स्मार्ट पुणेकर...
काही वर्षांपूर्वी बातमी होती की पुणे शहर आता स्मार्ट होणार! स्मार्ट सिटी प्रशासनाने करायचे ठरवले पण मग त्यांच्या लक्षात आले की काय माहीत, त्यांनी माणसांच्या ऐवजी रस्ते आणि फूटपाथ सजवून स्मार्ट करायला घेतले! यातून पुणे स्मार्ट झाले की नाही कळले नाही,पण पुण्यात रहाणारी माणसे मात्र जन्मजात स्मार्ट आणि डोकेबाज असतात यात तिळमात्र शंका नाही.पुण्यातली माणसे आधीच स्मार्ट आहेत हे सिध्द करणारा हा एक किस्सा....
त्यावेळी मी टेलिफोन खात्यात नुकताच नोकरीला लागलो होतो...
त्या काळात आपल्याकडे फक्त landline सेवा उपलब्ध होती. टेलिफोन केंद्राच्या क्षमता कमी असायच्या आणि टेलिफोनसाठी भरपूर वेटींग लिस्टही असायची...
एखाद्याला नवीन टेलिफोन कनेक्शन द्यायचे झाले तर त्याला जो टेलिफोन नंबर द्यायचा असतो तो आधी शक्यतो वापरलेला नसावा असा साधारणपणे संकेत होता.तांत्रिक मर्यादांमुळे नाईलाजाने कधी कधी जुने बंद झालेले नंबर पुन्हा वापरावे लागायचे,पण अशावेळी एक काळजी तरी घेतली जायची ती म्हणजे बंद झालेला टेलिफोन नंबर पुढे किमान एकदोन वर्षे तरी इत्तर कुणाला दिला जायचा नाही.
नवीन व्यक्तीला आधीच्या ग्राहकाचे फोन कॉल येऊ नयेत व त्याला त्रास होऊ नये हा त्यामागे उद्देश होता...
कधी कधी मात्र नजरचुकीने असा नुकताच रिकामा झालेला टेलिफोन क्रमांक नवीन ग्राहकाला दिला जायचा आणि मग संबंधित अधिकारी आणि एकंदरीतच खात्याला त्या ग्राहकाच्या रागाला सामोरे जायला लागायचे...
असाच एका हॉस्पिटलचा सहा महिन्यापूर्वी बंद झालेला टेलिफोन नंबर एका ग्राहकाला चुकून दिला गेला...
टेलिफोन सुरू झाला,खूप दिवसांची इच्छा फलद्रूप झाली म्हणून घरात अक्षरशः सण साजरा झाला.आता तो सगळ्या नातेवाईकाना आपला फोन नंबर कळविण्यासाठी कॉल करणारच होता तेव्हढ्यात एका मागोमाग एक इनकमिंग फोन कॉल यायला सुरुवात झाली...
येणारे बहुतेक कॉल "साने हॉस्पिटल ना?" असे विचारणारे होते.
सुरुवातीला एका पाठोपाठ आपला फोन वाजतो आहे याची त्या व्यक्तीला मजा वाटली..
व्हायचं काय की लोक जुन्या टेलिफोन डिरेक्टरीत साने हॉस्पिटलचा नंबर शोधायचे आणि नंबर फिरवायचे, तो कॉल या नव्या ग्राहकाला जायचा!...
दोन तीन कॉल आल्यानंतर त्या ग्राहकाला काय झाले असावे याचा अंदाज आला,पण जराही न चिडता शांतपणे त्याने फोन बरोबर नुकत्याच मिळालेल्या टेलिफोन डिरेक्टरीतून साने हॉस्पिटलचा नंबर शोधून तो नंबर कॉल करणाऱ्या व्यक्तींना सांगू लागला…
दुसरा एखादा ग्राहक असता तर त्याने लगेच तक्रार करून टेलिफोन केंद्राच्या अधिकाऱ्यांचा उध्दार केला असता,गलथान कारभार म्हणून खात्याचे वाभाडे काढले असते, चिडचिड करून आकांडतांडव केले असते,पण या ग्राहकाने यापैकी काहीही न करता शांतपणे वेगळीच शक्कल लढवली....
त्याने अजून थोडी मेहनत घेऊन टेलिफोन डिरेक्टरीतून टेलिफोन खात्याच्या जनरल मॅनेजरचा घरचा टेलिफोन नंबर शोधून काढला.रात्र होईपर्यंत तो येणाऱ्या प्रत्येक कॉल ला शांतपणे उत्तर देत राहिला....
रात्री मात्र येणारे फोन घेऊन साने हॉस्पिटलसाठी कॉल करणाऱ्या व्यक्तींना साने हॉस्पिटलचा म्हणून खात्याच्या जनरल मॅनेजरचा घरचा टेलिफोन नंबर द्यायला त्याने सुरु केले...
त्या रात्री जनरल मॅनेजरकडे एकापाठोपाठ एक असे सतत 'साने हॉस्पिटल'चे कॉल यायला लागले.नक्की काय झाले असेल यावर साहेब विचार करु लागले.तसे ते पुण्यातल्या लोकांच्या बद्दल आधीच ऐकून होते. विचारांती या घटने बद्दल साहेबांनी अंदाज काढला....
नक्कीच जुना नंबर कुठल्या तरी पुणेकर ग्राहकाला दिला असणार आणि त्याने तक्रार करण्या ऐवजी धडा शिकवायला हा पुणेरी गनिमी कावा प्रत्यक्षात आणला असणार!
त्याच रात्री तातडीने वरच्या लेवलवर सूत्रे हलली आणि दुसऱ्याच दिवशी संबंधीत ग्राहकाचा टेलिफोन नंबर बदलून झालेल्या त्रासाबद्दल माफीचे पत्र खात्यातर्फे त्या पुणेकर ग्राहकाकडे पोहोचते झाले, झालेल्या चुकीसाठी जबाबदार अधिकाऱ्याला कामातल्या हलगर्जीपणाबद्दल समजही देण्यात आली....
आहे की नाही स्मार्ट आणि डोकेबाज पुणेकर!
© प्रल्हाद दुधाळ.