वैजापूरचे मंतरलेले दिवस Uddhav Bhaiwal द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वैजापूरचे मंतरलेले दिवस

                                                                                                                                                                                उद्धव भयवाळ

                                                                                                                                                                                औरंगाबाद

 वैजापूरचे मंतरलेले दिवस

असे म्हणतात की, नोकरीतील पहिल्या पोस्टिंगचे ठिकाण हे आपल्या कायम लक्षात राहते.

१९७३ ते १९८२ या माझ्या वैजापूरच्या कार्यकालातील किती आठवणी सांगू आणि किती नको असे मला झालेले आहे.

मला बँकेच्या नोकरीची ऑर्डर आली आणि दोन मार्च १९७३ रोजी मी स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या वैजापूर शाखेत "कॅशियर कम गोडावून कीपर" या पदावर रुजू झालो. तिथे माधवराव दिवाण नावाचे खूप प्रेमळ शाखा व्यवस्थापक होते. थोड्याच दिवसांमध्ये नियमितपणे वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध होणाऱ्या माझ्या कविता वाचून मला कविता करण्याचा छंद आहे, हे सर्व स्टाफला कळले आणि सर्वांनीच माझ्या या छंदाचे कौतुक केले. "मी माझ्या विद्यार्थी जीवनापासूनच कविता करतो" हे सांगितल्यावर तर त्या सर्वांनाच खूप आनंद झाला. मी लिहिलेल्या प्रत्येक कवितेचे माझे पहिले श्रोते म्हणजे माझे बँकेतील सहकारी होत. अशातच एके दिवशी बँकेचा शिपाई माझ्या कॅश काऊंटरपाशी आला आणि मला म्हणाला, "तुम्हाला मॅनेजरसाहेबांनी केबीनमध्ये बोलावले आहे." हे ऐकताच मी ड्रॉवरला कुलूप लावून साहेबांच्या केबीनमध्ये गेलो, तर तिथे प्रख्यात ग्रामीण साहित्यिक रा. रं. बोराडे सर बसलेले दिसले. मी त्यांना अनेक कार्यक्रमांमधून पाहिलेले असल्यामुळे मी त्यांना ओळखले आणि नमस्कार केला. मॅनेजरसाहेबांनी त्यांच्याशी माझी ओळख करून दिली आणि मी कवी आहे हेसुद्धा त्यांना सांगितले. मी कविता करतो हे ऐकून बोराडे सरांना खूप आनंद झाला. "बोराडे सर हे वैजापूरच्या विनायकराव पाटील महाविद्यालयात प्राचार्य आहेत" असे मॅनेजरसाहेबांनी सांगितले तेव्हा तर मला खूपच आनंद झाला.

माझ्याच वयाची काही तरुण कवी मंडळी वैजापूरमध्ये असल्याचे लवकरच कळले आणि बोराडे सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही "शब्दवेध" नावाचे एक काव्यमंडळ स्थापन केले. वैजापूरचे तेव्हाचे गट विकास अधिकारी शरद कट्टी हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष झाले. शरद कट्टी यांचा 'चौथे अपत्य' हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला होता. माझ्यासह ज.रा. नेवाडकर, उत्तम बावस्कर, श्याम खांबेकर, क. मा. साळुंके इत्यादी या मंडळाचे सदस्य होते. दर महिन्यातून एकदा शब्दवेध मंडळाची बैठक होऊ लागली. त्या बैठकीत प्रत्येक सदस्याने आपली एक नवीन कविता वाचून दाखवायची असे ठरले. वैजापूरच्या अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य आणि उर्दू कवी बशीर अहमद "असिर" अधूनमधून तिथे येत असत आणि उर्दू शायरी ऐकवत असत. या सर्व काविमित्रांच्या सहवासात तसेच आदरणीय बोराडे सरांच्या प्रोत्साहनाने माझी कविता फुलतच गेली, हे मी कदापी विसरू शकणार नाही.

अधूनमधून वैजापूरमध्ये आम्ही कविसंमेलन आयोजित करू लागलो.

त्या काळात औरंगाबाद आकाशवाणीवर "युवावाणी" हा लोकप्रिय कार्यक्रम सायंकाळी साडेपाच वाजता प्रसारीत होत असे. बोराडे सरांच्या आग्रहाखातर एके दिवशी "युवावाणी" ची टीम वैजापूर येथे आली आणि तिथल्या विश्रामगृहामध्ये आम्हा कवी मंडळीच्या काव्यवाचनाचे रेकॉर्डिंग करून ते आकाशवाणीवर युवावाणी कार्यक्रमात नंतर प्रसारित केले.

मी लिहिलेली एक लावणी वैजापूर येथे एका कविसंमेलनात मी गाऊन दाखवली आणि ती बोराडे सरांना इतकी आवडली की त्यांनी मला नंतरच्या आठवड्यात परळी येथे झालेल्या 'अभिव्यक्ती' साहित्य संमेलनामध्ये ती लावणी गायला लावली. तिथे त्या लावणीला 'वन्स मोअर' मिळाला.

माझ्या जालन्याच्या महाविद्यालयीन जीवनात मी माझ्या कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनास या ना त्या कारणाने कधीच उपस्थित राहू शकलो नाही. पण ती कसर मी वैजापूरला बँकेत असतांना भरून काढली. विनायकराव पाटील महाविद्यालयामध्ये दरवर्षी जे स्नेहसंमेलन होत असे, त्याला मी आवर्जून उपस्थित राहात असे. प्राचार्य शिवाजीराव भोसले, मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर, वा.रा. कांत, "मृत्युंजय"कार शिवाजी सावंत, डॉ. यू. म. पठाण, गंगाधर पानतावणे, प्रभाकर निकळंकर या आणि अशा अनेक दिग्गज साहित्यिकांना आणि मान्यवरांना पाहण्याची आणि ऐकण्याची संधी मला वि. पा. महाविद्यालयातील स्नेहसंमेलनामुळे आणि बोराडे सरांमुळे मिळाली.

वैजापूर येथील नऊ वर्षांच्या कार्यकाळात सर्वश्री माधवराव दिवाण, रामचंद्र सोहोनी, माधवराव भटमुळे, मीर जाहेद अली, हे शाखाव्यवस्थापक मला लाभले. या सर्वांनी माझ्यातील कलागुणांना खूप प्रोत्साहन दिले. हैदराबादहून प्रसिद्ध होणाऱ्या आमच्या बँकेच्या 'SBH Mirror' या त्रैमासिकात माझ्या इंग्रजी कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. आमच्या बँकेचे रिजनल डेव्हलपमेंट मॅनेजर श्री रोपळेकर साहेब यांनी जेव्हा आमच्या वैजापूर शाखेस पहिल्यांदा भेट दिली तेव्हा त्यांच्या स्वागताप्रीत्यर्थ मी एक स्वागतगीत तयार करून गाऊन दाखविले. त्यावेळी रोपळेकर साहेबांनी मला जवळ घेऊन "You are budding poet of Maharashtra" असे म्हटले. ती माझ्या कवितेसाठी सर्वात मोठी पावती होती. त्यानंतर एके दिवशी हैदराबादच्या मुख्यालयातून बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री वैद्यसाहेब हे वैजापूरला आले. त्यावेळीसुद्धा मी त्यांच्यासाठी एक स्वागतगीत तयार करून गाऊन दाखवले. त्यांनीसुद्धा माझे खूप कौतुक केले.

वैजापूरला असतांना मला अधूनमधून जुन्या, फाटक्या नोटा घेऊन नागपूरला भारतीय रिझर्व्ह बँकेत जावे लागे. तिथे चार आठ दिवस मुक्काम असे. त्या काळी नागपुरी संत्र्यांचे खूप अप्रूप होते, त्यामुळे नागपूरहून परततांना मी नागपुरी संत्र्यांचे दोन तीन पेटारे घेऊन येत असे. वैजापूरला आल्यावर बँकेतील सहकाऱ्यांना घरी बोलावीत असे. आम्ही सर्वजण मग त्या संत्र्यांचा फडशा पाडीत असू.

एकूणच, वैजापूरचे ते दिवस माझ्यासाठी मंतरलेले दिवस होते, हे नक्की.

                                                                *******