हरवलेले मित्र... Pralhad K Dudhal द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हरवलेले मित्र...

हरवलेल्या मित्रांसाठी....
हरवणे ....सापडणे .... मानवी जीवनातला अविभाज्य घटक आहे.बऱ्याचदा आपल्या वस्तू हरवत असतात, त्या शोधल्या तर सापडतात सुद्धा ;पण प्रेमाची ,जीवाभावाची माणसें हरवली की आयुष्यात पुन्हा सापडतील याचा काही भरवसा नाही!म्हणून आपल्या स्नेहातली माणसे , मित्र मैत्रिणी सखे सोबती यांना जीवापाड जपायला हवे...
दरवर्षी मैत्रीदिनाच्या निमित्ताने एक दिवस शुभेच्छा दिल्या घेतल्या जातात.पाश्चात्य संस्कृतीला कितीही नावे ठेवली जात असली तरी त्यांची वेगवेगळ्या नात्यांचा सन्मान करणारे हे वेगवेगळे "डे" ज साजरे करायची पध्दत नक्कीच स्तुती योग्य आहे! आजच्या धकाधकीच्या व्यस्त जीवनात असे डेज आता खूप महत्त्वाचे वाटतात, त्या निमित्ताने नात्यांना उजाळा मिळतो !
वेगवेगळी समाज माध्यमे आज मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत आणि या माध्यमामुळे एक छान सोय झाली आहे ...ती समजून तिचा एक संधी म्हणून वापर करायला हवा....
प्रत्यक्ष न पाहता, न भेटतासुध्दा अनेक लोकांचा एकमेकाप्रती स्नेहभाव व्यक्त करण्याची, मैत्री जोपासण्याची एक उत्तम सोय या माध्यमातून हाताशी आली आहे! त्यातूनच अनेक अनोळखी व ओळखीच्या मनामनात एक स्नेहसेतू उभारला जातो आहे ही नक्कीच आजच्या समाजासाठी चांगली गोष्ट आहे.हे मैत्रीचे पूल माणसांच्या नात्यास नवा आयाम देत आहेत.
आज वयाच्या पन्नाशीच्या पुढे असणाऱ्या पिढीसाठी हे एक उत्तम वरदान मिळाले आहे,असे मला वाटते.शाळा कॉलेजमधल्या अनेक घट्ट मित्रमैत्रीणी फेसबुक, ट्विटर, व्हाटस्आप अशा माध्यमातून एकत्र येत आहेत. त्या निमित्ताने त्या मोरपंखी दिवसांच्या आठवणीना उजाळा मिळतो आहे.
खरं तर आज एका घरात, शेजारी असलेल्या लोकांचा एकमेकांशी संवाद हरवलेला असताना असे चार क्षण ऑनलाईन का होईना; पण आपल्या त्या त्या काळातल्या मित्र मैत्रीणीसोबत गुजगोष्टी करायला मिळणे ही या लोकांसाठी सुवर्णसंधीच आहे असे मला वाटते.
भौतिक सुखांच्या गर्दीत आज नाती हरवली आहेत.कुणालाही कुणासाठी वेळ देता येत नाही.पिढ्यापिढ्यातले वैचारिक अंतर वाढले आहे.अनेकांची संवादाची भूक आतल्या आत दाबली जात असताना या आभासी का होईना माध्यमामुळे हरवलेले मैत्र जपले जाते आहे ही गोष्ट मला वाटते खूप महत्त्वाची आहे .
या माध्यमातून पुन्हा जोडलेली मैत्री ही केवळ आभासी पातळीवर न ठेवता प्रत्यक्षात भेटून या स्नेहसेतूचे रूपांतर एखाद्या सामाजिक चळवळीत व्हायला हवे .आज सामाजिक व आर्थिक सुस्थितीत असलेल्या समाजातील घटकांनी आपल्या त्या त्या काळातल्या घट्ट मैत्रीच्या धाग्याला अजून घट्ट करून यथाशक्ती मानसिक आधार व मार्गदर्शन व गरज असेल तेथे शक्य तेवढी आर्थिक स्वरूपाची मदतही करायला हवी.श्रीकृष्ण-सुदामा मैत्रीची कथा आपण अगदी भक्तीभावाने वाचतो व ऐकतो आणि मैत्रीचे गोडवे गातो .
बघा, तुम्ही जर थोडेफार तशा कृष्णपदापर्यंत पोहोचले असाल तर तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या हरवलेल्या सुदामास नक्की शोधा... कदाचित त्याला तुमच्या मदतीची गरज नसेलही;पण आपली आठवण ठेवून हा मित्र पुन्हा एकदा समोर आलाय आणि तोही केवळ बालपणीची मैत्री जोपासण्यासाठी! त्या मित्राचे सोडा;पण यातून तुम्हाला किती आनंद मिळेल याचा विचार करा....
असे वयाच्या विविध टप्प्यांवर आपले अगदी जवळचेअनेक मित्र मैत्रिणी एका क्षणी दुरावतात.जगण्याच्या लढाईत ही मैत्री टिकत नाही.मार्ग वेगळे होतात असे हरवलेले मित्र मैत्रिणी आयुष्यात कधी पुन्हा भेटतील अशी शक्यता वीस पंचवीस वर्षांपूर्वी फारच धूसर होती;पण आज तंत्रज्ञानाचे हत्यार नशिबाने तुमच्या हातात आले आहे. संमाज माध्यमामुळे आज अशा मित्रांना पुन्हा शोधणे सहज शक्य झाले आहे आणि याचा फायदा घेऊन बालपणीचे आज अगदी साठी सत्तरीत असलेले मित्र पुन्हा भेटून आपली सुख दुःख शेअर करत आहेत.नव्या उत्साहाने मैत्री निभावत आहेत ही खूप आनंददायी बाब आहे.
तर अजून तुम्ही तुमच्या हरवलेल्या मित्रांना शोधले नसेल तर जरूर शोधा.मनातले व्यक्त करण्यासाठी आपल्या जिवाभावाच्या मित्रांची रियुनियन करून जीवनात आनंद निर्माण करू या...
हरवलेल्या मित्रांना आवाहन करा....
चला पुन्हा एकदा भेटू या,
आयुष्यातला आनंद लुटूया...
© प्रल्हाद दुधाळ, पुणे.