नमस्कार मंडळी.
तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तीळगुळाचे दोन लाडू हातावर ठेवून शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणारा बंटी सायंकाळी येऊन जातो न जातो तोच त्याच्यापाठोपाठ त्याचा मोठा भाऊ बबली दुसरे लाडू घेऊन तीच शुभेच्छा देण्यासाठी येऊन गेला.
मकर संक्रांतीच औचित्य साधून जवळपास सोसायटीतले सर्वजण एकमेकांना भेटून अशा शुभेच्छा देण्यात मग्न होते. मी ही अगदी त्याच उत्साहाने जे लोक भेटतील त्यांना मनापासून शुभेच्छा देऊन हा शेजारधर्म असाच जपून ठेवू या, अशी अपेक्षा वजा शुभेच्छा सर्वानाच देत होतो. दिवस अगदी मजेत गेला.तिळाचे लाडू खाऊन तोंड इतके गोड झाले होते की पुढचे दोन दिवस बिन साखरेचा चहा जरी घेतला असता तरी तो मला कडू लागला नसता यात नवल नाही…
असो…..दुसर्या दिवशी कामाला जाण्यासाठी आवराआवर करत असताना कानावर काही विचित्र आवाज येऊ लागले.काहीसे मोठ्याने बोलण्याचे , दरवाजे जोर जोरात आपटण्याचे , मध्येच कुणीतरी रडण्याचे….प्रकरण काय आहे हे पाहण्यासाठी चटकन दरवाजा उघडून आजूबाजूला डोकावल…तर तोच आवाज अजून प्रकर्षाने जाणवू लागला….त्याचा मागोवा आता घेतलाच पाहिजे म्हणून आणखी जरा चार पावलं पुढ गेलो…..मग लक्षात आलं हा मोठा आवाज म्हणजे सर्वसामान्य भाषेत आपण त्याला भांडण असं म्हणतो … असा आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून बंटी आणि बबली यांच्या घरातून येत होता.हे दोन्ही भाउ कोणत्या तरी कारणावरून एकमेकांशी भांडत होते. खरतर त्या दोन भावांच्या भांडणाच्या मुळाशी जाण्याचा किंवा त्याची उत्पत्ति का झाली याची शहानिशा करण्याचा मला काहीच अधिकार नव्हता.कारण हा त्यांचा वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रश्न होता. पण त्याच्या अशा वागण्याचा त्रास इतर शेजार्यांना होतोय , याची जाणीव करून देण्यासाठी मी हलकीशी थाप दारावर मारली , आणि “जरा हळू बोला” या वाक्याची ग्वाही देऊन मी माझ्या घरी परतलो , आणि पुढच्या कामाला लागलो.
तो दिवस कामाच्या रगाडय़ात कसा निघून गेला समजलच नाही. आणि नेहमीप्रमाणे संध्याकाळी 7:00 वाजण्याच्या सुमारास मी घरी आलो. नुकताच फ्रेश होऊन कंबर टेकणार इतक्यात दारावरची बेल वाजली. दार उघडून बघितल तर तो बंटी होता. [बबलीचा छोटा भाउ ] .चेहरा अजूनही हिरमुसलेला. नजर भीडवण्याची ताकद नसल्याने खाली जमिनीकडे बघत तो हळू आवाजात म्हणाला…..तुषारभाई आत येऊ का ?
सकाळी घडलेल्या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन मीही त्याला पटकन घरात घेतल. तो खुर्चीत बसला , आणि मी पुढे काही बोलण्याच्या आधीच तो “सॉरी” म्हणाला. मी विचारलं कशाबद्दल?
तर लगेच उत्तरला सकाळी आमच्या घरात भांडण होत असल्याच्या त्रास मला आणि इतर शेजार्यांना झाला याबद्दल.
मीही तो विषय जास्त गांभीर्याने न घेता “इट्स ओके”:…. घरोघरी असं होतच असतं. असं म्हणून विषयांची सांगता केली.
