मला स्पेस हवी पर्व १ - भाग १२ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १२

मला स्पेस हवी भाग १२

मागील भागात आपण बघीतलं की नेहा सुधीर आणि ऋषीला बसस्टॅंडवर यायला नाही म्हणते. बसस्टॅंडवर आलेल्या अक्षय आणि आईशीपण नेहा नीट बोलत नाही आता काय होईल पुढे बघू.

बस बंगलोरला निघाली नेहाला आई आणि अक्षय दिसले पण एसी बस असल्याने काचा बंद होत्या त्यामुळे तिला ते दोघं दिसले पण त्यांना नेहा दिसली नाही.

बस काही अंतर पुढे आल्यावर नेहाने डोळे मिटून घेतले. ती स्लीपरकोचने चालली होती आणि तिने सिंगल बर्थचं तिकीट काढलं असल्याने ती बर्थवर एकटीच होती.

तिने डोळे मिटले पण झोप तिच्या डोळ्यात शिरायला तयारच नव्हती. झोपे ऐवजी राहून राहून सुधीरच तिच्या डोळ्यासमोर येत होता. सुधीरची केविलवाणी नजर तेव्हा तिच्या मनाचा ठाव घेत होती तशी आताही घेत होती. नेहाला सुधीरबद्ल मनात कणव आली पण तिचा नाईलाज होता.

नेहाच्या मनात आलं, सुधीर बरोबर आपली लग्नानंतरची वर्ष खूप छान गेली. तिच्या काही मैत्रीणींचे अनुभव तिने ऐकले होते. नव्याची नवलाई संपल्यावर नवरा बायको मधले रेशमी बंध हळूहळू विसविशीत व्हायला लागले. सासूशी संबंध बरे होते तिथेही ताण निर्माण झाला. हे सगळं ऐकल्यावर नेहाला लग्न ठरल्यावर दडपण आलं. नेहाला एकत्र कुटुंब फार आवडायचं तसं ते सुधीरच्या घरी मिळालं पण तिला मैत्रीणींच्या अनुभवावरून आपल्या बाबतीत असंच घडलं तर? हा प्रश्न भेडसावू लागला.

एक दिवस तिच्या आईच्या लक्षात आलं की नेहावर कसलतरी दडपण आलय. तेव्हा आईने तिला विचारलं,

" नेहा तू मला इतक्यात कसल्या तरी दडपणाखाली वावरतेय असं वाटतंय. कसलं दडपण आलय?"

" आई सुधीरकडची मंडळी चांगली आहेत पण सुधा आणि कल्पनाचे अनुभव ऐकल्यावर मला जरा भिती वाटतेय.माझ्याबाबतीत पण असं काही घडलं तर? मला माणसांचा,नात्यांचा गोतावळा आवडतो पण त्यात अशी गैरसमजाची अढी निर्माण झाली तर मी कसं करीन?"

नेहाच्या मनातील भीती ऐकून तिच्या आईने तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हटलं,

" वेडाबाई या कारणावरून तुला दडपण आलय.अग प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं तसंच प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. संसाराचा पेपर एवढा कठीण नसतो. संसारात निर्माण होणारे प्रश्न पुष्कळदा आपणच निर्माण करत असतो तर कधी कधी परिस्थिती निर्माण करत असते. परीस्थितीमुळे निर्माण झालेले प्रश्न दोघांनी एकत्रित पणे ,शांतपणे, विचाराने सोडवले तर त्याचा त्रास होत नाही. "

" आई पण सगळे जर एकमेकांशी मोकळेपणाने वागले तरी गैरसमज का होतो?"

" गैरसमज स्वभावामुळे होत असतात. नेहमी दुसऱ्यांना समजून घेत गेलो तर गैरसमज कसे निर्माण होतील? एकत्र कुटुंबात प्रत्येकाला स्वतंत्रपणे नेहमीच राहता येईल असं होत नाही. एकत्र कुटुंबात चारपैकी एकजण जर वेगळ्या विचाराने चालायचा प्रयत्न करू लागला तर चौघांनी जी नात्यांची साखळी केली असते त्यात अंतर पडतं आणि मग चालण्याची लय बिघडते.

