पाठराखीण बाळकृष्ण सखाराम राणे द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पाठराखीण

पाठराखिण
ती एकटीच वाट चालत होती.तिचा चेहरा निर्विकार होता. आजंबाजूला काय चाललंय याच तिला भान नव्हते आणि त्याची तिला पर्वा सुद्धा नव्हती.वेळ रात्री दहाची होती.अश्या वेळी ती गावानजिकच्या जंगलाकडे चालली होती.सात-आठ महिन्यांपूर्वी लग्न झालेली ती नवविवाहिता...या अंधारात मिसळून अंधाराचाच एक भाग झाली होती. तिला शोधण्यासाठी तिच्या मागून कुणी येईल अशी अजिबात शक्यता नव्हती. ती आता जंगलात शिरली होती.गर्द झाडी..भूतांसारखी दिसणारी उंच झाडे...पान सळसळण्याचा आवाज...अधून मधून उठणारी कोल्हेकूई...रातकिड्यांची किरकिर..वटवाघळांचा विचित्र चित्कार..सारे वातावरण भयाण होत.ती पहिल्यांदाच इथ आली होती.इतरवेळी रात्री या जंगलात पाय ठेवण्याचे धाडस तिने केल नसत. सासरी आल्यावर तिने या जंगलाबद्दल बरंच काही ऐकलं होत.जंगलात भूत असून ती माणसांना झपाटतात. रात्रीच्या वेळी जंगलातून हसण्याचे आवाज येतात. कुणी अनोळखी सायंकाळी इथून जात असेल तर ' मी येवू ' का असा आवाज येत...सोबत चाळांचा छुम-छुम आवाज येतो. गावातला चुकून कुणी सायंकाळी घराबाहेर पडला तर घरातून त्याला सक्त सूचना मिळायची.मी येवू अस कुणी विचारल तर उत्तर द्यायचं नाही....मागे वळून बघायच नाही.
पण तिला या सगळ्या गावगप्पा वाटायच्या.ती शिकलेली असल्याने तीचा भूता खेतांवर विश्वास नव्हता. आज तर ती पुरती जीवाला कंटाळली होती.जीवन संपवण्यासाठी ती बाहेर पडली होती.खर म्हणजे तिच्या सासू सासर्यांनी
तीला घराबाहेर काढलं होत.माहेराला जाण्यात काही अर्थ नव्हता.म्हतार्या आई-वडिलांना त्रास देण्यापेक्षा जीवन संपवले बर अस तिने ठरवलं होत.तिच्या लग्नासाठी वडिलांना अर्धी जमीन विकली होती .कर्जही काढलं होत. गेल सहा-सात महिने तिने नरक यातना भोगल्या होत्या.पांढर्या पायाची...कुलटा .. अवदसा असंख्य नावाने तिला दूषण दिली जायचं.काही दिवसांपूर्वी..जेवण मनासारखझाल नाही म्हणून तिच्या सासूने तिला तापलेल्या कालथ्याने तिला डाग दिला होता...चरचर...आवाज करत त्वचा भाजली होती.असह्य वेदनेने चेहरा वेडावाकडा झाला होता. कंठात आलेली किंचाळी ओठ दाबत तिने कंठात जिरवली होती. पण गालावरचा काळा डाग कायम त्या वेदनेची आठवण करून द्यायचा. आपल्या नवर्याला घेवून माहेरी येवून राहिलेली तिची ननंद तिचा पायउतार करण्याची एकही संधी सोडत नव्हती. दिवसभर झोपा काढत...फक्त हुकूम सोडायची. एवढंच नाही तर घरजावई बनलेला तिचा नवराही.. तिला बोलायचा. सैन्यात असलेल्या आपल्या पतीला फोन करून तिने आपली कैफियत मांडली पण तूच चूकत असणार...मोठी माणसं बोलणारच...अस म्हणून तो तिलाच गप्प करायचा.पण आज कहर झाला...सासूने तिला माहेराहून दोन लाख रूपये मागून आण अस सांगितलं कशासाठी तर..जावयाला नवा बिझनेस करायचा आहे म्हणून!
कोणत्या तोंडात ती माहेरी पैसे मागणार होती?तिने ठामपणे नकार दिला. सासूने व नंणंदेने तिला घराबाहेर ढकलून दरवाजा बंद केला होता. यासाठीच ती आत्महत्या करण्यासाठी जंगलाच्या दिशेने बाहेर पडली होती.
