लकडी शिवाय मकडी...
एका ठराविक वयानंतर त्यातल्या त्यात नोकरीतून रिटायरमेंटनंतरचे जीवन शांत निवांत असावे असे साधारणपणे प्रत्येकाला वाटते.
आपणही निवृत्तीनंतर कसे जगायचे याबद्दल माझेही स्वतःचे असे काही नियोजन होते.
जवळपास मी ठरवल्याप्रमाणेच आमची सध्याची जीवनशैली आहे.सकाळी ठराविक वेळेला उठणे, माफक व्यायाम,प्राणायाम,सकाळी आणि संध्याकाळी ठराविक वेळेला फिरणे,समवयस्क लोकांना भेटणे, गप्पाटप्पा, वेळच्या वेळी नाश्ता,जेवण करणे.
अगदी छान दैनंदिनी आहे आमची!
सरकारी पेन्शन असल्यामुळे ना आर्थिक ताण ना कुठली जबाबदारी, यामुळे एक सुखी समाधानी जीवनाचा अनुभव घेत असतानाच एखादी घटना, एखादी व्यक्ती अचानक अर्थाअर्थी तसा काहीही संबंध नसताना, म्हटलं तर अगदी किरकोळ कारणाने या शांततेचा भंग करते... नाही म्हटले तरी माणूस डिस्टर्ब होऊन जातो. लोकांच्या वागण्याने माणुसकीवरचा विश्वास डळमळीत होतो.
म्हटले तर ही घटना अगदीच छोटी होती,पण एका व्यक्तीने या निमित्ताने मला चांगलाच मनस्ताप दिला...
सोसायटीत आमच्या बिल्डिंगमधेच एक कुटुंबं रहाते, दोघेही नवरा बायको सरकारी ऑफिसात अधिकारी आहेत.दोन अविवाहित मुले आयटी इंजिनयर म्हणून नोकरी करतात, त्यातला एक परदेशात असतो म्हणे.
गेल्या दिडेक वर्षात येता जाता कधीमधी रस्त्यात अथवा लिफ्टमध्ये गाठ पडत असल्याने संबंधित व्यक्तीची ओळख झालेली होती. कधी कधी त्या साहेबांशी आणि त्यांच्या मॅडमशी चार दोन वेळा जुजबी संवादही झाला होता.एवढाच काय तो आमचा परिचय होता.
डिसेंबर महिन्यात एक दिवस मी आणि बायको पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेजला चालू असलेल्या पुस्तक प्रदर्शनात फेरफटका मारत होतो.
अचानक माझा मोबाईल वाजला... अनोळखी नंबर होता..
" हॅल्लो" मी फोनला उत्तर दिले..
" सर मी आपल्या बिल्डिंगमधून अमुक तमुक बोलतोय, सर,प्लिज मला तीन हजार रुपये अर्जंट हवे आहेत,मी दोन दिवसांत परत करीन... "
समोरून 'ते' साहेब घाई घाईने बोलत होते.
मी वेळ मारून नेण्यासाठी बोललो
"सर,मी आता बाहेर आलोय,संध्याकाळी घरी आलो की बघू... "
" ना.. नाही सर मला आत्ताच हवेत,प्लिज गुगल पे करा ना...मी लगेच दोन दिवसांनी परत देईन"
साहेब खूपच काकूळतीला आले होते.
" बघतो मी,थांबा दहा मिनिटे.. " असे म्हणून मी फोन बंद केला.
मी विचार करायला लागलो...'घरात चार चार जण कमावते असताना, अचानक तीन हजार रुपयांची अशी काय निकड या साहेबाना आली असेल?'
मी बायकोकडे बघितले, तिनेही 'काही देऊ नका, एवढे अर्जंट कशाला लागतात पैसे?' असे मत व्यक्त केले..
खरं तर 'त्या' साहेबांचा मोबाईल नंबर माझ्याकडे सेव्ह केलेला होता,पण ते त्यांच्या फोनवरून बोलत नव्हते..
मी त्यांच्या माझ्याकडे असलेला फोन नंबरला कॉल करून बघितला... उत्तर मिळाले नाही.
