मला स्पेस हवी पर्व १ - भाग १६ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग १६

मला स्पेस हवी पर्व १ भाग १६

मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचे आई बाबा सुधीरशी बोलणार असतात पण सुधीरची मित्राच्या आत्महत्येमुळे मन:स्थिती ठीक नसते. या भागात बघू सुधीरला त्यांचे आईबाबा विचारू शकतात का


बराच वेळ झाला तरी सुधीर आपलं डोकं सोफ्याला मागे टेकवून डोळे मिटून बसलेला असतो. त्याच्या डोळ्यातून अजुनही पाणी वहात असतं. मधूनच त्याला दु:खाचा कढ आवरता येत नाही.

सुधीरचे बाबा त्याच्यासमोर येऊन उभे राहतात तरीही सुधीरला त्यांची चाहूल येत नाही. बाबा एकदा सुधीरकडे बघतात एकदा त्याच्या मागे उभी असलेल्या त्याच्या आईकडे बघतात आणि मानेनीच नाही म्हणतात.

आई त्यांना खुणेनेच सांगते की त्याला हलवा आणि विचारा सविस्तर काय झाले? यावर बाबा होकारार्थी मान हलवतात आणि त्याच्या बाजूला बसतात.

" सुधीर ऐकतोय का?"

बाबांच्या या बोलण्यावर सुधीर खूप कष्टाने डोळे उघडतो.आणि जड स्वरात विचारतो,

" काय?"

सुधीरचा इतका हताश चेहरा आजपर्यंत आईबाबा दोघांनीही कधी बघितला नसतो. त्यामुळे त्यांना कळत नाही की एकदम बोलायला कशी सुरुवात करावी.

बाबा काहीच बोलले नाही त्यामुळे सुधीरने पुन्हा डोळे मिटून घेतले. आई खुणा करून ' लवकर विचारा' असं दोन तीनदा म्हणाल्यावर बाबांनी सुधीरला विचारलंं,

" सुधीर नितीनला नोकरीच्या व्यतिरिक्त आणखी कशाचा ताण होता?"

" त्याची बायको. हकनाक बळी गेला नितीनचा"

एवढं बोलून तो पुन्हा रडायला लागला. आईबाबांना भिंती वाटली की नितीनसारखा सुधीरपण नेहा निघून जाण्याचा ताण तर घेणार नाही ?

" बेटा सुधीर जरा डोळे उघडतो का? आम्हाला नीट सगळं सांगतोस काय?"

" काय सांगू बाबा.नितीनचा डमरू झाला होता."

" म्हणजे?"

" एका बाजूने बाॅस बडवायचा तर दुस-या बाजूने बायको बडवायची. पिचून गेला होता दोघांच्या बडवण्यामध्ये."

" तू त्याला समजावलं नाही?"

" नितीनला मी आणि निशांत दोघंही धीर द्यायचो. पण बाॅसला आणि त्याच्या बायकोला कोण सांगणार की नका बडवू रे त्याला. दोन्ही कडून मार खाऊन थकला, कंटाळल आणि शेवटी आपल्या जीवाचा अंत करून घेतला."

हे सगळं सुधीर रडतच बोलला. त्यांचा रडवेला चेहरा आणि सूर ऐकून आईबाबा दोघांनाही खूप वाईट वाटलं.
नितीनच्या जाण्याने तेही दु:खी झाले कारण त्यांच्याकडे पुष्कळदा नितीन येऊन गेला होता.त्याची बायको मात्र कधीच त्याच्याबरोबर आली नाही.

सुधीरच्या या मन: स्थितीत त्याला नेहाबद्दल कसं विचारायचं हा खूप मोठा प्रश्न आईबाबांसमोर होता. पण विचारावं लागणार होतं.खरौ काय आहे ते कळायला हवं होतं. बाबा काही बोलणार तोच सुधीर म्हणाला ,

" नितीन त्यादिवशी बोललाच होता की मला हे सगळं आता सहन होत नाही.बाॅसचं ऐकावं की बायकोचं ते कळत नाही. बाॅस घरासाठी बायको मुलांसाठी वेळ देत नाही. बायको म्हणून चिडते.आणि बाॅस! एवढी ढोरासारखी मेहनत करतो तरी समाधानी नसतो.नोकरी सोडून द्यावी असं वाटतं म्हणायचा. "

सुधीरला पुन्हा रडायला आलं. सुधीरची आई समोरच्या खुर्चीवर हतबल झाल्यासारखी बसली होती. बाबांना तर कळेना काय करावं कारण सुधीर त्यांच्या खांद्यावर डोकं ठेऊनच रडत होता. बाबांनी सुधीरच्या गालावर हळुवारपणे थोपटलं. दुसरं ते काय करू शकणार होते?

नेहाच्या जाण्याच्या पाठोपाठ हा नितीनचा धक्का सुधीर कसा सहन करेल? त्याने तो कोलमडून तर जाणार नाही? तोही स्वतःचौ काही बरं वाईट तर करणार नाही? यासारख्या प्रश्नांनी सुधीरच्या आईच्या मनात खळबळ माजली.

" बाबा तुम्ही नितीनला ओळखता नं?"

"हो ओळखतो नं. बरेचदा आलाय तो आपल्या घरी. खूप कष्टाळू मुलगा होता.त्याचा चेहरा नेहमी चिंतेत असायचा. ते का हे आज कळलं. फार वाईट झालं."

बाबा अगदी मनापासून म्हणाले.

" बाबा माणूस लग्न का करतो हो?"

सुधीरचा हा प्रश्न ऐकून सुधीरचे आईबाबा दोघंही चमकले.
" बाबा सांगा नं?"
सुधीरच्या डोळ्यातून अजुनही पाणी गळत होतं. त्यांचा आवाज नुसताच रडवेला नव्हता तर खूप दुखावलेला पण होता. त्याच्या या प्रश्नात नितीनच्या बायकोबरोबर नेहाबद्दलचाही उल्लेख होता. बाबांना त्याला काय ऊत्तर द्यावं कळलं नाही तरी ते म्हणाले,

" अरे माणसाच्या आयुष्याला अर्थ यावा म्हणून लग्न करतात. "

" बाबा हे वाक्य तुमच्या आयुष्याला लागू पडतं. माझ्या आणि नितीनच्या आयुष्याला का नाही लागू पडलं? काय चुकलं आमचं दोघांचं?"

" बेटा आपलं आयुष्य कसं जाणार आहे हे खतररं देवानेच ठरवलं असतं आपण कुठे काय करतो?"

" हे सगळं प्रवचनात ऐकायला ठीक आहे. पण बाबा प्रत्यक्षात या परिस्थितीत काय करणार?"

सुधीर हळूहळू त्याच्या आईबाबांना ज्या प्रश्नाचं उत्तर हवंय त्या दिशेने चालला होता. आता आपण थोडा धीर धरायला हवा हे दोघांच्याही लक्षात आलं.

आता सुधीरचं रडणं थोडं कमी झालं होतं.

" नितीनच्या बायकोला खूप पैसा हवा होता,मोठ्ठं घर हवं होतं तर नेहाला स्पेस हवी होती. दोघींना त्यांच्या इच्छा इतक्या मोठ्या वाटल्या की या दोघींनी माझा आणि नितीनचा विचारच केला नाही.का? का आमचं आयुष्य,आमचं नातं काय वेशीवर टांगली? बाबा नितीन हळवा होता हो. तो नाही हा सततचा कोंडमारा सहन करू शकला. नितीनने बाॅस आणि बायकोच्या इच्छांच्या यज्ञकुंडात स्वतःच्या जिवाची आहुती दिली. नितीन गेला.

बाबा मिळाला का बाॅसला बिझनेस? मिळाला का त्याच्या बायकोला खूप पैसा,मोठ्ठ घर? माझ्या मित्राला जीवनातून उठवलं आणि आता त्याची बायको लोकांची सहानुभूती गोळा करत फिरतेय. लगेच इन्शुरन्सच्या पैशाचा क्लेम केला. आमच्या ऑफिस मध्ये नोकरी साठी क्लेम केला. किती स्वार्थीपणा हा!"

सुधीरचं सगळं बोलणं ऐकून त्याच्या आईबाबांचं मन आणि डोकं दोन्ही सुन्न झालं. सुधीरचं सांत्वन कोणत्याही शब्दातून होणार नाही हे दोघांच्याही लक्षात आलं.सुधीर नितीनच्या घटनेबरोबर स्वतःचं आयुष्य जोडत होता. त्यातून नितीन सारखा निर्णय सुधीर घेईल की काय ही भीती दोघांना वाटली.

" सुधीर बेटा नितीनच्या आयुष्याशी स्वतःचं आयुष्य जोडू नकोस. नितीन सारखा विचार तर तुझ्या डोक्यात येत नाही नं?"

सुधीरच्या आईने सुधीरच्या डोक्यावरून हात फिरवत घाबरून विचारलं.

"नेहा गेल्यावर खूपदा हा विचार डोक्यात आला होता."
सुधीरने असं म्हणताच आईबाबा दोघं मुळापासून हादरले.

" सुधीर हा असा वेडावाकडा विचार डोक्यात आणू नकोस.ऋषी लहान आहे.तू काही जिवाचं बरं वाईट केलं तर ऋषीने कोणाकडे बघायचं"

आई रडतच म्हणाली.

" ऋषीचा विचार करून हे पाऊल उचललं नाही.माझ्या माघारी ऋषीचच नाही तुमचही जगणं कठीण होईल याची मला जाणीव आहे. आई तू घाबरू नकोस.मी नितीन इतका कमकुवत नाही. नितीनसारखं पाऊल कधी ऊचलणार नाही."

" बेटा एक प्रश्न विचारू?"

बाबांनी हळुवारपणे आपला प्रश्न त्याच्या पुढे मांडण्यचा प्रयत्न केला.

" विचारा. मला ऊत्तर देता आलं तर देईन. माझं डोकं आता कुठल्याही प्रश्नाला शुद्धीत ऊत्तर देऊ शकेल की नाही माहीत नाही."

" ठीक आहे.असू दे नंतर विचारीन. "

सुधीरच्या मनाची आणखी बिकट अवस्था होऊ नये म्हणून त्याच्या बाबांनी एक पाऊल मागे घेतलं. कधी कधी परीस्थिती बघून एक पाऊल मागे घेणंच योग्य असतं हे सुधीरच्या बाबांना इतक्या वर्षांच्या आयुष्यात कळलं होतं.

" बाबा विचारा."

" नको बेटा. असू दे. तुझं मन आत्ता था-यावर नाही. तू शांत झालास की मग विचारीन."

" सुधीर झोपायला जातोस नं?"

आईने हळव्या मनाने विचारलंं.

" माझी झोप उडाली आहे. असं वाटतं डोळे मिटूच नये कारण डोळे मिटले की नितीनचा चेहरा डोळ्यासमोर येतो. हवालदिल झालेला नितीन मला स्वस्थ झोपू देणार नाही. ज्यांच्यावर मी खूप जीव लावतो नंआई ते मला असेच अधांतरी सोडून जातात."

सुधीरला एक हुंदका फुटला. हे बोलणं नेहाशी संबंधित आहे असं आईबाबा दोघांनाही वाटलं. तरी ते नेहाबद्दल स्पष्टपणे सुधीरला विचारण्याची हिंमत करू शकले नाही. दोघंही ऊदासल्या नजरेने हतबल झालेल्या सुधीरकडे बघत बसले, दोघंही यापेक्षा जास्त काहीच करू शकत नव्हते.

" ऊद्या नेणार कधी आहेत का नितीनला? तुझ्या बरोबर मी येईन."

सुधीरचा हात थोपटत बाबा म्हणाले.

" बाबा तुम्ही नका येऊ. सध्या ऊन खूप आहे. तुम्हाला उन लागलं आणि तुम्हाला काही काही झालं तर मी काय करीन.मी एकटा पडीन."

सुधीरचं हे बोलणं ऐकताच बाबांनी सुधीरला कुशीत घेतलं. सुधीरच्या मनावर नितीन आणि नेहाच्या जाण्याने खूप मोठा आघात झाला आहे हे बाबांच्या लक्षात आलं.ते म्हणाले,

" मी तुला आणि ऋषीला सोडून,एकटं टाकून कुठेही जाणार नाही. तू काळजी करू नकोस. मी नाही येत ऊद्या. आता जेऊन घे मग झोप.शाऔत झोप झाली की तुला बरं वाटेल."

सुधीर हळुच उठला. हातपाय धुवायला गेला. तो जाताच सुधीरची आई बाबांना म्हणाली,

" तुम्ही म्हणाले ते बरोबर आहे.सुधीर आणि नेहा मध्ये नक्की काहीतरी झाले आहे. "

" हो.पण आज ते विचारायचच राहिलं. ऊद्या हा शुद्धीवर आला की सांगतो की नाही कोणास ठाऊक? "

" सांगेल. एक दोन दिवसात त्याच्यावर जबरदस्ती, करून उपयोग नाही. जबरदस्ती केली तर तो काहीच सांगणार नाही."

" तू म्हणतेस ते बरोबर आहे. दोन तीन दिवस थांबून बघू स्वतःहून सांगतो का?"

" नाही तो स्वतःहून सांगेल असं मला वाटतं नाही. आपल्यालाच त्याला विचारावं लागेल."

" ऐ. थांब सुधीर आला."

" चल सुधीर जेवायला."

" मला इच्छा नाही."

"आम्ही थांबलोय बेटा तुझ्यासाठी.चल दोन घास खाऊन घे."

सुधीरची आई म्हणाली. सुधीर अनिच्छेने जेवायला बसला. तिघही न बोलता जेऊ लागले.
__________________________________
आज सुधीरला विचारता आलं नाही.ऊद्या सुधीर स्वतः सांगेल का बघू पुढील भागात.