श्री संत एकनाथ महाराज। २० Sudhakar Katekar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्री संत एकनाथ महाराज। २०

संत एकनाथ महाराज २०

एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

यदा चित्तं प्रसीदेत इन्द्रियाणां च निर्वृतिः । देहेऽभयं मनोऽसङंग तत्सत्त्वं विद्धि मत्पदम् ॥१६॥

वाढलिया सत्वगुण । चित्त सदा सुप्रसन्न । कामक्रोधलोभाचें स्फुरण । सर्वथा जाण स्फुरेना ॥४१॥ जें चित्त वणवणी विषयांलागीं । तें उदास होय विषयभोगीं । विषय आदळतांही अंगीं । तैं विषयसंगीं विगुंतेना ॥४२॥ जेवीं जळामाजीं जळस्थ । पद्मिणीपत्र जळीं अलिप्त । तेवीं विषयांमाजीं चित्त । विषयातीत मद्बोधें ॥४३॥ सदा मरणभय देहासी । तें मरण आलिया देहापाशीं । भय नुपजे सात्विकापासी । भावें मत्पदासी विनटले ॥४४॥ जंववरी भासे मीतूंपण । तंववरी अवश्य बाधी मरण । सात्विक मत्पदीं अभिन्न । यालागीं मरणभय त्या नाहीं ॥४५॥ सात्विक मत्पदीं अनन्य शरण । यालागीं बाधीना जन्ममरण । या स्थितीं वर्तवी सत्वगुण । आतां ऐक लक्षण रजाचें ॥४६॥

एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

विकुर्वन् क्रियया चाधीरनिर्वृत्तिश्च चेतसाम् । गात्रास्वास्थ्यं मनो भ्रान्तं रज एतैर्निशामय ॥१७॥

खवळलिया रजोगुण । विषयचिंता अतिदारुण । कर्मेंद्रियीं क्रियाभरण । नाना परींचें जाण उपपादी ॥४७॥ शरीर असतांही स्वस्थ । मन चिंतातुर अतिभ्रांत । वाढवितां विषयस्वार्थ । दुःखी होत सर्वदा ॥४८॥ असतां पुत्रवित्तसंपत्ती । अधिक स्वार्थ वाढवी चित्तीं । राजसाची चित्तवृत्ती । न मनी निवृत्ती क्षणार्ध ॥४९॥ नसतां विकाराचें कारण । चित्तीं विकार चिंती आपण । हेंचि राजसाचें लक्षण । मुख्यत्वें जाण उद्धवा ॥२५०॥ रात्री नोहे पैं प्रबळ । ना दिवस नव्हे सोज्ज्वळ । जैसी झांबवली सांजवेळ । तैसा केवळ रजोगुण ॥५१॥ सत्वरजांची उणखूण । तुज दाविली ओळखण । आतां ऐक तमोगुण । जड लक्षण तयाचें ॥५२॥

एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

सीदच्चित्तं प्रलीयेत चेतसो ग्रहणेऽक्षमम् । मनो नष्टं तमो ग्लानिस्तमस्तदुपधारय ॥१८॥

चित्तीं चिंता अतिगहन । ते महामोहीं होय निमग्न । कोणेही अर्थीचें ज्ञान । हृदयीं जाण स्फुरेना ॥५३॥ सुषुप्तीवेगळें अज्ञान । सदा पळे देखोनि ज्ञान । तेथ नवल कैसें झालें जाण । त्या ज्ञानातें अज्ञान गिळूनि ठाके ॥५४॥ जागाचि परी निजेला दिसे । कर्म करी स्फुरण नसे । जेवीं कां आभाळांतिले अंवसे । रात्रीं चाले जैसें आंधळें ॥५५॥ सकळ शरीराचा गोळा । होय आळसाचा मोदळा । हा तमोग्लानीचा सोहळा । पडळ ये डोळां चित्तवृत्ती ॥५६॥ संकल्पविकल्पांची ख्याती । उपजवी सदा मनोवृत्ती । त्या मनाची जड होय स्थिती । संकल्पस्फूर्ती स्फुरेना ॥५७॥ आणिकही नवलस्थिती । चित्तासी नाठवे चित्तस्फूर्ती । एवढी वाढे तमाची ख्याती । मनोवृत्तिविनाशक ॥५८॥ यापरी तमाचें बल होय । तैं मनातें अज्ञान खाय । ते काळीं मन नष्टप्राय । मूर्च्छित राहे मूढत्वें ॥५९॥ मन निःशेष जैं नासतें । तैं महादुःख कोण भोगितें । यालागीं तमाचेनि ऐक्यमतें । मन उरे तेथें जडमूढ ॥२६०॥ यापरी जे वर्तती गती । तेचि अत्यंत दुःखदाती । या नांव गा तमाची स्थिती । जाण निश्चितीं उद्धवा ॥६१॥ वाढवितां गुणवृत्ती । कोणे गुणें कोण वाढती । येचि अर्थीची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥६२॥

