मला स्पेस हवी पर्व १ भाग १८
मागील भागात आपण बघीतलं की सुधीर आईबाबांना नेहाचं बंगलोरला जाण्यामागचं खरं कारण सांगतो. तेव्हा त्यांना धक्का बसतो.आता काय होईल बघू.
सुधीरचे आईबाबा झोपायला आले खरे पण दोघंही अस्वस्थ असल्याने त्यांना झोप येत नव्हती.
" अहो आपलं काही चुकलं का? "
" कशाबद्दल विचारते आहेस?"
बाबांनी काही न कळून विचारलं.
" अहो असं काय करता. मी नेहाबद्दल बोलतेय. ती अशी का निघून गेली?"
' हे बघ आपण सासुसासरे म्हणून आपण तिच्यावर कोणताही अन्याय केला नाही. आपण तर तिला प्रियंकाच्या जागी मानत होतो. नेहाचे आईबाबा जसे तिच्याशी वागतील तसचं वागण्याचा आपण प्रयत्न केला. म्हणून तर तुमच्या दोघींचं गुळपीठ झालं."
" अहो हो ना ! म्हणूनच मला आश्चर्य वाटतंय की ते तिचं माझ्याशी वागणं खरं होतं की खोटं? "
" आता ते नेहाच सांगू शकेल."
" माझ्याशी ती अगदी प्रियंका वागावी तशी वागायची म्हणून मी नेहमी देवाचे आभार मानायची. म्हणायची की देवा माझी लेक तर तू घेऊन गेलास पण ही दुसरी लेक माझ्या ओटीत घातली. आयुष्यभर तुझ्या ऋणात राहीन. पण आज अचानक ही सगळी नाती तोडून नेहा निघून गेली."
आई रडायला लागली. बाबा जरा गडबडले कारण त्यांनाही नेहा आपल्या बाबांच्या ठिकाणी मानायची.
" अगं ती मला आपल्या वडलांच्या जागी मानायची. कितीदातरी महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर माझ्याशी चर्चा करायची. मलाही तेव्हा असंच वाटायचं जसं तुला वाटायचं की प्रियंकाला नेऊन देवाने हिला आपल्या ओटीत आपली लेक म्हणून घातली. मला माझ्याच भाग्याचा हेवा वाटायचा."
एक दीर्घ नि: श्वास त्यांनी सोडला.
" अहो मला वाटतंय आपल्या दोघांना भाग्याचा हेवा वाटला आणि आपलीच दृष्ट लागली असं वाटतंय. "
" मी असं मानतो मागच्या जन्मी आपल्याकडून तिला आईबाबा म्हणून जरा कमी प्रेम मिळालं असावं. तेवढं प्रेम तिने आपल्याकडून वसूल केलं आणि आपल्या पासून लांब गेली. "
" हल्ली तुम्ही प्रत्येक वेळी असं मागच्या जन्मातील कर्माशी नातं का जोडता?"
" अगं जे काही दु:ख आपल्या वाट्याला येतं ते मागच्या जन्मातील कर्माशी बांधील असतं. जे आपल्या आयुष्यात चांगलं घडतं तेही मागच्या जन्मातील कर्माशी बांधील असतं यावर माझा पूर्ण विश्वास आहे म्हणून मी नेहमी असं म्हणतो. कधी कधी या विचारसरणीमुळे मनावर ताण येत नाही. कारण काही प्रसंगात आपली चूक काय हेच कळत नाही. जसं आताही होतंय. "
" मलापण आज तुम्ही म्हणताय तसंच वाटतंय."
" अरे तुला माझं म्हणणं एवढ्या लवकर पटलं!"
" काही तरी काय बोलता? नेहमीच पटत. पुष्कळदा मीच पटवून घेते. मी आहे म्हणून तुमची ठाकूरकी आहे नाहीतर "
बाबा जोरात हसायला लागले.
" यात मी हसण्यासारखं काय बोलले?'
" तुम्ही आहात म्हणून नव-यांची ठाकूरकी असते असा तुम्हा बायकांचा दृढ आत्मविश्वास असतो नं त्यावर हसू आलं. "
" मग असं नाही का?"
" अगं गंमत केली. खरच तू आहेस म्हणून मी आहे. पण प्रत्येक नव-याच्या बाबतीत असं घडेल असं नाही. जसं नितीन आणि आपला सुधीर यांच्या बाबतीत काय म्हणशील?"
" दोघांबद्दल खूप वाईट वाटतं. सुधीरच्या बाबतीत जे घडलं त्याचाही संबंध तुम्ही मागच्या जन्मातील कर्माशी जोडला?"
" हो. मी जे स्पीरीच्युअल व्हिडीओ बघतो त्यात ते हेच सतत सांगतात. तुमच्या नकळत ही बरीच वाईट कर्म तुमच्या कडून घडतात त्याची शिक्षा कधी कधी याच जन्मात मिळते तर कधी कधी पुढच्या जन्मात मिळते."
" काही कर्माची शिक्षा लगेच या जन्मात मिळते आणि काही कर्मांची शिक्षा पुढील जन्मात का? तीही शिक्षा याच जन्मात मिळायला हवी."
" हे बघ. या विषयावर जर बोलायला लागलो तर रात्र सरेल. ऊद्या ऋषीची शाळा आहे. दोघांनाही लवकर उठायचं आहे. पुर्वी सारखं उठून लगेच फिरायला जाता येणार नाही. नेहाची किचनमधली ड्युटी आणि माझी ड्यूटी म्हणजे त्याला आंघोळ घालणं आणि शाळेसाठी तयार करणं. राणीसरकार आपल्या कामात कुचराई होऊन चालणार नाही. झोपा आता."
आणि बाबा हसायला लागले तसं आईपण हसली आणि दोघांनी झोपायची तयारी केली.
*****
आज ऑफीसमध्ये सुधीर आणि निशांत दोघंही अस्वस्थ असतात. त्यांची देहबोली पूर्णपणे खचलेली वाटत होती. नितीन हा दोघांचा खूप जवळचा मित्र होता. नितीन, सुधीर आणि निशांत तिघही काॅलेजमध्ये असल्यापासूनचे चांगले मित्र होते. यामुळेच निशांत आणि सुधीरला त्याच्या आत्महत्येने खूप मोठा धक्का बसला होता.
दोघेही लंचटाईम झाल्यावर उठले आणि कॅंटीनच्या दिशेने निघाले. खरतर त्यांना मघाशीच कॅंटीनमध्ये जायची इच्छा होत होती ती भूक लागल्यामुळे नाही तर कामच करावसं न वाटल्याने कॅंटीनमध्ये जाऊन , कामापासून लांब जाऊन त्यांना जरा मोकळा श्वास घ्यायचा होता.
" सुधीर आज मला ऑफीसमध्ये यायचीच इच्छा होत नव्हती."
" मलापण यावस वाटतं नव्हतं. पण काय करणार?"
" हो नं. हा आपला बाॅस फार खडूस आहे."
" मला तर तो निर्दयी वाटतो.कोणाला काय वाटेल याचा कधी विचारच करत नाही. झाप…झाप झापतो. "
" हो खरय. पण बाॅस इज ऑलवेज राईट असंच म्हणावं लागतं."
" ऐ टिपीकल वाक्य नको फेकूस. "
सुधीरच्या या वाक्यावर निशांत काहीच बोलला नाही. पण जे बोलला त्यातून त्यांची मनःस्थिती कळते.
" या महिन्यात मला दोन शाॅक बसले. एक नेहाचं वागणं आणि दुसरं नितीनचं जाणं."
" हं. मी काल आईबाबांना सांगीतलं."
" काय सांगीतलं?"
" नेहाच्या बंगलोरला जाण्यामागचं खरं कारण."
" खरच? मग काय म्हणाले ते?"
निशांतला सुधीरच्या आईबाबांची प्रतिक्रिया ऐकायची घाई झाली होती.
" त्यांना धक्का बसला कारण नेहाची इच्छाच जगावेगळी होती. तिच्या माहेरच्या लोकांना पण पटली नाही. माझ्या आईबाबांना ते नेहाशी वागण्यात कुठे चुकले तेच कळत नाही. निशांत सगळे जण म्हणायचे की तुमचं खूप सुखी आणि आनंदी कुटूंब आहे. याचीच बहुदा नजर लागली असावी."
अर्धा तास होत आला होता पण दोघांच्याही डब्यातील जेमतेम दोन तीन घास दोघांच्या पोटात गेले असतील. जेवणात दोघांचंही लक्ष नव्हतं. दोघांना झालेल्या दोन्ही घटनांवर विश्वास बसत नव्हता.
" सुधीर नितीन सारखं पाऊल नेहाने ऊचललं नाही हे आपलं नशीब आहे."
" होरे. तू म्हटल्यावर मला वाटतंय तसं झालं असतं तर ऋषी आयुष्यभरासाठी आईच्या प्रेमाला मुकला असता.आता निदान दोन वर्षांनंतर नेहाचं मन बदलेल आणि ती परत येईल अशी आशा तरी आहे."
" सुधीर नेहाला तू बळजबरीने थांबवलं नाही हे फार बरं केलं."
" तिनेच स्पष्ट सांगितलं होतं की तू आता कुठलाच प्रयत्न करू नकोस मी थांबणार नाही. मी तिला ऋषीचं कारण देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला होता त्यावर ती हे बोलली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता कोणतंही कारण तिचा निर्णय बदलविण्यास भाग पाडू शकत नाही. मग तिला खूप आग्रह करण्यात काही अर्थ नव्हता."
" हं. तिने हा निर्णय घेईपर्यंत तिची मानसिक घालमेल जर तुला कळली असती आणि तू तिला रिझवण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित तिने हा निर्णय घेतला नसता. अस़ मला वाटतं."
" निशांत तू जे म्हणतोय ते शेवटी जरतर मध्ये येतं इथे या परिस्थितीत कोणताही निश्चित फार्म्युला लागू पडत नाही."
" आता जे झालं त्याला आपण जबाबदार नाही असंच धरून चालू आणि दोन वर्षांमध्ये काही अचानक बदल होईल का याची वाट बघू."
निशांत म्हणाला.
" मी काल तेच आईबाबांना म्हटलं की नेहा परत येईल की नाही याचा मी आता विचार करणार नाही. आता माझा फोकस फक्त ऋषीकडे आणि तुमच्या कडे लक्षं देणे हाच आहे. त्यामुळे मी आता खूप शांत झालो आहे. इतके दिवस आईबाबांना कसं सांगू या चिंतेत मी होतो त्यामुळे त्यांच्या कडून येणाऱ्या प्रश्नांना टाळण्यासाठी मी रोज रात्री उशीरा घरी जायचो. काल नेहाच्या निर्णया मागचं कारण त्यांना सांगून त्या चिंतेतूनही सुटलो त्याहीमुळे मी आता खूप निश्चिंत आणि आनंदी आहे."
" हे बरंच झालं. पण सुधीर नितीनचं जाणं खूप दिवस आपल्याला छळणार आहे. "
" हो. कारण ऑफीसमध्ये आलं की रोजच त्याची आठवण येणार."
" हो"
यावर दोघ काही वेळ शांत होते तेवढ्यात गोविंद चपराशी त्यांना बोलवायला आला.
" निशांत साहेब लंच टाईम कधीच संपला. साहेब तुम्हाला बोलवतात आहे."
गोविंदाच्या बोलण्याने दोघं भानावर आले. दोघांनी घड्याळात बघितलं तर खरंच लंच टाईम संपून जवळ जवळ अर्धा तास उलटला होता. दोघांनाही कळलं नाही.
" हो चल येतोच. सांग साहेबांना."
निशांत म्हणाला. गोविंद गेल्यावर दोघांनी त्यांचे अर्धे उरलेलं जेवण तसंच ठेऊन डबा बंद करून ऑफीसमध्ये जायला निघाले.
________________________________
पुढे काय होईल बघू पुढील भागात.