एकनाथी भागवत - श्लोक २५ वा
वनं तु सात्त्विको वासो ग्रामो राजस उच्यते । तामसं द्यूतसदनं
मन्निकेतं तु निर्गुणम् ॥२५॥
पवित्र आणि तीर्थभूत । विजन वन एकान्त । ऐशिये वस्तीं सुखावे चित्त ।
ते वास निश्चित सात्विक ॥३४॥ वस्ती व्यवहारीं व्यापारीं । कां सदा सन्मानें
राजद्वारीं । विवाहमंडपामाझारीं । ज्यासी प्रीति भारी वस्तीसी ॥३५॥ ज्यासी आवडे
धनसंपदा । निकटवासें वसती प्रमदा । जो नगरीं ग्रामीं वसे सदा । हे वस्ती संपदा
राजस ॥३६॥ जेथ सन्मान वांछी चित्त । सदा क्षोभे विषयासक्त । ऐसऐसी वस्ती जेथ । ते
जाण निश्चित राजस ॥३७॥ जेथ साधुनिंदा जोडे । जेथ गुणदोषीं दृष्टि वाढे । ऐशिया
ठायीं वस्ती आवडे । तें तामसाचें गाढें निवासस्थान ॥३८॥ जेथ कलहाचें कारण । जेथ
अविवेकी होय मन । वेश्या द्यूत मद्यसदन । हें निवासस्थान तामस ॥३९॥ देवालयीं
घवघविती । देखोनि माझी निजमूर्ती । साचार सुखावे चित्तवृत्ती । ते निर्गुण वस्ती
उद्धवा ॥३४०॥ अभेदभक्तांचें निजमंदिर । तें मज निर्गुणाचें निजघर । तेथ सुखत्वें
ज्याची वृत्ति स्थिर । ते वस्ती साचार निर्गुण ॥४१॥ विषयातीत निजस्थिती। सुखें
सुखरुप राहे वृत्ती । ते निर्गुणाची निजवस्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥४३॥ सांडूनि
आकाराचें ज्ञान । निराकारीं सुखसंपन्न । वृत्ति स्थिरावे परिपूर्ण। ते वस्ती
निर्गुण जनीं विजनीं ॥४४॥ त्रिगुणसंगें त्रिविध कर्ता । निर्गुणलक्षणीं लक्षिजे
चौथा । चतुर्विध कर्त्यांची व्यवस्था । ऐक आतां सांगेन ॥४५