One such - ROI books and stories free download online pdf in Marathi

असाही एक - ROI

नमस्कार मंडळी

मागच्या आठवड्यात बँकेतून मला फोन आला,  कॉल वर एक 35 ते 40 वयाचे गृहस्थ दबक्या आवाजातच उद्गारले आपण मिस्टर XYZ  बोलताय का?

मी सुद्धा हो म्हटलं…. बोला काय मदत करू शकतो असा प्रश्न  मि त्यांना केला..

ती व्यक्ती पुढे बोलू लागली….. सर मी ABC बँकेतून बोलत आहे ,  तुमचं होम लोन अकाउंट आमच्या बँकेसोबत आहे , तर कॉल करण्यामागचं कारण असं की आत्ताच्या लेटेस्ट आरबीआय रूल प्रमाणे सर्व होम लोनचे ROI [Rate Of Interest]  म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट आता काही अंशी बदललेले आहेत .

 आता तुमच्या होम लोन चा ROI काही टक्क्याने वाढला आहे. हा वाढलेला ROI आणि त्याचं रीपेमेंट करण्यासाठी तुम्हाला दोन ऑप्शन आहेत… पहिला पर्याय म्हणजे ,  तुमचा [EMI] ईएमआय तोच राहील पण लोन  कालावधी काही महिन्यांनी वाढेल ,  आणि दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला लोनचा कालावधीआहे तसाच ठेवायचा असेल तर तुमचा ईएमआय वाढवावा लागेल,  जो ऑप्शन तुमच्यासाठी योग्य असेल तो एक्सेप्ट करण्यासाठी लवकरात लवकर बँकेत येऊन जा आणि काही फॉर्मॅलिटी करून  घ्या.एवढं बोलून त्या इसमाने कॉल ठेवून दिला. मला खरंतर बरेच प्रश्न पडले होते पण मी काही विचारणार याच्या आधीच त्याने हा कॉल कट केला.

आलेल्या कॉल ची शहानिशा करण्यासाठी एका जवळच्या मित्राला मी हा संवाद शेअर केला तर तोही म्हणाला की हो हे खरं आहे,  यावर्षीच्या बजेट मध्ये सर्वच प्रकारच्या लोन वरती ,  मग ते कोणत्याही प्रकारचे असो.. होम लोन , पर्सनल लोन, कार लोन,  एज्युकेशन लोन… सरकारने त्यावर लागणाऱ्या ROI ,  चे प्रमाण थोड्या बहुत प्रमाणात वाढवलेले आहे आणि ते नवीन रूल आता आपल्याला लागू पडणार आहेत.

म्हणजे एकंदर काय तर ROI वाढला,  म्हणजे महिन्याच् खर्च वाढला…आपल्या सारख्या सर्वसामान्य आणि नोकरदार माणसाची चाललेली तारेवरची कसरत आता आणखीनच वाढत जाणार … पण असो… ही गोष्ट स्वीकारल्या वाचून पर्याय नाही,  कारण जगातले 70 टक्के लोक बँकिंग लोन यावरच आपली सर्व स्वप्न पूर्ण करत असतात आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाढलेला हा ROI स्वीकारायलाच पाहिजे,  याला  पर्याय नाही…एवढ बोलून तो मित्र त्याच्या वाटेला निघून गेला

 संध्याकाळी घरी गेल्यावर आमच्या होम मिनिस्टरचा पहिला अपडेट  कानावर पडला,  अहो तुम्हाला समजलं का शेजारच्या दामले काकूंचा मुलगा दुसरीकडे राहायला गेला… का तर म्हणे घरात बहिणीशी आणि वडिलांशी पटत नाही .

मग मी ही म्हटले.. कौटुंबिक  मतभेद यामुळे विभक्त होणारी माणसे , यामध्ये दामले कुटुंबीय  हे काही पहिले घर नसावे…. घरोघरी मातीच्या चुली असतात त्यामुळे प्रत्येक घरात हे असे मतभेद असणारच… त्यातूनच आलेले हे रुसवे फुगवे आपल्या मानव जातीला नवे नाही. एवढ बोलून मीही फ्रेश होण्यासाठी बेडरूम मध्ये गेलो.