पण बंटीच्या वागण्यातून असं दिसत होतं की त्याला काही तरी सांगायचं आहे. शेअर करायचा आहे.आणि ते कदाचित माझ्यासोबतच… माझा अंदाज खरा ठरण्याआधीच… भाई तुझ्याशी थोड बोलायचं आहे हे वाक्य त्याच्याकडून आलंच.
बोलल्यामुळे तुला जर हलक वाटणार असेल तर बोल , असं बोलून मी त्याचं सांत्वन करण्याचा हेतु व्यक्त केला.
साधारण 1 तास.14 मिनिटे. तो माझ्याशी बोलत राहिला , सर्व सांगून झाल्यावर त्याने एक मोठा पॉज घेतला….आणि या पॉज नंतर मला त्याने एक प्रश्न केला….म्हणाला…भाई आता तूच सांग या सर्व प्रकरणात…..
“माझं काय चुकलं”??
या प्रश्नाने मी थोडा बिचकलो.कारण खरेतर त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी कोणी न्यायाधीश नव्हतो की कोणी सायकोलॉजिकल काउन्सिलर? पण त्याला उत्तराची अपेक्षा असल्या कारणानं , तुझ्या घरच्यांशी बोल , वडीलधाऱ्या माणसांचा सल्ला घे इतकंच बोलू शकलो. त्याला पडलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर देणारा मि तो नवे , याची जाणीव कदाचित त्त्यालाही झाली आणि माझा निरोप घेऊन तो त्याच्या घरी परतला.
खरं सांगायचं तर या दोन भावांच्या भांडणाच्या मुळाशी मला जि कारणे दिसत होती ती अगदी कॉमन होती….ते म्हणजे प्रत्येक घरा घरात असलेले प्रॉपर्टी रिलेटेड वाद….एकमेकांनी केलेले त्याग आणि त्यांची त्यावर झालेली कित्तेक पारायण…. आणि आपल्या हक्कासाठी केलेली मागणी जी सर्वानुमते कदाचित मान्य नसावी….असे सर्वांना परिचित असणारे घरगुती वाद थोड्याबहुत प्रमाणात सर्वांच्याच घरात असतात. यात काही नवीन नाही. पण मला आश्चर्य आणि अप्रूप वाटत होते ते या गोष्टीचे की , मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोड गोड बोला… एकमेकांच्या गळ्यात गळे घालून प्रेम व्यक्त करणारी ही भावा भावांची जोडी आज अचानक दुसऱ्या दिवशी या स्तरावर येऊन पोहोचावी?? हे परस्पर विरुद्ध अनुभव बघून मी थोडासा चक्रावलो.. विचारात पडलो , यापैकी खरे बंटी – बबली कोण? कालचे की आजचे.? हा सर्व गोंधळ मनामध्ये थैमान घालत होता…पण त्यापेक्षा एक मोठा यक्ष प्रश्न जो बंटी मला करून गेला तो मनाला जास्त हेलावून टाकणारा होता आणि तो म्हणजे –“माझं काय चुकलं”??
खरं पाहता…त्या एका यक्षप्रश्नाने बंटी जसा आज द्विधाअवस्थेत होता अशीच अवस्था माझीही या आधी बर्याचदा झाली होती. आजही होते…..किंवा तुम्हां सर्वांच्या आयुष्यात हा प्रश्न तुम्हालाही कधी ना कधीतरी नक्कीच पडून गेला असेल यात शंका नाही.
कारण…. सिच्युएशन वेगळी असतील कदाचित….पण “माझं काय चुकलं”? या प्रश्नाचा सामोरा आपल्याला कधी ना कधी तरी करावाच लागतो. हे मात्र नक्की.
असं कधी होत असेल बर??
जेव्हा आपल्याला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळत नाहीत. आणि कोणत्या तरी वाईट प्रसंगाची त्शिक्षा आपण भोगत असतो.
