Bhagy Dile tu Mala - 35 books and stories free download online pdf in Marathi

भाग्य दिले तू मला - भाग ३५








सुबहँ की अजाणसी
पाक लगना चाहती हु
मै मोहब्बत हु दिलबरो
दिलो पर राज करणा चाहती हु

स्वराच आयुष्य अचानक बदलू लागलं होतं. ती स्वतःच्याच नकळत हसू लागली होती. तिला खुश राहायला आता कुठलंच कारण लागत नव्हत. ती स्वतःहून माधुरीसोबत फिरायला निघत असे आणि नकळत हजारो गप्पा मारल्या जाऊ लागल्या. हळूहळू तिच्याही नकळत ती जुनी स्वरा परतू लागली होती. तिचा चेहरा तोच होता पण तिचे विचार बदलू लागले होते. स्वरा कायम आनंदी असायची पण जेव्हा कधी ती उदास असायची तेव्हा अन्वय काहीतरी कारण काढून तिला स्वतःच्या केबिनमध्ये बोलवायचा आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावर हसू परतायचं. हे सर्व अन्वयमुळे होत का? कदाचित हो. त्याने तिला आयुष्यात तीच स्थान मिळवून देण्याची शपथच घेतली होती फक्त स्वराला ह्याबद्दल माहिती नव्हत. ती तर स्वतामध्येच खुश राहू लागली होती. आधी अन्वय कसा असेल म्हणून ती घाबरली होती पण आता त्याच्या स्वभावाचा तिला अंदाज येऊ लागला आणि नकळत ती भीतीही नाहीशी झाली. आता तिच्या आयुष्यात पुन्हा प्रॉब्लेम येणार नाहीत म्हणून ती आनंदी राहू लागली होती.

असाच एक दिवस. आज ऑफिसमध्ये जास्त काम असल्याने अन्वय लवरकच ऑफिसला पोहोचला होता. त्याला अर्जेन्ट मेल करायचा होता त्यामुळे तो लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करत होता तरीही त्याला उशीर होऊ लागला. साधारणता साडे दहा वाजले होते जेव्हा तो ऑफिसच्या दारावर पोहोचला. आज त्याच आजूबाजूला देखील लक्ष नव्हतं. तो समोर चालतच होता की मागून आवाज आला," गुड मॉर्निंग सर!"

त्या आवाजाने त्याचे पाय जाग्यावरच थांबले. त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. अलीकडे त्याला त्या गोड आवाजाची इतकी सवय झाली होती की तो त्याच्या मनामनांत बसला होता. तो थांबलाच होता की स्वरा पुन्हा जवळ आली. तिने चेहऱ्यावरचा स्कार्फ काढला आणि हसत म्हणाली, " गुड मॉर्निंग सर! "

अन्वय क्षणभर तिच्याकडे बघत हसला. तीही त्याच्याकडे बघत होती. तिला बघितलं की अलीकडे तो कुठेतरी हरवून जायचा. तिला ते समजलं असत तर त्याने नक्की मार खाल्ला असता म्हणून हळूच तिला बघून उघडलेलं तोंड बंद करत तो म्हणाला, " गुड मॉर्निंग मिस टॉपर!! "

आता दोघेही एक एक पाऊल टाकत समोर जाऊ लागले. अन्वयच केबिन समोरच होत तर स्वरा आपल्या केबिनकडे वळू लागली. अन्वयला काय झालं माहीत नाही तो जाग्यावरच थाम्बत म्हणाला," मिस टॉपर! "

त्याचा आवाज ऐकताच ती जागीच थांबली आणि मागे वळत म्हणाली," काय सर? "

अन्वय थोडा उदास चेहरा करत म्हणाला, " तुम्हाला एक मेल येईल बहुतेक आज!! "

ती थोड्या गोंधळात पडली होती. काही वेळ विचार करत म्हणाली, " कसला मेल आणि कुणाचा? "

तो पुन्हा हसत म्हणाला, " प्रिन्सिपॉल सरांचा! त्यांना मी तुझी तक्रार केलीय की तू माझी जागा घेतलीस तेव्हा ती मला परत देण्यात यावी. आता कधीही तुला मेल येईल की मिस स्वरा अन्वयला त्याची जागा परत द्या. द्याल ना परत? "

स्वरा क्षणभर त्याच बोलणं ऐकून हसलीच. अन्वय असाच होता. कधी कधी अस काही बोलून द्यायचा की स्वराला हसू आवरत नव्हतं. तरीही हसू आवरत ती म्हणाली, " सर नाही दिलं तर? "

अन्वय आता हसतच उत्तरला, " मग माझ्याकडे मोर्चा काढण्याशिवाय पर्याय नाही. हमारी मांगे पुरी करो. तुझ्या घरासमोर धरणा देईन बर मी! "

स्वराला त्याच बोलणं ऐकून हसू आवरत नव्हतं तर तीच हसू बघून अन्वय खुश झाला होता. तेवढ्यात काका बाहेरून आले आणि दोघेही धावत पळत आपल्या केबिनला पोहोचले. आज ऑफिसला येताच येताच स्वराचा मूड छान झाला होता. तिने नेहमीप्रमाणे बाप्पा चे दर्शन घेतले आणि आनंदातच कामाला सुरुवात केली. इकडे तो आपल्या केबिनला पोहोचला. बॅग बाजूला ठेवली आणि तिच्याकडे बघू लागला. तीच हसन बघून तो हरवला होताच की त्याचा मोबाइल वाजला. दिल्ली वरून तो फोन होता. तो फोन बघताच त्याला मेलची आठवण आली आणि तो रुसत म्हणाला," मिस स्वरा काय वेड लावलं तुम्ही मला? एक काम लक्षात राहत नाही. बहुतेक तुम्ही मला वेड बनवून सोडणार आहात! अस नाही करायचं हा? मी वेडा झालो तर तुमच्यावर प्रेम कोण करेल? "

ती क्षणभर हसली आणि तिला बघून तो लॅपटॉपवर बसला. त्याने पटापट मेल टाइप केला आणि पुन्हा एकदा चेअरवर निवांत बसला. आज दिवसभरात त्याला कोणते काम आहे ह्याचा त्याने विचार केला आणि हळूच गालात हसला. त्याने पटकन बाजूला असलेल्या लँडलाइनवरून कॉल केला. समोरून स्वरा हळूच उत्तरली, " काही हवंय का सर? "

अन्वय आता थोडा खडूस होत म्हणाला, " मिस टॉपर ! आज मला तुमची हुशारी बघायची आहे सो लगेच माझ्या केबिनला या. "

ती समोर काही बोलणार त्याआधीच त्याने फोन ठेवून दिला. आता ह्याच हे काय नवीन म्हणून स्वराने हसतच फोन ठेवला आणि काहीच क्षणात त्याच्या केबिनसमोर पोहोचली. तिने हसतच विचारले, " मे आय कम इन सर? "

अन्वय जरा खडूस होत म्हणाला, " प्लिज कम इन! "

तो खर तर तिचीच वाट बघत होता पण ती दिसताच त्याने लॅपटॉप मध्ये काम करत असल्याचं दाखविल. स्वरा मध्ये आली आणि येताच तिने प्रश्न केला," सर काय म्हणालात तुम्ही? कसली हुशारी बघायची आहे ? "

अन्वय पटकन चेअरवरून उठला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता त्यामुळे तिनेही क्षणभर हसन बंद केलं. तो थोड्या वेळ ऑफिसमध्ये इकडून तिकडे चकरा मारत होता तर ती त्याला बघत होती. काही क्षण तसेच शांततेत गेले आणि अन्वय म्हणाला, " मिस टॉपर सिट ऑन माय चेअर. आय हॅव सम प्रॉब्लेम अँड यु हॅव टू सॉल्व धिस."

ती क्षणभर त्याच्या चेअरवर बसू की नको विचार करत होती पण पुन्हा त्याने रागावून बघितले आणि ती धावतच त्याच्या चेअर वर बसली. आता तो समोर काय बोलतो ह्याचा विचार करतच ती लॅपटॉप कडे बघत होती आणि तो थोडा रागात म्हणाला," मला ते कोडिंग जमत नाहीये ते थोडं करून द्या. आज डोकं काम करत नाहीये आणि मला ते काम आजच करून त्याची रिपोर्ट दिल्लीला पाठवायची आहे."

तिने क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि कामाला सुरुवात केली. ती काहीच क्षणात एकाग्र झाली. ती काम करत असली की तीच कुणाकडे लक्ष नसत हे त्याला माहिती होत पण आज ते प्रत्ययास येत होतं. ती काम करत होती आणि अन्वय तिला बघत होता. पंधरा-वीस मिनिटे झाली होती तीच त्याच्याकडे लक्ष नव्हतं आणि ती हसतच उत्तरली, " डन सर! "

तसाच तो तिच्या मागे पोहोचला आणि हळूच म्हणाला, " सांगा बर कस केलं तर? "

ती लॅपटॉप मध्ये बघून पेनद्वारे त्याला सांगत होती तर तोही मन लावून तीच सर्व बोलणं ऐकत होता. खर तर अन्वयला ते येत होतं पण तिच्यासोबत थोडा टाइम स्पेन्ड करता यावा म्हणून त्याने हे नाटक केलं होतं. काहीच क्षण गेले. ती त्याला सांगत होती आणि त्याच लक्ष तिच्या मानेवर गेलं. तिने आपले केस हळूच हाताने बाजूला केले आणि इच्छा नसतानाही त्याच लक्ष तिच्या मानेवर गेलं होतं. अन्वयने आजपर्यंत तिला अस जवळून कधीच बघितलं नव्हतं पण आता जेव्हा तो तिला बघत होता तेव्हा त्याला जाणवलं की तिचा चेहऱ्यापासून तर मानेपर्यंतचा संपूर्ण भाग अक्षरशः जळला आहे. नाकाच्या भागाची काही स्किन इतकी काळी पडली आहे की त्याच्या समोर काळा रंगही काहीच नाही. भुवयावरदेखील काहीसे डाग आहे आणि काही जागून त्या कापल्या गेल्या आहेत. बहुतांश जागी पांढरे पांढरे चट्टे शरीरावर पडले आहेत. चेहऱ्याचा असा एकही भाग नाही ज्यावर नॉर्मल स्किन असेल. आजपर्यंत त्याला तिची सुंदरता भारावून गेली होती पण आज त्याला वेगळंच काही वाटत होतं. तिला जवळून पाहिल्यावर काहीच क्षणात त्याच्या डोक्यात काही प्रश्न घर करून केले. तो तिला बघतच होता की स्वरा म्हणाली, " सर झालं काम. मी आता जाऊ? "

अन्वय काहीच न बोलता बाजूला झाला. ती सुद्धा पटकन निघून पसार झाली तर अन्वय आता खुर्चीवर एकटाच बसला होता. त्याने केबिनमधला लाईट ऑफ केला आणि डोळे मिटून चेअरवर शांत पडला. आज कितीतरी दिवसाने त्याच्या डोक्यात एक विचार आला होता आणि कायम हसणारा तो शांत झाला. आज त्याला काहीच सुचत नव्हतं. कामही त्याला भरपूर करायची होती पण आज कामात मन लागत नव्हत. असा कितीतरी वेळ तो डोळे मिटून बसला होता. त्याने डोळे उघडले तेव्हा समोर ऑफिसमध्ये कुणीच दिसत नव्हतं. त्याला फ्रेश जाणवत नव्हतं म्हणून तो वॉशरूमला गेला आणि चेहऱ्यावरून पाणी घेऊन परतला. येताना त्याने स्वराच्या केबिनवर लक्ष दिलं. ती आताही काम करत होती. तिला बघताच त्याने पुन्हा नजर वर केली आणि समोर चालू लागला. काहीच अंतरावर त्याला अमर काका दिसले आणि तो हळूच हसत उत्तरला, " काका आज जेवणाच्या सुट्टीमध्ये ऑफीस खाली खाली, काही खास कारण? "

काका हसतच उत्तरले, " आज त्या दीपिका मॅडमचा वाढदिवस आहे. कुणीच टिफिन आणला नव्हता सो गेलेत पार्टी करायला. तुम्हाला बोलवायला आले होते पण तुमची तब्येत बरी वाटत नव्हती म्हणून कुणी विचारलं नाही. "

अन्वय उदास स्वरात उत्तरला," आणि स्वराला नाही बोलावलं त्यांनी?"

काका आता जरा उदास झाले होते तर अन्वयही त्यांचं उत्तर ऐकून घेण्यास आतुर होता. काका म्हणाले, " सर त्या ऑफिसमध्ये आहेत की नाही ह्याने कुणाला फरक पडतो? आजपर्यंत त्यांना कुणी विचारलं नाही तर आज का विचारणार? त्यांना सोबत न्यायला लाज वाटत असेल. त्यांचा चेहरा खराब आहे ना म्हणून? "

अन्वयला ते ऐकून फार वाईट वाटलं होतं म्हणून तो रागावतच उत्तरला," तुम्हाला पण तिच्या चेहऱ्याने फरक पडतो?"

काका आता हसतच उतरले, " सर मला एकदा कुलकर्णी सर म्हणाले होते की त्यांचा जवळ जाऊ नका. काही दिवस मला त्यामागच कारण समजलं नाही पण जेव्हा समजलं तेव्हापासून मी स्वतः त्यांच्या केबिनमध्ये जाऊन सर्व देतो. सर ती मला मुलीसारखी आहे. आपल्या मुलीचा चेहरा जळलेला पाहून कोणता बाप तिला टाकून देईल. वाईट वाटत सर पण मी एक छोटा व्यक्ती काय बदल करू शकणार तिच्या आयुष्यात? "

तेरे ईश्क से ज्यादा
तेरे अश्क तकलीफ देते है
तुझे केहता नही हमसफर
की तेरे अश्क मुझेभी रुलाते है

काका आता उदास झाले होते तर अन्वयच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव नव्हते. त्याने काकांना हातानेच जायचा इशारा केला पण लोकांचे विचार बघून त्याला खूप राग आला होता. कुणीही त्याच्या डोळ्यात तो बघू शकत होता. त्याला आपल्या रागावर कंट्रोल होत नव्हता आणि तो रागातच तिच्या केबिनकडे पोहोचला. रागातच दार त्याने ढकलल. दार अचानक उघडल्याने स्वरा घाबरून त्याच्याकडे बघत होती आणि तो म्हणाला, " मिस टॉपर तुमचं जेवण झालं?"

तिने त्याला इतकं रागात कधीच बघितलं नव्हतं म्हणून घाबरतच बोलून गेली, " नाही अजून सर! थोडं काम आहे ते आवरते नंतर करेन. "

पुन्हा एकदा तो जरा जड आवाजात म्हणाला, " गुड! ते काम बाजूला ठेवा. मला आज तुमच्याकडे काम आहे सो आपण बाहेरच जेवण करणार आहोत. तिथेच चर्चा करू."

तो बोलतच होता की ती हळुवार स्वरात म्हणाली, " पण सर मी टिफिन.. "

आणि तोही रागातच म्हणाला, " मिस स्वरा आय एम युअर बॉस!! सो मी म्हणतोय ते करा लवकर. मी वाट पाहतोय बाहेर तुमची. लवकर या बाहेर! "

तो रागातच बाहेर पडला तर स्वरा त्याला आज काय झालंय म्हणून क्षणभर बघतच बसली. पण आज त्याला इतका राग आला होता की तिला थोडा जरी उशीर झाला असता तरीही तिला महागात पडलं असत म्हणून सर्व काम बाजूला सारत तिने पटकन स्कार्फ बांधला आणि त्याच्या बाजूला येऊन उभी झाली. त्याने एकदा तिच्याकडे पाहिले तरीही काहीच म्हणाला नाही आणि दोघेही चालू लागले.

स्वराने ह्या काही दिवसात त्याला कधीच रागात बघितलं नव्हतं. तो कायमच हसतमुखाने बोलत होता पण आज अचानक त्याला काय झालं तिला कळेना. चालताना पण त्याला एक दोन कॉल येऊन गेले पण त्याने ते रागातच कॉल कट केले होते त्यामुळे स्वरा त्याच्यासमोर गप्पच बसली होती. तो समोर समोर जात होता तर ती मागे मागे. अगदी १० मिनिट झाले असतील. त्यांना समोर एक हॉटेल दिसलं आणि तो तिकडे वळाला. तीही त्याच्या मागे मागेच पोहोचली. त्याला एक टेबल रिकामा दिसला आणि तो तिथेच बसला. स्वरा देखील त्याच्या समोर बसली आणि शांतपणे त्याला न्याहाळू लागली. ते बसताच वेटर आला आणि त्याने आधी थंड पाण्याची बॉटल मागवली. वेटरने बॉटल आणून देताच तो पटापट पाणी पिऊ लागला. पाहता-पाहता त्याने बॉटल रिकामी केली आणि वेटरला म्हणाला, " वन मसाला डोसा प्लिज!! स्वरा तुला काय हवंय मागव? "

आता पहिल्यांदा त्याच्या तोंडून शब्द निघाला तरीही त्याचा तो राग कमी झाला नव्हता आणि ती वेटरला म्हणाली, " वन डोसा मी टू प्लिज! "

तो वेटर समोर गेला तर दोघेही आता शांतच होते. त्याने खिशातून मोबाइल बाहेर काढला आणि कुणाचा तरी कॉल रिसिव्ह करत म्हणाला, " कॉल कट करतोय म्हणजे कामात आहे कळत नाही का? ठेवा फोन करतो फ्री झाल्यावर. "

ती शांतपणे त्याला बघत होती तर त्याने रागातच फोन टेबल वर ठेवला. तोपर्यंत वेटर डोसा घेऊन आला. त्याने डोसा खायला सुरुवात केलीच होती तर स्वरा अजूनही त्याच्याकडे बघत होती आणि तो घास तोंडाजवळ नेत म्हणाला, " मिस टॉपर स्कार्फ वरूनच खाणार आहात का डोसा?"

तसाच तिने स्कार्फ काढला. काही क्षण तसेच शांततेत गेले. त्याने एक दोन बाईट घेतले होते तर स्वरानेही घाबरत घाबरत खायला सुरुवात केली. तिच्या मनात आज एक प्रश्न होता जो तिला विचारु की नको अस झाल होत. खूप वेळ तिने तोे मनात दाबून ठेवला पण शेवटी तिला राहवलं नाही आणि बोलून गेली, " सर एक प्रश्न विचारू?"

त्याने डोश्यावरून आपली नजर वर केली आणि हळूच उत्तरला, " विचार!! "

तिने हिम्मत तर केली होती पण ती थोडी घाबरली होती. हात पाय, आवाज निट काम करत नव्हते आणि ती बाजूला नजर करत हळुवार आवाजात उत्तरली," सर तुम्हाला माझ्या चेहऱ्याची भीती वाटत नाही का ? खूप दिवस झाले अनुभवते आहे. सर्व मला बघून घाबरतात पण तुमच्या चेहऱ्यावर मला ते कधीच जाणवलं नाही म्हणून आज न राहवून विचारलं. तुम्हाला नाही वाटत भीती? "

तो क्षणभर शांत होता आणि हळूच उत्तरला, " मी एक प्रश्न विचारू तुला?"

तिने त्याच्या डोळ्यात बघितले पण तिची हिम्मत काही झाली नाही. तिने क्षणभर बाजूला बघितले आणि उत्तरली, " हो विचारा!! "

तोच अन्वय म्हणाला," स्वरा जेव्हा तू त्याच्या गालावर खाडकन मारलीस तेव्हा तुझ्या डोक्यात काय होत?"

तिची नर्व्हसनेस आता क्षणभर गायब झाली आणि त्याची जागा विश्वासाने घेतली. ती नकळत मोठ्या आवाजात बोलून गेली, " सर काहीच नाही बस त्याने एका स्त्रीचा अपमान केला. तो एका स्त्रीला कैद करू पाहत होता आणि बस दिली ठेवून. ठरवून काहीच गेले नव्हते आणि त्याला मारल्यावरही भीती वाटली नाही उलट समाधान मिळालं आवाज उठवल्याच. एक स्त्री जिंकल्याचा आनंद त्यावेळी मला जाणवला."

अन्वय चेहऱ्यावर शांत भाव आणत म्हणाला, " तुझ्याकडे बघतो तेव्हा माझ्याही डोक्यात काहीच नसत म्हणून मलाही कधी तुझ्या चेहँऱ्याला बघून भीती वाटत नाही. तुझ्याशी बोललं की समाधान मिळत ह्याव्यतिरिक्त तुझ्या चेहऱ्याकडे माझं कधी लक्ष गेलं नाही. "

ती क्षणभर त्याच्या उत्तरावर विचार करत होती आणि तो पुन्हा म्हणाला, " भीती वाटते मला स्वरा पण तुझ्या चेहऱ्याची नाही. लोकांच्या विचारांची. आज पण बघ ना सर्व बाहेर गेले पण तुला घेऊन गेले नाही. असा काय फरक पडणार आहे तुझ्या चेहऱ्याने. आनंद कमी होणार आहे का त्यांचा? "

ती हसतच उत्तरली," म्हणून तुम्ही रागात आहात का?"

तो काहीच बोलला नाही पण तिला उत्तर मिळाल होत आणि तीच हसत म्हणाली," सर जसा तुम्हाला राग आलाय ना तसा मलाही आधी यायचा पण आता नाही वाटत सर. इथे ना आपलेच लोक आपल्या सोबत नाहीत तेव्हा लोकांचा विचार कशाला करायचा? मलाही कधी कधी वाईट वाटत सर पण मी अलीकडे विचार करणं सोडलं त्यामुळे मला काहीच वाटत नाही."

तेव्हाच तो रागात म्हणाला, " पण मी नाही सोडू शकत ! मला नाही आवडत अस कुणी वागलेलं. कुणी चुकीच वागत असताना मला शांत बसलेल नक्किच आवडणार नाही. माझ्या हातात असत ना? "

स्वरा हसतच उत्तरली, " काय केलं असत सर? "

त्याला बोलायच खूप काही होत पण त्याने खाण्यात लक्ष दिलं तेव्हाच ती म्हणाली, " सर माझ्यासाठी कुणीच काही करू शकत नाही. कुणी येईलही तरी काही दिवस बदल करेल पण बाकीच आयुष्य माझं कायम तसच राहणार आहे. आता मीही स्वीकारलं हे बंदिस्त जीवन. मी नाही बघत स्वप्न सर की कुणी येईल अचानक आयुष्य बदलेल. स्वप्न कुणाचे पूर्ण होतात सर?"

स्वरा क्षणभर हसत राहिली तर अन्वय अजूनही तिच्याकडे बघत राहिला. आतापर्यंत त्याच्या डोक्यात एक प्रश्न होता ज्याने त्याला त्रासवून सोडलं होत आणि आता हा प्रश्न" कुणाचे स्वप्न पूर्ण होतात सर? "

ती हसत होती तर अन्वय त्या हसण्यामागचं दुःख शोधत होता. त्याला तिला काहीतरी सांगायचं होत पण तो हिम्मत करू शकला नाही आणि त्याच्या डोक्यात ते विचार बंदिस्त झाले. काय होत त्याच्या मनात जे त्याला एवढं त्रास देत होत ???

तुम कैसी हो ये सवाल हर पल खुदसे करता हु
धुंड लेता हु जवाब लेकिन तुझसे केह नही पाता हु

क्रमशा ….


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED