भाग्य दिले तू मला - भाग ९३ Siddharth द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भाग्य दिले तू मला - भाग ९३


अक्सर हम भूल जाते है
जिंदगी के मायने
जिंदगी वो नही है जो हसीमे दीखती है
वो तो हमेशासेआसूमे लिपटी पडी मिलती है....

गेले काही महिने स्वराने विचार केले होते त्यापेक्षाही कठीण गेले होते. तिचे प्रयत्न बघून लोक तिला स्वीकारतील अशी आशा तिच्या मनात जागी झाली होती पण तस काहीच झालं नव्हतं उलट येणारा प्रत्येक दिवस ती आशा आणखीच मावळत चालली होती पण आत्या अचानक तिच्या आयुष्यात आली आणि तिला पुन्हा एकदा आशेची एक किरण दिसू लागली. जुन्याच पिढीतल्या एका व्यक्तीचे विचार अन्वयने क्षणात बदलले होते म्हणून स्वरालाही जगण्याची, तेच नाते नव्याने घट्ट करण्याची संधी मिळाली आणि तिने ती संधी दोन्हीही हाताने अलगद उचलून घेतली.

दोन दिवसांचा कालावधी गेला होता. स्वराने म्हटल्याप्रमाणे आत्यासोबत ते दोन दिवस घालवले होते. आत्या स्वराला जसजशी ओळखत होती तसतस तिला जाणवू लागल होत की ह्या चेहर्यापलीकडेही एक सुंदर व्यक्ती आहे, जी सहसा कुणी बघत नाही पण त्याच रुपात ती खरी पाहायला मिळते. त्यांनी त्या सुंदर स्वराला बघितले आणि तिचा सहवास त्यांना जास्तच आवडू लागला. आता घरात कुणीही असले तरीही आत्या फक्त स्वराच्या आजूबाजूला असायची. तिचा स्वभाव त्यांना इतका आवडला होता की त्यांनी ह्या दोन दिवसात स्वराची क्षणभर सुद्धा साथ सोडली नव्हती.

ती सायंकाळची वेळ होती. स्वराने आजही सुट्टी घेतली होती त्यामुळे आत्या आणि स्वरा निवांत बेडरूममध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. स्वरा तर त्यांच्या कुशीतच विराजमान झाली होती. त्यांचा तो प्रेमाचा स्पर्श तिला मिळाला आणि स्वराच्या डोळ्यातही समाधानाचे मोती वाहू लागले. आत्या ते सर्व बघतच होती. तिच्या डोळ्यावरून हात घेत आत्याने विचारले," स्वरा तुला त्रास नाही होत का ह्या चेहऱ्याचा?"

स्वराच्या डोळ्यात आताच अश्रू येऊन गेले होते म्हणून ती काही क्षण शांत राहिली. आत्या तिच्याकडे एकटक बघत होत्या आणि स्वरा हळूच हसत उत्तरली," आत्या चेहऱ्याची भीती नाही वाटत ग. मी स्वीकारलंय की हा चेहरा आता असाच असणार आहे तेव्हा मला काहीच त्रास होत नाही. हा चेहरा आता शाश्वत आहे त्यामुळे ह्याचा त्रास करून काही फायदा नाही. त्रास होतो मला लोकांच्या नजरेचा. जर माझ्यासोबत सर्व होऊनही मी स्वीकारलं की हा चेहरा असाच असणार आहे तर मग जगाला स्वीकारायला नक्की काय अडचण आहे? हा चेहरा नक्कीच शाश्वत झालाय पण लोकांची नजर, त्यांचे विचार तर शाश्वत नाहीत ना ?? मग ते आपले विचार बदलवून एखाद्या मुलीला जगायला प्रेरणा का देऊ शकत नाहीत? ही सुंदर श्रुष्टी देवाने बनवली आहे. त्याने बनविताना भेद केला नाही तर मग आपण का करतो?"

स्वरा पटापट बोलून गेली तर आत्या तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघत होती. स्वराने त्यांच्या नजरेला नजर दिली आणि आत्यानी क्षणात नजर बाजूला केली. आपल्या डोळ्यात आलेले अश्रू पुसत त्यांनी मिश्किल हसतच उत्तर दिले," स्वरा ह्याच उत्तर मी तरी कसं देऊ? मीही तर तुला बरच ऐकवायला आले होते. जर अन्वयने तुझ्यातली खरी सुंदरता ओळखायला सांगितली नसती तर कदाचित मीही तुला शिव्या देतच बसले असते. बर झालं की अन्वयने मला ते करण्यापासून थांबवलं नाही तर स्वतःला कधीच माफ करु शकले नसते आणि स्वरा सॉरी मी पहिल्या दिवशी तुला दुखावलं त्यासाठी."

स्वराने हसतच उत्तर दिले," चालत ग आत्या. तस पण तू मला बोललीस त्यापेक्षा मला स्वीकारलंस ह्याचा जास्त आनंद आहे. माझ्या वयाच्या फार लोकांनी मला समजून घेतल पण कदाचित तुमच्या पिढीच्या मते सुंदरता चेहऱ्यातच असते, सुख चेहऱ्याने मिळतात आणि मी ते बदलू शकत नाही पण तुम्ही मला स्वीकारलं मला त्यातच आनंद मिळाला. गेले कित्येक दिवस मी एक आशा मनात ठेवून होते की कुणीतरी मला स्वीकारेल पण दिवस जाऊ लागले आणि आशा मावळू लागली. मी सतत नकारात्मक होऊ लागले आणि एक क्षण आयुष्यात असा आला की वाटलं आता काहीच होणार नाही. मी खचलेच होते की तुम्ही आलात माझ्या आयुष्यात आणि पुन्हा मला हिम्मत मिळाली. मी पुन्हा एकदा सकारात्मक होऊन प्रयत्न करू शकतेस. आत्या तुम्ही माझ्या आशा बनून आला आहात त्यामुळे खूप खूप थॅंक्यु.. "

दोघांच्याही चेहऱ्यावर आता हलकेच स्मित होते तर स्वरा आत्याच्या हातावर किस्सी करत होती. हे सर्व अन्वय बेडरूमच्या दारावर येऊन एकटक बघत होता. स्वराच त्याकडे लक्ष नव्हतं पण आत्याच लक्ष जाताच त्या हसत स्वराला म्हणाल्या," ए स्वरा बघ, तुझा नवरा कसा आपल्याकडे बघतोय?"

आत्याचा हळुवार आवाज येताच स्वराच त्याच्याकडे लक्ष गेलं आणि ती उठू लागली पण आत्याने तिला उठू दिलं नाही. तीच लक्ष जाताच अन्वय हळूच हसत उत्तरला," माझ्याबद्दलच गोष्टी सुरू आहेत बहुतेक तेव्हाच तर मी आल्यावर एकदम शांत झालात. काय ग आत्या माझे किस्से सांगत आहेस का माझ्या बायकोला?"

आत्या हसतच उत्तरली," आतापर्यंत तर सांगत नव्हते पण आता नक्की सांगेन. ते लहानपणीचे किस्से सांगू का?"

अन्वय हसतच उत्तरला," ए आत्या नाही हा. तू मला ऐकवतेस तेव्हाच किती हसतो मी, हिला सांगितलंस तर कायम छळ करेल माझा. तस पण वाघिनीच्या तोंडाला रक्त लागू देऊ नये म्हणतात नाही तर ती तुम्हाला कधीच सोडत नाही."

स्वराने चिडतच विचारले," अन्वय सर तुम्ही माझ्याबद्दल असा विचार करता? मी ना बोलणारच नाही आता तुमच्याशी. खडूस कुठले!!"

अन्वयनेही हसतच म्हटले," मॅडम ही परिस्थिती जवळपास सर्विकडे सारखीच आहे. तू अजून मामाना बघितलं नाहीस, आत्यासमोर ते एक शब्द काढत नाही, विचारून बघ तिलाच मग समजेल मी का म्हटलं ते तर?"

स्वरा कुतूहलाने आत्याकडे बघत होती आणि आता हसतच उत्तरली," त्याने बघितलंय सर्वच आता ह्यावर मी काय बोलू. मिळेल तुलाही कधीतरी संधी बघायला आमच्याकडे येशील तेव्हा. मग बघ तुझे सासरे माझ्यासमोर किती बोलतात ते."

आत्या हसून सर्व सांगत होती तर अन्वय हसतच हसतच फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये पोहोचला. स्वरा हनिमून वरून परत आल्यावर जणू तीच पूर्ण आयुष्यच बदललं होत. एक सकारात्मक विचार सर्वच सकारात्मक करतो असा काहीसा तो प्रसंग होता.

अन्वय काहिच वेळात वॉशरूमधून बाहेर आला. तो बाहेर येताच स्वरा चहा बनवायला किचनमध्ये जाऊ लागली. यी जाणारच की अन्वयने पटकन तिचा हात पकडत म्हटले," माहिती आहे चहा बनवायला जात आहेस, पण असू दे तुम्ही गप्पा मारा, आज चहा मी घेऊन येतो."

अन्वयने तिला बेडवर बसविले आणि तो किचनकडे वळाला. स्वरा त्याच्याकडे एकटक बघत होती की आत्याने हसतच विचारले," स्वरा हा नेहमी अशीच काळजी घेतो का ग तुझी?"

आत्याचा आवाज येताच स्वराच त्यांच्याकडे लक्ष गेलं. त्यांचा प्रश्न ऐकू येताच स्वराच्या चेहऱ्यावर आपोआप हसू पसरल आणि ती गोड हसू चेहऱ्यावर आणत उत्तरली," फक्त काळजी घेत नाहीत तर माझा प्रत्येक दिवस फक्त त्यांच्यामुळे चांगला जातो. मी उदास असले की कुठेही हसवायला तयार होतात. फक्त घरातच नाही, जगाच्या समोरही ते माझ्यावर तितकंच प्रेम करतात. मुळात प्रेम दाखवायला घाबरत नाही. कोण काय विचार करेल ह्यामुळे तर नाहीच नाही. चहा बनविणे वगैरे तर क्षुल्लक गोष्टी आहेत आत्या, ते माझ्या डोळ्यातून अश्रूच येऊ देत नाहीत. इतक प्रेम करतात ते. तुमचा मुलगा खरच खूप भारी आहे. त्याची तोड कुणात नाही."

तीच उत्तर ऐकताच आत्या हसत उत्तरली," म्हणून तर त्याला माझा जावई बनवून घेणार होते ना पण फसलाच नाही बाबा माझ्या तावडीत. स्वरा अन्वयना वरून सिम्पल सिम्पल वाटत होता, कधीच वाटलं नव्हतं की आपल्या जिवलग आईशी भांडण करून लग्न करेन. मी बघितलं आहे ह्यांना. आई लेक एक झाले की सर्वाना पुरून उरत. लोकांसमोर आईची बाजू घ्यायला किती वेळ भांडला मलाच माहिती आहे तेव्हा आईच्या विरुद्ध जाऊन सर्व करेल अस स्वप्नांत देखील वाटलं नव्हतं."

स्वरा त्यांच्याकडे एकटक बघत होती आणि आत्या पुन्हा उत्तरली," पण मानलं त्याला, त्याने युद्धही अशा मुलीसाठी केलं, जी जगातली सर्वात सुंदर मुलगी आहे. मी स्वतःच म्हणते की माझी मुलगी अन्वयला शोभली नसती. मुळात अस का म्हणू मी, मी तर म्हणेन की माझ्याच दुसऱ्या मुलीला ह्या जगात स्थान मिळाव म्हणून तो युद्ध करतोय. मुलगा म्हणून तो मला कायमच प्रिय होता पण एक व्यक्ती म्हणून तो इतका खास आहे हे मला आजच जाणवलं. अभिमान वाटतो मला अन्वयचा. प्रत्येक घरी एक असाच समजदार अन्वय नक्किच जन्माला यावा म्हणजे कित्येक स्वराच आयुष्य क्षणात स्वर्ग बनेल."

स्वरा भावुक होऊन त्यांच्याकडे बघत होती तर अन्वय हातात ट्रे घेऊन येत उत्तरला," झाल्या ना माझ्या चुगल्या करून? थकला पण असणार करीन करून।. सो आधी चहा घ्या. पुन्हा ऊर्जा मिळेल थोडीशी मग करा हव्या तेवढ्या गॉसिप."

दोघीनीही चहाचा कप हातात घेतला आणि हळूच हसत स्वरा उत्तरली," हो मग तुमच्याबद्दल ऐकायला मिळत असेल तर मी का नको ऐकू. आत्या सांगा हो तुम्ही. मला ना फार आवडत अन्वय सरांबद्दल ऐकायला."

स्वरा बोलून गेली आणि आत्या हसतच उत्तरली," किती काळजी हा नवऱ्याची स्वरा!!"

आत्याच एक वाक्य आणि स्वराचे गाल लाल झाले. अन्वय क्षणभर शांतपणे तिच्याकडे बघत होता तर स्वरा चहा घेता- घेता नजर चोरून त्याच्याकडे बघत होती. त्याला कुणाची भीती नव्हती की काही नाही. आत्याला क्षणभर अन्वयवर अधिकच प्रेम आलं होतं.

सर्वांचे चहा घेणं सुरुच होते की अन्वय जरा शांत स्वरात म्हणाला," आत्या मी खूप प्रयत्न केलेत ह्या घरात स्वराबद्दल लोकांचे विचार बदलावे म्हणून पण ते कधीच शक्य झालं नाही. स्वराला ह्या घरात कायम मी एकटाच हसवत आलोय, आज कुणाशी मनभरून बोलताना तिच्यासोबत हसताना पहिल्यांदा बघतोय आणि खरच सांगतोय खूप समाधान मिळतय मला तिला अस बघुन. आईला कधी थॅंक्यु म्हणू नये तरीही आत्या थॅंक्यु माझ्या स्वराला क्षणभर का होईना आनंदी ठेवायला."

आज अन्वयच्या आवाजात काहीतरी होत जे आत्याने त्याआधी कधीच बघितलं नव्हतं. गेले कित्येक वर्षे आत्याने त्याला बघितलं होत पण त्याचा आवाज इतका शांत कधीच जाणवत नव्हता. त्या आवाजात आज काहीतरी लपून होत हे आत्याला जाणवलं म्हणून ती समोर काहीच बोलली नाही मुळात तिच्याही डोक्यात काहितरी सुरू होत म्हणून ती त्यांच्याशी काहीच बोलू शकली नाही.

तिघांच्याही बऱ्याच वेळा गप्पा सुरु होत्या. स्वरान्वय कितीतरी वेळ बोलत होते पण आत्या आता जरा शांत झाली होती. ती हसत तर होती पण तिच्या मनात नक्की काहीतरी सुरू होत जे तिला त्यांच्यासमोर व्यक्त होता येत नव्हत. आणखी बराच वेळ गेला. स्वरा किचनमध्ये गेली तर अन्वय बाहेर गेला होता. आत्याच मन अजूनही स्थिर नव्हतं. त्यांनी स्वराला किचनमध्ये काम करताना बघितल आणि हळूच दार उघडून त्या अन्वयच्या आईच्या रूममध्ये गेल्या. जाताना त्यांनी हळूच दार लोटून घेतले. आत्याला बघूनही अन्वयची आई फक्त शांत बसली होती. आत्या हळुवार बेडवर जाऊन बसल्या. काही क्षण रूममध्ये शांतता होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हते. आत्याला काहीतरी बोलायचे होते पण नेमकं कस बोलू ते त्यांना कळत नव्हतं. काही वेळ त्यांचं स्वतःच्याच मनाशी युद्ध सुरू होत. त्यांनी घाबरत-घाबरतच मनाला तयार केले आणि हळुवार बोलून गेल्या," लता का ग अशी एकटी एकटी घरात बसून असतेस? थोडं बाहेर निघावं, फिराव बर वाटत. घरात बसून कंटाळा नाही येत का तुला? आणखी किती दिवस अशीच बसणार आहेस घरात?"

अन्वयच्या आईने हलकेच त्यांच्याकडे बघत म्हटले," काय करू ताई, मुलानेच ही वेळ आणली माझ्यावर. कधी बाहेर जायची इच्छा झाली तरीही लोक काय बोलतील ह्या भीतीने घरातच बसते. आता तर सवय झाली आहे ह्या सर्वांची आणि नसेल झाली तरीही करून घ्यायला हवी. लोकांची तोंड थोडी बंद होणार आहेत. ते तर वाटच बघत आहेत मला बोलण्याची."

अन्वयच्या आईच्या उत्तराने आत्याच अवसानच गळाल होत पण आज त्यांनी काहीही करून बोलायच ठरवलं होतं म्हणून काही सेकंद थांबून त्या उत्तरल्या," बर झालं तूच हा विषय काढलास. मलाही ह्यावरच बोलायच होत. लता मान्य की त्याने तुझ्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं पण त्याची निवड चुकली नाही ग. मी बोलतेय तिच्याशी दोन तीन दिवसापासून. मी तर म्हणेन की तिच्यासारखी दुसरी सुंदर मुलगी ह्या घराला कधीच मिळणार नाही, इतकी सुंदर आहे ती. एकदा रागाच्या पलीकडे जाऊन बघ तरी तिच्याकडे. स्वतःच्या मुलाकडे बघ किती त्रास होतोय त्याला तू बोलत नाही आहेस तर. मी आवडीने सांगेन की तू राग बाजूला केलास ना तर ती तुला क्षणात आवडेल. इतकी गोड पोर आहे ती. तिला समजून घेण्याच्या मध्ये फक्त तुझा राग आडवा येतोय. तो दूर कर मग ती किती खास आहे तेही समजेल. मला बाहेरच्या व्यक्तीला इतक्या कमी वेळात समजू शकत तर तुला नाही समजणार का?"

आत्या एका श्वासात बोलून गेली होती तर अन्वयच्या आई शांतच बसल्या होत्या. काही क्षण त्या एकटक आत्याकडे बघत होत्या. रूममध्ये भयाण शांतता होती. त्यांच्या हृदयाच्या ठोक्याचे आवाज स्पष्ट ऐकू येत होते आणि शांतता तुटली ती अन्वयच्या आईच्या हसण्याने. त्या सौम्य हसत उत्तरल्या," ताई तुम्ही विसरल्या असणार पण मी नाही विसरले काहिच. तुम्ही बोललेले ते शब्द आजही माझ्या आठवणीत आहेत. एक वेळ होती जेव्हा लोक मला अन्वयच्या लग्नावरून बोलत होते त्यात तुम्ही सुद्धा होतात, हे कसं विसरू मी? त्या लोकांच्या बोलण्यामुळेच मी सांगितलं की आणेन जगातली सर्वात सुंदर मुलगी. ताई तुम्ही त्या वेळी बोललात ना ते शब्द अजूनही जसेच्या तसे आहेत माझ्या हृदयात. खर सांगू तर तुमच्या बोलण्याचा जितका त्रास झाला नव्हता त्यापेक्षा जास्त मला माझ्याच मुलाने तोंडघशी पाडलं ह्याचा होतोय म्हणून कदाचित मी ह्या घराच्या बाहेर निघत नाहीये. मी आता स्वतःच्याच मनातून उतरले आहे तर जगाला कस तोंड दाखवू. जगते एक एक क्षण मोजत, आपल्याच मुलाचा चेहरा बघून हे स्वतःला सांगत असते की आपलं कुणीच नाही ह्या जगात. यायचंही एकट असत आणि जायचंही मग कुणाकडून अपेक्षा कशाला? मी आहे अशीच चांगली आणि अशीच ह्या घरात शेवटचा श्वासही घेईन. तसा पण कुणाला फरक पडतो मी असले किंवा नसल्याचा. फरक पडला असता तर अशी कोपऱ्यात बसून राहिले असते का?"

अन्वयच्या आईने बोलणं थांबवल होतच की आत्या उतरल्या," तुझं सर्व मान्य पण त्याच्या निर्णयाचा एकदा विचार तर कर. तुझा लाडका आहे ना तो. मग तो चुकणार अस वाटत का तुला?"

अन्वयच्या आई हसतच उत्तरल्या," वाटायचं काय सर्व समोरच आहे ताई. नाही बघायच त्याच्या बायकोच्या सुंदरतेला की नाही बघायच मला माझ्याच स्वार्थी मुलाला. अशा मुलाला ज्याने आपल्या आईची माया विसरून एका मुलीसाठी आपल्या आईच जीवन बंदिस्त केलं आणि नको अशी सून जिने मला माझ्या मुलापासून वेगळं केलं. नाही दाखवायची मला इतकी माया. मी आहे तशी आहे. आता मेल्यावरच काय ती सुटका होईल माझी त्यांच्यातून. तसेही सोडून तर जात नाहीच मग रोजच बघायच आहे मरण डोळ्याने. आजपर्यंत बघितलं आहे ना मग पुढेही बघेन, कदाचित हार्ट अटॅक येईल तेव्हाच जाईल मी."

आत्या त्यांना अडवत उत्तरली," अग पण.."

अन्वयच्या आईनेही मधातच अडवत त्यांना म्हटले," ताई तुम्हाला ती आवडली असेल तर घरी घेऊन जा पण प्लिज माझ्यासमोर त्यांच्याबद्दल काहीच बोलू नका. मुळात मला हा विषयच नकोय. तुम्हाला जर ह्याबद्दलच बोलायच असेल तर तुम्ही या. मला राहू द्या एकट. नको मला मुलं की नको मला हा त्रास. मी जगते आहे एकटी अटलिस्ट इथे तरी जगू द्या."

अन्वयच्या आईच्या आवाजात त्रास जाणवत होता म्हणून आत्या बाहेर जाऊ लागल्या. त्याने काही पावले टाकलीच होती की त्या मधातच थांबल्या आणि हळुवार आवाजात म्हणाल्या," माहिती आहे तुला त्रास होईल तरीही सांगते. मी जी चूक तुला ऐकवून आधी केली होती तीच चूक तू आता त्या दोघांना ऐकवून करते आहेस. शहाणपणा चुका करण्यात नाही तर त्यातून शिकण्यात असतो. जगाचा विचार करत बसशील तर असाच त्रास होईल तुला आणि मुलाचा विचार केलास तर ते खूप आनंद देतील, ज्याचा तू स्वप्नातही विचार केला नसणार. सो मी म्हणेन खरच स्वीकार त्यांना. लता तू केव्हाची जग जग करत आहेस ना तेव्हा तुला सांगते की एक वेळ तुझ्यावर अशी येईल की तुला जगाची खूप गरज असेल पण ते सोबतीला। असणार नाहीत उलट ज्यांचा तू सतत राग करतेस ना तेच तुझ्या पाठीशी असतील. तुझी आजची स्थिती बघून आताच सांगतेय की अशी वेळ नक्की येईल तुझ्यावर. लता मी शिकलेय माझ्याच चुकीमधून. तुझ्यापेक्षा जास्त राग करत होते मी अन्वयचा तेव्हाच तर इतके दिवस आले नाही घरी पण आज आले त्याला ऐकवायला आणि जाणवलं की तो वरून स्वार्थी वाटत असला तरीही त्याच्यासारखा दिलदार कुणीच नाही. लता स्वतःला समजव नाही तर तुझ्या हातात एक दिवस फक्त पश्चाताप राहणार आहे. लक्षात ठेव माझे शब्द. कायम लक्षात ठेव. तू स्वतःच्या इगोमध्ये ना खरी सुंदरता बघू शकत नाहीयेस आणि जेव्हा सुंदरता म्हणजे काय तुला समजेल, तेव्हा डोळ्यात अश्रू येतील तुझ्या. माझा शब्द लक्षात ठेव. येते मी."

आत्या डोळ्यात अश्रू घेऊन रूमच्या बाहेर पळाल्या तर अन्वयच्या आईचीही काहीशी अशीच अवस्था होती आणि प्रश्न एकच होता कोण योग्य? अन्वय की आई?

" विनाशकालीन विपरीत बुद्धी!!"

दुसऱ्या दिवसाची ती सकाळ होती. काल आत्याला रात्रभर झोप आली नव्हती. अन्वयच्या आईचे काही शब्द सतत त्यांना त्रास देत होते आणि त्यांना आपल्याच चूका पुन्हा लक्षात येऊ लागल्या होत्या. माणस मोठी तर होतात पण प्रत्येक वेळी तो मोठेपणाचा इगो घेऊन आयुष्य जगायच नसत हे त्यांना स्वराच्या बोलण्यातुन समजलं होत. हेदेखील त्यांना लक्ष्यात आलं होतं की फक्त राग धरून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा कधी-कधी मोठया मनाने माफ करणं सुद्धा गरजेचं असत. एखादं नात आपण स्वतःच जपायचा प्रयत्न केला नाही तर ते वाचणार तरी कसं ना? ह्याचा साधा सरळ अर्थ असा होतो की नात नकोस असलं की प्रयत्नच केले जात नाहीत. हीच स्थिती आज अन्वयच्या आईची होती. त्यांना कदाचित हे बघायचच नव्हतं की अन्वय बरोबर आहे की नाही. त्यांनी फक्त त्या कशा बरोबर आहेत हेच लक्षात ठेवलं म्हणून त्यांना स्वरा अन्वयची मेहनत कधीच दिसली नाही. अन्वयच्या आईकडे बघून आत्याला किव येऊ लागली होती कारण ज्या जगाच्या भीतीने त्यांनी अन्वय-स्वराला स्वीकारलं नव्हतं नंतर संपूर्ण जग सोबत असूनही अन्वय-स्वरा नसताना त्यांना एकट फिल करावं लागणार होतं. एक चूक कदाचित कितीतरी नाती तोडू पाहत होती आणि अन्वयची आई तशी वागण्यामागे आत्याचा नकळत हात आहे हे लक्ष्यात येताच त्यांना स्वतःची भीती वाटू लागली आणि अन्वय- स्वराला फेस करायलाही आता त्या क्षणभर घाबरू लागल्या. आता त्या इथे थांबल्या असत्या तर त्या अन्वय-स्वराला नजर मिळवू शकल्या नसत्या. कदाचित अन्वय-स्वराने त्यांना माफ केल असत पण त्या कशा स्वतःला माफ करू शकणार होत्या? म्हणून त्यांनी तडकाफडकी अन्वयच्या घरून जायचा निर्णय घेतला होता.

आज आत्या सकाळी-सकाळीच उठल्या आणि त्यांनी अन्वयला प्लेनचे तिकीट काढायला सांगितले. अन्वय-स्वरा त्यांना थांबायला सांगत होते पण आत्या आज अजिबात एकण्याच्या मूडमध्ये नव्हत्या. अन्वयची आत्याला जाऊ द्यायची इच्छा तर नव्हती पण तिला घरची आठवण येत असेल म्हणून त्यानेही तिला जायची परवानगी दिली. आज अन्वयने सुद्धा आत्याला सोडायला जायचं असल्याने सुट्टी घेतली होती. दुपारी १२ ची फ्लाइट होती. स्वराने त्यांना चहा नाश्ता दिला होता, त्यानंतर त्यांनी आपली बॅग भरून घेतली. सकाळचे १० वाजलेच होते की आत्या अन्वयच्या रूममध्ये येत उत्तरली," अन्वय निघायचं ना?"

स्वरा- अन्वयच्या चेहऱ्यावर काही क्षण उदासी होती तरीही हळुवार आवाजात अन्वय म्हणाला," हो मी कार काढतो, तू बॅग घेऊन ये बाहेर."

त्याचा आवाज येताच आत्या अन्वयच्या आईच्या रूमकडे वळाल्या. अन्वयचे आईबाबा दोघेही मध्ये बसूनच होते की आत्या त्यांच्या जवळ जात म्हणाली," लता माफ कर मला, रागात मागे बरच काही बोलले. ते सर्व नीट तर करू शकत नाही पण माफी नक्कीच मागू शकते. आशा करते मोठ्या मनाने माफ करशील. चल येते मी."

अन्वयच्या आई काहीच बोलल्या नाही मात्र त्याचे बाबा हळुवार म्हणाले," ताई कशाला इतक्या लवकर जात आहेस? थाम्ब ना दोन-तीन दिवस."

आत्याचा चेहरा थोडा पडला होता. त्या हळुवार आवाजात उत्तरल्या," घराची ओढ लागली आहे रे म्हणून मन नाही लागत आहे इकडेे. तू ये तिकडे कधी मग भेटू. चल मी येते."

त्यांनी कुणाच्याही बोलण्याची वाट बघितली नाही आणि सरळ बाहेर निघाल्या. बाहेर सोफ्यावर ठेवलेली बॅग हातात घेतली आणि कार समोर जाऊन उभ्या झाल्या. मागून अन्वयचे बाबाही दारावर येऊन पोहोचले. अन्वय पटकन कारमध्ये बसला आणि तेवढ्यात अन्वयचे बाबा म्हणाले," ताई पोहोचल्यावर कॉल कर ग."

आत्याने मानेने होकार भरला आणि त्या मध्ये बसल्या. स्वराही अन्वयच्या बाजूला समोरच्या सीटवर बसली. आत्याने घराकडे मनभरून बघितले आणि अन्वयने क्षणात कार सुरू केली.

हळुवार सुरू झालेल्या कारने आता गती पकडली. कारमध्ये शांत वातावरण होत. कुणीच कुणाशी बोलत नव्हते आणि स्वराने मागे वळत विचारले," आत्या काही झालंय का? इतक्या शांत का झालात? कालपर्यंत तर तुम्ही थांबणार होतात मग अचानक आज जायचं का ठरलं?"

आत्या वेगळ्याच विचारात हरवली होती, स्वराच्या आवाजाने त्या भानावर आल्या. तिचा आवाज येताच त्या स्वराकडे विचित्र नजरेने बघत होत्या, त्यांना स्वराने काय विचारलं माहितीच नव्हतं, स्वरालाही त्यांच्या नजरेवरून ते सहज लक्षात आलं. त्यांच्या मनात नक्की काहीतरी सुरू आहे हे स्वराला लक्षात आलं होतं पण त्यांचा घाबरलेला चेहरा बघून स्वराने समोर आत्याला काहीच विचारले नाही. बाकी समोरचा सर्व प्रवास फक्त शांततेत गेला. स्वरा काहीच बोलली नव्हती पण आत्या जाताना नक्कीच मनातलं सांगतील ह्याचा तिला विश्वास होता.

जवळपास ११.३० वाजायला आले होते. अन्वयने आत्याचे तिकीट वगैरे केले होते पण आत्या अजूनही शांतच होत्या. आता जवळपास जाण्याची वेळ आली होती. आत्याने काही पावले टाकली आणि क्षणभर मध्येच त्या थांबल्या. त्या थांबताच स्वराच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू पसरल आणि त्या आता नक्की बोलतील म्हणून ती खुश झाली. स्वरा विचार करतच होती की आत्या वळून स्वराकडे आल्या. त्यांचे डोळे पाणावले होते आणि आत्या रडवेल्या स्वरात म्हणाल्या," स्वरा तू बरोबर म्हणतेस, तुझा चेहरा खराब नाही तर आमच्यासारख्या लोकांची नजर खराब आहे. आम्हाला सुंदरता ह्या शब्दाचा अर्थ खरच समजत नाही तेव्हाच तर आम्ही चेहऱ्यात सुंदरता शोधू लागतो. खर तर आमच्या सारख्या लोकांमुळेच तुला न्याय मिळू शकत नाही. आम्ही आमचे इगो प्रॉब्लेम इतके घेऊन बसतो की त्यासमोर काहीच दिसत नाही म्हणूनच कदाचित मी इतके दिवस अन्वयकडे आले नाही आणि आता अन्वयची आईही तेच करतेय. स्वतःचा राग, स्वतःच्या इच्छा ह्यापलीकडे कुणाच दुःख दिसत नाहीये तिला. स्वरा मी असो की अन्वयची आई हे नक्की सांगेन की तुझ्यासमोर आमचे दुःख काहीच नाहीत. मला आज ते जाणवलं उद्या अन्वयच्या आईलाही नक्की समजेल. तुझा संघर्ष कधीच वाया जाणार नाही, एक दिवस तुझ्या आयुष्यात नक्कीच येईल जेव्हा सर्व लोक तुझ्या सुंदरतेचे फॅन होतील. चेहऱ्याच्या सुंदरतेचे नाही तर मनाच्या सुंदरतेचे. एका आईचा आशीर्वाद आहे हा. एक दिवस नक्की येईल जेव्हा सासूबाई स्वतःच ओरडून सांगेन की ही माझी सून आहे. तुला खूप खूप आशीर्वाद माझे स्वरा आणि आयुष्याचा एक सुंदर अनुभव द्यायला धन्यवाद. मला आज समजलं आम्ही लोक उगाच वयात अनुभव शोधत असतो पण प्रत्यक्षात वय आणि अनुभवाचा काही संबंध नसतो, अनुभव तर जगण्यातुन दिसतो. पुन्हा एकदा नव्याने विचार करायला शिकविलस त्यासाठी धन्यवाद.. खूप खुश राहा बाळा."

आत्याच बोलणं होताच स्वराने आत्याला घट्ट मिठी मारली. आज स्वरा- आत्या दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते पण ते दुःखाचे नाही तर आनंदाचे होते म्हणून अन्वयचे डोळेही क्षणभर पाणावले होते. स्वराचे होताच अन्वयनेही आत्याला मिठी मारली. काहीच क्षणात आत्या त्यांना मिठी मारून डोळ्यात अश्रू घेऊन स्वतःच्या प्रवासाकडे निघाली पण ती जाताना देऊन गेली एक उमेद नव्याने जगण्याची. पुन्हा एक आशा काहीतरी चांगलं घडण्याची आणि एक आशीर्वाद ज्यासाठी स्वराने आयुष्याचा सर्वांत कठीण मार्ग निवडला होता. आत्या जात होती पण स्वराच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक देऊन आणि कदाचित एक सुंदर नजर देऊन. जी सांगत होती, चेहऱ्यावर सुंदरता नाही तर नजरेत असते फक्त बघायची इच्छा असायला हवी. नजरच कुरूप असली तर सुंदरता कशी दिसणार??

तेरी आंखो मे देखा है मैने एक जहा
जहा के हर कतरे मे मै बसती हु
कोना कोना दिलं का है मुझसे भरा
मै तो तेरी सांसो मे रेहती हु...