स्वतंत्र विचाराची व्यक्ती पुढे जायचा प्रयत्न करत असते आणि इतर तिघं मागे पडतात आणि तिथे गैरसमजाची ठिणगी पडते. मग हळूहळू नातेसंबंध विसविशीत व्हायला लागतात. तुला एकत्र कुटुंब पद्धती आवडते नं मग अशी गैरसमजाची ठिणगी पडणार नाही याची तू काळजी घे.

तू बाहेरून त्यांच्या कुटुंबात जाते आहेस तुला त्यांच्या लयीमध्ये तुझी लय मिळवून चालावं लागेल. तेही तुला आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करतील.दोन्ही कडून चांगले प्रयत्न झाले तर ही लय कधीच बिघडत नाही. तू तुझ्या मैत्रीणींचे अनुभव ऐकून सुधीरच्या घरच्या लोकांना जज करू नकोस."

नेहाच्या मनातील भीतीचं मळभ आईचं बोलणं ऐकून दूर झालं. नेहाने आईला घट्ट मिठी मारली.

" माझं वेडं कोकरू आता नाही नं वाट चुकणार?"

" नाही. मी वाट चुकत असतांनाच तू मला योग्य मार्ग दाखवला. आई मी त्यांचं कुटुंब एकत्र बांधून ठेवण्याचाच नेहमी प्रयत्न करीन."

" शहाणं माझं बाळ."

आई हसत म्हणाली. आत्ता हे नेहाला आठवलं. लग्नानंतर नेहाने आईनी सांगीतलेल्या गोष्टी लक्षात ठेऊन सुधीरच्या कुटुंबाच्या लयीमध्ये आपली लय मिसळण्याचा प्रयत्न केला आणि ती दुधात साखर मिसळावी तशी त्यांच्या घरातील सगळ्यांशी एकरूप झाली.


आता इतक्या वर्षांनंतर मला का बरं या सगळ्यात जीव घुसमटायला लागला? ही सगळी नाती गोती तोडून बाहेर पडावसं वाटलं? मला स्वतःलाच याचं ऊत्तर मिळत नाही. तरीही खूप दिवस मी या बंधनात राहण्याचा जीव तोडून प्रयत्न करत होते.

मला जे वाटत होतं ते काही दिवस वाटेल कदाचित म्हणून वाट बघू. पण दिवसेंदिवस मनाची असं जी एकटं राहण्याची इच्छा होती. स्पेस हवी असं वाटत होतं ती इच्छा दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्यामुळे मनाची रस्सीखेच होऊ लागली तसं मला ठाम निर्णय घेणं महत्वाचं वाटलं.

माझ्या या निर्णयामुळे सगळेच दुखावले गेले. सुधीर तर कोलमडला आहे पण मीसुद्धा माझ्या मनाची चाललेली रस्सीखेच आणखी सहन करू शकणार नव्हते.

नेहाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले का तर तिच्यामुळे सगळे दुखावले गेले म्हणून. तिला आठवलं काही दिवसांपूर्वी सुधीर खूप मूडमध्ये होता. ऋषी आई बाबांजवळ झोपायला गेला होता. त्या क्षणांनी सुधीर इतका मोहरून गेला की त्याला त्याच्या मनातील भावना कशी व्यक्त करू समजत नव्हतं.

"नेहा आजची रात्र पूर्णपणे आपण दोघांनी प्रणय राधनेतील अत्युच्च बिंदू गाठेपर्यंत रंगवायची आहे. नेहा तू माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या जगण्याची व्याख्या बदलून गेली. तुला आठवतं आपल्या पहिल्या रात्री तू किती घाबरली होतीस. तुझा घाबरलेला चेहरा सुद्धा इतका सुंदर दिसत होता की मला मोह आवरत नव्हता. पण मी थांबलो. आजच तूही माझ्या सारखीच आपल्या संसाराची सुरुवात करणार होतीस.तेव्हा आजच तुझं मन जपायला हवं हे माझ्या लक्षात आलं.आज जर मी आतताईपण केला तर तू कोमेजशील आणि नंतर तू कधीच फुलली नाहीस तर आपला संसार कसा होईल. असं जबरदस्तीचा संसार मला नको होता म्हणून मी शांत राहिलो."

हे बोलत असताना सुधीरचा हात नेहाच्या अंग प्रत्यांगावरून लिलया फिरत होता. तिच्या प्रत्येक अवयवाच्या स्पर्शाने सुधीर मधला मदन जागा होत होता. नेहा मात्र त्याच्या स्पर्शाने अंग आक्रसून घेत होती. तिला हा प्रणय नकोसा वाटतो होता. सुधीर जितका उत्तेजीत होत होता तेवढीच नेहा विझत चालली होती.

उत्तेजीत झालेल्या सुधीरला काही वेळ हे लक्षात आलं नाही. जेव्हा लक्षात आलं तेव्हा तो भानावर आला. तो गोंधळून नेहाकडे बघायला लागला. नेहाचा चेहरा त्रासिक झालेला बघून सुधीरने विचारलं.

" नेहा आज का तू प्रतिसाद देत नाहीस. तुला काही त्रास होतोय का?"

हे विचारून सुधीरने हळूच तिचं चुंबन घेतलं आणि खूप प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाला,

" नेहा तुझ्यावर जबरदस्ती नाही करणार मी. तुला हे सगळं आवडत नसेल तर असूदे. तुला कधीही बघीतलं नं की मी नव्याने तुझ्या प्रेमात पडतो. अशी काय जादू आहे तुझ्यात मला कळत नाही. तुझ्या नजरेतून मधाळ प्रेम माझ्यावर बरसात करतं आणि त्यामुळे मी बेधुंद होतो. पण घरात आईबाबा असल्याने खूप संयम ठेवावा लागतो. नेहा मी तुझ्या प्रेमात आकंठ बुडालो आहे."

अचानक सुधीर गाऊ लागला,

"आकंठ मी बुडालो नेहा तुझ्या केसात,
धुंदी मनास आली जादू तुझ्या केसात.
आकंठ मी बुडालो. "

सुधीर या ओळी गुणगुणू लागला तशी नेहा क्षणाक्षणाला उद्विग्न होऊन लागली. गाणं संपवून सुधीर तिचं चुंबन घेण्यासाठी तिच्याकडे झुकला तसं नेहाने हाताने त्याला दूर करून म्हणाली,

" सुधीर प्लीज आज माझा मूड नाही हे तुला कळत नाही का?"

नेहा चिडून बोलल्यामुळे सुधीर खाडकन भानावर आला.

" नेहा काय झालं? मी इतक्या छान मूडमध्ये होतो. का ओरडलीस?"

"अरे तुझा मूड असेल पण माझा नाही हे कळत नाही का तुला? मघापासून तुझी ती रोमॅंटिक बडबड मी ऐकतेय. तुला वाटलं मीही रोमॅंटिक झाले आहे. तुला मी प्रतिसाद देत नाही हे लक्षात येतं नाही?"

" नेहा एकदम काय झालं? आज कितीतरी दिवसांनी आपण एकत्र आलो आहोत. म्हणून मी इतका रोमॅंटिक झालो. तू नव्हती का बघत वाट अशा एकांताची? कारण मी खूप दिवसांपासून तुझ्या स्पर्शासाठी आसूसलेलो होतो. आज ऋषी नाही म्हणून मी एवढा रोमॅंटिक वागलो तर तू अशी का रिॲक्ट होतेस?"

" कारण मला हे सगळं नकोस झालंय."

" नकोसं झालंय ! पण का? आपण काही म्हातारे झालो नाही."

" म्हातारे नाही झालो पण मला आता या गोष्टीत इंटरेस्ट राहिला नाही."

" तुला बरं नाही का? कसला त्रास होतोय का? सांग मला. डाॅक्टरकडे जाऊया."

" डाॅक्टरकडे जायची गरज नाही मला या रोमान्सचा कंटाळा आलेला आहे. नको वाटतं हे सगळं."

" का? मी तुझा मूड बनवण्याचा प्रयत्न करत होतो. तुला हे ही आवडलं नाही. माझ्या जवळ यायला पण आवडत नाही का?"
"
"नाही. मला हे काहीच आवडतं नाही."

हे बोलून नेहा सुधीरकडे पाठ करून झोपली. नेहाच्या बोलण्याने सुधीरचं मन पार विस्कटून गेलं. तो गलीतगात्र होऊन अंथरुणावर पडला. त्याला कळेना आपण कुठे आणि कसं विचित्र वागलो की त्यामुळे नेहाला हे सगळं आणि माझ्या जवळ येणं आवडेनासं झालं.


त्या दिवशीचा तो प्रसंग आणि हताश झालेला सुधीर हे सगळं आठवलं तशी नेहाने एक आवंढा गिळला आणि नेहा झोपण्याचा प्रयत्न करायला लागली. तेवढ्यात

" चलो खाना खानेके लिए बस यहाँ आधा घण्टा रूकेगी. जिनको ऊतरना है ऊतरो."


कंडक्टरच्या या ओरडण्याने नेहाने दचकून डोळे उघडले. तिने खिडकीतून बाहेर बघीतलं. कुठल्यातरी धाब्यावर बस थांबली होती. लोक उतरत होते.

नेहाने पुन्हा डोळे मिटले.पुन्हा तिच्या डोळ्यासमोर सुधीरच आला. तिला असा सतत डोळ्यासमोर सुधीर आलेला नको वाटतं होतं. तिने डोळे उघडले. डोळे मिटले की डोळ्यासमोर सुधीर येतो आणि त्याच्या आठवणी येतात. यामुळे ती थोडीशी चिडचिडली. तिच्या मनात आलं मी या सगळ्यांपासून दूर पळतेय आणि राहून राहून डोळे मिटले की त्याच्याच आठवणी का येतात. काय करावं? शेवटी तिने फोनवर कथा वाचायचं ठरवलं.

तिच्या मैत्रिणीने इतक्यातच तिला ऑनलाईन कथा वाचता येतात असं सांगितलं होतं. मैत्रीणीने सांगीतलेलं ॲप डाऊनलोड करून ती कथा ऐकणार तोच तिचा फोन वाजला. स्क्रीनवर सुधीरचं नाव दिसताच नेहाच्या कपाळावर आठ्या आल्या. तिने फोन उचलला नाही. जरावेळ फोन वाजून बंद झाला. तिने पर्समधून हेडफोन काढले आणि कानाला लावले. पुन्हा तिचा फोन वाजला. सुधीरचाच फोन होता. आता नाईलाजाने तिने फोन उचलला.

" हॅलो"

" नेहा सुधीर बोलतोय.एक मिनीट ऋषी बोलतोय."

" आई हॅलो. मी ऋषी बोलतोय."
"
हं बोल."

" तू कुठपर्यंत आलीस?"

"माहिती नाही."

"तुला मजा येते आहे नं?"

" हो मजा येतेय.

"आई मी आज बाबांजवळ झोपणार नाही. आजी जवळ झोपणार आहे कारण आजी मला गोष्ट सांगणार आहे"

" हो का ! ठिक आहे. ठेव फोन.

"का? आई बोल नं थोड्यावेळ . मी खूप शहाण्या मुलासारखा वागणार आहे.तू माझी काळजी करू नको. आई थोड्यावेळ बोलनं. "

" मला झोप येतेय. ऊद्या बोलू."

" बरं. आई तू घाबरू नकोस. भिती वाटली नं तर बाप्पाचं नाव घे."

" हो चल. ठेव आता"

" हो. गुड नाईट आई"


असं म्हणून ऋषीने फोन ठेवला. नंतर नेहानेपण फोन बंद केला. ऋषीला तिने लगेच फोन ठेवायला सांगितलं म्हणून सुधीरला राग येईल हे नेहाच्या लक्षात आलं. पण आत्ता तिला या सगळ्या नात्यांपासून दूर पळायची घाई झाली होती. ऊद्या बंगलोरला पोचल्यावर ऋषी पुन्हा फोन करेलच कारण त्याला हाॅटेल कसं आहे ते बघायचय. तेव्हा मनावर संयम ठेवून त्याच्याशी बराच वेळ बोलायचं असं नेहाने मनाशी ठरवलं. सुधीरही कदाचित बोलेल तर राग न येऊ देता सुधीरशी पण चार वाक्य नीट बोलायची हेही नेहा मनाशी ठरवते.
_________________________________
ऊद्या बंगलोरला पोचल्यावर ऋषीचा फोन येईल का? नेहा त्याच्याशी बोलेल का? बघू पुढील भागात.