मला स्पेस हवी पर्व १ - भाग १ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १

मला स्पेस हवी पर्व १ भाग २

मागील भागात आपण बघीतलं की नेहा सुधीरला मला स्पेस हवी आहे हे सांगते सुधीरला धक्का बसतो. ऋषी आल्यामुळे दोघांचं बोलणं अर्धवट राहतं.या भागात बघू काय होईल.


किती तरी वेळ सुधीर आपल्याच विचारात बाल्कनीत उभा होता. ऋषीच्या हाक मारण्याचे तो भानावर आला.

" बाबा…बाबा झोपायला यानं"

इच्छा नसून सुधीर आत आला. सुधीर रोज झोपताना ऋषीला गोष्ट सांगत असे. आज गोष्ट सांगण्याची सुधीरची मनस्थिती नव्हती. जडशीळ पावलाने सुधीर आत आला.

" बाबा आज कोणती गोष्ट सांगणार?"

ऋषीच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं कळेना. सुधीर नेहाकडे बघत म्हणाला,

" ऋषी आज मी खूप थकलोय. आज मला गोष्ट सांगायला लावू.नको."

सुधीर पलंगावर जाऊन झोपला.

" आई तू सांग गोष्ट"

"ऋषी आज असाच झोप मीपण खूप दमलेय."

ऋषी शेवटी गोष्ट न ऐकताच झोपायचा प्रयत्न करू लागला.

ऋषी झोपलेला बघून सुधीर हळूच उठला आणि बाल्कनीत आला. बाल्कनीत असलेल्या खुर्चीवर डोळे मिटून बसला.

नेहाने तिला स्पेस हवी हा विषय काढल्यापासून सुधीर अस्वस्थ होता. वरून त्यांचा चेहरा शांत दिसत होता पण आतमध्ये प्रचंड कल्लोळ माजलेला होता. या कल्लोळाची धग त्याचं मन आणि शरीर जाळत होतं. त्यांचा मेंदू विचार करेनासा झाला.

कितीवेळ या अवस्थेत तो बसून होता त्यालाच कळलं नाही.

इकडे नेहा ही जागीच होती. तिला सुधीर उठून बाल्कनीत गेल्याचं लक्षात आलं होतं पण ती डोळे मिटून गादीवर पडली होती. तिच्या मनातही विचारांची आवर्तनं फेर धरून तिला बेजार करत होते.

आज तिने जो विषय काढला त्यामुळे तिच्या मनावर इतके दिवस जे ओझं होतं,तिची जी कुतरओढ होत होती ती थांबली होती म्हणून तिला बरं वाटत होतं पण त्याचवेळी सुधीरची जी अवस्था होत होती ती ही तिला शांतता मिळू देत नव्हती.

आज तिच्या लग्नाला सात वर्ष झाली होती आता तिने स्पेस हवी सांगीतलं त्यामुळे तो अस्वस्थ झालाय हे तिला पटतंय.पण तिला आता या सगळ्या नात्यांच्या गोंधळात कंटाळा आलाय.

तिच्या मनात आलं की सुधीरला नीट समजावून सांगावं म्हणून ती हळूच पलंगावरून उठली आणि बाल्कनीत गेली.

" सुधीर"

सुधीर ने डोळे मिटलेलेच होते.

"सुधीर जरा डोळे उघडतोस"

सुधीर ने हळूहळू डोळे उघडले आणि तो नेहाकडे बघायला लागला.

"सुधीर मघाशी आपलं बोलणं अर्धवट राहिलय."

"आता काय बोलणार? जे तुला सांगायचं होतं ते तू सांगितलंस."

सुधीरच्या स्वर कोरडा होता.

"हो मघाशी मी सांगीतलं पण मला असं वाटतंय हे तू समजून घे. आत्ता तुला माझ्या मित्राच्या भूमिकेतून माझ्या बोलण्याचा, निर्णयाचा विचार करायला हवा."

"हं " सुधीर हसला

"हसला का? मी गंभीर पणे बोलतेय. यात हसण्यासारखं काय आहे?"

नेहाला सुधीरच्या हसण्या मागचं कारण लक्षात आलं नाही.

"हसू नको तर काय करू? मी तुझा मित्रच होतो आणि आहे पण त्याचवेळी एक नवरा पण आहे हे तू कसं विसरते? या तुझ्या निर्णयात मी फक्त मित्र म्हणून नाही तुला साथ देऊ शकत."

"प्रयत्न कर. प्रयत्न केला की सगळं जमतं."