आजकाल ऑनलाईन फसवणूकीचे बरेच वेगवेगळे प्रकार ऐकण्यात येतात त्यामुळे
"कुणी आपल्याला त्या व्यक्तीचा आवाज काढून फसवत तर नाही ना?"
मनात शंका यायला लागली.मन द्विधा झाले होते.मी थोडा वेळ वाट पहायचे ठरवले...
पाच मिनिटांनी 'त्या' साहेबांचा स्वतःच्या नंबरवरून मला कॉल आला...
निदान आता खात्री झाली होती की पैसे मागणारी 'तीच' व्यक्ती आहे..
" सर प्लिज,पाठवा ना पैसे, दोन दिवसांत नक्की परत देतो.. प्लिज प्लिज " त्यांची काकूळतीला येऊन विनंती करणे चालूच होते.
आता मला वाटायला लागले की 'खरंच काही तरी अडचण आली असेल... काही मजबुरी असेल, आणि तशीही तीन हजार काही फार रक्कम नाही.. सोसायटीला माणूस आहे,अचानक काही प्रसंग आला असेल म्हणून हक्काने माझ्याकडे मागत असेल....शेजारधर्म म्हणून देऊ या पैसे! आणि समजा नाहीच दिले परत,तर बघू पुढे काय करायचे ते!"
माझ्यातल्या परोपकारी गंपूने पैसे द्यायचा निर्णय घेतला होता...
मी माझ्या खात्यावर असलेल्या शिल्लक सहा हजार रुपया मधून तीन हजार रुपये साहेबांना gpay करून टाकले!
मी विचार केला 'फक्त दोन दिवसांचा तर प्रश्न आहे, मिळतील परत पैसे...'
पैसे मिळताच साहेबांचा 'thank you' मेसेज आला.
मी माझ्या सवयीप्रमाणे सगळ्या लिखित संवादाचा स्क्रीन शॉट काढून ठेवला...
ही घटना सतरा डिसेंबरची,दोन दिवसांनी म्हणजे एकोणीस तारखेला पैसे परत मिळतील असे मी गृहीत धरले होते.
लोकांच्या गरजेला मदत करायची माझी जुनी सवय होती.अनेकदा अशा प्रकारे मदत केलेली रक्कम बुडाली असली तरी अजूनही मला कुणालाही स्पष्टपणे 'नाही म्हणायला' जमत नाही.माझ्या त्या स्वभावाप्रमाणे मी त्या व्यक्तीला मदत करून टाकली.
माझी पत्नी मात्र पुन्हा पुन्हा शंका व्यक्त करत होती की,'आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या त्या व्यक्तीला तीन हजारासाठी माझ्यासारख्या रिटायर माणसाकडे पैसे मागावे लागण्याएवढी काय मजबुरी आली असेल?'
एकोणीस तारीख उलटून गेली, त्या दिवशी काही पैसे परत मिळाले नाही. 'असेल अडचण, अजून दोन दिवस वाट पाहू...' असा विचार करून मी शांत राहिलो..
काहीच झाले नाही म्हणून शेवटी तेवीस तारखेला मात्र मी 'त्या' साहेबांना मेसेज केला..
'सर नमस्कार, तुम्ही दोन दिवसांत देतो म्हटलं होतं म्हणून माझ्या खात्यावर कमी शिल्लक असतानाही मी आपल्याला पैसे दिले होते, कृपया ताबडतोब पैसे परत करावेत'
थोड्या वेळाने मला उत्तर आले...
'सॉरी सर,अजून फक्त दोन दिवस थांबा, 26 तारखेला दुपारी 2 पर्यंत मी तुम्हाला gpay करतो.. सॉरी सर'
मी 'ओके' म्हटले,आणि अजून तीन दिवस थांबायचे ठरवले..
26 तारीखेला तीन वाजेपर्यंत वाट पाहून मी पुन्हा मेसेज केला..
'सर आता दोन वाजून गेलेत, तुम्ही आज दोन वाजेपर्यंत पैसे पाठवतो म्हणाला होतात, तीन वाजले आहेत अजून पैसे पाठवले नाहीत, प्लिज पाठवा'
तिकडून उत्तर आले..
' सॉरी सर, मी पगार झाला की दोन तारखेला नक्की देतो, सॉरी सर, नक्की देतो... प्लिज...'
खरं तर आता मला 'त्या' व्यक्तीचा राग यायला लागला होता.दिलेल्या पैशापेक्षा 'कुणीतरी आपल्याला जाणीवपूर्वक फसवते आहे' या गोष्टीचा मला मानसिक त्रास व्हायला लागला होता,पण आता माझ्या हातात काहीच राहिले नव्हते.ती व्यक्ती म्हणेल तोपर्यंत थांबण्याशिवाय तसाही माझ्याकडे पर्याय नव्हता.
केवळ जुजबी ओळखीवर कुणाला उसणे पैसे देण्यापूर्वी मी थोडा विचार करायला हवा होता...
मी डोक्याला फार त्रास न देता ' हे पैसे बुडणार आहेत' असा विचार करून शांत बसलो...
दोन जानेवारीला मला एका लग्नानिमित्त सोलापूर जिल्ह्यात जेऊर भागात जायचे होते.तिकडे जाण्यासाठी मी आमच्या सोसायटीत महेश नावाचे एकजण टुरिस्ट गाड्यांचा व्यवसाय करतात त्यांच्याकडून भाड्याने कार घेतली. ऐनवेळी ड्रायव्हरचा काही प्रॉब्लेम झाल्याने
स्वतः मालक महेशच स्वतः ड्रायव्हिंग करायला आला.
माझी आणि महेशची ओळख असली तरी कधी फार बोलणे झाले नव्हते. या प्रवासात मात्र त्याच्याबरोबर मोकळेपणाने गप्पा सुरु झाल्या.
वयाने साधारण तिशीच्या आतबाहेर असलेला तो मुलगा आमच्या सोसायटीत गेले सहासात वर्षे रहात असल्याने सगळ्या रहिवाशांबद्दल... जसे की, त्यांचे स्वभाव, गुणदोष याबद्दल त्याला सखोल माहिती असल्याचे जाणवले.
त्याने मला बिल्डिंगमधील एका एका व्यक्तीबद्दल माहिती सांगायला सुरुवात केली.
मला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी त्याच्याशी गप्पा मारताना समजल्या.
मी सोसायटीत नवीन असल्याने तो सांगत असलेली माहिती मन लाऊन ऐकत होतो.
मी बोलता बोलता त्याला 'त्या' साहेबांना दिलेल्या पैशाबद्दल आणि ते परत करण्यासाठी तो करत असलेली टोलवाटोलवीबद्दल सांगितले.
त्याची पहिली प्रतिक्रिया ऐकून मी चकित झालो..
" घातली का टोपी तुम्हालाही त्याने? "
'त्या' साहेबांबद्दल आलेला तो रिमार्क माझ्यासाठी अनपेक्षित होता.
"म्हणजे?" मी त्याला प्रश्न विचारला.
"अहो काका, तो असाच नव्या नव्या लोकांना शोधून पैसे मागतो, एक नंबरचा बेवडा आहे तो!एवढा सरकारी अधिकारी असूनही रात्री हातभट्टी पिऊन टाईट असतो!"
माझ्यासाठी ही नवीन माहिती होती...
"सध्या त्याचा मोठा मुलगा इथे आलाय,घरच्यांनी त्याच्या बँकेतले पैसे काढून घेतलेत, बहुतेक सगळे पासवर्ड बदलले असावेत... नशीब तुम्ही थोडेच पैसे दिलेत!"
त्याने अजून माहिती सांगितली.
"काय सांगता? असे असेल तर अवघड आहे,आता बुडीत खात्यात गेले म्हणायचे माझे पैसे!"
मी झालेल्या फसवणूकीने अजूनच व्यथित झालो होतो.
मी मनातल्या मनात विचार करत होतो...
'खरंच,आपण किती सरळ वागतो ना लोकांशी? अगदी सहजपणे त्याने आपल्याकडून गोड गोड बोलून पैसे काढून घेतले आणि आता ते परत द्यायचे नाव घेत नाही.'
महेशने मला शब्दांनी आधार दिला आणि वसुलीचा एक मार्ग सांगितला..
"काका... काळजी करू नका,एक काम करा... एकदोन दिवस वाट पहा आणि मग त्यांना फोन करा आणि सांगा की आज पैसे मिळाले नाही तर तुमच्या मॅडमना फोन करेन,तुम्ही फक्त दम द्या... पैसे मिळून जातील तुमचे!"
महेशने मला बोलता बोलता करून बघता येईल असा एक उपाय सांगितला होता.
चार तारखेला मी सकाळी सकाळी त्या साहेबांना सरळ फोन केला. फोनला उत्तर मिळाले नाही.मग मी मेसेज केला..
" सर..दोन तारीख उलटून गेली आहे,अजूनही तुम्ही पैसे पाठवले नाहीत,मी चांगल्या भावनेने तुम्हाला मदत केली होती,पण तुम्ही वेळ पाळली नाही..आता टाळाटाळ करत आहात...आज जर मला पैसे मिळाले नाहीत तर संध्याकाळी मी तुमच्या घरी येईन"
मेसेज वाचल्याबरोबर त्यांचा कॉल आला. साहेब बहुतेक घरात होते आणि समोर कुणीतरी असावे. एकदम दबक्या स्वरात ते बोलत होते...
" सॉरी सर,अजून तीन चार दिवसांत देईन मी पैसे..."
'काय निर्लज्ज माणूस आहे हा!',
आता माझा राग अनावर झाला होता..
" हे पहा, आज मला पैसे मिळाले नाही तर मी रात्री तुमच्या घरी येणार म्हणजे येणार... "
माझा वाढलेला आवाज ऐकून त्याने बोलणे आटोपते घेतले...
" ठीक आहे सर,मी ऑफिसात पोहोचलो की gpay करतो .. "
त्यांनी फोन बंद केला...आत्तापर्यंत आलेल्या अनुभवावरून शब्द पाळला जाईल याची खात्री नव्हतीच,तरीही
'आज पिच्छाच पुरवायचा,दुपारपर्यंत वाट पाहून त्यांना पुन्हा फोन करायचा' असे मी ठरवले.
विशेष म्हणजे दहाच्या सुमारास त्यांचाच फोन आला...
" सर खूप अडचण आहे, दोन तीन दिवसांत मी नक्की परत करतो पैसे... "
माझ्या रागालोभाची पर्वा न करता त्यांचे आपलेच म्हणणे पुढे रेटणे चालूच होते, आता तर माझी खात्रीच झाली होती की, समोरच्या व्यक्तीला माझी रक्कम परत द्यायचीच नाहीये!मला केवळ झुलवत ठेवायचा उद्योग त्याने सुरु केला होता. त्याला आता सणसणीत उत्तर देणे आवश्यक झाले होते.
" हे बघा, आता मला तुमचे काहीच ऐकायचचे नाही, आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जर माझ्या खात्यात पैसे क्रेडिट झाले नाही तर रात्री मी तुमच्या घरी येणार... "
मी रागारागाने फोन बंद करून टाकला..
मी बिल्डिंगच्या व्हाट्स ऍप गृपवरून त्या व्यक्तीच्या बायकोचा मोबाईल नंबर काढून ठेवला.'आज या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच..' मी निर्धार केला.
संध्याकाळी नेहमीच्या वेळी आम्ही चालायला जाऊन आलो.घरी आल्यावर एकदा बँक स्टेटमेंट बघायचे आणि 'त्याच्या' बायकोला फोन करायचा हे ठरले होते...
साधारण संध्याकाळी साडेपाच वाजता माझ्या मोबाईलवर बँकेत तीन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज आला आणि महेशने सांगितलेला तो फॉर्मुला लागू पडल्याची खात्री झाली!
'लकडीशिवाय मकडी वळत नाही' हेच खरे आहे!
©प्रल्हाद दुधाळ.