अंधारात दगडांना आपटून पायांना जखमा झाल्या होत्या.चप्पल कधीच तुटली होती.बेभानपणे चालताना वाटेत झाडांना आपटत ठेचकाळत शरीरावर जागोजागी खरचटले होत.'नको बाई स्त्रीचा जन्म' कुणाच्याही वाट्याला असल जगणं नको येवो. ती स्वतः शी पुटपुटली. या जंगलात कुठेतरी धबधबा आहे अस तिने ऐकलं होत. धबधब्यावरून स्वतः ला झोकून द्याव अस तिने ठरवलं होत.आता सतत रानटी श्वापदांचे आवाज व हालचाली जाणवत होत्या. कदाचित कुणीतरी जनावर तिच्या पाठलागावर असावं.आता पाण्याच्या कोसळण्याच्या आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. तिला जीवन संपवण्याची घाई झाली होती. सगळ्या वेदनेवर..यातनांवर...मृत्यू सारखं दुसर औषध नाही एवढाच विचार तिच्या मनात होता.बस्स आता थोडा वेळ...मग सारंच संपेल.. ती आता कड्याच्या वरच्या टोकावर पोहचली होती.आता तिच्या मनात काहीच नव्हत...ना नवऱ्याचा चेहरा...ना आई - बाप ! आता अंधारातही सराव झाल्यामुळे थोड थोड दिसत होत. पाण्याचा एक मोठा प्रवाह उंच कड्यावरून खाली झेप घेत होता. पाणी मोठा आवाज करत खाली पडत होते. तिथे...पाण्याचा लहान डोह तयार झाला होता. ती झेप घेणार एवढ्यात.....तीच लक्ष खालच्या पाण्याकडे गेलं. ती दचकली... तीच हृदय धडधडू लागले. मनात भय निर्माण झालं. क्षणापूर्वी सगळ्या भावनांच्या पलीकडे गेलेली ती भयाने शहारली. खाली पाण्याच्या कडेला एक स्त्री पाय पाण्यात सोडून बसली होती. एवढ्याने ती घाबरली नव्हती...तर काहीतरी विचीत्र तिला दिसलं होत.
त्या स्त्रीने आपले दोन्ही पाय पाण्यात सोडले होते. ...आणि तेवढा भाग प्रकाशने उजळाला होता.तो प्रकाश तिच्या तोंडावर पडला होता. ती हातानं काहीतरी पाण्यात टाकत होती.तिने पाय हलवला की प्रकाश हलत होता. कोण होती ती?..तो अदभुत प्रकाश कसला होता?
ती मानवी स्त्री निश्चितच नव्हती!
तिने त्या स्त्रीकडे बघायचं टाळलं. आकाशाकडे बघत तिने हात जोडले. ' देवा पुन्हा स्त्री जन्म देऊ नकोस ' अस विणवत तिने खाली झेप घेतली. तिचा देह वेगाने पाण्याच्या प्रवाहा सोबत खाली कोसळू लागला.एक अखेरचा दणका आणि मग सगळं शांत होणार होत. ती बेशुदीच्या झुल्यावर झुलत होती. अचानक त्या पाण्याजवळ बसलेल्या स्त्रीने खालच्या पाण्याकडे बघत हात वर केला. डोहातले सारे पाणी एकत्र गोळा होत वर झेपावले .पाण्याच्या त्या स्तंभाने खाली कोसळणाऱ्या त्या स्त्रीला अलगद झेललं.
ती स्त्री ..शुध्दीवर आली तेव्हा पाण्याजवळच्या वाळूत पडली होती.आपण मेलो की जिवंत आहोत हे तिला कळत नव्हतं.
" मृण्मयी... झालं समाधान? जीवनाच्या लढाई पासून
पळत होतीस..किती पळशील?" त्या अनोळखी स्त्रीने विचारले.
" कोण...कोण आहात तुम्ही? मी कशी वाचले? माझे नाव तुम्हाला कस माहीत?"
जीव द्यायला आलेल्या त्या स्त्रीने म्हणजे मृण्मयीने विचारले.
"ते महत्वाचे नाही. ज्यांनी तुझा छळ केला ..ते मजेत राहतील...त्यांना शिक्षा कोण देणार?" त्या अनोळखी स्त्रीने विचारले?
पहिल्यांदाच मृण्मयीने त्या स्त्रीकडे बघितलं. ती विलक्षण सुंदर होती.अस सौंदर्य मानवी स्त्रीकडे असणं शक्य नाही ! ती हात किंवा पाय हलवायची तेव्हा चमकदार थंड प्रकाश पडायचा. तिच्या डोळ्यातही हिरवट निळसर प्रकाश दिसत होता.
"पण तुम्ही कोण आहात....आणि हा प्रकाश?"
" मी कोण? " ती हसली. किंणकिनाऱ्या असंख्य घंटा वाजल्यासारखा ध्वनी निर्माण झाला.
"तुमच्या गोष्टीत ' आसरा ' म्हणतात ती मी! मला या पूर्वी ज्या कुणी मानवानं पाहिलं ते एकतर वेडे झाले किंवा पुन्हा कुणालाच दिसले नाहीत"
मृण्मयीच्या अंगावर शहारे आले.
" पण यावेळी मी आपणहून तुझ्या सोबत येणार आहे. तुझ्या घरच्या मंडळींना धडा शिकवणार आहे."
" पण... पण मला घरी जायचं नाहीय. खरंच!" मृण्मयी काकुळतीने म्हणाली. तिने हात जोडण्यासाठी हात वर उचलला तस वेदनेची एक कळ तिच्या मस्तकात गेली. सारा हात सोलल्यासारखा रक्त बंबाळ झाला होता.
आसरा हसली तिने आपला हात मृण्मयीच्या दिशेने धरला.एक चमकता प्रकाश मृण्मयीच्या अंगावर फिरला. मृण्मयीच्या साऱ्या जखमा क्षणात बर्या झाल्या. जस काही झालंच नव्हत. मृण्मयीचा स्वतः वर विश्वास बसेना.
काय आहे हे? काय करणार आहे ही? इथून आपण पळून गेलो तर!
" हे बघ आता तुझ्या हातात काहीच राहील नाही बलिके. आता तू सरळ घरी जाणार आहेस.मी तुझ्या मागुन येणार आहे.घाबरु नकोस..मी तुझ्या सासरच्या माणसांची थोडी गंमत करणार आहे." आसरा खळखळून हसली.
" चल उठ .जाऊया ना आता?" ती मृण्मयीला म्हणाली.
मृण्मयी यंत्रवत उठली.ती गावाच्या दिशेने चालू लागली.तिच्या पाठोपाठ प्रकाशाचा एक झोत चालू लागला.लवकरच ती गावाच्या वेशीत प्रवेश करणार होती.
गावच्या वेशीवर एक छोटंसं मंदिर होत. त्या मंदिरात एक फिरस्ता रात्र घालवण्यासाठी थांबला होता. झोप येत नव्हती म्हणून तो बाहेर पायरीवर बसला होता.समोरून कुणीतरी स्त्री येतेय आणि तिच्या मागून एक विलक्षण प्रकाश पुढे सरकतो हे पाहून त्याची बोबडी वळली. सोबत चाळाचा आवाज...आणि वारा !तो एवढा घाबरला की शब्दजही त्याच्या तोंडून फुटेना....तो बसल्या जागीच बेशुध्द पडला व खाली कोसळला.
" मृण्मयी तिकडे लक्ष देवू नकोस..त्याला उद्या यातल काहीच आठवणार नाही. तू घरी गेलीस की दरवाजा वाजव...मग बघ !" आसरा हसत म्हणाली.
मृण्मय आपल्या घराच्या दिशेने चालू लागली.

मृण्मयीची सासू ,नणंद व तिचा नवरा भलतेच खुश होते.
"रत्ने..मी तूला सांगते...आपल्यामागची ब्याद गेली.आता मदनचे पुन्हा लग्न लावायचं.. मिळेल त्या हुंड्यात जावईबापूंचा धंदा उभा करता येईल. " मृण्मयीची सासू आपल्या मुलीला म्हणाली.
"अग पण आधी..बाकीच्या भानगडीत निस्तराव्या लागतील. मृण्मयी पोलिसांकडे गेली तर?" रत्ना म्हणाली.
" ती कसली जाते? अगदीच गावंढळ आहे ती." सासू फिदीफिदी हसत म्हणाली.
" तरीही उद्या आपल्याला मृण्मयी हरवण्याची पोलिसात तक्रार द्यावी लागेल." रत्ना म्हणाली.
तेवढ्यात दरवाजा वाजला.तिघेही स्तब्ध झाले.कोण असेल? पोलीस आले की मृण्मयीने आत्महत्या केल्याची कुणी बातमी घेऊन आला आहे.?
पुन्हा दरवाजा वाजला.
"कोण आहे?" रत्नाने विचारले.
" वन्स मी आहे? मृण्मयी..!"
"आलीस तशी निघून जा. तूला या घरात जागा नाही. "
सासू ओरडली.
अचानक हसण्याचा आवाज ..किणकिण असा...छोट्या घंटांचा आवाज ...त्या पाठोपाठ दरवाज्याची कडी मागे सरकली.दरवाजा उघडला व मृण्मयी उंबरठा ओलांडून आत आली.तिघेही घडपडून उभे राहिले. दरवाजा आपोआप कसा उघडला? हा प्रश्न सगळ्यांना पडला होता.कदाचित आपणच कडी व्यवस्थित लावली नसणार अस सासूला वाटल.
" आई, भूक लागलीय. घरात काही आहे?"
" फुकटच गिळायचय? आता काही शिल्लक नाही. " नणंद रत्ना ओरडली.
" रत्ने बोलत काय बसलीस...धर तिच्या झिंज्या...घराबाहेर काढ पुन्हा..." सासू पदर खोचत म्हणाली. मृण्मयीच्या डोळ्यात हिरवट पिवळा प्रकाश चमकला....वार्याचा एक झोत घरभर फिरल्यासारखा वाटला. कुणीतरी रत्नाला जोरदार तडाखा दिला.ती आपल्या आईच्या अंगावर पडली.दोघी बाजूच्या बिछान्यावर पडल्या.नेमकं काय घडल हे रत्नेच्या नवर्याला कळेना.आपली बायको व सासू पडल्यात हे बघून तो रागाने उठला. मृण्मयीच्या दिशेने जात त्याने हात उगारला.मृण्मयीचा हात वर झाला.जावई बापूंचा हाथ काही केल्या खाली येईना.सारे भयभीत झाले... काय आहे हे? नेमकं काय घडतेय....त्यांना काहीच कळेना?
अस यापूर्वी कधीच घडल नव्हते. जावईबापूच त...तत.पपप करायला लागले.
मृण्मयी तडक आपल्या खोलीत गेली. भानावर आलेले तिघेही धपकन खाली बसले.
" अचानक अवदसेला जादू कशी काय यायला लागली." सासू धापा टाकत म्हणाली.
" आज झोपल्यावर तिचा निकाल लावला पाहिजे, नाहितर आपल काही खर नाही. " रत्ना म्हणाली.
" ती झोपल्यावर तिच्या तोंडावर ऊशी दाबून तिला मारूया. हे काम जावईबापू करतील." सासूबाई जावईबापूंकडे पाहत म्हणाली.
" मी...मी? नको..!मृण्मयीकडे जादू आहे."
" अहारे...माझा शेळपट सरदार..घातली ना शेपटी...म्हणे बिझनेस करणार?"
रत्ना वैतागून म्हणाली.
तिघांनी प्लान ठरवला.कोणत्याही परिस्थितीत मृण्मयी चा काटा काढायचा हे नक्की झाले. रात्रीचा एक वाजला...सासूने मृण्मयीच्या खोलीकडे जात कानोसा घेतला..आत अगदी सामसूम होती. तिने अलगद दरवाजा ढकलत मुलीला व जावयाला खुणा केली. जावईबापू हातात उशी घेवून आत शिरले. त्यापाठोपाठ रत्ना आत आली.तिघांच्या ह्रदयात धडधड होत होती..जावईबापूंचा तर हात थरथरत होता. ते मृण्मयीच्या डोक्याच्या बाजूला गेले. अचानक त्यानां जाणवल की पलंगावर मृण्मयी एकटी नाही. आपले हात लोखंडासारखे जड झालेत अस त्यांना वाटल. मृण्मयीच्या बाजूला एक रूपवती तरूणी झोपली होती.ती मधाळ हसली तस जावईबापूंच्या डोळ्यात वादळ पेटले ते सार विसरले . खाणा खुणा करणार्या सासू व बायकोकडे त्यांच लक्षच नव्हते.
रागाने त्यांची बायको पुढे सरकली. नवर्याच्या हातातली उशी ओढण्यासाठी तिने हात पुढे केला.तेवढ्यात त्या रूपवतीच्या डोळ्यातल्या मासोळया थरथरल्या. जावईबापूंनी उशी सरळ बायकोच्या तोंडावर दाबून धरली. बायको घुसमटून हातपाय ताणू लागली. भयभीत झालेल्या सासूने धाव घेतली.तिने कसबस आपल्या मुलीला सोडवल.रत्ना धापा टाकत होती .तिचे डोळे लाल झाले होते.आपण थोडक्यात वाचलो हे तिच्या लक्षात आल.
या एवड्या गदारोळात मृण्मयी गाढ झोपेत होती.
अगदी शांत व हसरा चेहरा होता तीचा.एखाद छान स्वप्न ती पाहत असावी.
" आई , इथून लवकर चल....मला खूप भीती वाटायला लागलीय." रत्नाने आपल्या आईला ओढतच खोली बाहेर नेलं.त्या पाठोपाठ जावईबापू थरथरत बाहेर गेले.त्यांचा चेहरा पार पडला होता.त्या रात्री ती तिघेही व्यवस्थित झोपली नाहीत. पहाटेला जावईबापूंना जाग आली.बाहेर थोडंफार दिसत होत. त्यानी खिडकीबाहेर पाहिलं.ते धडपडून उभे राहिले. होय..बाहेर तिच रूपवती उभी होती.तिने त्यांना खुणावल. गारुड झाल्यासारखे...जावईबापू दरवाजा उघडून बाहेर पडले. ती सुंदरी चालू लागली. ते सुध्दा तिच्या मागोमाग चालू लागले. कुणी तरी गुदगुल्या केल्यामुळे रत्नेला जाग आली.खिडकीतून बाहेर बघते ते काय!तिचा नवरा एका सुंदर तरूणींच्या पाठीमागे चाललाय.रत्ना धडपडून उठली.डोळ्यांवरची झोप उडाली होती .दरवाजा उघडाच होता .रत्ना सुध्दा नवर्याच्या पाठीमागे चालू लागली. पायवाटेवरच्या सुकलेल्या पाचोळ्यात फक्त दोघांच्या पावलांचा आवाज येत होता.त्या रूपवतीच्या पावलांचा आवाज जराही येत नव्हता.त्या सुंदर स्त्रीची पावलं जमीनीवर पडतच नव्हती.जमिनीच्या दोन बोट वर हवेत ती चालत होती.पण हे रत्ना व तिच्या नवर्याच्या लक्षात आल नव्हते. रत्नेचा नवरा संमोहित होऊन त्या रूपवतीच्या मागे चालला होता.त्याला फक्त ती दिसत होती. थोडा वेळ चालल्यावर समोरच्या शेताजवळ ती सारी पोहचली. शेतात एक रहाटाची विहीर होती.दोन स्त्रीया भल्या पहाटे पाणी भरण्यासाठी आल्या होत्या. एकजण रहाट ओढत होती.तर दुसरी कठड्याला टेकून उभी होती. सर्वात पुढे चालणारी ती रूपवती अचानक त्या कठड्याला टेकून उभ्या असलेल्या स्त्रीच्या शरीरात सामावून नाहीशी झाली. भारावलेल्या जावईबापूंनी झटकन धावत जात त्या स्त्रीचा हात धरला.
" मी तूझा ..दास आहे. मला तूझ्या सोबत घेवून चल." ते विनवू लागले.
अचानक ती स्त्री किंचाळली. त्याबरोबर दुसरी स्त्री भयाने ओरडू लागली. धीर करून दोघींनी पायातल्या चपला काढून या दिलफेक आगांतूकाला मारायला सुरुवात केली. शेतावर काम करायला जात असलेल्या शेतकर्यांनी तिथे धाव घेतली.जावईबापू त्या स्त्रीला सोडायला तयारच नव्हते. सर्वांनी कसबस तीला सोडवले व जावईबापूंना बर्यापैकी चोप दिला. तेवढ्यात रत्ना तिथे पोहचली.नवर्याच कर्तृत्व बघून ती ओशाळली. सर्वांच्या हातापाया पडून तिने नवर्याला सोडवल.
घरी आल्याबरोबर रत्नेने हातात झाडू घेऊन नवर्याला चोप द्यायला सुरूवात केली.सासू मध्ये पडली.
" रत्ने, काय झाल..?"
" काय झाल! नसते धंदे करतायत हे...शेण खायला निघाले होते ..मार खावून आले."
" म..म..मला खरच..काही कळत नाही...कुणी हिरवट डोळ्यांची स्त्री आहे....बहुतेक ती हे सार घडवतेय.."
जावईबापू म्हणाले.
" कोण ती?उगाच काहीतरी बरळून नका." रत्ना वैतागली.
" अग...अशी काय करतेस...जावईबापूंवर कुणी तरी करणी केलीय..बहुतेक!" सासूने जावयाची बाजू घेतली.
" करणी नव्हे...यांची कर्मे...छळताहेत..यांना. ते काही नाही मी चालले माझ्या घरी. इथे राहिले तर वेड लागेल मला." रत्ना आपल सामान भरायला लागली.
" अग पण तुम्ही गेल्यावर...माझ एकटीच कस होणार?" रत्नांचा आई म्हणाली.
बेडवर बसलेली 'आसरा' खुद्कन हसली.पुन्हा किणकिण असा घंटांचा आवाज आला.रत्ना शहारली.
" काल पासून हा ..हा ..आवाज सारखा कानात रुंजी घालतोय...आई...मला खूप भिती वाटतेय. हे बघ..मृण्मयी शी जमवून घे त्यातच भल आहे...खूप छळ केला आपण तिचा! "
रत्नाने आपल सामान गुंडाळल. नवर्याच्या बखोटीला धरून म्हणाली.." चला..खूप शोभा झाली..घरी जाऊया. "
एवड्यात मृण्मयी बाहेर आली.
" वन्स..कुठे चाललात? थांबा ना"
रत्ना हात जोडत म्हणाली.
" नको... जाते मी..यापुढे तूला त्रास नाही देणार."
रत्ना व तिचा नवरा बाहेर पडली. मृण्मयी बाहेर निरोप द्यायला गेली.त्यापाठोपाठ ' आसरा'ही तरंगत बाहेर आली. मृण्मयीने आसरेकडे कृतज्ञतेने पाहिले. आसरा खूदूखुदू हसत होती.
" कैदाशिनी माझ्या मुलीला पळवून लावलेस.. पण मी खमकी आहे...थांब बघतेच तूला." सासू हातात झाडू घेवून मृण्मयीला मारायला आली.
" आई!..थांबा.." मृण्मयी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होती.
" आई? कोण आई..! कुणाची आई?"
मृण्मयीच लक्ष आसराच्या हालचालींवर होत.ह्वरांड्यातल्या फॅनवर बसलेल्या आसरेने तेथूनच आपला हात लांब केला...सासूच्या हातातली केरसुणी अलगद हवेत उलटी फिरली झाडूचे फटकारे फटाफट सासूबाईंची पाठीवर बसू लागले.आपल स्थूल शरीर सावरत टणाटण उड्या मारत ती मार चुकवण्यासाठी प्रयत्न करू लागली. कसबस सुटका करून ती माजघरात पळाली.
अखेरचा प्रयत्न म्हणून तिने दुपारी मृण्मयीच्या जेवणात अत्याधिक तिखट सगळ्या पदार्थांचा मिसळले.ते खाऊन मृण्मयीच्या पोटात आगआग होईल व सर्व शरीराचा दाह होवून ती पळून जाईल असा तिचा अंदाज होता. पण तिला हे माहित नव्हते की तिच्या बाजूलाच आसरा उभी होती व मिस्कील हसत हे सार पाहत होती. मोठ्या प्रेमाने सासूने मृण्मयीला जेवण दिल व स्वतः बाजूला जेवायला बसली.तिला मृण्मयीची होणारी तडफड बघायची होती.पण झाल उलटच मृण्मयी चव घेऊन जेवत होती.सासूबाईंनी दोन- चार घास खाल्ले आणि तिच्या पोटात आगडोंब उसळला. ताटावरून उठायचा प्रयत्न करते तर तेही जमेना कुणीतरी तिच्या तोंडात घास कोंबत होत .अखेर ती जमिनीवर गडाबडा लोळत रडू लागली.मृण्मयीची क्षमायाचना करू लागली.
सायंकाळी परगावी गेलेले सासरेबुवा घरी आले तेव्हा सार घर कस शांत होत.घरात रत्ना व जावईबापूंही दिसले नाहीत. त्यांना समजेना नेमकं काय झालय ते.पण मृण्मयीशी बोलताना आपली बायको किती नम्रपणे बोलतेय हे पाहून गप्प राहण्यातच त्यांनी शहाणपणा मानला.त्या रात्री मृण्मयी 'आसरे'चे आभार मानत होती.
" तू माझी पाठराखण केलीस मला वाचवलं...माझा संसार सावरलास कसे आभार मानू तूझे."
" हे बघ..थोड हिमतीने घे..स्वतः स्वतःची पाठराखिण बन
अरेला कारे करायला शिक....जमेल?"
मृण्मयीने मान हलवली.
आसरा तरंगत खिदळत....
जंगलाच्या दिशेने गेली.
-----------------समाप्त-----------