मी भूत पाहिले त्याची गोष्ट Uddhav Bhaiwal द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी भूत पाहिले त्याची गोष्ट

                                                                                                                                                                उद्धव भयवाळ

                                                                                                                                                                औरंगाबाद

                  मी भूत पाहिले त्याची गोष्ट

जगामध्ये भुताचे अस्तित्व आहे किंवा नाही याबद्दल प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. परन्तु मला काही वर्षांपूर्वी आलेला अनुभव मी खाली देत आहे.

सतरा अठरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. मी त्यावेळी औरंगाबाद येथे चाणक्यपुरीमध्ये राहत होतो आणि नोकरीनिमित्त परभणीला होतो. महिन्यातून एखाद्या वेळेस औरंगाबादला येत असे. एका शनिवारी सायंकाळी परभणी येथून नंदीग्राम एक्स्प्रेसने निघून रात्री दहाच्या सुमारास औरंगाबादला पोचलो. रेल्वे स्टेशनवर रिक्षा भरपूर होत्या. पण चाणक्यपुरीकडे येण्यासाठी एकही रिक्षावाला तयार नव्हता. शेवटी मी वेदांत हॉटेलपर्यंत पायी येण्याचा निर्णय घेतला.  वेदांत  हॉटेलपर्यंत पायी आलो तेव्हा तिथे एक रिक्षा उभी असलेली मला दिसली. रिक्षा ड्रायव्हर रिक्षाच्या बाहेर रिक्षाला खेटून उभा होता आणि आतमध्ये एक प्रवासी पूर्ण अंगाला ब्लँकेट गुंडाळून बसलेला होता. रिक्षावाल्याने मला विचारले,"कुठं जायचं काका?"

मी म्हणालो, "चाणक्यपुरी."

तो म्हणाला," ठीक आहे. बसा."

त्याच्याशी बोलून भाडे ठरवले आणि रिक्षाच्या मागच्या सीटवर अगोदरच बसलेल्या माणसाशेजारी जाऊन बसलो. रिक्षा निघाली, तेव्हा रिक्षावाला माझ्याकडे वळून म्हणाला, "यांना अगोदर प्रतापनगरला सोडतो. नंतर तुम्हाला चाणक्यपुरीला सोडतो." मी म्हणालो, "ठीक आहे." कारण रिक्षाचा मार्ग म्हणजे आधी पीरबाजार, नंतर प्रतापनगर आणि शेवटी चाणक्यपुरी असा होता. त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नव्हता. दरम्यान मी त्या सहप्रवाशाशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्याने क्षणभर मान वळवून नुसते माझ्याकडे पाहिले आणि काही न बोलताच पुन्हा समोर बघू लागला. सर्वांगाला त्याने ब्लँकेट लपेटलेले असल्यामुळे मला फक्त त्याचे डोळे दिसले.    

प्रतापनगर ही उच्चभ्रू लोकांची कॉलनी आहे. रिक्षा मुख्य रस्त्यावरून प्रतापनगरच्या कॉलनीतील रोडवर आली. तसे रिक्षावाल्याने त्या प्रवाशाला विचारले, "कुठे सोडू?" तसे त्याने हाताने खुण करून रिक्षा पुढे नेण्यास सांगितले. रिक्षावाला पुन्हा पुन्हा विचारीत होता आणि तो प्रवासी हाताने खुण करून रिक्षा पुढे पुढे नेण्यास सांगत होता. तशी रिक्षा पुढे, पुढे जात होती. शेवटी प्रतापनगरची वस्ती संपली आणि  प्रतापनगरची स्मशानभूमी आली. तरी तो माणूस रिक्षातून उतरायला तयार होईना. रिक्षा अगदी स्मशानापाशी आली तेव्हा तिथे सर्वत्र शुकशुकाट होता. स्मशानभूमीतील खांबावरील दिव्यांचा लख्ख प्रकाश पडलेला होता. समोर अगदी जवळच बऱ्याच वेळचे एक प्रेत जळत असावे असे दिसत होते. रिक्षावाल्याने रिक्षा तिथेच थांबवली आणि त्या माणसाला सांगितले, "याच्यापुढे रिक्षा जाणार नाही. समोर तर घर वगैरे काहीच दिसत नाही. केवळ स्मशान आहे."  रिक्षावाला एवढे बोलला आणि त्याने भाड्याच्या पैशांसाठी हात पुढे केला. तितक्यात तो माझ्या शेजारचा माणूस काहीच न बोलता रिक्षातून पटकन उतरला. त्याने पाय रिक्षाच्या बाहेर ठेवताच मला काहीतरी वेगळेच जाणवले. त्याच्या पायाचा आकार वेगळाच असावा असे वाटले. पण मी मनावर घेतले नाही. परंतु मला आणि रिक्षावाल्याला काही कळायच्या आत तो माणूस तिथे उतरल्याबरोबर जागेवरच गायब झाला. तिथून तो चालत गेला असता तर मला किंवा रिक्षावाल्यास दिसला असता. कारण खांबांवरील दिव्यांचा लख्ख प्रकाश पडलेला होता. आजूबाजूला दूर दूरपर्यंत सगळा शुकशुकाट होता. मला किंवा रिक्षावाल्याला तो माणूस कोणत्या दिशेला गेला हे दिसले असते. पण तो प्रवासी जागेवरच गायब झाला होता. हे सारे एका क्षणात घडले. रिक्षावाल्याला तर दरदरून घाम फुटला. त्याने कशीबशी रिक्षा मागे वळवली आणि मला म्हणाला,

"चला काका. इथे काहीतरी गडबड आहे, हा माणूस नव्हता. हे तर भूत होतं." हे ऐकताच माझ्याही अंगावर सर्रकन काटा आला; आणि तितक्यात मला काहीतरी आठवले. एक म्हणजे त्या दिवशी आमावस्या होती. म्हणजेच ती आमावस्येची रात्र होती. इतकेच नव्हे तर ती 'शनी आमावस्या' होती. कारण तो शनिवार होता. आमावस्येला रात्रीच्या वेळी भुते फिरायला निघतात, असे मी पूर्वी कधीतरी ऐकले होते. माझ्या लहानपणी आई मला नेहमी म्हणायची, " उद्धव, तुझा राक्षस गण आहे. तुला भूत दिसेल पण ते तुला काही त्रास देणार नाही." यावरून मला मात्र हे कळले की त्या रिक्षावाल्याचा सुद्धा राक्षस गण असावा. म्हणूनच आम्ही दोघेही त्या भुताच्या संपर्कात आलो पण त्याच्या तावडीतून सहीसलामत सुटलो.

रिक्षा मुख्य रस्त्यावर आणून त्याने अशी पळवली की विचारू नका. अगदी काही मिनिटांमध्ये आम्ही चाणक्यपुरीपाशी आलो. तिथे त्याने रिक्षा थांबवताच मी त्याला पैसे देत असताना तो म्हणाला, " काका, बरं झालं. आपला जीव वाचला. नाही तर आपलं काही खरं नव्हतं आज."

मी म्हटलो," खरंय तू म्हणतोस ते."

एवढे झाल्यावर रिक्षावाला जाण्यासाठी वळला. मीसुद्धा भूतापासून वाचवल्याबद्दल मनातल्या मनात देवाचे आभार मानले आणि घरात आलो.

********

                      

 

                                                  उद्धव भयवाळ

                                                 १९, शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी

                                                 गादिया विहार रोड

                                                 शहानूरवाडी

                                                 औरंगाबाद ४३१००९  

                                                 मोबाईल: ८८८८९२५४८८ / ९८३४११९४४१

                                                 email : ukbhaiwal@gmail.com