श्लोक १९ वा

एधमाने गुणे सत्त्वे देवानां बलमेधते । असुराणां च रजसि तमस्युद्धव रक्षसाम् ॥१९॥

दैवी आसुरी राक्षसी स्थिती । हे त्रिगुण गुणांची संपत्ती । जे जे ब्रह्मांडीं इंद्रियवृत्ती । तेचि स्थिती पिंडींही ॥६३॥ ब्रह्मांडीं सकळ देव । महापुरुषाचे अवयव । पिंडींही तेचि स्वयमेव । वर्तती सर्व निजऐक्यें ॥६४॥ उचित स्वधर्मशास्त्रस्थिती । निवृत्तिकर्मी जे प्रवृत्ती । ऐशी जेथ इंद्रियवृत्ती । ते दैवी संपत्ती सत्वस्थ ॥६५॥ कामाभिलाष दृढ चित्तीं । आणि स्वधर्मी तरी वर्तती । ऐशी जे इंद्रियस्थिती । जे आसुरी संपत्ती राजसी ॥६६॥ सलोभमोहें क्रोध चित्तीं । सदा अधर्मी प्रवृत्ती । ऐशी जे इंद्रियस्थिती । ते राक्षसी संपत्ती तामसी ॥६७॥ क्षणें सकाम क्षणें निष्काम । ऐसा जेथ वाढे स्वधर्म । तेथ देवां असुरां परम । होय संग्राम वृत्तीसी ॥६८॥ चित्तीं वाढवूनि मोहभ्रम । अधर्मचि मानी स्वधर्म । तैं राक्षसाचा पराक्रम । देवासुरां परम निर्दाळी ॥६९॥ सकामनिष्काममोहभ्रमेंसी । वृत्ती वर्ते गा जयापाशीं । तेथ देवांअसुरांराक्षसांसीं । कलहो अहर्निशीं अनिवार ॥२७०॥ क्षणैक रति परमार्थी । क्षणैक रति अर्थस्वार्थी । क्षणैक होय अनर्थी । परदारारती परद्रव्यें ॥७१॥ ऐशिये गा चित्तवृत्तीं । कदा नुपजे निजशांती । मा परमार्थाची प्राप्ती । कैशा रीती होईल ॥७२॥ साधक सर्वदा पुसती । कोण बाधा असे चित्तवृत्ती । ते बाधकत्वाची स्थिती । विशद तुजप्रती सांगीतली ॥७३॥ एकचि गुण जैं पुरता जोडे । तैं एकविध वृत्ती वाढे । हें तंव सर्वथा न घडे । गुण गुणासी भिडे उपमर्दें ॥७४॥ एकचि न जोडे गुणावस्था । यालागीं नव्हे एकविधता । तेणें अनिवार भवव्यथा । बाधी भूतां गुणक्षोभें ॥७५॥ तम अधर्माकडे वाढे । रजोगुण देहकर्माकडे । सत्वगुणासी वाढी न घडे । मुक्तता जोडे कैसेनी ॥७६॥ रजतमउभयसंधीं । सत्व अडकलें दोहींमधीं । तें वाढों न शके त्रिशुद्धीं । नैराश्यें वृद्धी सत्वगुणा ॥७७॥ त्रिगुण गुणांची त्रिपुटी । आपण कल्पी आपल्या पोटीं । तेंचि भवभय होऊनियां उठी । लागे पाठीं बाधकत्वें ॥७८॥ सत्वें देवांसी प्रबळ बळ । रजोगुणें दैत्य प्रबळ । तमोगुणें केवळ । आतुर्बळ राक्षसां ॥७९॥ हे गुणवृत्तींची व्यवस्था । समूळ सांगीतली कथा । आतां त्रिगुणांच्या तीन अवस्था । ऐक तत्त्वतां सांगेन ॥२८०॥

एकनाथी भागवत - श्लोक २० वा

सत्त्वाज्जागरणं विद्याद्रजसा स्वप्नमादिशेत् । प्रस्वापं तमसा जन्तोस्तुरीयं त्रिषु संततम् ॥२०॥

सत्त्वगुणाचिये स्थिति । नातळे स्वप्न आणि सुषुप्ती । जीवीं सदा नांदे जे जागृती । इंद्रियप्रवृत्ती सावध ॥८१॥ रजोगुणाचेनि आधिक्यें । चित्तवृत्तीतें स्वप्न जिंके । जागृति सुषुप्ति दूरी ठाके । बैसला देखे स्वप्नचि ॥८२॥ तमोगुण वाढल्या वाढी । जागृति स्वप्न दूरी दवडी। मग सुषुप्तीची अतिगाढी । आदळे रोकडी जीवाअंगीं ॥८३॥ त्यासी सभे बैसविल्या पाहे । बोलतां बोलतां डुलकी जाये । जेवितांजेवितांही पाहे । झोंपीं जाये कडकडां ॥८४॥ क्षणां जागृति क्षणां सुषुप्ती । क्षणैक स्वप्नाची प्रतीती । हे त्रिगुणांची मिश्रित वृत्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥८५॥ जागृति स्वप्न सुषुप्ती । तिहीं अवस्थांतें प्रकाशिती । यालागीं ते चौथी । तुरीय म्हणती सज्ञान ॥८६॥ जे जागृतीतें जागवित । जे स्वप्नीं स्वप्नातें नांदवित । जे सुषुप्तीतें निजवित । त्यातें तुरीय म्हणत उद्धवा ॥८७॥ जे तिहीं अवस्थांआंत । असोनि नव्हे अवस्थाभूत । जे निर्गुण निजनित्य । त्यातेंचि म्हणत तुरीय ॥८८॥ जेवीं पुत्राचेनि जाहलेपणें । पुरुषें पिता नांव पावणें । तेवीं तिहीं अवस्थागुणें । तुरीय म्हणणें वस्तूसी ॥८९॥ वस्तूवरी अवस्था भासे । भासली अवस्था सवेंचि नासे । त्या नाशामाजीं वस्तु न नासे । उरे अविनाशें तुरीय ॥२९०॥ तुरीय त्रिकाळीं संतत । यापरी जाणावें एथ । आतां गुणवृद्धिभूमिका प्राप्त । तोही वृत्तांत हरि सांगे ॥९१॥