Hirve Nate - 13 books and stories free download online pdf in Marathi

हिरवे नाते - 13 - मुकी

                                                                                                मुकी :14

 

 बदली झाली आणि आम्ही औरंगाबादला रहायला आलो. आपलच गाव होतं. पण परत नवीन शेजार पाजार, शाळा, कामवाली बाई सगळच नवीन. सामानाच्या बॉक्सनी घर भरून गेलं होतं. स्वैपाकघरातलं सामान आधी लागतं म्हणून ते बॉक्स उघडायच्या तयारीत असताना बेल वाजली. आता आपल्याकडे कोण येणार अशा प्रश्नार्थक मुद्रेने काम आवरत राहिले. कुणीतरी दार उघडेल ही आशा होती पण कुणीच दार उघडायला हलेना तेव्हा नाईलाजाने मीच उठत दार उघडले.

  दारात एक गोरीपान, कुरळ्या बाई उभी होती. कोण पाहिजे ? काय पाहिजे ? विचारलं तर तिने घशातून उत्तरादाखल विचित्र मोठा आवाज काढला. त्या आवाजाने मी एकदम घाबरूनच गेले. हा काय प्रकार ? बाकीचेही चमकून पाहू लागले. हातवारे करत ती बाई काहीतरी सांगू पहात होती. तेव्हढ्यात शेजारची बाई बाहेर आली आणि म्हणाली “ अहो तुमच्याकडे काम मिळेल का ? विचारत आहे.”

   कामवाली तर मला हवीच होती. पण अशा प्रकारे रोज संवाद कसा साधयचा ? आणि ती काय बोलतीये हे आपल्याला कसे कळणार ? तेव्हढ्यात शेजारची म्हणाली “ अहो हिला आपण संगितलेलं सगळं कळतं, आणि हळूहळू सवयीने ती काय म्हणतीये हे ही आपल्याला कळायला लागते. आणि कामही अगदी स्वच्छ आहे तिचं.” यावर मुकीने डोळ्यातून हसून मान डोलावली. मलाही हसू आलं. मग शेजारणीशी ओळख होऊन तिच्याच सहाय्याने घासघिस करून मुकीला कामावर ठेवलं. रुटीन सुरू झालं.

    सगळे आपापल्या कामावर गेले की नऊच्या ठोक्याला मुकी कामावर यायची. दारातून आत यायची ते चित्रविचित्र आवाज आणि हातवारे करतच. उत्साहाने तिला गल्लीतल्या बातम्या एकमेकांकडे पोहोचवायच्या असायच्या. बेसिन जवळ जाऊन धडाधडा भांड्यांचे, नळाच्या पाण्याचे ,आणि तिच्या आवाजाचे मिश्रण सुरू व्हायचे. आधी मला वाटायचे की ती मुकी आहे तर बहिरीही असावी. त्यामुळे आपण एव्हढा आवाज करतोय हे तिला कळत नसावं. पण नाही. तिला उत्तम ऐकू यायचे. ती आली की घरात शेणाचा वास पसरायचा आणि कितीतरी वेळ तसाच रहायचा. काम मात्र अगदी स्वच्छ होतं. पण तो आवाज आणि वास मला सहन होईना. संध्याकाळी शेजारच्या नीताकडे गेले तेव्हा तिला विचारलं तु तो वास आणि आवाज कसा सहन करतेस ?

 “ मलाही आधी त्रास व्हायचा या सगळ्याचा. पण नंतर जसजसं तिच्याबद्दल कळत गेलं तसतसा तो त्रास मी सहन करायला शिकले.” नीता

 “ का बरं काय झालं ?” मला उत्सुकता वाटली.

