पॉवर ऑफ अटर्नी - भाग 14 - अंतिम भाग Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पॉवर ऑफ अटर्नी - भाग 14 - अंतिम भाग

पॉवर ऑफ अटर्नी  भाग १४  

भाग १३  वरुन पुढे  वाचा

“आई,” किशोर खट्याळ पणे म्हणाला, “ह्या तर दोनच कृपा झाल्या. तिसरी कृपा पण झाली आहे त्याचा  उल्लेख नाही केलास ?”

“आता हे काय नवीनच ? तूच सांग.” माई म्हणाल्या. विभावरी सुद्धा त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पहात होती.

“अग तुझ्या लक्षात कसं येत नाहीये ? विभावरी सारखी इतकी सुंदर, गूणी आणि लोभस सून कशी मिळाली तुला ? हा गोंधळ झाला म्हणूनच न. आता ही कृपाच नाही का ?”  किशोर मिष्कील स्वरात म्हणाला.

हे ऐकून विभावरीच्या गालावर गुलाब फुलले नसते तरच नवल. किशोर तिच्याकडे अनिमिश नजरेने बघत होता आणि ते बघितल्यावर ती अजूनच लाजली आणि तिथून बेडरूम मधे पळूनच गेली. किशोर आणि माई यांना हसता हसता पुरेवाट  झाली.

आता सगळ्यांच्याच मनावरचं ओझं उतरलं होतं. माईंनी काही गोड करायचं म्हणून खीर केली होती. रात्री उशिरा पर्यन्त गप्पा चालल्या होत्या. शेजारच्या सुलभा काकू पण सामील झाल्या त्यांच्या गप्पांमधे. सगळं कसं आनंदाचं वातावरण होतं.

दोन दिवसांनी किशोरला मॅनेजर नी दुपारी सर्व कामं संपल्यावर बोलावलं. किशोर गेल्यावर त्यांनी सांगितलं की

“चौकशी समिती चा रीपोर्ट आला आहे. आणि त्यांनी आपल्या दोघांनाही क्लीन चिट दिली आहे. So now enjoy. घरी जाऊन सण साजरा करा.”

किशोर आ वासून बघतच राहिला. त्याला अत्यानंद झाला होता. त्यांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. पण शेवटी बोलला

“पण साहेब, हे घडलं कसं ? तुम्हाला कसं कळलं ?”

“अरे रीजनल ऑफिस मधे माझा मित्र आहे, त्यानी सांगितलं. अजून officially declare व्हायचंय, पण पक्की खबर आहे. जाहीर होईपर्यन्त कोणाला सांगू नकोस असं म्हणाला. पण तुला म्हणून सांगितलं. तू मात्र अजून कोणाला सांगू नकोस.” – मॅनेजर

“साहेब खूपच चांगली बातमी दिलीत तुम्ही. मनावरचं ओझं उतरलं बघा. काही डिटेल्स कळले का ?” किशोर म्हणाला.

“आपण दोघांनी सर्व काही प्रोसीजर प्रमाणेच केलं आहे असा निष्कर्ष काढला आहे समितीने. चूक आपल्या वकिलांची आहे. त्यानी पॉवर ऑफ अटर्नी ची नीट कसून चौकशी करायला पाहिजे होती ती केली नाही असा त्यांच्यावर ठपका ठेवला आहे. बँक आता त्याला पॅनलवरुन काढून टाकेल आणि त्यांच्या वर legal कारवाई पण करण्याची शक्यता आहे.” मॅनेजर नी डिटेल्स दिले.

“आपल्याला अधिकृत रित्या केंव्हा कळेल ?” – किशोर

“एक दोन दिवसांत, साहेबांची सही झाली की कॉपी मिळेल.” – मॅनेजर

“मग आज घरी सांगू की नको ? पण साहेब, ही बातमी लपवणं फार अवघड आहे हो.” किशोर नी आपली अडचण सांगितली.

“इतके दिवस धरलास, तसा अजून एक दोन दिवस धीर धर.” -मॅनेजर.

पण किशोरला धीर धरावाच लागला नाही. त्याच संध्याकाळी रीजनल ऑफिस मधून फॅक्स आला. मग काय, पूर्ण बँके मधे बातमी पसरली. सर्वांनी किशोरचं आणि मॅनेजरचं  अभिनंदन केलं. किशोर आणि मॅनेजर नी सर्वांना मिठाई आणि चहा  दिला. किशोरवरचं बालंट दूर झालं म्हणून सर्वांनीच आनंद व्यक्त केला.

मग किशोरनी सानिका सापडल्याचं आणि पोलिस तिला आणायला हुबळी ला गेले आहेत हे सांगितलं.

“म्हणजे आता जर तिच्याकडे पैसे सापडले तर तू बँकेत ते भरू शकतो” – मॅनेजर

“हो नक्कीच, पण या सगळ्या गोष्टीला किती वेळ लागेल ते सांगता येणं कठीण आहे. बँकेने मला तो पर्यन्त EMI भरायची सवलत दिली तर फार बरं होईल. नाही तर प्रॉब्लेमच आहे.” किशोर म्हणाला  

“अरे नको त्याची काळजी करू, एवढं सगळं सुरळीत झालंय तर ते पण  होईल. मी स्वत: त्या साठी  प्रयत्न करेन. Have my word.” मॅनेजरनी आश्वासन दिलं.

संध्याकाळी किशोरनी विभावरीला फोन केला, आज येतेस का, असं विचारलं.

“का रे ? काय विशेष ?” विभावरी

“आता काय सांगू तुला, किती तरी दिवस झालेत, आपण भेटलो नाहीये, जीव किती आसुसला आहे तुला पहाण्यासाठी. ये न आज.” किशोरनी आपली व्यथा मांडली.  

“सेल्फी फोटो पाठवते. मग तर झालं ?” विभावरीनी खिजवलं आणि खुदकन हसली.

“ए हा काय चावट पणा आहे ? मी एवढ्या प्रेमाने बोलावतो आहे आणि तुला थट्टा सुचतेय. नकोच येऊस. पण मग असं म्हणू नकोस की मी तुला सांगितलं नाही म्हणून.” किशोरनी चेंडू तिच्या कडे टोलवला.

“अरे असा चिडतोस काय ? येते न मी. मला सुद्धा चैन पडत नाहीये. पण  तु काय सांगणार आहेस. आत्ताच सांग ना”  – विभावरी.

“तू ये तर खरं, मग सांगतो. फोन वर नाही सांगता येणार.” किशोर मुद्दा सोडायला तयार नव्हता.  

“बरं येते मी. आज खूप लोड आहे त्यामुळे थोडा उशीर होईल. चालेल न ?” विभावरीनी आपली अडचण सांगितली.   

“उशीर होणार असेल तर मी येऊ का घ्यायला ?” – किशोर

“नको. येईन मी.” – विभावरी.

“का ग, नको का ?” किशोर चा प्रश्न

“अरे, मी डायरेक्ट येईन. उशीर होणार आहे न, म्हणून हॉस्टेल वर जाणार नाही तिकडेच येईन. पण खरंच का काही महत्वाचं सांगायचय ? का आपलं असच काहीतरी सांगतो आहेस, मी यावी म्हणून.”  विभावरी म्हणाली.  

“तुझं येणं तर माझ्या साठी महत्वाचं आहेच. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली आहे,  ती तुझ्या बरोबर शेअर करायची आहे. किती वाट पाहायला लावतेस, लवकर ये न.” किशोरनी तक्रारीचा सुर लावला.

“काम आटोपलं की लगेच निघते. बरं ठेवू आता ?” किशोरची आतुरता पाहून विभावरी मनोमन खुश झाली.

किशोर ला पण थोडा उशीर झालाच. त्याच्या बँकेतल्या लोकांनी त्याला सोडलं नाही. त्याच्या कडून एक छोटीशी पार्टी त्यांनी उकळलीच. किशोर त्यामुळे जेंव्हा घरी पोचला तेंव्हा विभावरी आलेली होती. त्याला आश्चर्यच वाटलं. म्हणाला

“अग तुला उशीर होणार होता न ?”

“उशीर होणार होता, पण  मीटिंग लवकर संपली. मग काय लगेच इकडेच आले. तुझीच वाट पाहत आहोत. तू काय सांगणार होतास लवकर सांग उगाच उत्सुकता वाढवू नकोस.” विभावरी म्हणाली

मग किशोरनी फॅक्स ची कॉपी दाखवली. मग काय सगळंच वातावरण बदलून गेलं. किशोरवर कुठलाही ठपका ठेवण्यात आलेला नाहीये ही समजल्यावर माईंच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. आणि त्या पाहून विभावरीचे पण डोळे ओले झाले.

थोडा वेळ तसाच गेला. मग विभावरी म्हणाली

“हे फार बरं झालं. आता काकांचा विरोध असण्याचं काही कारणच उरणार नाही.”

“हो ग तू म्हणतेस तसंच होवो.” माई म्हणाल्या.

“आता परवा शनिवारी तू जाच काकांच्या कडे. आता फार उशीर नको. मला माझी सून लवकर घरात यायला पाहिजे.” – माई

“हो माई आता मला पण हॉस्टेल चा खूप कंटाळा आलाय.” विभावरी म्हणाली.

त्यानंतर दोन तीन घडामोडी लगोलग घडल्या.

एक म्हणजे सर्व ऐकून घेतल्यावर काकांचं समाधान झालं आणि काकांनी लग्नाला परवानगी दिली. आणि लवकरच किशोरच्या आईला भेटायला येऊ म्हणून सांगितलं.

दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांनी सानिकाला पकडल्यावर जी काही चौकशी केली त्यांची माहिती देण्यासाठी विभावरी आणि किशोरला बोलावलं.

“आम्ही सानीका  आणि तिच्या साथीदाराचे सर्व बँक अकाऊंट सील केले आहेत. २२ लाखांची रक्कम अजून शिल्लक आहे. पांच लाख कॅश जप्त झालेत, आणि बाकी १७ लाख त्यांना खात्या मधून काढायला वेळच मिळाला नाही. बाकीचे तेरा लाख त्यांनी खर्च केले. ते काही मिळणार नाहीत. आता त्यांच्या त्या सर्व अकाऊंट मधले व्यवहार थांबवले आहेत. ती आता कोर्टाच्या ताब्यात जाईल. केस चा निकाल लागल्यावर किशोरला ते पैसे मिळतील.” उत्तम रावांनी माहिती दिली.   

२२ लाख वापस मिळणार आणि बँकेचे कर्ज पूर्ण फिटणार हे ऐकल्यावर किशोर आणि विभावारी ला हर्ष वायु व्हायचाच बाकी होता. केंव्हा एकदा घरी जाऊन  माईंना ही बातमी देतो असं त्यांना झालं.

“काका आम्हाला सानिकाला भेटता येईल का ?” विभावरीने विचारले.

“काय करणार आहेस भेटून ?” उत्तम रावांनी उलट सवाल केला.

“माझी इतकी जिवा भावाची मैत्रीण, ती अशी का वागली हे कळायला पाहिजे न, म्हणून” – विभावरी.

“तसंही तुम्हाला पोलिस बोलावतीलच. शहानिशा करायला. कदाचित उद्याच बोलावतील तेंव्हा त्यांना request कर भेटू द्या म्हणून.” -उत्तमराव  

दुसऱ्या दिवशी, विभावरी आणि किशोर दोघांनाही पोलिसांनी बोलावलं. त्यांनी सानिकाला ओळखलं. मग विभावरीने विनंती केली की पाच मिनिटं भेटता येईल का म्हणून.

सानिकाचा चेहरा विदीर्ण झाला होता. तिच्या कडे बघवत नव्हतं. तिला बघून विभावरीच्या अंत:करणात कालवा कालव झाली. तिला तिची कणव आली.

“का ग असं करावस वाटलं तुला सानिका ?” विभावरीनी विचारलं.

आणि सानिका रडायलाच लागली. रडता रडताच तिने तिची कहाणी सांगितली.

सानिका जिथे काम करायची तिथे रामकृष्णा दुसऱ्या एका कंपनी चा माल घेऊन delivery द्यायला यायचा. हळू हळू ओळख झाली आणि ओळखीतून प्रेम फुललं. खूप मोठ मोठ्या बिझनेस ची आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांची स्वप्न दाखवली त्यानी सानिकाला. सानिकांचा त्याच्यावर विश्वास बसला. पण बिझनेस करायला पैसा लागतो तो काही त्यांच्या जवळ नव्हता. मग एक दिवस तो म्हणाला

“सानिका, पैशा कडे पैसा जातो. आता आपल्याजवळ पैसा असता तर तू मोटारीतून फिरली असतीस आणि मोठ्या घरात आपण राजा सारखे राहिलो असतो.” – राम

“अरे पण जेवढा आहे त्यातच सुरू कर न. माझ्या जवळ पांच हजार आहेत ते मी तुला देते. तुझ्याजवळ पण काही असतीलच न.” -सानिका

“अग असा पांच दहा हजारात बिझनेस थोडीच होतो ? लक्षात घे सानिका, लाखों रुपये लागतात.” – राम

“अरे इतके पैसे आपण कुठून आणणार ?” – सानिका

“माझ्या जवळ एक प्लॅन आहे, पहा तुला पटतो का ते.” – राम

“काय करायचं आहे ?” -सानिका

“तू ज्या फ्लॅट मध्ये राहते आहेस तो विकायचा. जे पैसे मिळतील त्यातून  धंदा उभा करायचा. मग काय पैसेच पैसे. चिंताच नाही”. -राम

“अरे पण तो फ्लॅट माझा नाहीये, विभावरीचा आहे. आपण कसा  विकणार ? जी वस्तु आपली नाही, ती कशी विकणार ?” सानिकाने गोंधळून विचारलं.

“ते सर्व तू माझ्यावर सोपव. तू फक्त फ्लॅट चे कागद पत्र मला आणून दे. बस.” राम नी आपली आयडिया सांगितली.

“विभा, मीच मूर्ख, त्यांच्या भूल थापांना बळी पडले. मी त्याला म्हंटलं की हे असं काही मी करणार नाही, तर म्हणाला की आपला बिझनेस चालू झाला की याच्या दुप्पट पैसे आपण विभावरीला परत करू. आपल्याला कोणाचे पैसे नकोत. ही फक्त तात्पुरती सोय आहे.  माझाही विश्वास बसला त्याच्या बोलण्यावर, मग मी  कपाटातून सर्व पेपर काढून त्याला दिले. मग त्यांनी कुठून तरी माझ्या नावाने खोटी power of attorney करून आणली आणि तेवढ्या वेळात घर विकत घेणारा पण शोधला. व्यवहार पण पूर्ण झाला. मग आम्ही तिथून निघालो. तो म्हणाला की कर्नाटकात हुबळीला त्याचे बरेच कॉन्टॅक्ट्स आहेत तिथे धंद्याची सुरवात करू. पण नंतर माझ्या लक्षात आलं की तो नुसताच ऐष आराम करतोय. मी त्याला विचारलं तर त्यांनी मला उडवा उडवी ची उत्तरं दिली. मग एक दिवस त्यानी माझा मोबाइल चालू केला. पण पोलिसांना ते कळलं आणि आम्ही पकडल्या गेलो. विभा तू काही तरी कर न, आणि मला सोडव. मी तुझी घोर अपराधी आहे पण प्लीज मला माफ कर.”

“ठीक आहे, सानिका मी बघते काही करता येत असेल तर, पण आता ही पोलिस केस झाली आहे आणि मला नाही वाटत की माझ्या हातात काही असेल असं. पण तरी मी प्रयत्न करते.” असं म्हणून विभावरी आणि किशोर तिथून निघाले.

बँकेला पण पोलिसांनी सगळी माहिती दिली होती आणि त्या आधारे बँकेने सुद्धा lenient view घेऊन किशोरला सांगितलं की निकाल लागून पैसे मिळाल्यावर, उर्वरित रक्कमेचा, एक रकमी भरणा करेन असं undertaking द्या, म्हणजे तो पर्यन्त EMI नेहमी प्रमाणे भरला तरी चालेल. किशोरनी तसं स्टॅम्प पेपर वर लिहून दिलं.

आता त्यांच्या लग्नाला कुठलीच अडचण नव्हती.

विभावरी आणि किशोर आता मागचं सगळं विसरून लग्नाच्या तयारीत गुंतले होते. एक वर्ष खूप मनस्ताप झाला होता पण आता दोघेही खुश होते. पुढच्या आयुष्याची स्वप्न रंगावत होते.

 

**** समाप्त *****

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.