20B 1032 books and stories free download online pdf in Marathi

20B 1032

आजही तो दिवस मला चांगलाच आठवतोय , 28 ऑक्टोबर 2015 , तो दिवस तुझ्या कुशीतला शेवटचा दिवस असेल असं वाटल नव्हतं , कारण त्या रात्री तुझ्या कुशीत निजून दुसऱ्या दिवशी मी 29 ऑक्टोबर 2015 ला माझा नवीन जॉब साठी मलेशियाला प्रयाण करणार होतो .अर्थातच हा जॉब माझ्यासाठी महत्त्वाचा असल्या कारणानं मलेशियाला येण्याआधी तुझ्या सहवासात मला जास्त वेळ नाही राहता आलं याचं दुःख मला कायम आहे.

वर्षभराच्या आतच म्हणजे साधारण जुलै – ऑगस्ट 2016 च्या दरम्यान तुझ्याशी, माझ्या भावनांशी जोडलेली नाळ ही कायमची तुटली आणि मी तुला कायमचा जन्मभरासाठी परका झालो ,  कारण ही तसंच होतं दादाला त्याला त्याचे स्वतःचे घर घेताना आर्थिक मदत व्हावी म्हणून आम्ही आमच्या राहत्या घराचा ताबा (विकून) एका नवीन इसमाला देऊन कायमचे मोकळे झालो

खरंतर असं करण्याची आमची कोणाचीच इच्छा नव्हती  पण कारणही तेवढं महत्त्वाचं असल्याकारणाने आम्हाला असं करणं भागच आहे  , याची जाणीव झाली आणि मग शेवटी बाबांनी दिलेल्या होकारानंतर आम्ही आमच्या राहत्या घराचा निरोप घेतला…… ज्याचं स्थान म्हणजे

बिल्डिंग नंबर 20 ब , रूम नंबर 1032 माहीम मच्छिमार कॉलनी…

कसं होतं आमचं जुनं घर??

अर्थातच म्हाडाचं ,  म्हणजे गव्हर्मेंट कॉटर्स असल्याकारणाने टिपिकल  दहा बाय बाराची जागा ,

आमच्या घराचा हॉल म्हणजे तेच आमचे सर्वस्व ,  आणि त्यात सर्व काही येत होतं,  ज्याला आपण आत्ताच्या भाषेत लिविंग रूम , बेडरूम , स्टडी रूम अशी वर्गणी करतो, हे सर्व  त्या एकाच रूममध्ये समाविष्ट होतं.

आई आणि जेमतेम तीन-चार बायका एकत्र बसून स्वयंपाक करू शकतील तेवढेच काय ते किचन..टॉयलेट बाथरूम अर्थातच घरामध्ये , आणि विशेष म्हणजे घराच्या बाहेर एक मोठी गॅलरी 

आमचं घर सोडून पुढे सात घरांची दारं एकमेकांना चिकटून रांगेत बसावी अशीच होती , एकंदर काय तर सिमेंट काँक्रीटच्या भरोशावरती उभारलेली ही चार मजल्याची इमारत वजा चाळ असं त्याचं छानसं स्वरूप होतं आणि आजही आहे.

माझा जन्म तसा मुंबईचा अर्थात माहीमचा , आणि माझ्या जन्माच्या आधी साधारण दहा-12 वर्ष आधी बाबांना म्हाडा मध्ये नोकरी मिळाल्यावर लगेचच गव्हर्मेंट स्टाफ म्हणून या खोलीचा ताबा मिळाला होता.

आधी गावी आणि  नंतर कामानिमित्त मुंबईत आल्यावर , रस्त्यावर दिवस काढलेल्या पिढीने म्हणजेच माझ्या बाबांना त्यावेळेस हे घर मिळावे म्हणजे जणू एखाद्या गरिबाला लॉटरी लागून बंगलाच मिळावा असं काहीसं होतं ..त्यामुळे त्यातला आनंद काही वेगळाच …..लगेच बाबांनी घराचा ताबा घेतला आणि मग काय , मुंबईत आता आपलं हक्काचं घर आहे  , त्यामुळे आता गावाकडची सर्व मंडळी , डायरेक्ट आमच्या या घरातच असायची.

