He and…..that one power in him books and stories free download online pdf in Marathi

तो आणि…..त्याच्यातली ती एक शक्ती

नमस्कार मंडळी

कुछ पाने के लिए हमे बहुत कुछ  खोना पडता है….. या वाक्याचा अर्थ आणि अनुभव आम्ही गेली सात वर्ष पदोपदी घेत आहोत कारण… 

कामानिमित्त परदेशात असल्याकारणाने आम्ही आमच्या मायदेशाला आणि आमच्या कुटुंबीयांना नेहमीच मिस करत असतो,  त्यामध्ये सगळेच येतात, आई, बाबा, भाऊ , बहीण, दादा , वहिनी आणि इतर मित्र मंडळी सुद्धा… पण का कुणास ठाऊक गेले काही दिवस माझ्या मनामध्ये एका व्यक्तीची सारखी आठवण येत होती.

 खरंतर या व्यक्तीला आम्ही एकदाच भेटलोय ,  पुन्हा कधी भेटू ,  माहित नाही पण त्या एका भेटीतच त्या व्यक्तीने माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या मनामध्ये जे काही कायमचं घर केलेलं आहे ते नक्कीच कधीही पुसल जाणार नाही म्हणूनच अशा व्यक्तीची आठवण आज या कागदावर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय.

 त्या व्यक्तीची आणि आमची आठवण म्हणजे अलीकडचीच, कोरोनाची दोन वर्षे गेली त्या दरम्यान, तो महिना म्हणजेच साधारण ऑक्टोबर 2020 मधला. १७ सप्टेंबर 2020 ला माझा मुलगा तीर्थ  याचा जन्म झाला आणि माझ आयुष्य पुन्हा एकदा 360 डिग्री च्या अंशाने बदलावं इतकं बदलून गेलं.

खरंतर खूप मोठा आनंदाचा तो दिवस ,  तब्बल सात वर्षानंतर आमच्या आयुष्यात स्वामी प्रसाद रुपी तीर्थ आला आणि माझी आणि माझ्या कुटुंबीयांची जीवनशैली अगदी बदलून गेली.

माणसाचं आयुष्य लग्नानंतर बदलत याचा अनुभव घेत असतानाच , आपल्याला एक बाळ झाल्यावर ते कित्येक पटीने अजून बदलत याचा अनुभव घ्यायला माझी आणि माझ्या पत्नीची नुकतीच सुरुवात झाली होती , त्यात कोरोना आणि लॉकडाऊन ची भर … 

खूप काटेकोरपणे आम्हाला तीर्थची काळजी घ्यावी लागत होती ,  दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करत असताना दिवस अगदी वाऱ्यासारखे पटापट धावत होते.

अशाच एका शनिवारी  दुपारच्या वेळी,  अचानक  दारावरची बेल वाजली,  अर्थात कोरोना असल्याकारणाने कोणालाही घरात घेण्याआधी किंवा कोणतही सामान घरात घेण्याआधीआपल्याला खूप दक्षता घ्यावी लागत होती,  म्हणून दरवाजावर कोण आहे हे पाहण्यासाठी मी हळूच दरवाजा उघडला.

चेहऱ्यावर मास्क घातल्या कारणाने समोर नक्की कोण आहे याचा मला अंदाज येईना .कुटुंबातले किंवा इतर कोणी नातेवाईक नाहीत याची खात्री पटली , पण भर दुपारी उन्हात आलेली व्यक्ती कोण असावी आणि ती नक्की योग्य त्या पत्त्यावर आली आहे का हे विचारण्यासाठी मी प्रश्न केला..

कोण आपण? आणि आपल्याला कोण हव आहे?

साधारणपणे सहा फूट उंच,…मध्यम बांधा…. निळ्या कलरची जीन्स आणि पांढऱ्या कलरचा टी-शर्ट घातलेली एक व्यक्ती…

चेहऱ्यावरच्या मास्कच्या पडद्याआड भारदस्त आवाजात बोलू लागली… 

दादा तुला मुलगा झाला ना यासाठी त्याला आशीर्वाद द्यायला मी आलो आहे ..

मला अजूनही कळेना समोर असलेली व्यक्ती नक्की कोण आहे…  त्याने केलेल्या पेहरावावरून नक्कीच जाणवलं की ती कोणी साधुसंत नाही किंवा फकीर बाबा नाही … मी आणखीन काही विचारणार इतक्यात आमच्या सौभाग्यवती किचनमधून आल्या आणि तिने त्याला चटकन ओळखले 

माझी पत्नी म्हणाली तुम्ही आहात… ठीक आहे…. बाळ आता झोपले आहे तुम्ही मंगळवारी या तुम्हाला तुमचा शगुन आणि मानपान नक्की दिला जाईल..

बर ताई मंगळवारी येतो… पण किती जण येऊ? मी एकटाच की आमची तीन-चार जणांची टीम आहे त्या सर्वांना घेऊन येऊ? पत्नी म्हणाली Corona चालू आहे त्यामुळे इतके सर्व लोक एकाच वेळेस जमणं बरं नाही तू एकटाच ये….

ठीक आहे ताई मंगळवारी मी एकटाच येतो , असं बोलून ती व्यक्ती निघून गेली आणि दरवाजा बंद झाला.. 

काही क्षणातच माझ्या लक्षात आले की, नवजात बालक…. आनंदाचे क्षण….मानपान या सर्व गोष्टींची चाहूल लागल्यानंतर आणि शगुन मिळाल्यानंतर भरभरून आशीर्वाद देणारी  व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून ती दारात आलेली व्यक्ती म्हणजे तो एक किन्नर होता…

खरंतर  किन्नर आणि यांचा समाज –  यांच्याविषयी काही मत मांडण्याची माझी पात्रता किंवा योग्यता नक्कीच नाही पण माझ्या मनात त्यांच्याविषयी जे स्थान आहे किंवा व्याख्या आहे ती काहीशी अशी..[अर्थात हे  सर्वस्वी  माझं वैयक्तिक मत आहे,  इतरांची मतं ही नक्कीच वेगळी असू शकतात]

किन्नर :- अर्थात पुरुषरुपी शरीरामध्ये वसलेली एक स्त्रीशक्ती 

एक मानवी जीव जो शरीराने… पुरुष म्हणून जन्माला येतो पण त्याचा आत्मा म्हणजे एक अद्भुत स्त्रीशक्तीचा नमुना असतो. पुरुष आणि स्त्री,  या दोन जीवाची उत्पत्ती जेव्हा परमेश्वराने केली तेव्हा या  दोघांसाठी त्याने त्या त्या प्रकारची जीव शक्ती किंवा चेतनाशक्तीही प्रदान केली. त्यामुळे Masculine एनर्जी  जी साधारणपणे  पुरुषांसाठी योग्य मानली जाते आणि feminine एनर्जी  ही स्त्रियांसाठी , असं म्हणू शकतो.

पण खरे पाहता प्रत्येक पुरुषांमध्ये काही अंशी feminine एनर्जी ही असतेच आणि प्रत्येक स्त्रीमध्ये देखील काही अंशी Masculine एनर्जी असते.आणि त्यात गैर असे काहीच नाही ,  कारण ते नैसर्गिक आहे.

एकाच देहामध्ये शिव आणि शक्तीच रूप पाहायचे असेल तर किन्नर हे एकमेव उदाहरण आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

असो…… 

ठरल्या दिवसाप्रमाणे तो किन्नर मंगळवारी सकाळी पुन्हा आमच्या घरी आला.पण आजचे त्याचे हे रूप काहीसे वेगळेच होते … कारण आज तो त्याच्या खऱ्या आणि आवडत्या  वेशांत म्हणजेच स्त्री वेशात आला होता.

हिरवी साडी , चोळी , कपाळावर मोठाले कुंकू , अंगावर भरपूर, पण बनावटी दागिने, गजरे असा साज शृंगार करून एका खऱ्या स्त्रीला लाजवेल इतक्या सुंदर रूपात तो आला आणि परवा आलेली व्यक्ती तो हाच का या विचाराने माझी बोटं माझ्या तोंडात घालून मी अवाक होऊन त्याच्याकडे बघतच  राहिलो.तो स्त्रीच्या वेशात खरंच खूप सुंदर दिसत होता.

ताई दादा मी घरात येऊ की बाळाला बाहेर दारात घेऊन येता? असा प्रश्न त्यांनी केला…

दारात उभी असलेली व्यक्ती म्हणजे साक्षात अतिथी देवो भव या विचाराने आम्ही त्याला घरात येण्याची विनंती केली .नव्या नवरीने उंबरठ्या वरचे माप ओलांडावे तसा त्याने उजवा पाय पुढे  टाकत घरात हळुवार प्रवेश केला….. 

आल्या आल्या आधी हात पाय धुण्याची इच्छा त्याने व्यक्त केली…..स्वतःला सॅनिटाइज करण्याचे सर्व सोपस्कार आटपल्यानंतर  त्याने माझ्या मुलाला प्रेमाने मांडीवर घेतले…त्याच्या साडीच्या पदराने  बाळाची नजर उतरवली…त्याचे औक्षण केले…मधाचे बोट त्याच्या ओठाला लावले…प्रसाद रुपी एक रुपयाचे नाणे त्याच्या हातावर ठेवून  त्याला खूप आशीर्वाद दिले  आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून.. जगातली सर्व सुख याला मिळतील असा आशीर्वाद दिला.

मग माझ्या बायकोने सुद्धा त्याला नवीन साडी, खण, नारळ , बांगड्या, गजरे, फळे, मिठाई, धान्य.. अशी  शगुन रुपी भेट देऊन त्याची ओटी भरली. 

ओटी भरल्यानंतर सगळ्यात जास्त त्याला काय आवडावे तर ती साडी .

तो पटकन म्हणाला दीदी साडी खरच खूप छान आहे, अशी साडी आतापर्यंत कोणीच मला भेट म्हणून दिली नव्हती त्या साडीला बघून त्याच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता त्याची तुलना खरंतर कशाचीच करता येत नव्हती.

मिळालेला सर्व शगुन बघून तो खूप  भावुक झाला आणि त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी आले ,  त्याच्या पदराने ते डोळे टिपत असताना उगीच चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवण्याचा तो प्रयत्न करत  होता.

खरंतर किन्नरांना अशा अवस्थेत,  इतक्या जवळून पाहण्याची माझी आणि माझ्या पत्नीची पहिलीच वेळ होती म्हणून अशा वेळेस काय बोलावे आम्हालाही सुचेना.

तेवढ्यात पत्नी म्हणाली ताई तुम्ही बसा मी चहा आणि नाश्ता घेऊन येते तो नको नको म्हणत  होता, पण आमचा आग्रह मोडवेना म्हणून ठीक आहे पण अगदी थोडं आणा ,असं बोलून तो सोफ्यावर पुन्हा शांतपणे बसूनच  होता.

चहा नाश्ता येईपर्यंत काहीतरी बोललं पाहिजे म्हणून मी त्याला विचारलं, कुठे राहता आपण? आणि तुमच्या घरी कोण कोण असतं ?

असा प्रश्न ऐकताच, तो थोडा सावरला आणि मग बोलू लागला 

दादा मी इथून पुढेच 20 मिनिटांच्या अंतरावर एक बैठी चाळ आहे तिकडेच राहतो . घरी तसं कोणीच नाही मी एकटाच राहतो आणि आजूबाजूला आमच्या समाजातली काही लोक आहेत.

आई वडील कुठे गावी असतात का?….. मी विचारल

तर उत्तराला , नाही दादा तेही इथेच जवळपास राहतात पण त्यांचा आणि माझा आता काही संबंध नाही. मी वयात येत असताना,  आपल्या मुलांमध्ये काहीतरी दोष आहे ,  मी जन्माला मुलगा म्हणून आलो असलो तरी माझ्या सर्व सवयी, आवडी निवडी,  विचार करण्याची  पद्धत सर्वकाही मुलींप्रमाणे आहेत.. हे आपल्या  समाजात आणि कुटुंबामध्ये मान्य होणार नाही , शोभण्यासारखे नाही म्हणून, तुला तुझा मार्ग मोकळा आहे असे बोलून वयाच्या पंधराव्या वर्षी माझ्या कुटुंबीयांनी मला घराबाहेर काढल… तेव्हापासून ते आजतागायत माझे आयुष्य असंच आहे. कुणाचच आधार नाही.

मी स्वतः कोण आहे? असा का आहे?  हे समजण्यात माझ अर्ध आयुष्य गेलं . मी एक किन्नर आहे याची जाणीव मला आमच्या समाजातल्या काही लोकांनी करून दिली…मी असा का आहे याची पूर्ण माहिती रीत सर पटवून दिली आणि आणि तेव्हापासून मी माझं स्वतःचं स्वतंत्र आयुष्य जगायला सुरुवात केली. 

जन्मानंतर पाळण्यातल माझं पहिलं नाव कमलेश , पण किन्नर समाजाने आपलंसं केल्यानंतर माझं पुन्हा नामकरण करण्यात आलं आणि त्यानंतर मी माझ्या जुन्या नावाची आणि आठवणींची कात मागे टाकून एका नवीन नावाने म्हणजेच बबीता नावाने पुन्हा जन्म घेतला.

लहानपणापासून शाळेत असताना , कॉलेजला असताना या समाजाकडून आणि त्यांच्या मिळणाऱ्या वागणुकीतून खूप त्रास सहन केला.

वर्गातल्या मित्रांच चिडवण…. नको नको त्या शब्दांची बाराखडी नेहमीच कानावर पडली जात होती,  वाईट शब्दांनी हिणवलं जात होतं ,आम्हालाच बोलून , आमच्यावरच हास्य करणारा हा समाज आम्हाला सुखाने कधीच जगू देत नाही.

कशीबशी शाळा पूर्ण केल्यावर,  कॉलेजमध्ये असताना झालेल मानसिक , शारीरिक शोषण मी कधीच विसरू शकणार नाही, पण करणार काय?  सांगणार कुणाला?

माझा जन्म एका अशा समाजामध्ये झाला आहे ,  जिथे आम्हा किन्नरांना नेहमीच इग्नोर केलं जातं, आमच्याकडे बघून एकतर हास्य पिकवलं जातं, किंवा आमच्या दिसण्यावर, बोलण्यावर,  वागण्यावर विनोद लिहिले जातात आणि मनोरंजनाचा एक पर्याय म्हणून आमची नेहमीच टिंगल उडवली जाते.

रस्त्यात , दुकानात,  दवाखान्यात, ट्रेन , बस  अशा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आम्हाला बघितलं तर लोक नाक, तोंड आणि पाठ सर्वकाही फिरवून बसतात.आमच्यापेक्षा दोन हात लांब राहून आमच्याशी संवाद साधतात. शरीराने धडधाकट असलो , शिक्षणाने उच्चशिक्षित असलो तरी कोणीही आम्हाला नोकरी व्यवसाय करण्यासाठी सहाय्य करत नाही किंवा आमचा विचार केला जात नाही, मग आम्ही करायचे तरी काय?

रस्त्यावर भीक मागत फिरणे किंवा पैसे देतील त्या ठिकाणी नाचकाम करणे इतकाच ऑप्शन आमच्यासमोर उभा राहतो आणि म्हणून मग आम्हाला हेच काम करावे लागते कारण दिवसाच्या शेवटी आम्हालाही भूक लागते,  आम्हाला पण देवाने पोट दिले आहे त्याची खळगी भरण्यासाठी आम्हाला अशी काम करावीच लागतात.

ही कहाणी फक्त माझीच नाही तर आपल्या समाजात 80%  कुटुंबामध्ये थोड्या बहुत प्रमाणात सर्व किन्नरांची परिस्थिती सारखीच आहे. फार क्वचित आणि नशीबवान मुलं आहेत ,  जे किन्नर असून देखील त्यांना त्यांच्या कुटुंबीयांचा पूर्णपणे पाठिंबा मिळतो. 

या समाजाला आमची आठवण फक्त एकदाच होते,  जेव्हा यांच्या घरी काही शुभ प्रसंग किंवा कार्य असेल तर त्यांना जाऊन आशीर्वाद देणे कारण आमच्या वाणीतला आशीर्वाद हा नेहमीच  लाभदायक ठरतो, आम्हाला ते एक प्रकारचे वरदान परमेश्वराने दिले आहे असा विश्वास आहे मग लग्नाच्या वेळी , बाळंतपणाच्या वेळी , किंवा कोणत्याही मंगल कार्यासमयी आम्हाला आवर्जून बोलावले जाते. लोकांची दुःख आम्ही आमच्या पावलांशी घेऊन जातो आणि जाताना त्यांना फक्त सुख ,आनंद, आणि त्यांच्या कार्यात भरभराट देतो या विश्वासाने आणि अपेक्षेने लोक आमच्याकडे येतात.पण हा सर्व मानपान काही तासांपुरताच मर्यादित असतो त्यानंतर आमची किंमत पुन्हा शून्यात जमा होते. 

लग्न, घर , संसार,  मुलं बाळ या गोष्टींच सुख आमच्या नशिबात या जन्मात तरी नाही. म्हणून इतरांच्या सुखामध्ये आम्ही आमचं सुख मानतो आणि मग त्यांना त्यांचं सुख टिकण्याकरता भरभरून आशीर्वाद देतो. पण आम्हाला आमचं खरं सुख मिळवून देण्यासाठी कोणीच पुढे यायला धजावत नाही किंवा मदत करत नाही.फार तुरळक लोक आहेत जी खरंच आमच्या हक्कासाठी , न्यायासाठी लढत आहेत पण त्यामध्ये यश कधी येईल कुणास ठाऊक?

हेच आजचे सत्य आहे….I have accepted this fact, we Don’t have a choice, nor any option, so we are struggling 2 have a normal life…. let’s see how it go.

हे वाक्य त्याच्याकडून आलं आणि मी खरंच पूर्णपणे  स्तब्ध झालो. 

माझ्यासमोर बसलेला , आणि अस्खलित इंग्लिश बोलणारा तो किन्नर [बबीता] एम ए पास होता …हे त्याने मला नंतर सांगितले पण फक्त किन्नर समाजाचा भाग असल्याकारणाने कोणीही त्याला नोकरी द्यायला धजावत नव्हते याची खंत त्याने माझ्यासमोर बोलून दाखवली.

एवढे सगळे ऐकल्यानंतर पुढे काय बोलावं काही सुचत नव्हत, इतक्यात बायको पोहे आणि चहा घेऊन आली.

अगदी हळुवारपणे त्याने ती प्लेट घेतली आणि एकच घास खाऊन झाल्यावर पुन्हा एक दुःखाचा आवंढा त्याने गिळला.

आता मात्र मला आणि माझ्या पत्नीला रहावले नाही म्हणून मीच  पुन्हा  त्याला विचारले..

संपूर्ण मानव जातीला आशीर्वाद देणाऱ्या आणि ज्याच्या शब्दात इतकी ताकत आहे अशा व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आम्ही पहिल्यांदाच बघतोय .. असं का बरं?

तो पुन्हा सांगू लागला ..

दीदी तुझ्या हातचे पोहे खाऊन मला माझ्या आईची आठवण झाली, ती देखील असेच पोहे  बनवायची, मी आईला खूप मिस करतो पण काय करणार भेटता येत नाही ,  कारण घराचे दरवाजे हे माझ्यासाठी कायमचे बंद झालेले आहेत.

दादा या शगुन ताटात जी साडी तू मला घेतलीस,  इतकी सुंदर साडी खरंच याआधी मला कोणीच भेट म्हणून दिली नव्हती . आम्हाला शगुनच्या ताटात जे काही मिळतं ते बऱ्याचदा कमी दर्जाचं किंवा लोकांना नको असलेली वस्त्र आमच्या वाटेला येतात पण पर्याय नाही म्हणून आम्ही त्याचा स्वीकार करतो. तू घेतलेली ही नवी साडी मला एका भावाने केलेली भाऊबीजच आहे असं मला वाटून दिल.

या साडी सोबत तुम्ही दोघांनी जे काही इतर किराणामाल,  फळ,  सुकामेवा या सर्वांनी भरलेल्या दोन मोठ्या पिशव्या दिल्यात, असं इतकं कोणीच आमच्यासाठी करत नाही..

मला वाटलं नेहमीप्रमाणे शगुन म्हणजे थोडे बहुत पैसे आणि मिठाईचा एक छोटा पुडा माझ्या वाट्याला येईल पण या भरलेल्या दोन पिशव्या म्हणजे माझी पंधरा दिवसांची, खाण्याची सोय तुम्ही केलीत. यापुढे किमान पंधरा दिवस तरी माझ्या घरची चूल बंद राहणार नाही याची मला खात्री आहे .

बाळाला आशीर्वाद दिल्यानंतर तुम्ही दोघांनी जे आदरा  तिथ्य केलत , मला घरात घेऊन तुमच्याच कुटुंबातला एक भाग असल्यासारखं जे प्रेम दिलेत त्यासाठी मी आज खूप खूप आनंदी आहे . खरंतर लोक आम्हाला त्यांच्या घराचा उंबरठा ओलांडून आत यायला परवानगी देत नाहीत… त्यात अशा कोरोना काळामध्ये सुद्धा तुम्ही मला तुमच्या घरात स्थान दिल…. प्रेमाचे चार शब्द बोलला…आपलेपणाने विचारपूस केलीत, या अशा साध्या गोष्टींसाठीच आम्ही खरं तर आसुसलेले असतो.  

प्रेमाचे दोन शब्द….. आपुलकीची नजर…. आणि सर्वसामान्य माणसाला मिळतो तो आदर…. 

या तीन गोष्टी आम्हाला हव्या असतात आणि त्या आज एकाच ठिकाणी तुमच्या या घरात मिळाल्या त्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. पुन्हा एकदा अगदी मनापासून त्याने मला आणि माझ्या कुटुंबीयांना भरभरून आशीर्वाद दिला आणि दीदी – दादा आता मी निघते असे बोलून त्याने आमचा निरोप घेतला.

निघताना घराच्या बाहेर पाऊल पडताना जे हास्य आणि आनंद त्याच्या चेहऱ्यावर होत, ते मी आणि माझ्या पत्नीने कायमच मनात टिपून घेतल.

त्या दिवसानंतर ते आजतागायत त्याची आणि आमची भेट पुन्हा कधीच झाली नाही. पण  त्याच्या व्यक्तिमत्त्वाची छाप आजही आमच्या मनामध्ये कायम आहे आणि ती इथून पुढेही कायम राहील यात मला शंका नाही. 

झाल्या प्रसंगावरून ,  माझे डोळे काहीसे खाडकन जागे झाले आणि मलाही चार नव्या गोष्टी यांच्याकडून शिकायला मिळाल्या.. 

शीतावरून भाताची परीक्षा जस आपण करतो तसंच काहीसं बबीताच्या या एका अनुभवावरून मला जाणवलं की या समाजात जगत असलेल्या प्रत्येक व्यक्तीची दुःख आणि त्यांचे प्रॉब्लेम खरच खूप मोठे आहेत. त्यांच्या सर्व समस्यांचे निवारण अजूनही झालेले नाही , अनेक दुःखातून , संकटातून आजही या समाजाला तोंड देत यांना आपलं जीवन जगावं लागत आहे आणि त्यासाठी त्यांचा खूप मोठा संघर्ष अजूनही चालूच आहे.

एका बाजूला स्त्री आणि पुरुष समानता मानणारा आपला समाज ,  Name ,  Fame आणि  Money  हे मिळवण्यासाठी चालू असलेली तारेवरची कसरत , 
मी आणि माझे कुटुंबीय या चौकटीपर्यंतच विचार करणारा प्रत्येक व्यक्ती ,  आज कुठेतरी एका अशा समाजाला ,  आणि त्यात जगत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला समजून घेण्यात इतका मागे पडत असेल , याची जाणीव खरंतर बबीता ने मला करून दिली , आणि मग कुठेतरी  खर तर माझीच मला लाज वाटू लागली. 

कोणीही किन्नर आपल्यासमोर आल्यास त्याच्याकडे पाठ न फिरवता.., प्रेमाचे दोन शब्द जर आपल्याला त्याच्याशी बोलता आले तर त्यांना नक्कीच आवडेल.
त्यांच्या समस्या जाणून घेऊन जमेल तितकी मदत त्यांना वेळोवेळी पुरवली गेली तर काहीतरी चांगलं करून दाखवण्याची ताकद यांच्यात नक्कीच आहे ,  हे ते आपल्या कार्यातून सिद्ध करून  दाखवतील,  पण याची जाणीव  आणि तेवढा विश्वास आपल्या या सर्वसामान्य समाजाला होणे फार गरजेचे आहे. 

शिक्षण घेतलेल्या सर्व किन्नर बांधवांना त्यांच्या योग्यतेनुसार, त्यांचा विचार विविध नोकरी पदांसाठी केला जावा. जेणेकरून ते त्यांच आयुष्य अभिमानाने आणि सन्मानाने जगू शकतील.आणि मग कुठेही रस्त्यावर भीक न मागता ते स्वतःचे आणि त्यांच्यावर निर्भर असलेल्या सर्व लोकांचे पालन पोषण सहजरीत्या करू शकतील. 

कोणीही किन्नर बांधव जर त्यांचा स्वतःचा व्यवसाय चालवत असतील तर त्या व्यवसायाला प्राधान्य आणि प्रोत्साहन नक्कीच दिलं गेलं पाहिजे.
किन्नर समाजात , शिक्षणाची आवड असलेल्या प्रत्येक मुलाला शाळांमध्ये, कॉलेजमध्ये सर्वसामान्य मुलांप्रमाणेच समान वागणूक देण्याचा कल असावा अशी योजना करण्यात यावी , असं मला मनापासून वाटतं. 

असा हा कमलेश उर्फ बबली थोड्या काळासाठी का होईना पण पुन्हा एकदा मनाच्या कोपऱ्यात, आठवण रुपी एक छोटीशी साद घालून गेला. कुठेतरी तोही आम्हाला मिस करत असेल अशी आशा करतो आणि त्याला सुद्धा त्याच्या आयुष्यामध्ये सर्व सुख मिळावी ही परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो.

धन्यवाद.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED