किस्से मैत्रीचे Pralhad K Dudhal द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

किस्से मैत्रीचे

#मैत्रीचे_भन्नाट_किस्से
तसा मी लहानपणापासून एकलकोंडा होतो.मित्रांच्या गर्दीत मी फारसा रमत नव्हतो तरी जोडलेल्या मोजक्या मित्रांच्या आठवणी या निमित्ताने निश्चितच सांगायला आवडतील....
शाळेत जाण्यापूर्वी तसे आमच्यावर कुणाचे आणि कसलेच बंधन नव्हते,सकाळी एकदा आईवडील शेतात गेले की पक्या,धुऱ्या,पांडुरंग अशा आम्हा संवंगड्यांचेच राज्य असायचे. मनाला येईल तसे हुंदाडणे चालू असायचे.वाडीच्या जवळच वाहता ओढा आणि सिध्देश्वराचा डोह होता.खेळत खेळत आमचा मोर्चा दररोज या डोहावर जायचा.डोहात डुंबत मस्ती करता करता वयाच्या चार पाच वर्षातच आम्ही मित्र अगदी तीन पुरुष खोल पाण्यात पट्टीचे पोहायला शिकलो होतो आमच्या पालकांना याचा मुळीच पत्ता नव्हता !
मी आणि पांडुरंग जिथे जाईल तिथे बरोबर असायचो.आमच्या वाडीवर आम्हा दोघांना गंडोरीवाला आणि रेवडीवाला नावे मिळाली होती!
शाळेत जायला लागल्यावर वाडीवरून गावात जाताना अरुंद पानंदीतून चिखलाच्या रस्त्यातून शाळेत जावे लागायचे.बऱ्याचदा मोठे मोठे साप आडवे जायचे. रस्त्यात ओढ्याच्या काठचे सतीचे मंदिर,पिराचा दर्गा,मारुती मंदिर,चुन्याचा घाणा लागायचा.तिथे भुताची, खैस आणि हडळीची वस्ती आहे असे बोलले जायचे.लहानपणी मी खूपच घाबरट होतो त्यामुळे मित्रांची सोबत असेल तरच त्या रस्त्याने जायचो...
शाळेत मी अभ्यासात कायम पहिला येत असल्याने तिसरी चौथी नंतर वर्गात माझ्याभोवती मित्रांपेक्षा माझ्या बालमैत्रिणींचेच कोंडाळे असायचे.'हा सारखा पोरींच्यात बसतो' याचा आमच्या एका गुरुजीना मात्र प्रचंड राग येत असावा.एकदा शाळेत हे गुरुजी दारू पिऊन आले आणि काहीच कारण नसताना मला बेदम चोप देऊन त्यांनी तो राग माझ्यावर काढला होता!
गावात इलेक्ट्रिसिटी नसल्याने सातवीत असताना रात्री आमची शाळेतच अभ्यासिका असायची.अभ्यास झाला की आम्ही शाळेतच झोपायचो.वर्गातल्या मित्रांच्या नादाने एका रविवारी अभ्यास करायचे सोडून मंदिरात आम्ही भंडाऱ्याचे जेवायला गेलो.एका मित्राने आमची याबद्दल चुगली गुरुजींना केली त्यावरून दुसऱ्या दिवशी खूप बोलणी बसली.मला मित्रांसमोर माझा झालेला तो अपमान सहन झाला नाही आणि मी चक्क शाळेत जायचे बंदच करून टाकले.गुरुजींनी घरी येऊन समजूत काढली तेव्हा कुठे पुन्हा शाळेत जाऊ लागलो...
सातवीत असताना किसन नावाचा एक मित्र एका वनिता नावाच्या मुलीच्या चक्क प्रेमात पडला होता तो माझ्याकडून त्याची प्रेमपत्र लिहून घ्यायचा...
आता त्या पत्रात काय लिहिले होते ते आठवत नाही; पण त्या वयात आपण हे काम केले होते हे आठवले की जाम हसू येते!
दहावीच्या परीक्षेला आडनावांप्रमाणे नावांची यादी बोर्ड परीक्षेसाठी बनविली जात होती.मी शाळेतला स्कॉलर विद्यार्थी असल्याने माझ्या मागे माझ्याच आडनावाच्या अभ्यासात ढ असलेल्या पक्याचे नाव टाकले होते आणि नंतर दुधाने नावाच्या वर्गात दुसऱ्या नंबरावर येणाऱ्या मुलीचे नाव टाकले होते.आम्हा दोघांनाही सरांनी परीक्षेत जो पुढे येईल त्याने पक्याला पेपर दाखवण्याचा सूचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे मी त्याला पेपर दाखवत होतो;पण काही मित्रांनी माझे कान भरले आणि शेवटच्या पेपरला मी मुद्दाम त्याला पेपर न दिसेल असा धरू लागलो.आत्तापर्यंत माझ्या जीवावर त्याचे पेपर्स छान झाले होते,पण त्या दिवशी माझ्या असहकार आंदोलनाने तो रडकुंडीला आला. त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याने मी पाघळलो आणि शेवटचा अर्धा तास मी त्याला दिसेल असा पेपर धरला.एकदाचा पक्या मॅट्रिक झाला.आजही पक्या सगळ्यांना मोठ्या फुशारकीने त्याच्या खास शैलीत माझ्यामुळे तो मॅट्रिक पास झाल्याचे सांगतो.त्यात त्याला कसलाही कमीपणा वाटत नाही!
कॉलेजात असताना मी येरवड्यात झोपडपट्टीत रहात होतो.माझ्या शेजारी माझ्याच वयाचे कॉलेजात शिकणारे शिर्के बंधूही रहायचे.ते दोघे माझ्याप्रमाणेच स्वतःचा स्वयंपाक करून खायचे.त्या वस्तीत आमचे बाकीचे दहा पंधरा मित्र मात्र शिकलेले नव्हते.त्यात कुणी रिक्षा चालवायचा, कुणी वेल्डर होता, कुणी सिनेमाच्या तिकिटांचे ब्लॅक करायचे तर बरेच कामधंदा न करता दिवसभर टगेगिरी करत फिरायचे.शिर्के बंधूनी किंवा मी घरात काही चांगले चुंगले शिजवले आणि या मित्रांना त्याचा सुगावा लागला की ती अख्खी टोळधाड आमच्या खोलीकडे यायची,आम्ही जे काही स्वतःसाठी बनवले असेल ते शोधून सुपडा साफ करून जायचे!त्या दिवशी आम्हाला उपाशी रहायची वेळ यायची.वडा सांबार खाऊन दिवस काढावा लागायचा.असे अतरंगी; पण तेवढेच दिलदार मित्र मला लाभले होते. त्या काळात एका दिवशी नागपूर चाळ वसाहतीत रात्री दहाच्या दरम्यान लक्षात आले की वस्तीत विशिष्ट दुकानात दारू पिलेल्या अनेक लोकांना देशी दारुतून विषबाधा झाली आहे.आम्ही मित्रांनी लगेच घरोघरी संशयित दारुड्या लोकांची शोध मोहीम सुरू केली.अक्षरश: घरातल्या प्रत्येक पुरुषाच्या तोंडाचा वास घेऊन दारू पिलेल्या लोकांना मित्रांच्या रिक्षातून तातडीने ससूनला दाखल करायची मोहीम रात्रभर राबवली.या घटनेत दहा लोकांचा बळी गेला;पण शेकडो लोकांना वेळीच उपचार मिळवून देण्यात आम्हाला यश आले. आमचे शिवाजी मित्रमंडळ या कामगिरीमुळे चांगलेच चर्चेत होते
आमच्या या मित्रांच्या गँगमधे एक अवली मित्र होता. पेशाने साधा वार्डबॉय असलेला हा मित्र कायम कडक वेशात असायचा.इम्पोर्टेड गॉगल व उंची अत्तरे तो वापरायचा,वाट्टेल तसा मनसोक्त खर्च करायचा! आम्हा मित्रांना आठवड्यातून एकदा तो पार्टी द्यायचा, अगदी ज्याला जे हवे ते तो प्यायला खायला द्यायचा.त्या काळी खूप गाजलेले हिंदी सिनेमे तो स्वखर्चाने रस्त्यावर मोठ्या पडद्यावर दाखवायचा! या सगळ्या साठीचा पैसा तो कुठून आणायचा याबद्दल उलट सुलट चर्चा रंगायच्या. तो पैसा कुठून येतं होता ते आम्हाला नंतर समजले;त्यासाठी त्याच्यावर कारवाईही झाली;पण कमावलेला सगळा पैसा आपल्या मित्रांवर उधळण्याचा त्याचा दिलदारपणा मात्र कायमचा आठवणीत राहिला ...
पहिले वर्ष सोडले तर मी नोकरी करून कॉलेजला जात असे.बारावीपासून माझ्याबरोबर शिकत असलेला विकास या काळात माझा जवळचा मित्र होता.गरवारे कॉलेजमधील गॅदरिंगला फिशपाउंड साठी एक बॉक्स ठेवला होता.मी आणि विकासने या बॉक्समध्ये शंभरेक फिश पौंड टाकले.कॉलेजच्या सगळ्या शायनर मुला मुलींवर आम्ही काव्यमय फिशपाउंड टाकले आणि ते सगळे सिलेक्ट होऊन स्टेजवर वाचले गेले.सहसा ज्या मुलांच्या नादाला कुणी लागत नव्हते त्यांच्यावर लिहिलेल्या त्या कॉमेंट्स खूप गाजल्या. हे कुणी केले असेल यावर कॉलेजात खूप दिवस चर्चा चालू होती, आम्ही दोघे ते सगळे एन्जॉय करत होतो!
ऑफ पिरीयड मिळाला की मी आणि कुलकर्णी नावाचा माझा एक मित्र चहा घ्यायला लकडी पुलाच्या पलीकडे छोट्या हॉटेलात जायचो.तो नेहमी शिगारेट फुंकायचा. तो मलाही शिगारेट प्यायला शिकवण्याचा प्रयत्न करत असे; पण त्याला त्यात यश आले नाही.या मित्राबरोबर अलका टॉकीज मध्ये 'प्यासा' हा सिनेमा मी एकूण सहा वेळा पाहिला होता, त्याला तो सिनेमा एवढा का आवडत होता कोण जाणे?
नोकरीला लागल्यावर खूप जिवाभावाचे सच्चे मित्र कायमचे जोडले गेले. त्यांच्याबरोबर नोकरी कधी नोकरी वाटायची नाही.कॉलेज जीवन काय असते ते कॉलेज मध्ये असताना फार एन्जॉय करता आले नव्हते ते नोकरीला लागल्यावर एन्जॉय केले! एकांकिका, कलचरल प्रोग्राम, हिंदी पखवाडा आम्ही मित्र अक्षरशः गाजवायचो!
अचानक पिकनिक ठरायची आणि सामूहिक रजा घेऊन आम्ही पुण्याबाहेर जायचो!
एकाच वेळी नोकरीला लागलेल्या तीस पस्तीस मुला मुलींचा आमचा ग्रुप होता.
एकदा आमच्या दोन मित्रांनी सगळ्या मित्र मैत्रिणींच्या बरोबर गृपने सिनेमाला जायचा एक प्रोग्राम बनवला. तिकिटे काढायची जबाबदारी एकावर सोपवली गेली.सगळेच बॅचलर होते त्यामुळे त्यांनी थियेटर मध्ये जाताना कोणाला कोणाच्या शेजारी बसवायचे ते ठरवून टाकले होते! तिकीटे हातात आली की कुणाला कुणाच्या शेजारचे तिकीट द्यायचे याचे एक सिक्रेट प्लॅनिंग केले होते.ऐन वेळी थियेटरवर तुफान गर्दीमुळे कशीबशी मिळालेली तिकिटे विखुरलेल्या नंबरची होती! केलेले सगळे प्लॅनिंग फिस्कटले आणि त्यांनी जुळवलेल्या जोड्याना सिनेमाला एकत्र बसवायचे आणि त्यांचे आपल्या आवडत्या पात्राबरोबर बसून सिनेमा बघायचे मनातले मांडे मनातच राहिले!
असे छोटे छोटे बरेच किस्से आहेत; पण पोस्ट खूपच लांबली आहे.
लहानपणीचे किंवा कॉलेज जीवनातले अगदी थोडेच मित्र आता संपर्कात आहेत; पण नोकरीच्या विविध टप्प्यांवर भेटलेल्या शेकडो मित्रांशी जुळलेले बंध मी छान जोपासले आहेत...जोपासत आहे.
© प्रल्हाद दुधाळ