सर्व चुलत ,सखे,  मावस , लांबचे,  जवळचे,  सर्व नातेवाईक मुंबई म्हटल्यावर माहीम हाच आमचा राहण्याचा अड्डा आहे या हक्काने येत असत आणि मग बाबाही सर्वांना त्या घरात आसरा देत.

माझ्या बाबांच्या लग्नाआधी जवळजवळ सात-आठ कुटुंब आमच्या या वास्तूत आपलेपणाने राहून गेली आहेत.

मी साधारण कळता होईपर्यंत म्हणजे वयाच्या चार-पाच वर्षापासून , मला आठवतंय त्याप्रमाणे आम्ही घरात जेमतेम पाच मंडळी ,  आई- बाबा – मोठा भाऊ -एक छोटे काका आणि मी. 

कालांतराने छोट्या काकांचं लग्न होऊन छोटी काकी आणि  त्यानंतर वर्षभरात त्यांची एक मुलगी हे सर्वजण आम्हाला सामील झाले आणि खरंतर आम्हा चौघा जणांचे कुटुंब सात जणांमध्ये कधी परिवर्तित झालं हे कळलेच नाही…दहा बाय बाराच्या या छोट्याशा खोलीत आम्हा सात जणांचं कुटुंब आणि ते सोनेरी दिवस काही औरच होते..माझी दहावी आल्यावर [1999] , काकांनी आपलं बस्तान दुसऱ्या ठिकाणी हलवून ते नव्या ठिकाणी स्थिरस्थावर झाले 

तसं पाहता माझं आणि या घराचं नातं 32 वर्षापर्यंत होतं अर्थात माझी शाळा – कॉलेज- नोकरी ची सुरुवात हे सर्व टप्पे , मी या वास्तूमध्येच पूर्ण केले.

वयाची 32 वर्ष या एका वन रूम किचन मध्ये राहिल्यानंतर काय भावना किंवा नातं निर्माण झालं असेल आमच्या दोघांमध्ये ??खरंतर ते शब्दात सांगता येणार नाही पण मला जमेल तसा मी प्रयत्न करतो….

हे वन रूम किचनच घर माझ्यासाठी फक्त चार भिंतींचं घर कधीच नव्हत ,  याउलट आई-बाबा सारखी , मायेची उब देणारा एक खूप मोठा आसरा होता 

लांबी रुंदीने कितीही छोटं असलं तरीही जागेची अडचण मला कधीच जाणवली नाही,  लहानपणापासून ते आज तागायत या वास्तूने मला भरभरून दिले… जीवनात अनेक चढउतारांचा सामना करत असताना दुःखापेक्षा सुखाचे जास्त क्षण मी या वास्तूत उपभोगलेले आहेत आणि ते मी कधीच विसरू शकणार नाही.

फक्त मलाच नाही तर तिकडे राहून गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक कुटुंबाला सर्वांनाच त्या वास्तूने खूप आशीर्वाद दिले आणि म्हणूनच आज तो प्रत्येक व्यक्ती आणि ते प्रत्येक कुटुंब आपल्या आपल्या जीवनात उत्तरोत्तर प्रगती करत राहिले आहेत ,  हीच या  घराची खूप मोठी खासियत आहे …

आज तो प्रत्येक व्यक्ती  खूप सुखी आयुष्य जगत आहे ज्याने या वास्तूचा थोड्या काळासाठी का होईना पण आश्रय घेतला होता आणि त्याच्या विसावाला थांबला आणि या सर्व गोष्टींचा मला खूपच आनंद आहे 

आयुष्याचा पूर्वार्ध आणि एक खूप मोठा काळ अशा वास्तूमध्ये घालवल्याने मला जे काही शिकायला मिळाले त्याचा उपयोग मला आज होत आहे आणि इथून पुढेही कायम होईल यात शंका नाही ,  कारण या वास्तू ने जे काही ज्ञान मला दिले ते जगाच्या पाठीवर कुठल्याही विद्यापीठात शिकवले जात असेल असे मला वाटत नाही..

काय शिकलो असेल मी या वास्तूमधून आणि तिथे व्यतीत केलेल्या जीवनामधून??

स्वतःच्या गरजा कमी ठेवणे 
अर्थात घर लहान असल्याने नको असलेल्या वस्तूंचा साठा करून त्याची भरमसाठ घरात करून ठेवणे कधी आम्हाला सुचलेच नाही आणि तसे कधी आम्ही केलेही नाही , लागेल तेवढेच घेणे किंवा गरजे इतकेच घेणे हा महामंत्र मला या वास्तूने दिला 

असेल तशा परिस्थितीत ऍडजेस्ट होणे 
घरी येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांची ,  नातेवाईकांची , सारखीच ये जा असल्याकारणाने , जो येईल त्याचे हसतमुखाने स्वागत करणे आणि ,  आपली जागा जरी लहान असली  तरी आपलं मन मोठे असेल  तर सगळ्या गोष्टी सामावून घेता येतात ही एक मोठी गोष्ट आणि शिकवण मला इकडे मिळाली.

मला आजही आठवते घरात कोणतेही मंगल कार्य असतील जसे नवरात्री,  गणपती , सत्यनारायण , कुणाचे वाढदिवस त्यावेळेस कुटुंबामधलेच आम्ही 15 ते 20 माणसे एकत्र असायचो  आणि ही 15 ते 20 माणसे मग त्या एकाच घरात अगदी दाटीवाटीने आणि आनंदाने दिवस काढायचो..

रात्री झोपताना सुद्धा आम्ही किचन पासून गॅलरीपर्यंत सर्वजण एकमेकांना चिकटून झोपायचो , अशा वेळेस शेजार धर्म पण खूप उपयोगाला येतो याचा अनुभव मी फार जवळून घेतला कारण आमचा बाहेरचा रूम ,किचन आणि गॅलरी या सर्व जागा फुल झाल्यानंतर ,  मग शेजाऱ्यांच्या काकूंचं घर म्हणजे आपलं दुसरं घर या आवेशात आम्ही काही मंडळी त्यांच्या घरी अगदी हक्काने झोपायला जात होतो.

आमच्या या शेजारच्या काकूंनी सुद्धा कोणत्याही प्रकारची कुरकुर न करता अगदी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाप्रमाणे आमच्या सर्व कुटुंबीयांचा पाहुणचार अगदी आपलेपणाने केला आणि याच मला नेहमीच कौतुक राहिल आहे. 

सर्वांना आपलंसं करणं…
अशा या चाळीमध्ये कधीच कुणाचे दरवाजे दिवसभरात बंद नसायचे  ते कायम उघडे ,त्यामुळे आपल्या जीवनात जो कोणी येईल त्याला आपलेपणाने ,मनमोकळेपणाने आपलंसं करणे आणि त्यांना आपल्यात सामावून घेणे  हे या उघड्या दरवाजांनी मला शिकवले…

समंजसपणाची जाणीव 
रिटायरमेंट नंतर आणि दादाचं लग्न लावून दिल्यानंतर गावाला निघून जायचं हा आई बाबांचा निर्णय आधीच पक्का झाला होता , त्यामुळे मीही पुण्याचा जॉब घेऊन मुंबई सोडून लगेचच पुण्याला शिफ्ट झालो… कारण अगदी सरळ होतं आणि ते म्हणजे नवीन दांपत्याला त्यांच्या भावी आयुष्याची वाटचाल करताना त्यांना  एक  मोकळीक [Space] मिळावी म्हणून , आणि अशी मोकळीक या छोट्याशा जागेत सर्वांनी एकत्र राहून  मिळणं फारच कठीण याची जाणीव आई-वडिलांना तर होतीच पण मलाही झाली आणि ती या वास्तूमुळेच. 

वायफळ खर्च व त्यावरचे नियंत्रण
घराचे इंटिरियर कधी करायचे म्हटले तर आमच्यासाठी  दोन गोष्टी महत्त्वाच्या असायच्या त्या म्हणजे घराचा रंग आणि घराचे पडदे बदलणे हे इतकच, या 2 गोष्टी पलीकडे घरामध्ये आणखीन काही इंटिरियर करता येते याचा विचार सुद्धा आमच्या मनाला कधी शिवलाच नाही .. कारण या दोनच गोष्टी आमच्यासाठी खूप पुरेश्या होत्या

आजच्या जमान्यात लोक घरासाठी अव्वाच्या सव्वा खर्च करत बसतात तो निव्वळ देखावाच असतो किंवा वायफळ खर्च असं मला वाटतं….असो

त्या घरात असताना गरजेपुरते कपडे आणि ते ठेवण्यासाठी असलेले एक लोखंडी कपाट [तेही आरशासहित] हे चार माणसांसाठी पुरेसे आहे , त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी एक वेगळे कपाट,  ड्रेसिंग टेबल , जेवणासाठी डायनिंग टेबल या अशा गरजेपेक्षा जास्त वस्तू आपण का करत बसतो त्याचा प्रश्न आजही मला नेहमी पडतो 

जमिनीवर पाय असणे 
जागेच्या अभावी आम्हाला घरामध्ये डायनिंग टेबलची गरज कधीच जाणवली नाही,  कारण जेवताना नेहमी जमिनीवर मांडी घालून बसणे आणि तेच आपल्या आरोग्यासाठी चांगले असते हे या वास्तुने आम्हाला पटवून दिले

आपण कितीही मोठे झालो तरी जेवणासाठी ,  पोटाची खळगी भरण्यासाठी शेवटी आपल्याला जमिनीशी संलग्न रहावेच लागते ही शिकवण माझ्यासाठी लाख मोलाची होती आणि आजही आहे 

लहान जागेच्या अभावी घरात आम्हाला कधी बेड आणि त्यावर मऊ मऊ लुसलुशीत गादी असावी याचा अनुभव आम्ही कधी घेतलाच नाही ,  कारण 

माझ्यासाठी शांत झोपेचे रहस्य म्हणजे जमीन ,  त्यावर एक छटाई आणि आजीची एक उबदार  गोधडी या गोष्टी तेव्हाही पुरेशा होत्या आणि आजही त्याच फॉलो करायला मला जास्त आवडतं.

खरी श्रीमंती पैशात नाही तर माणसात आहे 
एखाद्या व्यक्तीची श्रीमंती मोजायची असेल तर ती,  त्याच्या बँक बॅलन्स वरून नाही , त्याचं घर किती मोठ आहे यावरून नाही तर, ती त्याच्या दाराशी किती चपला आहे यावरून मोजावी आणि हे मोजमाप अगदी शंभर टक्के योग्य उत्तर देते यात शंका नाही.

आमची ही वास्तू लहान असली तरी आमच्या घराबाहेर नेहमीच चपलांचा ढीग लागलेला असायचा [म्हणजेच अनेक माणसांची वर्दळ], तसा तो आजही असतोच पण गंमत अशी की तेव्हाच ते घर इतकं लहान असताना देखील सर्व लोकांची वर्दळ आमच्याकडे कायम असायची , चाळीतले इतर सर्व लोक नेहमी म्हणायचे हे घर नेहमी लोकांनी भरलेलं असतं,  हे ऐकून आणि बघून खूप समाधान वाटायचं..

आपलं जीवन घडायला जसे विविध संस्कार , रिती, रिवाज , परंपरा , समाज, आपले हितचिंतक आणि त्यांचे प्रेम कारणीभूत असतात तसेच आपण ज्या वास्तूत राहतो तिथल्या वातावरणाचे पडसाद देखील आपल्या जीवनात घडत असतात यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

काही लोक म्हणतात की अमुक एक वास्तू आम्हाला फलदायी नाही किंवा तमुक एक वास्तू आम्हाला खूप लकी ठरली पण माझ्या मतानुसार कोणतीच वास्तू अशुभ नसते 

या उलट ती वास्तू आणि तिकडचे वातावरण हे आपल्याच कृतीतून घडणाऱ्या ,  [बोलण्याने आणि वागण्याने] वायब्रेशनचे प्रतिबिंब असते आणि मग आपल्याला पण तसेच अनुभव येत राहतात.

आपल्या डोक्याखाली एक आसरा देणार छप्पर आहे मग ते कसे का असेना , तो त्या परमात्माचा आशीर्वाद रुपी हातच आहे  आणि त्याच्या छायेखाली मी,  माझे कुटुंबीय सुरक्षित आहोत , आनंदीत आहोत अशी भावना जर आपण आपल्या मनात निर्माण केली तर जगातली कोणतीच वास्तू आपल्याला अशुभ लाभणार नाही याची मला खात्री आहे.

अशा या माहीमच्या वास्तूने मला वयाच्या 32 वर्षापर्यंत भरपूर प्रेम दिले ,आईसारखी मायेची ऊब दिली…… बापासारखे कणखर उभे राहण्याचे सामर्थ्य दिले ….भावासारखे धैर्य राखून काम करण्याची उमेद दिली….आणि इतके मिळून सुद्धा खऱ्या अर्थाने तिला काही मनापासून धन्यवाद करू शकलो नाही.

मी मलेशियातून मुंबईला सुट्टीवर आल्यानंतर एकदा भेट देण्याचा योग आला होता , त्यावेळेस खरंतर पुन्हा एकदा त्या वास्तूच्या मिठीत जाऊन तिला घट्ट मिठी मारावी असं अगदी मनापासून वाटत होतं , पण तसं करणं शक्य झालं नाही कारण एक नवीन मालक त्या जागेवर आधीच आश्रयाला आला होता 

मला त्या घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्याला भेट देऊन , तिच्या उंबरठ्या रुपी चरणांवर  एकदा डोकं ठेवून आशीर्वाद घ्यायचा होता पण तो काही मला घेता आला नाही याची खंत आजही माझ्या मनाला कायम आहे.

तू तिकडे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जसे भरभरून दिले तसे मलाही देत आहेस , तुझा आशिर्वाद माझ्यासोबत कायम आहे यावर माझा विश्वास आहे

माहीमच्या त्या एका घरासोबतची माझी नाळ तुटली खरी पण त्याचबरोबर तू माझी नाळ इतर “दोन” नवीन घरांसोबत जोडून दिलीस. ही घरं आज आकाराने खूप मोठी असली , सर्व सुख सुविधांनी परिपूर्ण असली तरीही तुझ्या छायेची कमतरता मला नेहमीच जाणवते यात शंका नाही.

ही नवीन घरं , म्हणजे तुझीच नवीन रूप आहेत असं समजून हे सुख , हे ऐश्वर्य तू माझ्या झोळीत घातल आहेस आणि त्यासाठी मी तुझा खूप खूप आभारी आहे

या दोन्ही वास्तू कडून सुद्धा मला तुझ्या इतकेच प्रेम आणि आशीर्वाद मिळत राहतील अशी आशा करतो आणि जाता जाता एवढेच म्हणेन की जाणतेपणाने अजाणतेपणाने जर माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा कर , तुझे हे प्रेम , आशीर्वाद असंच कायम राहू दे ..इतकं लिहून मी माझं मनोगत इथेच संपवतो,  ते तुझ्यापर्यंत कोणा मार्फत तरी नक्की पोहोचेल अशी आशा करतो 

धन्यवाद

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED