झाले गेले विसरून जावे.. Pralhad K Dudhal द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

झाले गेले विसरून जावे..

झाले गेले विसरून जावे...

माझे एक खूप आवडते गाणे आहे....
'झाले गेले विसरून जावे
पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे'
माणसाच्या आनंदी जीवनाचे सार या गाण्यात अगदी मोजक्या शब्दात सांगितले आहे ...
'सर्जेराव आणि गणपतराव ही एका गावातली दोन मातब्बर माणसे,दोघेजण एकेकाळचे अगदी जीवाभावाचे मित्र होते.गावाची सगळी सत्ताकेंद्रे या दोन घराण्यांच्या ताब्यात होती.
आज मात्र या दोघांच्यात प्रचंड शत्रूत्व आहे.
झाले असे की, एका वर्षी गावातल्या बैलपोळ्याच्या मिरवणुकीत सर्जेरावांचे बैल गणपतरावांच्या बैलांच्यापुढे गेले आणि गणपतरावांना तो त्यांचा अपमान वाटला.या दोघांची मैत्री आधीपासून खुपत असलेल्या गावातल्या लोकांनी पध्दतशीरपणे या दोघांच्यात वितुष्ट वाढण्यासाठी प्रयत्न केले आणि वर्षानुवर्षे एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरणारे हे दोन मित्र एकमेकांना पाण्यात बघायला लागले.पुढे त्यांच्या या वितुष्टाला परंपरागत वैराचे स्वरूप आले.’
‘गणेश आणि सुरेन सख्खे भाऊ, घरच्या अत्यंत बिकट परिस्थितीतून दोघांनी उच्च शिक्षण घेतले.मळलेल्या वाटेने न जाता त्यांनी ट्रान्सपोर्टचा धंदा सुरू करायचे ठरवले.आईचे दागिने मोडून डाऊन पेमेंटचे पैसे भरले आणि बँकेचे कर्ज घेवून एक जुना ट्रक खरेदी केला.त्यावर एक पाण्याची टाकी चढवली आणि एका बिल्डरच्या साईटवर पाणी पुरवण्याचे काम मिळवले.शहरातल्या या बड्या बिल्डरच्या साईटवर रात्रंदिवस गाडीच्या फेऱ्या चालू झाल्या आणि पुढच्या पाच सहा वर्षात मिळालेल्या पुंजीतून एकामागोमाग एक असे पंधरा वीस ट्रक या दोघांनी खरेदी केले.हा हा म्हणता एक मोठा उद्योग उभा राहिला!दोघा भावांच्या उत्तम व्यवस्थापण कौशल्याने धंद्याची भरभराट झाली.या कुटुंबाने केलेली प्रगती सर्वांसाठी प्रेरणादायी होती.खूप वर्षे नीट चालले होते;पण दोघांच्या बायकांच्या झालेल्या वरवर अगदी किरकोळ वादाचे तीव्र पडसाद उमटले आणि भरल्या घरात पुढे टोकाच्या वादाची ठिणगी पडली.आता सख्खे भाऊ पक्के वैरी झाले आहेत.घरातल्या मोठया माणसांनी दोघांच्यात समेट करायचा प्रयत्न केला;पण यश आले नाही.प्रचंड कष्टाने शून्यातून उभ्या मोठया उद्योगाचे तुकडे पडले.पुढे त्यांचा आपसातला वैरभाव वाढतच गेला.’
‘मुगुटराव एका मोठया उद्योगात अधिकारी होते.एकुलत्या एका मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी त्याचे मोठया हौसेने लग्न करून घरी सून आणली. त्यांना स्वतःची मुलगी नसल्याने त्यांनी आपल्या सुनेला मुलगी मानली.मुकुटराव आणि त्यांच्या पत्नीला आपल्या या नव्या मुलीसाठी काय करू नी काय नको असे झाले होते.तिच्या तोंडातून आलेला प्रत्येक शब्द प्रमाण मानून तिच्या सगळ्या हौशी पुरवल्या जायला लागल्या.तीही या दोघांना मनापासून जीव लावत होती.एकदोन वर्षे अगदी आनंदात गेली. अचानक काय बिनसले माहीत नाही आणि आणि आई आई म्हणून अगदी प्रेमाने बोलणारी सुनबाई आपल्या सासूबाईशी तुसडेपणाने वागायला लागली.संधी मिळेल तिथे तिचा पाणउतारा करायला लागली.संपूर्ण कुटुंबासाठी हा फार मोठा धक्का होता.दिवसेंदिवस सुनबाईचे वागणे बिघडत गेले.एक दिवस कडेलोट झाला.सासरे आणि सासू नात्याचा विचार न करता सून तोडून बोलली.त्यांचा अपमान केला. हसत्या खेळत्या घरात वादाला तोंड फुटले! समेट घडविण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही.माघार घ्यायला कुणीच तयार नसल्याने पुढे वाद चिघळत गेले.’
वर दिलेल्या प्रत्येक उदाहरणात कोण बरोबर होते आणि कोण चूक होते हा मुद्दा गौण आहे.खरा महत्वाचा मुद्दा आहे तो नात्यात निर्माण झालेली कटूता!
ही कटूता वाढण्याचे मुख्य कारण आहे यातल्या एका किंवा दोन्ही व्यक्तींचा हेकेखोरपणा,टोकाचा अहंकार!
“मीच का माघार घ्यायची?”
अशा प्रतिष्ठेच्या केल्या गेलेल्या मुद्द्यामुळे त्यांच्या नात्यात दरी वाढत गेली दोन्ही बाजूच्या ताठर भूमिका नात्यांच्या विनाशाला कारणीभूत झाल्या.दोन्ही पैकी एका बाजूने जरी थोडीशी लवचिकता दाखवली असती तर नातेसंबंधाना जेवढी हानी पोहोचली त्याची तीव्रता निश्चितच कमी झाली असती.
'झाले गेले' ते विसरून जाऊन नाती दुरावू नयेत याला महत्व दिले असते तर नाती एकसंघ राहिली असती ...
प्रत्येक माणसाला आपल्या विचारांच्या भावनांच्या मर्यादा माहीत असणे आवश्यक आहे. आपल्या स्वभावात असलेल्या गुणदोषांचा अभ्यास प्रत्येकाने करायला हवा. डोळसपणे केलेल्या आत्मपरीक्षणामुळे नक्कीच यां मर्यादांची जाणीव व्यक्तीला होवू शकते.एकदा का अशा स्वत:च्या मर्यादा माहीत झाल्या की व्यक्ती आपल्याबरोबरच त्याच्या संपर्कात येणाऱ्या माणसांच्या विचारांची, भावनांची त्याच्या वागण्याची बोलण्याची तसेच त्यातून व्यक्त होणाऱ्या अर्थाची योग्य ती चिकित्सा करायला लागेल.
प्रत्येकाला आवश्यक असणारी स्पेस मिळाली तर माणूस विचारी बनतो.सारासार विवेकबुद्धी जागृत राहिल्याने कोठे कसे वागायचे,काय बोलायचे किंवा किती बोलायचे,किती मर्यादेपर्यंत ताणायचे,कोठे माघार घ्यायची याचे आत्मभान यायला लागते.
म्हणून म्हणतो की माणसाने भूतकाळातील कटू घटना,व्यक्त झालेली वेगळी मते,मनात घट्ट रुजून बसलेला अपमान,जाणता अजाणता झालेला अन्याय, त्या त्या प्रसंगी झालेली अवहेलना यामुळे मनात बसलेली आढी व गैरसमज वेळीच निपटून टाकायला हवा.फार न ताणत योग्य वेळी असे घडलेले वाईट प्रसंग सोडून द्यायला शिकायला हवे.
समोरच्या माणसाचे वागणे त्या त्या प्रसंगी तसे का होते हे त्याच्या भूमिकेत जावून समजून घ्यायला हवे. आनंदी मानवी जीवनासाठी अशा छोट्या मोठया घटना विसरून जाऊन नातेसंबंध सुधारण्याला सर्वोच्च महत्व द्यायला हवे.
सोडून द्यायला शिकले की मनावरचे विनाकारण बाळगलेले ओझे उतरले जाऊन मन हलके होते.मनाची कवाडे उघडी ठेवल्याने नात्यातली किल्मिषे झटकून माणसे पुन्हा जोडली जातात. असे होण्यासाठी...
चुकून चुकले काही, लगेच मागावी माफी ,
चुकले कुणाचे काही, करून टाकावे माफ,
बोलून टाकावे खुपलेले,ठेऊ नये अंतर्मनात,
किल्मिष नकोच काही,आनंदी नातेसंबंधात!
© प्रल्हाद दुधाळ पुणे.
9423012020