नेहाचं हे वाक्य ऐकताच सुधीर हसतच तिला म्हणाला,

"नेहा हे तुझं वाक्य भाषणात ऐकायला छान वाटतं. या वाक्यावर लोकांच्या टाळ्या मिळतात पण प्रत्यक्ष आयुष्यात हे अवघड आहे."

यावर नेहा काही बोलली नाही. सुधीर कितीतरी वेळ तिच्याकडे एकटक बघत होता. त्याची नजर नेहाला अस्वस्थ करत होती. तिने महत्प्रयासाने आपली नजर दुसरीकडे वळवली. नेहाने नजर वळवली तरीही तिला सुधीरची नजर तिच्यावरच टिकली आहे हे कळत होतं. तिला सुधीरची नजर टोचत होती.

"नेहा या सात वर्षांत तुला आपल्या संसारात काय ऊणीव भासली की आता तुला स्पेस हवी वाटतेय? मी तुझा फक्त नवरा म्हणून कधीच वागलो नाही. एक मित्र पण झालो. तुझ्या इच्छा अपेक्षांचा नेहमी आदर केला. तरीही तुला काहीतरी उणीव जाणवते आहे?*

"सुधीर आपल्या संसारात काहीच उणीव नाही तरीपण मला हवी तेवढी स्पेस मिळत नाही. मीपण बायको म्हणून न वागता तुझी मैत्रीणपण झाले. मीही तुझ्या इच्छा, अपेक्षांचा आदर केला. पण तरीही मला वाटतंय की एक व्यक्ती म्हणून मला जे हवंय नाही मिळतंय. मला आता नेहा या नावाने फक्त जगायची इच्छा आहे."

"नेहा पुरूष माणसाला एकटं राहणं सोपं असतं स्त्रीला हे तेवढं सोपं नसतं."

सुधीर पुन्हा तिला समजावणीच्या स्वरात म्हणाला.

"सुरवातीला वाटेल थोडं अवघड नंतर मला सवय होईल."

"तू फक्त एकच बाजू बघतेय. तुला स्पेस हवी यावरच तू विचार करतेय. तुला सात वर्षांत आमच्या सहवासाची सवय नाही झाली का? आमच्यात तू गुंतली नाही?"

नेहाने काहीच उत्तर दिलं नाही.

"बोल नं ? अगं मीच नाही माझे आईबाबापण तुझ्यात गुंतले आहेत. तुझ्यामध्ये ते त्यांच्या मुलीला बघतात. तुझ्यावर मुलीसारखं प्रेम करतात. आज प्रियंका असती तर साधारण तुझ्याच वयाची असती. तूही सगळी नाती तोंडुन जाशील म्हणजे पुन्हा एकदा ते त्यांची मुलगी गमावतील. फार दु:ख होईल ग त्यांना म्हणून पुन्हा विचार कर."

"सुधीर मी म्हणजे प्रियंका नाही. मी नेहा आहे. मी प्रत्येक वेळी प्रियंका म्हणून कशी वागेन? प्रियंका अशी वागेल, प्रियंका तशी वागेल याचा विचार करून मी कसं वागायचं हे का ठरवू?"

" असं कोण म्हणतंय? तू नेहा आहेस नेहासारखीच रहा. आईबाबा तुझ्यात प्रियंकाला बघतात म्हणून त्यांनी तुला कधी प्रियंका म्हणून वावरण्याची जबरदस्ती नाही केली.'

" सुधीर प्लीज मला समजून घे."

"तू पण मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. शांतपणे, सुखाने आपला संसार चालू असताना तू जर हा बाॅम्ब फोडशील तर मी गोंधळणार नाही का?"

सुधीरच्या चेह-यावरून त्यांचं बावरलेपण स्पष्ट दिसत होतं नेहा मात्र कळूनही त्याकडे दुर्लक्ष करत होती.

"सुधीर मला या नात्यांचा मोह दाखवू नकोस. मला याचं गोतावळ्याचा कंटाळा आलेला आहे. या सगळ्या भूमिका करताना मला मी कुठेच सापडत नाही. माझ्यातील मी का हरवू ? सुधीर हे बघ तू सहजपणे जाऊ दिलंस बंगलोरला तर मला बरं वाटेल. मला खूप वाद नकोय."

बोलताना नेहाचा आवाजात चीड आली होती.

" नेहा स्त्री प्रमाणे पुरूषालाही खूप भूमिका निभवाव्या लागतात. मीही तुझ्या सारखं म्हणू का? अगं तुला स्पेस हवी नं .तू कुठेतरी लेडीज गृपबरोबर आठवडाभर फिरायला जा. तुला आम्ही आठवडाभर फोनसुद्धा करणार नाही तुझी स्पेस मी तुला देईन पण हे प्रमोशनवर बंगलोरला जाण्याचा विचार डोक्यातून काढून टाक. तुला आत्ता हे सगळं सोपं वाटतं आहे पण हे तेवढं सोपं नाही."

"मला माझ्या या निर्णयावर खूप चर्चा करायची नाही. माझं ठरलंय. आईबाबांना मी प्रमोशन घेणार आहे म्हणून सांगणार आहे."

"ऋषीचं काय? त्याला काय कारण सांगणार ? नेहा आता कोणताही निर्णय घेताना आपल्या दोघांनाही विचार करावा लागेल कारण आपल्या निर्णयावर ऋषीचं भवितव्य अवलंबून आहे हे तुझ्या लक्षात येतंय का?"

" कळतंय मला मी मूर्ख नाही. ऋषीला मी प्रमोशनचंच कारण सांगणार आहे. मी त्याला समजावीन पण तुम्ही सुद्धा त्याला समजवायला हवं.'

"तुझ्या मनात खरं काय आहे हे तू ऋषीला सांगू शकशील?"

" सुधीर ते कारण ऋषीला कशाला सांगायचं? ते कळण्याचं वय नाही त्याचं. उगीच माझ्या निर्णयावर काथ्याकूट नको करूस."

" ऋषी हे सगळं समजून घेण्याच्या वयातील नाही हे तुला कळतंय हेच खूप आहे. तू बंगलोरला गेलीस तरी तुला ऋषी रोज फोन करेलच मग कशी तुझी स्पेस जपणार आहे ."

"बघीन. तो नंतरचा प्रश्न आहे."

नेहा अजूनही ताठर स्वरातील बोलत होती.

सुधीर खुर्चीवरून उठला आणि बाल्कनीच्या कठड्याला टेकून उभा राहत म्हणाला

"नेहा हा कठडा बघितलाय?"

"रोजच बघते."

"या कठड्यामुळे बाल्कनीत असलेली कुठलीही वस्तू सुरक्षीत राहते. असाच कठडा संसाराला पण हवा असतो तेव्हाच ब-याच महत्त्वाच्या गोष्टी संसारातून सुटून जात नाही."

"...आणि ब-याच गोष्टी मनावर करकचून वळ उमटवतात तरी त्यांना सहन करावं लागतं."

नेहाच्या या बोलण्याने सुधीर चमकला. त्याला नेहाकडून हे उत्तर अपेक्षित नव्हतं.

"कोणत्या गोष्टी तुझ्या मनाला करकचून बांधून मनावर वळ उमटवतात आहे?"

"मला माझ्या मनासारखं वागता येत नाही. मला फक्त नेहा म्हणून जगायचंय."

"म्हणजे?

"मला आता सुन,बायको,आई,जाऊ या सगळ्या भूमिका जगतांना कंटाळा आलाय."

"नेहा तुला कळतंय का या सो काॅल्ड स्पेसचा विचार किती तकलादू आहे. सध्या तू त्याच्या आकर्षणात आहेस म्हणून तुला हे घर ही नाती नकोशी झाली आहेत. पण एक‌दिवस तुला जाणवेल की तू एकटी पडली आहेस. ज्या भूमिका जगतांना तुला कंटाळा आलाय त्यांना तू एकटेपणात कळवळून हाक मारलीस तरी कोणी येणार नाही अगदी ऋषीसुद्धा येणार नाही. तेव्हा हीच स्पेस तुला थकवेल. नंतर पश्चात्ताप करून उपयोग होणार नाही म्हणून सांगतोय आत्ताच पुन्हा गंभीरपणे या प्रमोशन बद्दल विचार कर. एकदा प्रमोशन स्विकारले की काही वर्ष तू अडकलीस."

सुधीर कळवळून बोलत होता पण नेहावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

"ठीक आहे मी झोपते."

अगदी निर्विकारपणे बोलून नेहा झोपायला गेली.सुधीर कपाळावर हात मारून अस्वस्थपणे फे-या मारू लागला. आपलं काय चुकलं की आपण या विचित्र वळणावर येऊन पोहोचलो. हेच त्याला कळत नव्हतं.

"मला हे वळण मान्य नाही. पण नेहा ऐकायला तयार नाही. ऋषीच्या मनाची किती घालमेल होइल. एक दिवस ठीक आहे आई नाही दिसली तर ऋषी त्रास देणार नाही पण खूप दिवस आई भेटणार नाही ही गोष्ट ऋषी मान्य करू शकेल का?" मनातच बोलला. काय करावं सुधीरला कळत नव्हतं.
________________________________
नेहा सुधीरच्या बोलण्यावर विचार करेल का? बघू पुढील भागात.