माझा बदललेला सूर बायकोने ओळखला मग ती ही शांत झाली . थोड्या वेळाने चहाचा गरमागरम  कप घेऊन आली आणि माझ्या समोरच्या टेबलावर ठेवून म्हणाली चहा घ्या…

आणि आता सांगा काय झालं आहे,  तुमचा आधीचा सूर काहीसा वेगळा होता.. ऑफिसमध्ये सर्व ठीक आहे ना?

 चहाचा घोट घशातून पोटात जाईपर्यंत मी  ही थोडा शांत झालो होतो. बायकोने विचारलेला प्रश्न तसा साधाच होता पण त्यामागे दडलेलं उत्तर आज वेगळं होतं.

मी बोलू लागलो….

मी तिला विचारलं… तुला ROI म्हणजे काय माहित आहे का? ती म्हणाली हो त्यात काय, “रेट ऑफ इंटरेस्ट”.

जेव्हा आपण बँकेत जातो किंवा फायनान्स रिलेटेड काहीही देवाण-घेवाण करतो तेव्हा हा ROI खूप महत्त्वाचा असतो. जसे की कोणतं लोन असेल तर ROI जितका जास्त तितका जास्त भुर्दंड हा लोन घेणाऱ्याला भरावा लागतो….पण हाच ROI जर इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत बघितला तर जितक ROI जास्त ,  तितके इन्वेस्टमेंट वरचे रिटर्न्स जास्त मिळतात…. काय बरोबर ना?? असा उलट प्रश्न तिने मला केला…

मी थोडस स्मितहास्य करत म्हटलं हो अगदी बरोबर आणि गंमत म्हणजे माझ्या आयुष्यात हा ROI इतका महत्त्वाचा का आणि कसा आहे, हे मला वयाच्या 25 व्या वर्षी समजायला लागले… जेव्हा मी पहिल्यांदा होम लोन घेतले पण आजकालची नवीन पिढी तर या ROI बद्दल खूपच जागरूक आहे आणि वयाच्या 17 ते 18 वर्षीच त्यांना याचं महत्त्व, याच एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन जमलेल आहे असं बोललो तर वावगं ठरणार नाही.असो…

बायको म्हणाली ते सर्व ठीक आहे पण आज अचानक हे ROI ,आणि त्याबद्दलचे असे प्रश्न तुम्हाला का पडत आहेत? याआधी तुम्ही असे कधी विचारात पडलेले मी तर पाहिलेले नाही….

मी पुन्हा बोलू लागलो….

अग खर तर ज्या ROI बद्दल तू काय किंवा जगातली सर्वच लोक काय रोजच विचार करत असता तो ROI म्हणजे कोणत्या फायनान्स किंवा लोन , इन्व्हेस्टमेंट रिलेटेड  मुळीच नाही … माझ्या डोक्यात ज्या ROI बद्दलच चक्र आणि वादळ चालू आहे ते एका वेगळ्याच कारणासाठी…..

पत्नीने विचारले हा कोणता नवीन ROI आता?

मी उत्तरलो…. माझ्या डोक्यातला ROI म्हणजे नात्यांमधला Rate Of Interest.

पत्नी म्हणाली मी नाही समजले काय म्हणायचे तुम्हाला नक्की ?

मी म्हटलं बघ ना ……ROI - [Rate of Interest]  शब्द एकच  असला तरी त्याचे अर्थ किती भिन्न होत आहेत…आयुष्यभर मनुष्य नावाचा प्राणी.. पैशांची जमवाजमा, हिशोब, नफा तोटा,  या सर्वांचा विचार करत असताना जसा ROI या शब्दांचा वारंवार  वापर करत असतो…तेव्हा हाच ROI त्याच्या जीवनातील प्रत्येक नात्यांमध्ये सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो याचा आपण कधी विचार करतो का?

मगाशी तूच म्हणाली ना दामले  काकूंचा मुलगा वेगळा राहायला गेला म्हणून….का गेला?

घरात होणाऱ्या वादामुळे , मतभेदांमुळे त्याला त्याचा  कुटुंबीयांचा आणि त्यात राहत असलेल्या व्यक्तींवरचा [ नात्यांमधला] इंटरेस्ट कुठेतरी नक्की कमी झाला असणार? म्हणून गेला दुसरीकडे राहायला

फक्त हेच उदाहरण नाही तर आपल्या आजूबाजूला आणि सभोवताली अशी अनेक उदाहरणं आपल्याला रोजच्या जीवनात पाहायला मिळतात…इतरांचे अनुभव हे नक्कीच वेगळे असू शकतात पण माझ्या अनुभवावरून मी एवढे नक्की सांगू शकतो की…. आज प्रत्येक नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे तो या इंटरेस्टमुळे.

 

जसे की…

 

-  Oh Please , he or she is NOT my type so I am NOT interested ,

अशी वाक्य आजकाल प्रत्येक तरुण आणि तरुणीच्या ओठावर सहज असतात…. काय म्हणायचं असतं त्यांना त्यातून? इतकंच की त्यांचा त्या व्यक्तीबद्दल रेट ऑफ इंटरेस्ट  तितकासा नाही किंवा अजिबातच नाही [  इथेही ROI आलाच]

-  माझ्या अमुक तमुक गरजा जर पूर्ण होत नसतील तर मला त्या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नाही , हे सुद्धा कानावर रोजच पडत.. [ कशामुळे तर या ROI मुळेच]

-  वडिलोपार्जित मालमत्तेच समान वाटप मुलांमध्ये झालं नाही तर त्या मुलांच्या मनात आपल्या पाल्यांसाठी आणि इतर भावंडांसाठी असलेला आदररुपी इंटरेस्ट लगेच कमी होऊन जातो आणि मग वर्षानुवर्षे चालत आलेली ही रक्ताची नाती काही काळातच वादाच्या भवऱ्यात सहजपणे अडकून जातात आणि कालांतराने संपुष्टात येतात [ याला सुद्धा ROI कारणीभूत]

-  लव मॅरेज करून सुद्धा,   कालांतराने कोणत्याही एका पार्टनरला नवीन व्यक्ती विषयी आकर्षण वाटावं आणि त्यातून एक्स्ट्रा मेरीटल अफेअर्स घडून यावेत हे तर आजच्या पिढीला फारच कॉमन आहे?  का? तर म्हणे माझ्या पार्टनरचा माझ्या मधला इंटरेस्ट कमी झालेला आहे…असं जर असेल तर  लव्हमॅरेज या शब्दाचा खरा अर्थ काय , असा प्रश्न मला गेली कित्येक वर्ष पडलेला आहे.

- एकाच घराचे चार भाग करून चार वेगळ्या चुली मांडण… हे काय दर्शवतं? तर हेच की एकत्र कुटुंब पद्धती ही जरी नावाला असली तरी मतं जुळत नसल्यामुळे , किंवा काही विथभर जागेच्या हव्यासापोटी नात्यांमधला इंटरेस्ट आणि आपलेपणा कमी होतो,  आणि मग एकाच घरात चार वेगळ्या चुली मांडल्या जातात…

-  मला आणखीन एका गोष्टीच अप्रूप वाटते ते म्हणजे अंतयात्रा.

 मी बऱ्याचदा बघितले आहे की स्वर्गवासी लोकांच्या अंत्ययात्रेत असे बरेचसे चेहरे असतात जे त्या गेलेल्या व्यक्तीचा मनातून आयुष्यभर तिरस्कार करत असतात.खरं तर त्या आलेल्या व्यक्तीचा…. त्या गेलेल्या व्यक्तीमध्ये काही इंटरेस्ट नसतो मग अशी लोकं येतातच कशाला? फक्त फॉरमॅलिटी म्हणून??

जिवंतपणी जर तुम्ही तुमचा इंटरेस्ट त्या व्यक्तीबद्दल आणि नात्याबद्दल दाखवू शकत नसाल किंवा कदाचित ते करताना जर तुमचा इगो  आड येत असेल तर अंत्ययात्रेला येऊन त्यांना  समाजापुढे काय प्रूफ करायचे असते?

ती  कायमची निघून गेलेली व्यक्ती जिवंत असतानाच जर अशा व्यक्तींनी त्यांचा इंटरेस्ट त्या नात्यांमध्ये टिकवून ठेवला असता , तर त्यां व्यक्तीला नक्कीच आवडले असते याची जाणीव त्या सर्वसामान्य माणसांना होऊ नये का? याची खंत मला कायम आहे.

-  प्रत्येक कुटुंबातलं प्रत्येक नातं हे त्या व्यक्तीच्या ROI वरच टिकलेल असतं…

इंटरेस्ट ठेवला तर ते नातं जास्त काळ टिकत.. आणि इंटरेस्ट नसला किंवा तो कमी झाला तर ते नातं संपुष्टात येतं.

कधी कधी तर नात्यांमधला ROI इतका कमी होऊन शिगेला पोहोचतो की मेल्याशिवाय ही लोक एकमेकांची तोंड सुद्धा बघायला पसंत करत नाही..आणि हेच आजच्या कलियुगातल  कटू सत्य आहे.

-   या ROI ची एक गंमत अशी  पण आहे की…लोकांचा तुमच्यामध्ये असलेला किंवा त्या नात्यांमध्ये असलेला इंटरेस्ट तेवढ्यापुरताच मर्यादित असतो… जोपर्यंत त्यामागे काही स्वार्थ किंवा मतलबीपणा कुठेतरी खोलवर रुजलेला असेल.एकदा का त्या नात्यांमधली गरज पूर्ण झाली की त्यामधला इंटरेस्ट सुद्धा कमी कमी होत जातो आणि मग प्रत्येक जण विभक्त होऊन आपला मार्ग वेगळा करण्याचा प्रयत्न करत असतो.

मगाशी मी म्हटलं तसं… घरोघरी मातीच्या चुली.. वैचारिक मतभेदांमुळे नात्यांमधला प्रत्येकाचा इंटरेस्ट कमी होत गेल्यामुळे आजकाल एकत्र कुटुंब पद्धती ऐवजी विभक्त कुटुंब पद्धती जास्त पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला सिंगल फादर… सिंगल मदर….. ओल्ड एज हाऊस…. यांची संख्या दिवसेंदिवस वाढण्यामागचं मुख्य कारण म्हणजे ही सर्व या ROI देणगी आहे ..

 जगाच्या प्रत्येक  कानाकोपऱ्यात,  प्रत्येक कुटुंबामध्ये हा नात्यांमधला इंटरेस्ट…. प्रेम… आपुलकी…. आपलेपणा हा लोप पावत चाललेला आहे आणि हे असंच चालत राहिलं तर येणारा काळ नक्कीच भयावय असेल यात शंका नाही.

 एखाद वेळेस आपण घेत असलेले शिक्षण, आपण करत असलेली नोकरी किंवा बिजनेस यामधला आपला इंटरेस्ट जर कमी झाला आणि जर तो आपण बदलण्याचा निर्णय वयाच्या कोणत्याही टप्प्यावर घेतला तर त्यामध्ये आपल्याला पुन्हा उभारी घेता येऊ शकते ,  पण नात्यांमध्ये असं करता येत नाही, इंटरेस्ट नसला म्हणून वर्षानुवर्षे चालत आलेली नाती सहजासहजी सोडून देता येत नाही.

 एखादं नातं बनवण्यासाठी जेवढा वेळ लागत नाही त्याच्यापेक्षा कितीतरी  पटीचा वेळ ते नातं टिकवण्यासाठी लागतो.  आणि ही एक ongoing  प्रोसेस आहे…. एकदा केल आणि झाल असं इथे चालत नाही.कोणतही नातं टिकवण्यासाठी करावा लागणारा प्रयत्न म्हणजेच आपला स्वतःचा त्या नात्याबद्दल असलेला ROI  आणि तो टिकवण्यासाठी आपल्यालाच  करावे लागणारे प्रयत्न याची योग्य ती सांगड घालता आली तर कोणतही नातं हे चिरकाल टिकवता येते.

 समाजाची एवढी  भयावः परिस्थिती होत चाललेली असताना आपण गप्प राहणं हे नक्कीच योग्य नाही , या उलट त्यासाठी काही बदल जर मी स्वतः मध्ये केले किंवा स्वतःपासून याची सुरुवात केली तर याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल याची मला खात्री.आहे …

 जसे की….

- जेवढे महत्त्व आपण पैसे ,बचत,  इन्व्हेस्टमेंट याला देतो तेवढेच महत्त्व आपण आपल्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक नात्याला दिल पाहिजे… म्हणजेच काय तर आपला त्या  नात्यांमधला  रेट ऑफ इंटरेस्ट वाढवला पाहिजे.

-एखाद्या व्यक्तीने किंवा नात्याने आपल्यासाठी माझ्या आयुष्यात काय  केले ,  आणि काय केले नाही याची गणित मांडत  बसण्यापेक्षा कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता  जर ते नाते जपले तर त्यात आपले नुकसान असे काहीच नसते.

 बँकेचा ROI वाढला तर कदाचित बँकेत भरायचा आपला पैशांचा EMI चुकू शकतो….

जॉब सुटला…. बिजनेस डबघाईला आला तर ROI - EMI  यांची वाढती आकडेवारी बघून कदाचित आपले भौतिक ऐश्वर्य संकटात येऊ शकते पण नात्यांमधला ROI कमी होत गेला , आणि  त्या नात्यांना पुरेशा वेळेचा EMI  दिला नाही  तर ती नाती संपुष्टात येथील आणि मग त्यापासून होणारे नुकसान हे नक्कीच  कोणत्याही  भौतिक नुकसानापेक्षा जास्त मानसिक आणि बौद्धिक कष्टदायक  ठरू शकते .

 आयुष्यात काही नाती निभावत असताना कितीही मान - अपमान सहन करावा लागला तर ते स्वीकारण्याची तयारी ठेवणे नेहमीच हितकारक ठरते पण त्याची प्रचिती येण्यासाठी थोडा काळ जाणे  तितकेच गरजेचे असते.

एखादं नातं तुमच्या सोबत कायम टिकावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर वयाचा विचार न करता , कोणताही इगो आड येऊ न  देता,  झालेल्या चुका माफ करून पुढे  चालत राहणं याला प्राधान्य दिल पाहिजे

कोणतंही नातं टिकवण्यासाठी किंवा  ते जास्त मजबूत करण्यासाठी आपला आणि समोरच्या व्यक्तीचा ROI आपल्याला कसा वाढवता येईल याचा विचार करून स्वतःमध्ये थोडे बदल करता आले पाहिजेत.तुमच्यात काही पॉझिटिव्ह बद्दल झाला तर समोरच्या व्यक्तीत सुद्धा बदल  घडायला वेळ लागणार नाही याची खात्री बाळगणे फार गरजेचे आहे

मीच का करू? मीच किती चेंज करू स्वतःला? मीच का ऍडजेस्ट करू प्रत्येक वेळी? या शब्दांऐवजी जर हे नातं मला टिकवायचं असेल तर मी हवे ते बदल स्वतःमध्ये करायला तयार आहे… सक्षम आहे आणि ते मी करणारच , असा विचार केला तर ते नक्कीच फायदेशीर  ठरू शकत.

नो फोर्स - आयुष्यातील सर्वच नाती  ही आपल्याला हितकारक ठरू शकतील असेही नाही आणि म्हणूनच… जर एखाद्या  व्यक्तीला तुमच्या मध्ये  किंवा त्या नात्यांमध्ये  मनापासून इंटरेस्ट नसेल तर त्या व्यक्तीचा किंवा त्या नात्याचा हव्यास करू नका. जे सहज घडेल…. आपलेपणाने घडेल अशाच नात्यांचा आणि लोकांचा विचार करून त्यांना प्राधान्य द्या.अशाने जी तुमची खरी जीवाभावाची नाती आहेत ती कायम तुमच्या सोबत राहतील आणि नको असलेली किंवा बळजबरीने  निभावलेली नाती आपोआप गळून पडतील.

खरी नाती… ही प्रेम या एकाच तराजूत तोलली जाऊ शकतात त्याला दुसरे कोणतेच मोजमाप असू शकत नाही त्यामुळे अशी प्रेमळ नाती जपण्यासाठी आपला वेळ आणि आपला इंटरेस्ट कायम त्या लोकांसाठी खर्च करा.

असा हा  ROI  तुमच्या आमच्या जीवनात आपल्या पाचवीलाच पुजलेला आहे. तो जसा आपल्याबरोबर आला आहे तसाच आपल्या बरोबरच जाणार आणि म्हणूनच या ROI च मोजमाप तुम्ही फक्त पैशापुरतीच मर्यादित न ठेवता आपल्या विचारांमध्ये  आणि आपल्या नात्यांमध्ये ठेवण्याला प्राधान्य द्या

 कारण वरती जाताना घेऊन जाणार ते फक्त प्रेम आणि आणि खाली ठेवून जाणार ते आपले चांगले अनुभव  आणि आठवणी ..  जे या नात्यांद्वारेच आत्ताच्या पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले जाणार आहे..

असे असताना आता  या  भौतिक सुखाच्या ROI ला किती प्राधान्य द्यायचे हे तुमचे तुम्हीच ठरवा..

 धन्यवाद

Tushar K

 

 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED