अर्थ:- कुलीन घराण्यातील वधू चा कल नेहमी शरीर झाकण्याकडे असतो.
त्यावर आधारित कथा:-
"अरे! काय झालं निशा! अशी चिडलेली का दिसतेस तू?",निशाची आई
" नचिकेत कुठेय? आला का नाही घरात तो?",निशाचे बाबा
म्हणाले.
"तो आता येणार नाही आणि मीसुद्धा ठरवलंय की त्याच्याशी लग्न करायचं नाही म्हणून",निशा
"अरे अरे! हे काय विपरीत! लग्न ठरल्या पासून ही चार पाच वेळा भेट झाली तुमची आणि हे काय विपरीत! ",निशाची आई
"अगं तो खूप बॅकवर्ड विचारांचा आहे",निशा
"म्हणजे लग्न झाल्यावर माहेर विसरायचं असं म्हणाला का तो?",निशाचे बाबा
निशाने नकारार्थी मान हलवली.
"मग स्त्री ही पुरुषाची दासी आहे असं काही म्हंटल का त्याने?",निशाची आई
"नाही त्याने तसं काही म्हंटल नाही.",निशा
"मग म्हंटल तरी काय त्याने? आणि असे दळभद्री कपडे का घालून गेली होतीस तू?",निशाचे बाबा
"जाताना तर वेगळाच ड्रेस होता हा कोणता घातला?",निशाची आई
"मी नंतर तो बदलून हा घातला होता. ह्या ड्रेस वरूनच आमचं बिनसलं. तो म्हणाला असे अर्धे कपडे घालणं बरं दिसत नाही. इतर पुरुष बघतात ते मला आवडत नाही.फक्त माझ्यासमोर घातलं तर गोष्ट वेगळी.",निशा
"अच्छा म्हणून त्याला बॅकवर्ड म्हणतेय तू! मला तर त्याचं काहीच चुकीचं वाटत नाही. आणि कमी कपडे घालण्यास जर तू फॉरवर्ड आणि आधुनिक म्हणत असशील तर मग उत्क्रांती आधीचे स्त्री आणि पुरुष ते जास्त आधुनिक आणि फॉरवर्ड असायला पाहिजे कारण ते कपडेच घालत नसत.",निशाची आई
"पण का घालायचे नाहीत असे कपडे? इतर पुरुष बघत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे म्हणून आपण का आपलं मन मारायचं का नाही घालायचे असे कपडे?",निशा
"अगं मन मारण्याचा काय प्रश्न आला त्यात? तुझी का एवढी घालमेल होते अश्या दळभद्री कपड्यांसाठी? कोणतं मेडल मिळणार आहे तुला?असं काय जगावेगळं अचिव्ह करणार आहेस तू असे दरिद्री कपडे घालून? ",निशाचे बाबा
"आणि इतर पुरुष बघतात ते दूषित नजरेने बघतात तो त्यांचा प्रश्न नाही गधडे तो आपलाच प्रश्न असतो.",निशाची आई
"पुरुष तर घालतात वाटेल ते कपडे",निशा
"क्काय म्हणजे नचिकेत ने टॅंक टॉप आणि शॉर्टस घातले होते की वन पीस घातला होता की मिनिस्कर्ट की पाठ उघडं टाकणारं ब्लाउज घातलं होतं? ईsssकिती भीषण दिसत असेल तो! नाही?",निशाची आई
"अगं नाही तो शर्ट पॅन्ट मध्येच होता पण पुरुष घालतातच न बरमुडा वगैरे ते म्हणतेय मी",निशा
"अगं पुरुष जे जे करतात ते ते करायचंच असा अट्टाहास आपण स्त्रियांनी केला तर खरंच शक्य आहे का ते? आता तुझे बाबा दाढी करतात उद्यापासून मी सुद्धा करायला लागू का दाढी? काहीतरीच बोलते निशा तू! स्त्री आणि पुरुषाच्या शरीरात फरक नाही का? बरं पुरुष waxing न करता बरमुडा घालतात. मग शॉर्टस घालणाऱ्या स्त्रिया का waxing करतात. त्याबाबतीत त्या का पुरुषांसारखं करत नाही.",निशाची आई
निशा निरुत्तर झाली होती.
"बघ हे संस्कृत सुभाषितांचं पुस्तक काय लिहिलंय बघ!
कुलवधू अंगानी गोपयती म्हणजेच कुलवधू लपवी अवयव:
अर्थात कुलीन घराण्यातल्या स्त्रिया शरीर झाकतात आधुनिकतेच्या नावाखाली कुलहीन स्त्रियांप्रमाणे उघडं टाकत नाही. कळलं! आपलं घराणं नचिकेतचे घराणे कुलीन आहेत. एका कुलवंत घरातून दुसऱ्या कुलवंत घराण्यात तू जाणार आहेस. नचिकेत एक कुलीन पुरुष असल्याने त्याने तुला असे दरिद्री कपडे घालू नको म्हंटल.",निशाचे बाबा
"मग टिव्हीत आणि इतरत्र सगळीकडेच बऱ्याच स्त्रिया असे कपडे घालतात!",निशा
"त्या कुलहीन स्त्रियांना खुशाल घालू दे! त्यांच्या नादी कुठे लागता. त्या कमी कपडे घालण्याचे काही न काही निरर्थक कारणं देतच राहतात. टीव्ही सिनेमात तर स्त्री देहाचा बाजार मांडलाय त्यावर च ते सगळे प्रोड्युसर डायरेक्टर हिरो हिरोईन पैसे मिळवतात. स्त्री देहाचं भांडवल केलंय त्यांनी. मग उगीच भूमिकेची गरज होती असे दांभिक कारणं देतात. मुळात त्यांना सगळ्या पुरुषांनी आपल्याकडे बघावं असं वाटतं म्हणून बिचाऱ्या त्या करतात. आणि कुलहीन पुरूषांना तश्या बायका बघायला आवडतात. अश्या स्त्रियांना पुरुषांनी बघितल्याशिवाय आत्मविश्वासच वाटत नाही. जगाला आपली बुद्धिमत्ता दाखवून देण्यापेक्षा आपलं शरीर दाखवण्यातच त्या धन्यता मानतात आणि अशाच स्त्रियांमुळे स्त्री ही पुरुषांच्या मनोरंजनाची वस्तू म्हणून लेखल्या जाते. अशाच तथाकथित मॉडर्न स्त्रियांमुळे नराधम पुरुषांच्या भावना उत्तेजित होतात आणि ते निरागस लहान मुला-मुलींशी ते प्रतिकार करू शकत नाही म्हणून कुकर्म करतात.",निशाची आई
"पण बॉलीवूड च्या एका अभिनेत्याने तर त्याच्या नातींना पत्र लिहिलं त्यात त्याने लिहिलं होतं की स्कर्ट च्या लांबीवर चारित्र्य ठरत नाही",निशा
"ते त्याने त्याच्या नातींसाठी लिहिलंय ते त्यांनाच फॉलो करू दे. उत्तम अभिनेता आहे तर त्याचा अभिनय बघावा त्यांच्याकडून आयुष्याचे धडे घेतलेच पाहिजे असं काही नाही.
मुळातच हे कमी कपडे घालण्याचे थेरं पाश्चात्यांचे आहे ज्याचं अनेक जण अंधानुकरण करतात. पाश्चात्यांचे वेळ पाळणे, स्वतः चे काम प्रामाणिकपणे करणे, देशाशी भ्रष्टाचार न करणे हे काही गुण सोडले तर त्यांच्या संस्कृती कडून काहीच घेण्यासारखं नाही. संपूर्ण भोगवादा वर आधारित अशी हिणकस संस्कृती आहे ती. वाटेल तसे वागणे काहीही करणे अशी बेछूट स्वैराचारी संस्कृती आहे ती. त्या संस्कृतीत आई वडिलांना वर्षातून एकेक दिवस देऊन देतात मदर्स डे फादर्स डे करुन आणि बाकी सगळे दिवस नुसता भोगवाद आणि चंगळ वाद असतो. आपल्याकडे जेव्हा सात आठ वर्षाचे मूल आजी आजोबांकडून पंचतंत्र कथा बोधकथा ऐकत असतात तेव्हा ते मुलं डेटिंग करत असतात. जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त भोगवाद करत राहायचा हीच त्यांची संस्कृती आहे.
आपली भारतीय संस्कृती इतकी परिपूर्ण आहे की आपल्याला कोणाच्याच संस्कृती तुन काहीही घेण्याची गरज नाही.",निशाचे बाबा
"पण हे चित्रकार तर अर्धे कपडे घातलेल्या किंवा कपडेच न घातलेल्या स्त्रीचे पेंटिंग काढतात त्याचे प्रदर्शनं भरवतात त्यात त्यांना सौन्दर्य दिसते ते कसं काय?",निशा
"मुळात असं सौन्दर्य सौन्दर्यच नाही जे मनात विकार निर्माण करेल. नैसर्गिक सौन्दर्य बघ झाडं फुलं नद्या चन्द्र चांदण्या, पक्षी ह्यांना बघून प्रसन्न वाटते आणि विकारसुद्धा निर्माण होत नाही हे खरं सौन्दर्य. अनावृत्त स्त्री देहात ज्यांना सौन्दर्य दिसते ते लोकं दांभिक असतात स्वतःच्या अपूर्ण इच्छा ते त्या कलेतून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. चित्रकार चित्रातून, शिल्पकार लेण्यातून,लेखक साहित्यातून. मग ते दृष्टिकोन perspective च्या गोष्टी करून इतर खरं बोलणाऱ्या लोकांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही किती मोठे आमची विचारसरणी किती मोठी इतरांची किती खालची मेंटलिटी आहे हा आव आणतात. जेव्हा हे चित्रकार,शिल्पकर,साहित्यिक आपल्या कलेचं प्रदर्शन भरवतात तेव्हा ते बघणारे प्रेक्षक यांच्या डोक्याला ब्रेन मॅपिंग मशीन किंवा एखादं भावना ओळखणारे मशीन लावले तर आपल्याला कळून येईल की ते सौन्दर्य दृष्टीने बघतात की आणखी कोणत्या. इतरांचंच कशाला ह्याच चित्रकार शिल्पकार साहित्यिक आणि आणखी जे कोणी असतील ते त्यांच्या डोक्याला जर असं मनातील भावना ओळखणारे मशीन लावले तर कळेल त्यांचा खरा perspective ",निशाचे बाबा
"पण माझ्या मैत्रिणी मला काकुबाई म्हणून चिडवतात त्या मला मग एकटं पाडतात.",निशा
"खुशाल म्हणोत त्या काकुबाई आंटिजी किंवा बेहेनजी. ह्या काही शिव्या नाही वाईट वाटून घ्यायला. जेव्हा त्यांना कळेल की तू कितीही चिडवलं तरी चिडत नाही तेव्हा त्या आपोआप गप्प बसतील. त्या तुला काकुबाई म्हणतात तर तू त्यांना पुतण्या बाई म्हण. त्यांचे दात त्यांच्याच घशात घाल. मला तर फारच कमाल वाटते बाई! कमी कपडे घालणाऱ्या स्त्रियांना कमी कपडे घालू नका म्हंटल तर त्या लगेच 'कोणी कोणते कपडे घालावे हे आपण सांगू नये'असं म्हणतात मग तोच नियम एखादी स्त्री पूर्ण कपडे घालत असतील तेथे त्या का नाही लावत? लगेच कशाला काकुबाई म्हणतात? हा बरा न्याय आहे! एकाला एक दुसऱ्याला दुसरा. मी तर म्हणते अश्या मूर्ख मैत्रिणी असण्यापेक्षा तू एकटीच राहा तेच चांगलं आहे. काही दिवसांनी तुला तुझ्याचसारखी काकुबाई नक्की भेटेल एकटी पडणार नाहीस तू! मला खात्री आहे. अश्या आकुबाई मैत्रिणींपेक्षा काकुबाई मैत्रीण चांगली.",निशाची आई
"मला सांग तुला इतर पुरुषांना आकर्षित करायचं आहे का? मग तू घाल लहान कपडे. चारपाच वेळा तू आणि नचिकेत भेटलात त्यात तुमच्यासमोरून कमी कपड्यात अनेक स्त्रिया गेल्या असतील त्यांच्याकडे नचिकेत अगदी देहभान हरपून बघत राहतो असं तुला आढळलं का?",निशाचे बाबा
"नाही तो असं कोणाचकडे बघत नाही त्याचं फक्त माझ्याचकडे लक्ष असते. आणि मला इतर पुरुषांना का आकर्षित करावं वाटेल? तसं मला मुळीच वाटत नाही. मला फक्त नचिकेत मध्येच इंटरेस्ट आहे. ",निशा
"पण त्याच्याशी तर तू भांडून आली",निशाची आई
"हो न! एका फालतू कारणासाठी उगीच मी त्याच्याशी भांडली. भांडताना तर मी हे सुद्धा म्हणाली की तू अठराव्या शतकातला आहेस मी 2021 मधली आहे",निशा
"त्यावर तो काय म्हणाला?",निशाचे बाबा
"तो म्हणाला की मला जेव्हा अठराव्या शतकातील कोणी भेटेल तेव्हाच मी लग्न करेल. पुढे तो असंही म्हणाला की शतक अठरावं असो की अठ्ठावीसावं आयुष्यातील तत्त्वं आणि मूल्ये कधीच बदलत नाहीत.",निशा
"वा वा वा! जावई असावा तर असा! मुळातच स्त्रियांना कोणते कपडे घालावे हे इतरांनी सांगावं लागणं त्यांचं त्यांना न समजणं हेच मोठं दुर्दैव आहे आणि असे अनेक मूर्ख पुरुष मी बघितलेत की अर्धे कपडे घातलेल्या त्यांच्या बायकांकडे जेव्हा इतर लोकं माना वळवुन बघतात त्यांना फारच भूषणास्पद वाटते.जग कितीही बदलो स्त्रियांनी पुरुषांकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि पुरुषांनी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन कधीही बदलणं शक्य नाही.
जगात पुराणात एकच पुरुष होऊन गेला शुकमुनी ज्यांना स्त्री आणि पुरुष भेद वाटायचाच नाही कारण ते शरीराच्या पलीकडल्या आत्म्याला बघायचे. सद्यस्थितीत असे पुरुष आहेत का सांग? सर्व्हे केला तरी असे सापडणार नाहीत. 'माणसाला माणसाने माणसासारखं बघावं मग ती स्त्री असो की पुरुष' ह्या सगळ्या आदर्श गोष्टी आहेत ज्या ऐकायला चांगल्या वाटतात आणि असायला सुद्धा हव्यात परंतु त्या आहेत का? वास्तव काय आहे स्त्री दिसली की तिच्याकडे दूषित नजरेनेच बघितल्या जाते मग ती बालिका असो किशोरवयीन असो तरुण असो की वयस्कर असो हयाला काही अपवाद असतील पण फार थोडे. पूर्ण कपडे घातलेल्या स्त्रीकडे सुद्धा दूषित नजरेने बघतात पण कमी कपडे घातलेल्या स्त्रीकडे जास्त दूषित नजरेने बघितल्या जाते. कारण त्यामुळे पुरुषांमध्ये असणाऱ्या नैसर्गिक भावना उफळतात उत्तेजित होतात आणि त्यातून बरेच दुष्कृत्य घडतात. एका समाजात आपण राहतो त्यामुळे आपली सुद्धा सामाजिक बांधिलकी असते. आपल्या कृत्यामुळे समाजात वाईट परिणाम होत असतील तर ते आपण करू नये. स्त्रियांनी कोणते कपडे घालावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न नसून सामाजिक प्रश्न आहे ह्याचं त्यांनी भान ठेवायला हवं कारण त्यांच्या पोशाखामुळे फक्त त्यांच्यावर नसून संपूर्ण समाजावर परिणाम होतो. यावर स्त्रिया म्हणतील की आम्ही कोणतेही कपडे घालू तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला तर ते योग्य आणि आदर्श जरी असलं तरी प्रॅक्टिकली फारच कठीण आहे त्यापेक्षा स्त्रियांनी संपूर्ण कपडे घालणं कधीही सोपं आहे. असो. इतरांशी मला काही देणंघेणं नाही तू माझी मुलगी आहे म्हणून एवढं सांगितलं.
आता बघ निशा तुला नचिकेत शिवाय इतर पुरुषांमध्ये रस नाही आणि त्यालाही तुझ्याव्यतिरिक्त इतर स्त्रियांमध्ये रस नाही ह्यातून तुम्ही दोघे कुलीन आहात हेच सिद्ध होते. आता तू त्याला फोन कर माफी माग. मला खात्री आहे तो उमद्या मनाचा आहे. तो तुला मोठ्या मनाने माफ करेल.", बाबा
निशाने तिच्या बाबांचं ऐकलं आणि नाचिकेतला फोन करून माफी मागितली. त्यानेही माफ केलं आणि काही दिवसांनी नचिकेत-निशाचे धूम धडाक्यात लग्न झालं.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