यशवंत गाडीवरील रहस्य बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

यशवंत गाडीवरील रहस्य

यशवंतगडावरील रहस्य

मम्मी...आम्ही सगळे किल्ल्यावर जाऊ? " केतकी मम्मीला
लाडीगोडी लावत होती.
"नको.
अजिबात नको. "मम्मीने
केतकीला साफ धुडकावून लावल. तेवढ्यात बाजूलाच बसलेली मोठी आई बोलली. " यशवंतगडावर नको बाई. हल्ली रात्रीचे कसले कसले आवाज येतत. खाजनाच्या(खाडी) बाजून मशाली..
लाईटी दिसतत.. दोन वेळा लोकांनी कुणाच्यातरी किंकाळ्या
सुध्दा ऐकल्यात..आताशा संध्याकाळनंतर कोणच जाणा नाय
तिकडे."
" पण त्या रात्री! आता तर सकाळ आहे. " केतकी हटूनच
बसली.
"मला काही सांगू नकोस. पप्पांना विचार." मम्मीने आ-
पले हात झटकले. केतकी हसली. पप्पाकडुन परवानगी नक्की
मिळणार याची तीला खात्री होती. बाहेर पप्पा पेपर वाचत बसले
होते.
"पप्पा, आम्ही सगळे यशवंतगडावर जातोय!" केतकीने सरळ
सांगून टाकल.
"अग तिथ झाडी वाढलिय...पडक्या भिंतीमधून विंचू..साप..माकड
यांचा वावर आहे,"
"पण पूर्वीपण आम्ही जात होतो."
"त्या वेळी मामासोबत गेला होता आणि ती भूताटकीची अफवा."
"पप्पां...तुम्हीपण!"
"ठिक आहे! जा,पण आगाऊपणा करायचा नाही. समुद्रात
जायचं नाही. सोबत हा फोन घेऊन जा.....भटकून झाल की फोन करा..मी येतो."
सगळ्या मुलांनी एकच गलका केला. केतकी,जान्हवी व तिचा छोटा..
भाऊ नाताळच्या सुट्टीत रेडीमध्ये मामाकडे आली होती, तिथून
किल्ला अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर होता. पूर्वी रेवतीनगर
म्हणून प्रसिद्ध बंदर असलेल्या रेडी मध्ये सोळाव्या शतकात सुमारे
पाच एकराच्या परिसरात मराठ्यांनी समुद्रकिनारी किल्ला बांधला.

यशवंतगड म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला पुढे पोर्तुगिजांनी जिंकला. पुढे तो सावंतवाडीच्या राजांकडे आला. मुल सुट्टीत
आली की मामाबरोबर कधीतरी किल्ल्यावर जायची. पण आज
आम्ही मुलच जाणार असा हट्ट धरुन बसली. सहा वर्षाचा छोटा
शार्दुल ही तयार झाला. परवानगी मिळताच सारी मुल रस्त्याने
गड़बड़ करत चालली. सर्वात पुढे केतकी होती. डोक्यावर गोल
हॅट... हातात काठी घेवून ती झपाझप चालत होती. अथर्व,
दिप, यश व शार्दुल घोळक्याने तर सर्वात मोठी जान्हवी
मोबाइलने सर्वांचे शुटिंग करत जात होती. बघता-बघता सारीजण
सावंतवाड्याजवळ पोहचली. एक वळण पार करत किल्ल्याच्या
वाटेवर आली. डाव्या हाताला पंधरा पावलांवर समुद्राचं निळेशार पाणी... व सोनेरी वाळू त्यांना खूणावू लागली. दूर समुद्रात
काही विदेशी स्नान करत होते.
" दिदी..समुद्र.."छोटा शार्दुल ओरडला.
"कुणीही समुद्रावर जायच नाही." जान्हवीने सगळ्यांना समज
दिली.
सारी टोळी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आली. प्रवेशद्वाराची
मोठ्या प्रमाणात पडझड झालेली होती. लाकडी खांब अधांतरी
लोंबकळत होते. प्रवेशद्वारावरच द्विभूज गणपतीची प्रतिकृती
दिसत होती. तेवढ्यात समोरुन चार-पाच हिप्पी लोक
आपले कॅमरे सांभाळत आली. झाडांवर उड्या मारणाऱ्या माकडांचे
फोटो खेचू लागली. सगळी मुल फिदीफिदी हसू लागली.
सकाळचे नऊ वाजले होते. हवेत बऱ्यापैकी गारवा होता. सोनेरी
सूर्यकिरणांनी झाडांचे शेंडे चमकत होते. असंख्य पाखर झाडावर
किलबिलाट करत होती.

"केतकी तो बघ किंग फिशर." अथर्वने समोर बोट केले. समोर एका
झाडावर किंग फिशर बसला होता. निळे-जांभळे पंख..पिवळट
नारिंगी चोच..नजर समोर किनाऱ्यावर... सकाळच्या कोवळ्या
उन्हात छान दिसत होता.

"अरे त्येका खंड्या पक्षी म्हणतात." दिपूने ओरडून सांगितले,
"अरे हळू बोल..सगळे पक्षी उडून जातले मरे! "केतकी फिदीफिदी हसत म्हणाली.
प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला असलेली पाहरेकऱ्यांची
जागा सुस्थितीत होती. थोड पुढ गेल्यावर डाव्या बाजूला पडकी विहिर
होती. तिथे खूपच झाडी वाढली होती. सगळीजण धावत
गेली.
"लांबून बघा..कोसळेल कदाचित ."जान्हवी यश व शार्दुलचा हात पकडत म्हणाली, विहीर बरीच खोल होती व ऐका बाजूने
कोसळली होती. तिथून सारीजण चालत पश्चिमेकडच्या बुरुजाजवळ आली. तेवढ्यात एक भला मोठा पक्षी पंख
फडफडवत किल्ल्याच्या दिशेने येताना दिसला.
"तो..बघा..गरुड !"यश नाचत म्हणाला.
तो गरुड नव्हे..धनेश म्हणतात त्याला! जान्हवीने माहिती
दिली.
तेवढयात केतकीला बोरीच्या झाडावर काहीतरी दिसले.
एक पोपटी रंगाचा शॅमेलिअन सरडा होता. त्याने आपली
शेपटी वरच्या दिशेला वळवली होती. बटबटीत डोळ्यांनी नजर रोखत भक्ष्यावर झडप घालण्याच्या तयारीत होता, केतकी हळूच तिथे पोहचली. अलगद तिने सरडा असलेली ती फांदी तोडली ती फांदी घेऊन सर्वांजवळ आली.
"बघा...हा..बघा...शॅमेलियन सरडा...बघा त्याचा रंग बदलला."
"चल..चल हट बाजूला घे तो."जान्हवी ओरडली.
"अगो भियात्यय कश्याक.. साप न्हय तो.. सरडो आसा."तिला अथर्व म्हणाला.
केतकीने तो सरडा पुन्हा झाडावर सोडला.
"चला.. आता बुरुजावर जावया." अथर्व म्हणाला,
अरुंद वाटेवरुन सारीजण वर चढली. बुरुजावरुन दूरवर
परलेला अरबी समुद्र दिसत होता, उजवीकडे शिरोड्याच
सुरूच बन., वाळूत लोकणारे हिप्पी.. तर समोर वेंगुर्ले बंदर दिसत होत.
डावीकडे सिद्धेश्वरमंदिर..तिथेच समोर बंदरावर मायनिंगच
काम चालू होत. किनाऱ्याकडे परतणाऱ्या होड्या..
उसळत्या लाटांवर डोलताना दिसत होत्या. पुन्हा सारी खाली आली. एक पांढराशुभ्र ससा पळत-पळत करवंदीच्या जाळीत
गायब झाला.
"सश्याक पकडूया काय मटाण बरा लागता."दिपू जाळीकडे
बघत म्हणाला.
"तुला फक्त मटणच दिसत..गरीब प्राण्यांना मारायच नसत."
जान्हवी म्हणाली.
"दिदी तो कसला पक्षी शार्दुल आकाशाकडे बघत म्हणला."
आकाशात एक काळा पक्षी गोल गिरक्या मारत पुन्हा खाली
झेपावत होता. केतकीने जान्हवीकडचा मोबाईल घेतला व त्याचे
शुटिंग करु लागली.
"त्याला कोतवाल म्हणतात. त्याची सर्वत्र नजर असते. तो
पक्ष्यांना सावध करत असतो."
मुल तिथूनच खाडीच्या बाजूला असलेल्या भिंतीजवळ आली.
तिथे चार कोठ्या चांगल्या अवस्थेत होत्या. जमिनीवर भल्या
मोठ्या फरश्या बसविलेल्या होत्या, त्यावर कबुतरांची विष्ठा
पडलेली होती. तिथे केतकीला दोन भिंतीच्या सांध्यात एक
गोलाकार मनगटाएवढा दगड थोडा बाहेर आलेला दिसला.
"हे काय आहे ?"तिने जान्हवीला विचारले.

"कदाचित पूर्वी बांधकाम करताना एखादा वरवंठा चुकून
अडकला असले. " केतकीने बाजूला पडलेला एक दगड उचलला
व त्या गोलाकार दगडावर मारायला लागली. अचानक कर्कर्..
कर् असा आवाज झाला. कोपऱ्यातील जमिनीवरची दगडी
पाथर काटकोनात फिरत बाजूला झाली. सगळी मुल भितीने
स्तब्ध झाली. फरशीखाली भुयारी वाट दिसली खाली अंधार
होता. कदाचित खाली तळघर असाव. किंवा चोरवाट असावी.
"चला..चला आपण इथून पळूया..पप्पांना सांगुया.." जान्हवी
घाबरुन म्हणाली.
"अग तु अर्किओलॉजिस्ट होणार ना? मग
घाबरते का चल खाली उतरुया ."केतकी म्हणाली मोबाईलची
बॅटरी चालू करुन ती खाली उतरली सुद्धा.
"अग पण खाली काय असेल कुणास ठावूक ?" जान्हवी तिला
थांबविण्याचा प्रयत्न करत होती.
पण केतकी पायऱ्या उतरु लागली. सारी जण तिच्या पाठोपाठ
उतरु लागली. साधारण पाच पायऱ्या उतरल्यावर पुन्हा करकर
आवाज झाला व वरची फरशी पुन्हा उलट फिरत जाग्यावर
बसली. तळघराच प्रवेशद्वार बंद झाल होतं
"बघितल..आता आम्ही सारे अडकलो..बाहेर कसे पडणार?"
अथर्व रडलेल्या सुरात म्हणाला.
"अरे घाबरतोय काय जसा
वरुन दरवाजा उघडला..तसा खालुनही उघडेल. चला शोधुया
एखादी कळ आहे का?" केतकी म्हणाली. सारे तळघरात उतरले.
तळघरात अनेक लाकडी पेट्या रचून ठेवल्या होत्या म्हणजे इथ
कुणाचा तरी वावर होता. मध्ये-मध्ये गारवाराही जाणवत होता.
म्हणजेच कुठूनतरी समुद्रावरचा वारा आत येत होता. म्हणजेच
कुठेतरी चोरवाट असणारच याची खात्री जान्हवी व केतकीला
झाली. बॅटरीच्या प्रकाशात मुले एखादी कळ किंवा खुंटी दिसते का ते पाहत होती. केतकीपुढे सरकली. तिला उजव्या हाताला
कमी उंचीचा अरुंद दरवाजा दिसला. दगडी कपारीतून खोदलेला
रस्ता होता. वळणा-वळणाचा रस्ता पार करत केतकी थोडी पुढे
गेली. तेवढ्यातच तिला कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला.
कोण बोलतय ते केतकी कपारीला पालीसारखी चिकटली.
हळूहळू बोलण्याचा आवाज ऐकू आला. ती दोन माणस होती.
नेहमी सराव असल्यासारखी ती अंधाऱ्या भुयारी मार्गावरुन
केतकीच्या अगदीजवळून गेली.
केतकी पण हळूहळू त्यांच्या माग-माग जावू लागली. त्या
व्यक्ति तळघरात पोहचल्या. सारी मुले भयाने थरथर कापत
होती. त्यातील एकाने कुठच तरी बटण दाबल. लख्ख प्रकाश
पडला.बहुधा जनरेटरची व्यवस्था असावी. मुलांना बघून ते चमकले.
" पावलू ..अरे ही मुल कोण? आत कशी आली ?"काळ्या
कुळकुळीत रंगाचा व उग्र चेहऱ्याचा धिप्पाड असा तो
माणूस
मुलांकडे खाऊ की गिळू अशा नजरेने बघत होता. "सिद्धाप्पा.. -
अरे आपण ह्या मुलांना सोडल तर आपल काही खर नाही. सध्या आपण
ह्याना बाजूच्या खोलीत बंद करुया व बॉसला फोन करुया. " पावलु
म्हणाला.
"होय..बरोबर आहे.. चलारे पोरट्याने..चला त्या खो-
लीत. " सारी मुल रडू लागली. त्यांच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता.
बाहेर उभ्या असलेल्या केतकीला त्या गुंडाचा राग येत होता.
तिला वाटत होत की आत जावून त्या गुंडाच्या डोक्यावर एखादा दगड घालावा. पण गुंडाच्या बोलण्यावरुन तिला जाणवले की
कदाचित इधून फोन लागू शकतो. ती परत मागे फिरली. कधी
काटकोनात तर कधी अर्थवर्तुळाकार मार्गावरुन चालत-चालत
ती बरीच पुढे गेली. तिला मोबाईलची रेंज मिळाली. तिने शंभर
नंबर डायल केला. फोन वेंगुर्ले पोलीस स्टेशनला लागला. एका
मुलीचा आवाज ऐकून पोलीस सावध झाले. केतकीने त्यांना
यशवंतगडावरील तळघर, आत अडकलेल्या मुलांची व गुंडाची
माहिती दिली. तळघरात कस शिरायच ते ही सांगितल. कदाचित
खाडीच्या बाजूने भुवारी मार्ग असावा हेही सांगितल. तिने
पोलीसांना आपल्या पप्पांचा मोबाईल नंबरही दिला.
पोलीसांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. किल्ल्यातील तळ-
घरात अडकलेल्या मुलांच्या जीवाला धोका होता. भरभर
चक्रे फिरली. वेंगुर्ले बंदरावरून तेथील पोलीस स्पीड बोटीने
किल्ल्यांच्या रोखाने निघाले. पप्या प्रचंड तणावाखाली होते.
त्याचवेळी केतकी त्या भुलभूलैया असलेल्या मार्गाने बाहेर
पडता येते का हे पाहत होती. चालता-चालता अखेर तिला
प्रकाश दिसला. तो खाडीच्या दलदलीच्या भागाजवळ आली
होती. तिथे वेलीच जाळ पसरल होत. तेवढ्यात तिला
पोलीसांची बोट दिसली. केतकीने हातवारे करत पोलीसांचे लक्षा
वेधून घेतले. तिच सार अंग खरचटून गेल होत. पोलीस झपाझप
उड्या टाकत खाली उतरले बंदूका लोड करत चिंचोळ्या वाटेतून वाकत-वाकत आत शिरले, मध्ये केतकी व पुन्हा पोलीस अशा
पद्धतीने ते झपाझप चालत होते.
वर किल्ल्यात पोलीसांनी तळघराचा मार्ग उघडण्याची कळ
शोधली. बॅटऱ्यांच्या प्रकाशात पोलीस व पप्पा झपाझप
पायऱ्या उतरले. तो दगड पुन्हा आपोआप जागेवर बसला मार्ग
बंद झाला. तळघरातील गुंड पोलीसांना बघून घाबरले व भुयारी
मार्गाने पळू लागले पण तिथेही पोलीस बंदुका रोखत दत्त म्हणून उभे
होते. क्षणार्धात गुंडाच्या मुसक्या आवळल्या गेल्या. पोलीसांनी
तळघरातील लाकडी खोके उघडले. त्यात अमली पदार्थाच्या
पिशव्या भरलेल्या होत्या. कोट्यवधी रुपयांचा माल होता.
पोलीसांनी सापळा रचून समुद्रमार्गे येणाऱ्या बॉसलाही पकडले.
त्या तळघराचा शोध गुंडाना चार महिन्यापूर्वी योगायोगाने ला-
गला होता. माल लपवण्यासाठी त्यांना योग्य जागा सापडली
होती. यासाठी त्यांनी भुताटकीची अफ वा पसरण्यासाठी
मशाली,विविध आवाज, यांचा उपयोग केला होता. पण त्यांनाही
माहित नव्हते की तळघरात शिरण्यासाठी वरुनही मार्ग आहे, जो
मुलांना योगायोगाने सापडला होता.
मुलांनी प्रामुख्याने अकरा वर्षांच्या केतकीने असामान्य
धाडस व प्रसंगावधान दाखवून गुंडाना पकडण्यास मदत केली.
त्याबद्दल पोलीसांनी तिचे व तिच्या आईवडिलांचे कौतुक केले.
सर्व मुलांना बक्षीसेही दिली.
-----------*--------------*-------------*---------*-----'
श्री बाळकृष्ण सखाराम राणे, सावंतवाडी