कदाचित तेव्हा…..जेव्हा आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्या अपेक्षेप्रमाणे नसतील किंवा त्या साचात बसलेली नसतील.आणि आलेल्या वाइट प्रसंगाचा भुर्दंड आपल्याला भोगावा लागला असेल.
जेव्हा लोकांना आपण केलेल्या चुकांचे रियलायजेशन होतच नसेल किंवा त्यांना ते करून घ्यायचे नसेल अशा वेळेस माझं काय चुकलं असा उलटा प्रश्न समोरच्या व्यक्तीला करून त्याचं ओझं दुसर्याच्या माथी मारून रिकामी होणारी लोक जेव्हा भेटतात, तेव्हा कदाचित….
बर्याचदा असं होतं की , आपल्याला जे दिसते त्यावरच आपण पूर्ण विश्वास ठेवतो. त्यामुळे चांगलं कोण आणि वाईट कोण याची शहानिशा करण्यात आपली गल्लत होते. आणि मग आपण न केलेल्या गोष्टीचा भुर्दंड आपल्या माथी येतो.
जीवनाच्या वाटेवर अशा अनेक गोष्टींचा अनुभव झोळीत भरत असताना मी बरंच काही शिकत आलो.आजही शिकतो आहे. आपल्या सभोवताली असणार्या माणसांना वाचण्याचा प्रयत्न अजून चालू आहे…..त्यामुळे असा प्रश्न जेव्हा माझ्या दैनंदिन जीवनात येतो , तेव्हा त्याच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन काहीसा वेगळा होऊन जातो.. आणि मग काही उत्तर अशीही उलगडत जातात….
बर्याच वेळा घडलेल्या प्रसंगामध्ये कोणीही एक व्यक्ती अगदीच चुकीचा नसतो किंवा कुणी एक पूर्णपणे बरोबर नसतो दोन्ही व्यक्ती त्यांच्या परीने त्यांच्या जागेवर योग्य असतात , फरक फक्त इतकाच की आपण कोणत्या अँगलने कोणाकडे पाहतो आहे?
100 पैकी 80 टक्के पडलेल्या प्रश्नांची उत्तर ही आपल्यातच दडलेली असतात. पण ती शोधण्याचा प्रयत्न आपण बाहेरच्या जगात करत असतो.आणि ती मिळाली नाही मग निराश होऊन बसतो. थोडस अंतर्मुख होऊन शांत राहून जर आपण आपल्या अंतर्मनात डोकावलो तर याचे उत्तर आपल्याला सहज मिळत. पण तसं करण्याची आपल्याला सवय नसते किंवा तयारीही….
व्यक्ती तितक्या प्रकृती…या उक्तीप्रमाणे प्रत्येकाची समज , आकलन आणि शहानिशा करण्याची पद्धत निराळी असते. त्यामुळे साहजिकच प्रत्येकाची चांगल्या वाईट गोष्टीबद्दलची व्याख्या , संकल्पना आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोण हा वेगवेगळा होऊन जातो.
या सर्व प्रश्नांचं काहूर मनामध्ये चालू असताना या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न , माझा मीच केला.आणि एक सर्वसाधारण उत्तर माझ्याच अंतर्मनातून मला दिलं गेलं. ते उत्तर म्हणजे आपण केलेली अपेक्षा.
आता ते कसं बरं?
कोणतीही गोष्ट करताना मग ती कोणासाठीही असो , ती करताना त्याच्या परताव्यात काही गोष्टीची अपेक्षा आपण करतो. फक्त आई वडील या दोन व्यक्तिरेखा सोडल्या तर आयुष्यात निभावली जाणारी प्रत्येक नाती ही या अपेक्षाच्या बंधनात गुरफटलेली असतात….आणि मग जेव्हा आपल्या किंवा दुसर्यांच्या, त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर मग माणूस नावाचा प्राणी या एका प्रश्नावर येऊन पोहोचतो… “माझं काय चुकलं”?? मी कुठे कमी पडलो?
याच प्रश्नाला जर थोडस वेगळ्या दृष्टीने म्हणजे स्पिरिच्युअलिटी या कोनातून बघितल तर एक उत्तर असेही मिळतं की… प्रत्येक मनुष्य जेव्हा कठीण प्रसंगात वा संकटात असतो…..आणि त्याला सर्व प्रयत्नांती जर यश येत नसेल , त्यामागची कारणं उलगडत नसतील , तेव्हा असे समजावें कीं हे आपल्या मागील कुठल्यातरी जन्माचे प्रारब्ध या जन्मात भोगतो आहे. त्या प्रारब्धाचा हिशोब कदाचित आधीच्या जन्मामध्ये पूर्ण झालेला नसतो आणि म्हणूनच तो पूर्ण करण्यासाठी आपली कोणतीही चुकी नसताना … आपण कुठलेही दुष्कृत्य किंवा पाप कर्म केलेले नसताना , काहीशी अनपेक्षित दुख/त्रास आपल्या वाट्याला येत असतात.आणि तेव्हाही आपल्याला हा प्रश्न पडतो कि…माझं काय चुकलं?
असा हा एक प्रश्न कधी तुम्हाला पडला आणि त्यातून स्वतःला कसं सावरायचं त्याच उत्तर जर तुम्हाला शोधायचे असेल तर खाली दिलेले छोटे उपाय तुम्ही नक्की करून बघा.
आणि हो– विशेष टिप्पणी म्हणजे हे सर्व उपाय माझ्या स्वतःच्या अनुभवाचे बोल आहेत. कदाचित तुमच्या मनातून काही वेगळी उत्तरही येतील.फक्त त्याचा सर्वतोपरी विचार करा आणि त्याचा फायदा जर तुम्हाला होत असेल तर त्या नक्की आत्मसात करा.
अपेक्षा करणं बंद करा.तुम्ही जेव्हा कोणासाठी काहीही चांगल कराल तेव्हा समोरचा व्यक्तीसुद्धा तुमच्यासाठी तेवढंच करेल किंवा त्याने ते करावं अशी अपेक्षा अजिबात ठेवू नका.
आपल्या बोलण्यात आणि विचारात एकसूत्रीपणा आणि पारदर्शकता कायम ठेवा. म्हणजे जे तुमच्या मनात असेल तेच ठामपणे बोलण्याचा प्रयत्न करा. [ मनात एक आणि ओठात दुसरेच असे वागू नका.] अशाने तुमच्याबद्दलचे कोणतेही गैरसमज इतरांना होण्यास वाव मिळणार् नाही.
तुम्ही जर दुखात असाल, संकटात असाल तर स्वतःला , माझं काय चुकलं?… हा प्रश्न वारंवार करण्याऐवजी “मी काय शिकलो” असा करा.जीवनात आलेली प्रत्येक संकट आणि दुःख हे आपल्याला काहीतरी शिकवण देण्यासाठी आलेली असतात.म्हणून आज असलेल्या परिस्थितीतून मला काय धडा शिकला पाहिजे याचा शांतपणे विचार करा.जेव्हा ती गोष्ट तुमच्या लक्षात येईल त्यानंतर ती सर्व दुःख, संकट तुमचापासून दूर जायला लागतील.
कोणताही वाद घडत असताना समोरचा व्यक्तीअसा का बोलतो? हे स्वतःला त्याच्या जागेवर ठेवून बघा आणि मग त्या वादला प्रत्युत्तर द्या. अर्थात हे प्रतिउत्तर जमेल तितक्या सौम्य आणि साध्या भाषेत असाव. कारण आवाजाची पातळी आणि शब्दांची परिसीमा तुम्हीदेखील ओलांडली तर ती व्यक्ती आणि तुमच्यत काहीच फरक राहणार नाही.
प्रत्येक वेळी आणि प्रत्येक बाबतीत सर्वांना त्या प्रसंगांचे जस्टिफिकेशन देत बसू नका. कारण जी तुमची जवळची माणसे आहेत ते तुमच्याकडून त्याची अपेक्षा करणार नाहीत….आणि त्याउलट चुकीच्या माणसांसमोर कितीही बोलत राहिलात ..तरी त्या गोष्टी त्त्यांना पटणार नाहीत…
तुमच्या उपस्थितीमुळे जर एखाद्या व्यक्तीचा किंवा ग्रुपचा मूड अचानक बदलत असेल [नकारार्थी.] तर समजून जा , तुमची उपस्थिती त्यांना अपेक्षित नाही…अशा लोकांसमोरआणि समुदायासमोर जाणे टाळा.
निंदकाचे घर असावे शेजारी अशी आपल्याकडे एक म्हण आहे. तुमची जेव्हा चांगली प्रगती होत असते त्यावेळेस 10 पैकी सहाजण हे नक्कीच तुमच्या विरोधात किंवा तुमचा पाय खाली खेचण्याच्या प्रयत्नात असतात….पण अशा निंदकांना पूर्णपणे दुर्लक्ष करून तुम्ही करत असलेली वाटचाल कायमठेवा.
ज्या गोष्टी आपल्या हातात नाही किंवा त्याचे उत्तर आपल्याकडे नाही , त्याला प्रारब्धाचा भोग म्हणून पूर्णपणे स्वीकार करा.आणि असे प्रारब्ध लवकर संपुष्टात यावे यासाठी परमेश्वराची फक्त प्रार्थना करा. या विषयामध्ये जर तुम्हालाआणखीन खोलवर जाण्याची इच्छा असेल तर योग्य आणि अनुभवीत अशा मार्गदर्शकांकडून आपलं “पास्ट लाइफ रिग्रेशन” किंवा “इनर चाइल्ड हीलिंग” नक्की करून घ्या. अशा माध्यमातून तुम्हाला , तुमच्याकडून झालेल्या मागील अनेक जन्माच्या , अनेक चुका नक्कीच निदर्शनास येतील आणि त्या सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही या जन्मी नक्की करा.
कर्म की भट्टी में सबको जलना पड़ता है , हा संदेश तर आपल्या साईबाबानी सुद्धा संपूर्ण जगाला दिला आहे. त्यामुळे आपल्याकडून झालेल्या [कळत किंवा नकळत] सर्व पापांचे पडसाद म्हणजे आपल्या आयुष्यात आलेल्या या सर्व दु,खद/कष्टप्रत घटना आहेत, या सत्याचा स्वीकार करून आपल्या प्रत्येक दु खाला आपण स्वतः कारणीभूत आहोत , अजून दुसरे कोणीही नाही याची गाठ मनाशी बांधून घ्या.अशाने आपल्याकडून झालेल्या चुकांचे खापर दुसर्याच्या माथी फोडण्याचा वृत्तीतून आपण नक्कीच बाहेर येऊ , आणि मग “माझं काय चुकलं”?? असा प्रश्न आपल्याला पडणे नक्कीच बंद होईल.
संसारातले कोणतेही नातं जर तुम्हाला कायम टिकवून ठेवायचं असेल मग ते कोणतेही असो, “नमतेपणा” घ्यायला शिका.त्या व्यक्तीला चांगल्या वाईट सर्व गुणांसह आपलेसे करा.आणि तुम्ही घेतलेला नमतेपणा ही तुमची शरणागती नसून ते नातं टिकवण्यासाठी तुम्ही केलेला एक प्रयत्न आहे असं समजा.
क्षमाशील रहा….तुमच्याकडून झालेल्या अपराधांची माफी मागायला अजिबात लाजू नका आणि ज्यांनी तुम्हाला दुखावल आहे त्यांनाही मोठ्या मनाने माफ करा.
पुढचा मनुष्यजन्म आपल्याला कधी मिळेल आणि तो कसा असेल याचे उत्तर आपणा कुणालाच माहीत नाही.आणि म्हणूनच आता मिळालेल्या या मनुष्य योनीला आपल्या सु-स्वभावाने सत्कारणी लावा , हीच शुभेच्छा.
धन्यवाद.