यद्यपी शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम नाचरणीयम Kalyani Deshpande द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

यद्यपी शुद्धम लोकविरुद्धम ना करणीयम नाचरणीयम

अर्थ: जरी तुमचं आचरण शुद्ध असेल आणि विचार शुद्ध असतील तरीसुद्धा तुमच्या वागण्यातून वेगळा अर्थ निघत असेल, सामाजिक सांस्कृतिक नियमांचं उल्लंघन होत असेल, तुमचं वागणं गैरसमज निर्माण करणारं असेल तर असं करू नका आचरणात आणू नका.

कथा:- ऋचा आणि ऋत्विक हे बाहेर रेस्टॉरंट मध्ये त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त जेवायला आले होते.

वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत ते ऑर्डर येण्याची वाट बघत बसले होते. ऋत्विकने दोघांच्याही आवडीचे पदार्थ मागवले होते.

एकंदरीत ते दोघेही खूप खुश होते. जेवणानंतर त्यांचा एखादा सिनेमा बघण्याचा प्लॅन होता.
ऋचा ऋत्विकला काहीतरी सांगतच होती तेवढ्यात ऋत्विकच्या खांद्यावर कोणीतरी जोरात थाप मारली त्याने लगेच वळून बघितलं.

"अरे बोक्या ओळखलं की नाही मला!",एक साधारण ऋत्विकच्याच वयाची स्त्री त्याच्याकडे बघत डोळे मिचकावत म्हणाली.

"वा वा! ओळखलं नाही तर काय वैजू! तशीच स्लिम आहेस हं" तिला तो नखशिखांत न्याहाळत म्हणाला. "ये ये हो जॉईन आमच्यासोबत",असं म्हणत त्याने तिला खांद्याला धरून बाजूच्या खुर्चीत बसवलं.

हे सगळं ऋचा त्रासिक मुद्रेने बघत होती. तिच्याकडे एक कटाक्ष टाकत वैजू डोळे मोठे करून म्हणाली,"ऐ पण तुझ्या बायकोला आवडेल का?"

"हो हो का नाही! बऱ्याच दिवसांनी आपण भेटलो! कॉलेजचे काय दिवस होते. कुठे असते तू सध्या? लग्न वगैरे केलं की नाही? ",ऋत्विक अतिउत्साहात बोलत होता.

"हो हो केलं ना म्हणजे काय तुझ्यासाठी झुरत बसेन असं वाटलं की काय तुला!",तिने त्याच्या हातावर टाळी देत म्हंटल

तेवढ्यात तिथे एक गृहस्थ आला.
"मिट माय हब्बी! वसंत",वैजुने तिच्या नवऱ्याशी ऋत्विकची ओळख करून दिली.

हस्तांदोलन वगैरे झाल्यावर वसंत सुद्धा त्यांच्यात जॉईन झाला. इकडे ऋचाला कधी एकदा घरी जातो असं झालं होतं. इथे ऋत्विक आणि वैजुच्या गप्पांना उधाण आलं होतं. वैजू बोलता बोलता ऋत्विकच्या मांडीवर थाप मारत होती कधी त्याच्या डोक्यावर टपली मारत होती तर ऋत्विक बोलता बोलता वैजूचा गालगुच्चा घेत होता तर वैजू कधी त्याच्या दंडाला चिमटा घेत होती. वैजूचा हब्बी वसंत केविलवाणा हसत इकडे तिकडे बघत होता.

ऋचा चा ताबा सुटला तिला तिथे थांबणं असह्य झालं तिने तिथेच त्या दोघांना सुनावलं आणि तरातरा घरी एकटीच परतली.

तिच्या सासू सासऱ्यांनी तिला विचारलं तेव्हा तिने सगळं सांगितलं. आणि ती तिच्या खोलीत निघून गेली. इकडे मैत्रिणीसमोर आपला अपमान झाला म्हणून ऋत्विक घरी रागातच आला होता. आल्या आल्या त्याने ऋचाशी भांडण सुरू केलं.

बाहेर ऋत्विकचे आईबाबा त्यांचं भांडण थांबायची वाट बघत बसले परंतु त्या दोघांचे भांडण वाढतच चालली होते म्हणून मग त्याचे आई बाबा त्यांच्यात पडले. त्यांनी त्या दोघांना शांत केलं आणि दुसऱ्यादिवशी ह्या विषयावर आपण बोलू असं सांगितलं.

दुसऱ्या दिवशी ऋत्विक ऋचा एकमेकांशी बोलत नव्हते.

ऋत्विकच्या बाबांनी त्याचीही बाजू ऐकून घेतली.

"बाबा ही ऋचा एवढी अडाणी असेल असं वाटलं नव्हतं मला! किती संकुचित विचारसरणी आहे हिची! मी जरा माझ्या मैत्रिणीशी हसत खेळत बोललो तर ही तिथे तमाशा करून आली. "

"मी ऐकलं बेटा तिचीही बाजू ऐकली आणि तुझी सुद्धा बाजू ऐकली. मला तरी ऋचा चं म्हणणं पटलं. तू आणि तुझ्या मैत्रिणीने असं एवढं उत्तेजित होऊन अंगचटीला यायची गरज नव्हती. "

"बाबा तुम्ही सुद्धा असाच विचार करता कमाल आहे! अहो वैजू आणि मी वी आर जस्ट फ्रेंड्स! आता मी एखाद्या मित्राला जर खूप दिवसांनी भेटलो असतो तर असाच वागलो असतो ना मग तेव्हा तुम्हाला काही वाटलं असतं का? नाही! मग वैजू स्त्री आहे म्हंटल की लगेच कसा काय तुम्हा लोकांचा दृष्टिकोन बदलतो"

"तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे वैजू स्त्री असल्यानेच दृष्टिकोन बदलतो. कितीही आधुनिक काळ आला तरी स्त्री आणि पुरुषांमध्ये आणि त्यांचा एकमेकांना बघण्याच्या दृष्टिकोनात कायम फरक राहणारच आहे. आत्ताचच उदाहरण घेतो. आता आपण बाल्कनीत बसलो आहे. रस्त्यावरून आत्तापर्यंत तीन पुरुष आणि एक स्त्री असे एका नंतर एक असे काही वेळेच्या अंतराने गेले. त्यात तीन पुरुष जात असता तू त्यांना बघून न बघितल्या सारखं केलं परंतु जेव्हा स्त्री जात होती तेव्हा तू लक्षपूर्वक ती शेवटच्या कॉर्नर ला वळे पर्यंत मधून मधून बघत राहिला. जर तुझा स्त्री आणि पुरुषाकडे बघण्याचा दृष्टिकोन सारखाच असता तर त्या स्त्रीकडेही तू बघून न बघितल्यासारखं करायला हवं होतंस"

बाबांचं बोलणं ऐकून ऋत्विक थोडा खजील झाला.

"साधं दैनंदिन आयुष्यातील उदाहरणं आठव, टिव्हीत, रस्त्यात, समारंभात, ऑफिसमध्ये पुरुष पूर्ण कपड्यात असतो पण स्त्री असते अर्ध्या कपड्यात जर स्त्री पुरुष समानता असती तर दोघांनी पूर्ण कपडे घालायला हवे होते. तर माझ्या म्हणण्याचा हा उद्देश आहे की तुमची आजकालची पिढी हवं तेव्हा स्त्री पुरुष एक दृष्टिकोन ठेवा म्हणते आणि हवं तेव्हा एक दृष्टिकोन ठेवत नाही. आधुनिकतेची ढाल पुढे करून आजची तरुण पिढी स्वैराचाराला पाठिंबा देतेय. मैत्रीण आहे तर तिच्याशी बोलायला काहीच हरकत नाही पण तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस असताना तू ऋचाकडे पूर्ण दुर्लक्ष करून गप्पा मारत बसला. कधीही लक्षात ठेव कितीही मैत्रीण असली तरी ती बाहेरची व्यक्ती आहे आणि ऋचा ही तुझी सहचारिणी आहे. तिच्यासोबत तुला संसार करायचाय. मैत्रिणीसाठी तिच्याशी भांडणं मूर्खपणा आहे. आपल्या संस्कृत मध्ये खूप छान सुभाषित आहे 'यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम नाकरणीयं नाचरणीयं' म्हणजे जरी तुमचं मन शुद्ध असेल पण तुमचं आचरण समाजाच्या नियमात बसत नसेल तर तसं वागू नका. आपल्या संस्कृतीत नात्यांचे काही नियम आहेत त्याचं उल्लंघन व्हायला नको. आधुनिकता म्हणजे अंगचटीला येणे कमी कपडे घालून देहप्रदर्शन करणे नव्हे. वैजू परकी असल्याने तिला मी काही सांगू शकत नाही पण तू माझा मुलगा असल्याने मी हे तुला सांगितलं,बाकी तू शहाणा आहेच म्हणा!"

ऋत्विक ने बराच वेळ विचार केला आणि त्याला त्याच्या बाबांचं म्हणणं पटलं. त्याने ऋचाची माफी मागितली आणि ऋचाने सुद्धा कबूल केलं की यापुढे तिला काही पटलं नाही तर तडका फडकी एकटी निघून येण्यापेक्षा काय जे आहे ते ती घरी येऊन स्पष्ट करेल.

★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★

कथा 2:-

एका शहरात एक मुलगा आणि मुलगी शेजारी शेजारी राहत होते. मुलीचे घरातले कोणीतरी दवाखान्यात भरती होते आणि त्यांच्यासाठी तिला रोज डबा घेऊन जावा लागत असे. तिच्याजवळ वाहन नसल्याने तिची फार तारांबळ उडत असे. ह्या शेजारी राहणाऱ्या मुलाला तिची कणव वाटली आणि तो रोज तिला त्याच्या सायकल वर डबल सीट दवाखान्यात सोडू लागला. जेव्हा ते रोजच जायला लागले तेव्हा आजूबाजूच्या काही शेजार पाजारच्यांना खटकू लागलं. काही जण म्हणू लागले त्याच्या मनात पाप नाही हो तो फक्त तिच्या मदतीसाठी करतो. काही जणांनी त्याला सुचवलं एक तर तू तिला सायकल देऊन तू पायी जा नाहीतर तिला डबल सीट बसवण्यापेक्षा तूच का डबा देत नाही दवाखान्यात. जरी तुझं मन शुद्ध असलं तरी असं वागणं बरं दिसत नाही. 'यद्यपि शुद्धम लोक विरुद्धम नाकरणीयं नाचरणीयं'

पण त्या दोघांनीही काही ऐकलं नाही आमचं मन शुद्ध आहे असं ते म्हणत राहिले आणि डबा द्यायला डबल सीट जात राहिले.

एक दिवस असेच डबा द्यायला गेले असता काय त्यांच्या शुद्ध मनात आलं काय माहीत डबा राहिला जागच्या जागीच हे दोघे सायकल वर दवाखान्यात जाण्याऐवजी कुठे गेले काय माहित अजूनही पत्ता नाही त्यांचा. त्या मुलीच्या नातेवाईकांना वाटलं कुठून ह्या मुलीला डबा आणायला लावला.
★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆★☆