 अगं काय सांगू. जन्मत ही एकदम धडधाकट होती. छान होती. तीन वर्षाची असताना कसला तरी ताप आला त्यात हिचा आवाज गेला. जन्मतः मुकी असली असती तर बहिरीही असली असती. त्या तापाने वाचा गेल्यावर डॉक्टर, स्पीच थेरपीने ती घशातून आवाज काढू लागली आणि कळणाऱ्यांना त्यातून अर्थ कळू लागले. एक दोन वर्षानी तिची आई वारली आणि बापाने दुसरे लग्न केले. तिथूनच  मुकीचे भोग सुरू झाले. सावत्र आई या गोऱ्या गोमटया मुलीला अजिबात बरं पहात नव्हती. बाप आपल्या कामात मग्न होता. लवकरच सावत्र भाऊ बहिणी झाल्या. मग मोठी म्हणून हिच्या मागे कामाची रिघ सुरू झाली. कामाला वाघ असणारी मुकी म्हणूनच त्या घरात टिकून राहिली. तरीही आईचा मार नशिबी होताच. शाळा, शिक्षण हे शब्द तर कुणाच्याच दूरान्वयानेही शब्दकोशात नव्हते. एव्हढी कामं उपसूनही, घरात मोटभर असूनही तिला पोटभर जेवायला मिळायची मारामार. अशा वातावरणात मुकी उफाड्याने वाढली. गोरीपान, कुरळे केस, धरधरीत नाक याने ती उठून दिसायची. मुकेपणाने त्रास सहन करत ती सगळ्याना आपलसं करू पहायची. पण सावत्र आईचा व्देष परकोटीला चाललेला पाहून वडीलांनी मामाशी लग्न लावून दिलं. पहिल्या बायकोचा भाऊ मुकीवर नजर ठेऊन आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. गाई म्हशी, दुधातुपाचा व्यापार करत तो चांगलं कमावत होता, आणि तिकडे घरच्यांनाही मुकीबद्दल सगळं महित होतं त्यामुळे सगळच जुळून आलं होतं.

    मुकीच लग्न झालं. सासरी येऊन संसार सुरू झाला. नव्या नव्हाळीच्या दिवसानंतर पोरांचा लबेदा मागे लागला. कुठल्यातरी रोगाच्या साथीत दोनचार गाई गुरं मृत्युमुखी पडले. जम बसलेला व्यवसाय कोलमडतोय पाहून नवरा दारू प्यायला लागला. मग पिल्यावर भान सुटलं की हिला मरेस्तोवर बडवायला लागला. आपला संसार आपल्यालाच सांभाळणं आहे हे जाणण्याएव्हढी मुकी सुज्ञ होती. मुलांना सासुकडे सोपवून तिने चार घरची कामं करायला सुरवात केली. पहाता पहाता तेरा घरातल्या कामांचा डोंगर ती उपसू लागली. शेणगोठा, सकाळचं आवरून ती बाहेर पडली की दोन वाजताच जेवायला येई. सकाळ व संध्याकाळचा दुधाचा रतिब घालायला मोठ्या मुलाला पाठवी. तिच्या या झपाट्याकडे पाहून नवराही वरमून कामं करत असे. पण दारूची सवय थोडीच जाते. अधूनमधून अंगावर, गालावर वळ घेऊन आलेली मुकी पहावत नाही. पण तिची जिद्द वाखाणण्यासारखी होती. आपल्या कष्टावर तिनी पुर्ण घर पेललं होतं. आजकालच्या सगळ्या कामवाल्या बायकांच्या अशाच कहाण्या आहेत पण धडधाकट असून रडगाणं गात बसणाऱ्या बायकांपेक्षा हिची जिद्द कुठतरी भावून जाते. मग तिचे हे बाह्यरंग जाणवेनासे होतात.” निताने सुस्कारा सोडला.

  मलाही ते एकून हेलावल्यासारखं झालं. एका जिद्दीवर संसार उभारणाऱ्या बाईची नक्कीच कदर करायला पाहिजे.

  आता मलाही तिची भाषा कळू लागली. ती आल्यावर येणारा शेणाचा वास सवयीचा झाला. भांडे आणि तिच्या संमिश्र आवाजावर लताचे सुर उलगडू लागले. चहा दिल्यावर, तिच्या थकल्या चेहेऱ्यावर अलगद आलेलं स्मित डोळ्यातून उमटले की मलाही आनंद होऊ लागला.

  काही वर्षानी ते घर सुटलं तेव्हा आम्हाला निघताना पाहून मुकीची झालेली घालमेल बघवत नव्हती. परत भेटण्याच्या खोट्या आश्वासनांवर समाधान मानून ती परतली. पण सत्य काय ते तिलाही महित होतं आणि मलाही.

  आयुष्यात किती व्यक्ती येतात आणि जातात. काही नुसत्याच विखुरतात, तर काही ठसे सोडून जातात.

                                                                                .................................................

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED