तू ही रे माझा…. “मितवा” Tushar Karande द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तू ही रे माझा…. “मितवा”

नमस्कार मंडळी

आजच्या या ब्लॉगला खरंतर कशी आणि कुठून सुरुवात करू सुचत नाहीये , कारण ज्या नात्याविषयी आज मी बोलणार आहे त्याबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच आहे… या नात्याची सुरुवात नक्की कधी पासून झाली हे देखील मला ठीकस आठवत नाही ,  पण जितक आठवेल आणि जसं जमेल तसं सांगण्याचा मी प्रयत्न  करतो.

काळ  साधारण 1990-91  दशकातला ,  माझं वय साधारण सात ते आठ वर्ष ,  शाळेत जायला नुकतीच सुरुवात झाली होती,  कदाचित पहिली किंवा दुसरीत असेल .

माझी शाळा म्हणजे सर्वांच्या परिचयाची अर्थात बालमोहन विद्यामंदिर दादर शिवाजी पार्क ,  तिथून थोडसं पुढे गेलो की लगेच शिवसेना भवन आणि त्याच रस्त्याच्या पुढच्या गल्लीत एक सर्वतोपरी परिचित हॉस्पिटल म्हणजे धन्वंतरी 

या हॉस्पिटलचा उल्लेख करण्यामागे कारण असं की या हॉस्पिटलमध्ये आमचे साधारणपणे  दोन ते तीन , अगदी जवळचे नातेवाईक एडमिट होते… आणि त्यांना भेटायला म्हणून मी आणि माझे बाबा अधून मधून तिकडे जात असू. अर्थात माझं वय वर्ष बाराच्या आत असल्याकारणाने मला पेशंट वॉर्ड मध्ये जायला परवानगी मिळत नसे. मग बाबा मला बाहेरच एका बाकड्यावर बसवून स्वतः नातेवाईकांना भेटायला आतमध्ये जायचे.

मी बाहेर एकटाच बसलेलो असायचो……आजूबाजूला खूप शांतता असायची,  हॉस्पिटलच्या पुटपाथवर नजर  टाकली तर एक-दोन छोटी दुकान असायची हार फुलांची… आणि अधून मधून कधीतरी घंटेचा बारीकसा नाद कानी पडायचा…हे सर्व बघत आणि अनुभवत असताना मनाला कुठेतरी खूप शांतता वाटायची, आणि मग बाबा पेशंट वार्डामधून बाहेर आले की मी पुन्हा घरी जाण्याच्या मार्गावरअसे बऱ्याचदा घडले असेल… माझी बाबांची त्या हॉस्पिटलमध्ये बऱ्याचदा वारी घडत असे 

अशीच काही वर्षउलटल्यावर वयाच्या साधारण अकराव्या बाराव्या वर्षीचा  हा प्रसंग….  माझा एक वर्गमित्र , जो माझा वर्गमित्र पण होता आणि बिल्डिंग मध्ये राहत असल्याने सोसायटी मित्र सुद्धा..एप्रिल महिन्याची सुट्टी लागली होती म्हणून मी त्याच्या घरी खेळायला म्हणून गेलो होतो …खेळता खेळता अचानक त्याच्या आईने म्हणजेच काकूंनी मला प्रश्न केला (तुषार) त्या प्रेमाने मला तुतूड म्हणायच्या ,मला म्हणाल्या उद्या आम्ही सर्वजण एका ठिकाणी भंडाऱ्याला जाणार आहोत तू येणार का आमच्या सोबत?खर तर त्यावेळेस भंडारा म्हणजे काय हे मला अजिबातच माहीत नव्हते पण कुठेतरी फिरायला जायला मिळणार म्हणून.. मी घरी बाबांना विचारतो आणि कळवतो असं सांगितलं. बाबांनी पण लगेचच होकार दिला आणि उद्या कुठेतरी फिरायला जायला मिळणार म्हणून मीही मनमोहन सुखावलो काकूंना लगेच निरोप दिला,  हो काकू मी येतोय तुमच्यासोबत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता निघण्याचा आमचा निर्णय पक्का झाला.

ठरल्याप्रमाणे काकू, माझा मित्र अभिषेक, त्याची ताई ,त्याचे बाबा असे आम्ही पाच जण.. नऊ वाजता निघालो …बस मध्ये बसल्यावर काही कल्पना येईना की आम्ही कुठे जात आहोत आणि शेवटी आमचं ठरलेलं ठिकाण आल्यावर आम्ही बसमधून उतरलो. उतरल्यावर खरंतर मला जास्त काही अप्रूप वाटलंच नाही कारण आम्ही आमच्या नेहमीच्या शाळेच्या बस स्थानकावरच म्हणजेच नेहमीच्या एरियात येऊन पोहोचलो होतो.

माझी पिकनिकची एक्साईटमेंट आता जरा थंडावली… थोडं पुढे गेल्यावर काकूं त्याच हॉस्पिटल समोर येऊन थांबल्या जिथे पूर्वी मी आणि बाबा येत होतो, आणि म्हणाल्या चला चपला इकडेच काढा,आत जायचे आपल्याला.

मला इथे दुसरा आश्चर्याचा धक्का बसला की आपण फिरायला आणि नंतर कुठेतरी भंडाऱ्याला जाणार त्या ऐवजी काकू आपल्याला पुन्हा याच धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये का घेऊन आले असतील? त्यांचे नातेवाईक सुद्धा इथे भरती आहेत का काय? असा प्रश्न मी करणार इतक्यात…. हॉस्पिटलचा गेट आणि त्याची पायरी न चढता त्या आम्हाला त्याच गेटला लागून एक अगदी छोटासा निमुळता गेट जो सहसा कोणाला दिसणार नाही त्यामध्ये घेऊन गेल्या आणि चार-पाच पायऱ्या चढल्यावर आत गेल्यावर मी पूर्णपणे स्तब्ध झालो..

समोर पाहिलं तर साधारण आजोबा वाटतील या वयाचे एक गृहस्थ.. वयाने साठी –  65 गाठली असली तरी चेहरा मात्र एकदम तेजपुंज,  तेजस्वी , चेहऱ्यावरती स्मितहास्य , डोळे अगदी नितळ ,  खूपसे भाऊक आणि तितकेच बोलके..अशा व्यक्तीमत्त्वाचा एक भला मोठा फोटो माझ्यासमोर होता… त्यांना पाहताच मी त्यांच्या प्रेमात पडलो …  “ये बाळ तुझीच वाट बघत होतो” हे भाव त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होते … एक हरवलेली वासराची भेट तिच्या आईला भेटल्यावर होते किंवा एक छोटस नदीच पात्र शेवटी सागराला जाऊन मिळतं , तसे काहीसे भाव माझ्या मनात दाटून येत होते.त्यांची आणि माझी जन्मोजन्मीची साथ असावी , असा अनुभव मला त्याच क्षणी आला आणि त्यांच्या चरणांशी मी कायमचा रुजू झालो.

काय लक्षात येते का मी कोणाबद्दल बोलत आहे?  

ते अतुल तेजस्वी व्यक्तिमत्त्व दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात परब्रम्ह स्वरूप.. विश्वाचे अधिपती… ब्रम्हांडाचे नायक “श्री स्वामी समर्थ महाराज” यांचे होते.

स्वामी प्रकटदिनी या ठिकाणी म्हणजेच दादर मठात खूप मोठा भंडारा (प्रसाद) असतो तोच घेण्यासाठी आम्ही सर्वजण आलो होतो. भंडाऱ्याचा प्रसाद घेतला, स्वामींचे दर्शन घेतलं आणि आम्ही सर्वजण घरी आलो.त्या दिवशी खरं तर मी खूप आनंदात होतो , का कुणास ठाऊक पण आज मला माझे सर्वस्व भेटले , असं सारखं वाटत होतं पण वय लहान असल्याकारणाने माझ्या मनात हे सर्व काय चालू आहे आणि या नात्याला मी नेमक कोणतं नाव द्यावं हे काही मला कळत नव्हतं.

काही वर्षांपूर्वी मी त्या मठा जवळच्या, हॉस्पिटलच्या बाकड्यावर बसलेलो असताना… ती वाजणारी घंटा… ते दिसणारे हार पेढे वाले खरंतर त्याच वेळेस मला कुठेतरी संकेत देत होते की ये बाळा तुझी आणि माझी भेट घडायची आहे पण ते संकेत मला त्यावेळेस कळालेच नाही.  घंटेचा तो हळुवार आवाज ऐकल्यावर मनात यायचं कुणाचं बरं मंदिर असेल हे? एकदा जाऊन बघूया का पण त्यावेळेस तो योग काही आला नाही.. 

पण आमच्या भेटण्याचा हा योग आमच्या या काकूमुळे आला… त्यांनी मला त्या सद्गुरूंच्या चरणांची वाट दाखवली यासाठी मी त्यांचा जन्मभर ऋणी आहे 

स्वामींना पहिल्यांदा भेटल्यावर असं कधीच वाटलं नाही की मी यांना पहिल्यांदाच भेटत आहे असं वाटत होतं की त्यांचं आणि माझं नातं जन्मोजन्मीच आहे अर्थात मागच्या जन्मात कुठेतरी मी त्यांच्या चरणांशी जोडलेलं असणार म्हणून या जन्मी सुद्धा त्यांनी मला त्यांच्या चरणाजवळच येऊन थांबवलं हा माझा अतूट विश्वास आहे.

आपण मनात कितीही भेटायचे प्रयत्न केले, तरी स्वामी दरबारात शेवटी तोच येऊन पोहोचतो ज्याला स्वामी स्वतः बोलवतात या वाक्याचा अनुभव मी त्यादिवशी पहिल्यांदा आणि आजतागायत घेत आहे.

बरं ज्या लोकांना स्वामी विषयी जास्त माहिती नसेल तर थोडसं त्यांच्याविषयी 

श्री स्वामी समर्थ – अक्कलकोट महाराष्ट्र 

जन्मस्थान वडाचे झाड –  कुराडीचा घाव बसून वारूळ तुटण्याचे निमित्त आणि त्यांचे प्रकटीकरण..

पूर्ण दत्तअवतार आणि गुरुचरित्रात वर्णिल्याप्रमाणे..

त्पहिला अवतार –  श्रीपाद श्रीवल्लभ – पिठापुरम आंध्र प्रदेश  [  Year 1320 -1351]

Sripada Sri Vallabha – Wikipedia

दुसरा अवतार – श्री नृसिंह सरस्वती –  गाणगापूर [Year 1378-1459]

Narasimha Saraswati – Wikipedia

तिसरा अवतार –  श्री स्वामी समर्थ – अक्कलकोट [Year 1856 – 1878]

Swami Samarth – Wikipedia 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा ब्लॉग जर अध्यात्म आणि माझा विश्वास या विषयावर आहे तर हे “मितवा” प्रकरण काय आहे?

खरं तर माझी आणि स्वामींची जेव्हा पहिली भेट झाली त्यावेळेस मला खरंच कळत नव्हत की त्यांच्या आणि माझ्या नात्याला काय नाव द्यावं कारण माझ्यासाठी ते सर्वच होते आणि आजही आहेत. त्यांना मी माझे आई – वडील – मित्र गुरु या सर्व रूपात त्पाहतो.

आता या सर्व रूपांचं एकरूप जर काय असेल आणि जर त्याला काय नाव द्यायचं असेल तर माझ्यासाठी मितवा हेच नामकरण मला योग्य वाटतं

 मि – मित्र

 त –  तत्त्वज्ञ  (आई -वडील )

 वा – वाटाड्या  (अर्थात गुरु)

पहिल्या दोन नात्यांमध्ये [ मित्र/आई] ,  मी त्यांना अगदी हक्काने अरे/अगं अशीच हाक देतो …

पण तिसऱ्या रूपात पाहताना [गुरु] ते माझ्यासाठी एक मार्गदर्शक आणि शिक्षक म्हणून आहेत आणि म्हणूनच त्यांना मी अहो अशी हाक देतो…ही तीनही नाती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत आणि स्वामींना पण ती नक्कीच मान्य असतील असा विश्वास करतो.

मी , माझ्या स्वामीना अशा तीन विविध रूपांमध्ये बघितल्यावर ,  माझी भूमिका ही काहीशी बदलत जाते 

ती कशी तर,

आयुष्यात काही हट्ट पुरवून घ्यायचे असतील तर मी त्यांना आई स्वरूपात बघून ते सर्व हट्ट त्यांच्याकडे करत बसतो..

कधी कोणत्या गोष्टींच दुःख झालं , मनोबल खचल्यासारखं झालं असेल तर त्यांच्याशी एक वडील आणि मित्र म्हणून गप्पा मारतो , माझ् मन त्यांच्यापुढे मोकळ करतो… 

आणि जीवनाची अमूल तत्त्व जाणण्यासाठी …. ज्याचे शिक्षण आपल्याला कोणत्याही पुस्तक किंवा विद्यापीठात शिकवले जात नाही अशी शिकवण एक गुरु म्हणून मी त्यांच्याकडून आणि त्यांनी केलेल्या उपदेशातून , त्यांच्या विविध ग्रंथातून घेत राहण्याचा प्रयत्न करतो. 
आता ज्या ज्या रूपात मी त्यांना बघतो  किंवा हाक देतो त्या त्या स्वरूपात ते सुद्धा माझ्या हाकेला नेहमी प्रतिसाद देतात 

जसे की..

आई म्हटल्यावर… मी कितीही हट्ट केले तरी माझ्यासाठी जे योग्य असेल तेच मला ते देत राहतात आणि आश्चर्य म्हणजे मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या गोष्टींचा हट्ट त्यांच्याकडे करतो त्या त्या वेळेस माझ्या सर्व चांगल्या इच्छांसाठी , माझ्या अपेक्षेपेक्षा मोठे दान माझ्या झोळीत ते पाडत असतात.. 


वडील आणि मित्र म्हटल्यावर,  माझ्या दुःखाच्या वेळी, काही अडचणीच्या वेळी नेहमी कोणत्या ना कोणत्या रूपात तरी धावून येतात आणि माझ्या नकळत मदतीचा हात माझ्यापर्यंत पोहोचवतात अनेकदा काही ओळख नसताना ,संकटकाळी खरे मित्र जसे धावून येतात अशी अनेक स्वामी रूप माणसं माझ्या आयुष्यात आली आहेत आणि माझ्यावरच संकट नेहमीच दूर झाल आहे, त्यावेळी जाणवतं की माझे स्वामी एक मित्र म्हणून आणि एक वडील म्हणून माझ्यासोबत कायम उभे आहेत


तिसर नातं अर्थात गुरु शिष्याचं – हे नातं थोडं कडक आणि शिस्तीचे राहत, कारण गुरु शिष्य या नात्यांमध्ये गुरूकडून कोणतीही शिकवण घेण्याआधी आपली स्वतःचि ,तेवढी पात्रता असण गरजेचं असतं , आणि अशी पात्रता निर्माण होण्यासाठी श्रद्धा , अतुट विश्वास , प्रयत्नांची पराकाष्ठा आणि संयम या गोष्टीची सांगड एका शिष्यला घालावीच लागते. आपल्या कळत नकळत आपले गुरु आपली परीक्षा घेत असतात त्या सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण होत होत पुढची वाटचाल शक्य असते त्यामुळे त्यांनी घेतलेल्या प्रत्येक परीक्षेमध्ये निष्ठेने ,संयम राखून, त्याला पार पाडण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत असतो.प्रत्येक घटना आपल्या आयुष्यात आपल्याला काहीतरी बोध घेण्यासाठीच घडत असते आणि तो बोध काय आहे हे शिकण्याचा मी आटोकाट प्रयत्न करत असतो.
गुरु म्हणून जेव्हा स्वामी परीक्षा घेत असतात त्यावेळेस एक गोष्ट नक्की माहीत असते की माझे गुरु, माझे  स्वामी मला कधीच एकटे टाकीत नाहीत . जोपर्यंत मी ते संकट ,  ती परीक्षा पूर्णपणे पार पाडत  नाही तोपर्यंत पदोपदी ते माझ्यासोबत कोणत्या ना कोणत्या रूपात कायम असतात आणि मला मार्गदर्शन करत असतात.

मी दहा वेळा पडेल पण पुन्हा उठण्याची ताकद तेच मला देत असतात,  त्यांच मार्गदर्शन आणि माझी चिकाटी या जोरावर जीवनातली अनेक स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनीच मला प्रेरणा दिली,  सहाय्य केलं आणि अजूनही माझ्या पाठीशी उभे आहेत ,  यावर माझा पूर्ण विश्वास आहे. 

आपल्याला मिळालेला हा मनुष्यजन्म काहीतरी  सत्कर्म करण्यासाठीच दिला गेला आहे,  काहीतरी  महत्त्वाचे , समाज उपयोगी कार्य माझ्या वाट्याला निवडून दिले आहे आणि ते मला पूर्ण करायचे आहे , त्यामुळे प्रपंचात राहून कौटुंबिक जबाबदारी पार पाडता पाडता, फक्त स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा विचार न करता आपण या समाजाचे सुद्धा काही देणं लागतो आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी केलं पाहिजे या सत्याची जाणीव त्यांनीच मला करून दिली. 

माझ्या स्वामींचा हात पकडून जीवनमयी प्रवास जगत असताना जीवनाचे काही अमूल्य धडे मला वेळोवेळी शिकता आले..

जसे की,

1.माझ्यातला मीपणा –  सोडला तर जगात सर्व काही मिळवणं सोपं होऊन जातं पण हा मी पणा आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांकडून सुटणं फार कठीण… या मीपणामुळे माणसाच अस्तित्व कधी कधी नष्ट होतं पण त्याची जाणीव त्याला शेवटपर्यंत होत नाही ,  असा हा मी पणा सोडण्याचा माझा प्रयत्न मी कायम चालू ठेवला आहे 

2.करता करविता तोचि एक समर्थ –  कोणतेही सत्कर्म जर आपल्या हातून किंवा कृतीतून घडत असेल तर ते मी केलं असं न मानता हे करणारा आणि करून घेणारा कोणी दुसराच आहे याची भावना निर्माण करणे.

घडत असलेल्या सर्व गोष्टीला आपण फक्त निमित्त मात्र आहोत ही भावना ठेवून चांगलं काम करत राहणं याचा मी काटोकाठ प्रयत्न करतो. पुण्य कर्म असे करावे जे उजव्या हाताने केले असता डाव्या हाताला सुद्धा ते कळता कामा नये अर्थात कोणताही गाजावाजा किंवा बडेजाव जगासमोर न मांडता, आपण आपले चांगले कर्म अगदी शांततेत करावे असे मला मनापासून वाटते 

3.मी स्वामी भक्त आहे असे बोलून जगात मिरवणे हे तर स्वामींना अजिबात मान्य नाही कारण त्यांच्यापुढे ,  त्यांच्या दरबारात सर्व माणसे सारखीच.  त्यामुळे आपण करत असलेली सेवा किंवा भक्ती ही नेहमीच आपल्या पुरती मर्यादित आणि गुप्त ठेवणे मी पसंत करतो 

4.क्षमाशील राहणे –  आपल्याकडून झालेल्या चुका आणि त्याची माफी मागण्यास कधीच कमीपणा न वाटणे. मग ते वयाने लहान असो किंवा मोठे.तसेच इतरांनाही त्यांच्याकडून झालेला चुकांची माफी त्यांना देणे , याच्या प्रयत्नात मी कायम असतो.खरंतर क्षमाशीलतेने आपल्या अनेक गत्त जन्माची पापे पुसून काढण्यास आपल्याला मदत होत असते.

5.स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व चांगल्या वाईट घटनांना आपण स्वतः आणि आपले कर्म कारणीभूत असते बाकी दुसरे कोणीही नाही त्यामुळे कोणत्याही वाईट घटनांचा दोष दुसऱ्यांवर लावणे किंवा इतरांना जबाबदार धरणे मी कटाक्षाने पाळतो 

6.कृतज्ञ राहणे – रोज सकाळी मी जर सूर्यनारायणाच दर्शन करू शकत असेल तर त्यामागे काहीतरी कारण आहे आपले ध्येय अजून पूर्ण झाले नाही, आपल्याला निवडून दिलेले कार्य अजून पूर्ण झालेले नाही आणि ते पूर्ण करण्यासाठीच , त्याकडे एक पाऊल पुढे येण्यासाठी मला आजचा हा नवीन दिवस परमेश्वराने बहाल केला आहे त्त्यासाठी कृतज्ञ राहणे आणि आपल्या ध्येयाचा वाटचालीसाठी रोज एक नवा प्रयत्न करणे हे मी पाळतो

7.शेअरिंग इज केरिंग –  गरजेपेक्षा जर कोणती गोष्ट माझ्या जीवनात जास्त असेल किंवा माझ्या गरजा पूर्ण झाल्यावर देखील माझ्या जीवनात अजून बरच काही शिल्लक राहत असेल तर ते इतरांसोबत शेअर करणे , त्या सर्व गोष्टींचा अनुभव  आणि आनंद इतरांना देणे . ते दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जे सुख आणि आनंद मिळतो तोच आनंद खरंतर स्वामीना अपेक्षित असणार या जाणीवतेतून शक्य तितक्या गरजू लोकांना ,  जमेल  इतक सहाय्य करण मला नेहमीच आवडत.

आयुष्याच्या अंतकाळी कितीही भौतिक सुख आपल्या पदराशी असली तरी ती सर्व या भूतलावरच ठेवावी लागतात जाताना फक्त आणि फक्त आपले कर्मच आपल्या सोबत आपण घेऊन जात असतो , ज्याचा हिशोब तिकडे वरती  होऊन आपल्याला आपल्या पुढच्या जन्मीची वाटचाल कशी असणार याचा निकाल लागणार असतो , त्यामुळे जीवनातील  कोणत्याही भौतिक सुखाला कायम चिकटून न राहता ते कधीतरी नष्ट होणारच याची जाणीव ठेवून मिळत असलेला प्रत्येक क्षण पुरेपूर जगण्याचा मी प्रयत्न करतो.

असा हा माझा मितवा 

फोटो फ्रेम मध्ये पाहिलेल्या त्या रूपाला जरी मी प्रत्यक्षात भेटलो नसलो तरी अनेक विविध रूपांमध्ये त्यांची माझी भेट कायम होत असते , त्याची सोबत माझ्यासोबत कायम असते  आणि म्हणूनच त्यासाठी मी त्यांचा कायम ऋणी आहे.

आज पुन्हा एकदा, एक छोट बाळ म्हणून, जर काही हट्ट करायचा असेल तर हाच करीन की त्यांच्या चरणांशी , त्यांच्या मायेच्या छत्रखाली मला कायम राहता यावा… या जन्मी आणि पुढच्या अनेक जन्मांमध्ये त्यांची माझी साथ अशीच कायम रहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” त्यांचे हे वचन आणि त्याची प्रचिती, जगातल्या लाखो लोकांना आजही येत  असते…या प्रचितीचा अनुभव मी सुद्धा अनेकदा घेतला आहे..ते सर्व अनुभव जर मी आज इथे मांडत बसलो तर एक ग्रंथच लिहावा लागेल यात शंका नाही.. …

तुम्ही देखील तुमच्या जीवनातली सर्व काळजी, चिंता, भय त्यांच्या चरणांवर सोपवून त्यांना मितवा या नात्याने एकदा हाक द्या तुम्हाला प्रतिसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मला आहे.

II श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ II

धन्यवाद 

Tushar K