मला स्पेस हवी पर्व १ - भाग २४ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २४

मला स्पेस हवी पर्व १ भाग २४

मागील भागात आपण बघीतलं की ऋषी नेहाशी बोलल्यावर खूप खूष असतो. आता बघू

"आजोबा आज आईंशी मी खूप वेळ बोललो."

"अरेवा! मग एक मुलगा खूष?"

"हो"

"आता जेवायला चलायचं का "
आजीने विचारलंं.

"हो आजी. "

तिघं जेवायला बसले.ऋषीची अखंड बडबड चालू होती.
हं हं असं करत, मध्येच हसत सुधीरचे आई बाबा ऋषीची बडबड ऐकत होते पण मनातून त्यांना गलबलल्यासारखं होत होतं

***

थोड्यावेळाने सुधीरचा फोन आला.

"हॅलो"

"आई अग बाबा कुठे गेलेत?"

"कारे?"

"त्यांना फोन केला ऊचलला नाही."

"ऋषीला झोपवतात आहे. दुपारी आजोबांनी गोष्ट सांगायची असते."

"अरे हो विसरलोच."

"काय काम होतं बाबांशी?"

"ऋषी बोलला का नेहाशी हे विचारण्यासाठी फोन केला होता."

"हो बोलला. खूप खूश होता."

"हं"

"सुधीर तू केलास का नेहाला कधी फोन?"

"नाही."

"का?"

"तिच्या डोळ्यात मला काही दिसलं नाही की ती माझ्या फोनची वाट बघेल किंवा तिला माझ्याशी बोलावंसं वाटेल."

"असं का वाटतं तुला?"

"आई कधी कधी माणसाला गट फिलींग्ज येतात नं त्यावरून सांगतोय."

"तू नेहा जाण्यापूर्वीपासून मनात नकारात्मक भावना घेऊन आहेस म्हणून तुला असे गट फिलींग्ज येत असतील. एकदा करून तर बघ."

"नको."

"का?"

"मला वाटतं नाही की नेहा कधी परत येईल."

"अरे असं का बोलतोस?"

"तिचा संसारातील इंटरेस्ट संपला आहे म्हणून ती तिला स्पेस हवी या नावाखाली प्रमोशन घेऊन गेली."

"काहीतरी तर्क काढू नको. स्पेस हवी म्हणून तिने प्रमोशन घेतलं तर ठीक आहे. दोन वर्षात तिला कळेल एकटं राहणं सोपं नाही."

"आई मी तुम्हाला त्याच दिवशी म्हटलं होतं की मी नेहा परत येण्याची वाट बघणार नाही. आता माझं आयुष्य ऋषी आणि तुमच्या भवतीच आहे."

"इतका कठोर होऊ नकोस बाळा.थोडा धीर धर."

"आई तिच्या मनात तीन चार वर्षांपासून ही गोष्ट होती. जर तिला बोलून दाखवायची असती तर तेव्हाच बोलली असती. मनात एक ओठांवर एक असं का वागली.?"

"सुधीर माणसाचा स्वभाव पुष्कळदा कळत नाही. आपल्याला वाटतं की आपण खूप छान ओळखतो या व्यक्तिला पण तसं प्रत्यक्षात घडलेच असं नाही."

"मग मी कशाला तिची वाट बघू? माझा फोन तिला घ्यायचा नसेल आणि मी सतत फोन केला तर ऊद्या ती ऋषीसाठी मी फोन केला तरी ऊचलणार नाही.‌ नको मला ऋषीचं मन मोडायचा नाही."

"एकदा करून बघ."

"नको. आई नेहा सोडून गेली आहे सगळं. जर तिला आता वाटलं तर तिने फोन करावा.अग नेहा तिच्या आईला पण फोन करत नाही मग मी तर दूरच आहे."

"मला असं वाटतं नेहा इथून जाताना ज्या पद्धतीने गेली तशीच आताही वागेल असं नाही. कदाचित आपण तिला बंगलोरला जाऊ देऊ की नाही या शंकेमुळे तिने बंगलोरला जाईपर्यंत तटस्थ राहणं योग्य समजली असेल. आता काही दिवस झाले आहेत. नेहाचं मन जरा शांत झालं असेल. कदाचित बोलेल. करून तर बघ."

"तू खूप समजावते आहेस पण माझं मन ऐकत नाही. कारण मी फोन केल्यावर जर नेहा म्हणाली मला तुझ्याशी बोलायचं नाही. मला इंटरेस्ट नाही तर मी ते सहन करू शकणार नाही."

"ठीक आहे. तुझी इच्छा नसेल तर नको करूस फोन."

"ठीक आहे मी ठेवतो फोन."

"हो ठेव."

सुधीरच्या आईने फोन ठेवला आणि त्या सुधीर आणि नेहा यांच्या नात्याबद्दल विचार करू लागल्या. एक आई म्हणून त्यांचं मन म्हणत होतं की सुधीर आणि नेहा मध्ये दुरावा यायला नको कारण त्यांच्या संसारावर ऊमललेलं फूल ऋषी अजून कोवळ्या वयाचा आहे. त्याला वडिलांबरोबर आईचं प्रेम पण हवंय. आईसारखं आजी कितीही करेल तरी आई ती आईच असते. या लहान वयात त्याच्या मनावर विपरीत परिणाम व्हायला नको.

माझी दोन्ही मुलं एवढी शांत आणि समजूतदार असून मुलीचा जीव कॅन्सरने घेतला तर मुलांचं मन या स्पेस मुळे दग्ध झालंय.

या विचाराने आईच्या डोळ्यांना धारा लागल्या. त्यांना गर्भरेशमी शालू परिधान केलेली हिरवा चुडा भरलेली, हातावर सुंदर मेंदी काढलेली, गोरीपान नाजूक वेल असणारी आपली लेक प्रियंका नववधू प्रिया मी बावरते म्हणत निरंजन बरोबर साठ्यांच्या घराचा उंबरठा ओलांडून गेली तीही लाजत लाजत. हे तिचं गोड रूप आत्ता त्यांच्या डोळ्यासमोर आलं.

प्रियंकाची निवेदिता झाली. बदललेलं नाव सांगत सगळ्यांना साखर वाटणारी, उखाणा घे म्हटल्यावर लाजणारी, उखाणा घेताना हळूच निरंजन कडे बघणारी माझी सोनपरी .

प्रियंका हळूहळू निवेदिता म्हणून सासरी रूळायला लागली. जेव्हा जेव्हा माहेरी यायची तेव्हा तेव्हा तिच्या डोळ्यात सूख ओथंबून आलेलं दिसायचं तिच्या चेहऱ्यावर एक पूर्ततेची लज्जा दिसायची. आई म्हणून मला कधी तिने शब्दातून आपलं सूख रेखाटण्याची गरज भासली नाही. आईला मुलीचा चेहरा, मुलीचे डोळे सगळं सांगून जातात. आईला हेच सूख अपेक्षित असतं.

पण म्हणतात नं सूख शिगोशीग भरलं की त्याला दृष्ट लागण्याची दाट शक्यता असते. माझ्या प्रियंकाच्या बाबतीत तसंच घडलं. प्रियंकाला आयुष्याची लय छान सापडली होती. तिच्या आनंदी स्वरात निरंजन सूर मिळवून गात होता. साठ्यांच्या घरात प्रत्येक सण आनंदाने साजरा होऊ लागला.

पण एके दिवशी प्रियंकाचं कान दुखायला लागला. दुखतो कधी कधी असं म्हणत प्रियंकाने सहन केलं.
प्रियंका मुळातच खूप सहनशील होती. पण हे सहन करणं तिच्या जीवावर बेतलं आठ दिवस तिच्या कानाचं दुखणं थांबेना तेव्हा निरंजनने ऐकलं नाही एक दिवस त्याचा फोन आला,

"हॅलो

"आई निरंजन बोलतोय"

"हं बोल."

"जरा प्रियंकाला समजवा"

आईच्या छातीत धस्स झालं कारण या वर्षभरात निरंजन ने कधीच प्रियंका बद्दल तक्रार केली नाही किंवा तिच्याबद्दल या सुरात तो कधी बोलला नाही

"काय झालं?"

"आई प्रियंकाचं कान गेले आठ दिवसांपासून दुखतोय. तिला सहन होत नाही हे तिच्या चेहऱ्यावरून कळतं पण डाॅक्टर कडे जायला तयारच नाही. तुम्हीच तिला सांगा
अगं बाई प्रियंकाचं कान दुखतो आहे हे मला माहीत नाही. दे तिला फोन"

"हॅलो आई."

"काय ग तुझा कान दुखतोय?"

"हो. "

"अगं मग वेळच्या वेळी दवाखान्यात का नाही गेलीस?"

"अगं मला वाटल थांबेल."

"अगं तुला वाटून काय उपयोग ? थांबला का?"

"नाही.आता खूप जास्त दुखायला लागला आहे."

"प्रियंका अगं प्रत्येक वेळी कसली चालढकल करतेस. दुखणं वाढलं तर तुलाच त्रास होतो आहे नं?"

"हो."
"मग? आजच जा निरंजन बरोबर दवाखान्यात."

"जातेय आई."

"तू जातेय तर निरंजनने मला का फोन केला?"

"त्याला उगीच सुट्टी घ्यावी लागेल."

आई काहीतरी बोलणार तेवढ्यात निरंजनचा आवाज ऐकू आला.

"ऐ काहीतरी काय बोलतेस.संध्याकाळी गेलो असतो नं मी काय ऑफीसमध्ये राहतो का? चल लवकर."

निरंजनचा आवाज चिडलेला होता.

"आई ठेवते."

प्रियंकाने फोन ठेवला.


प्रियंका कानाचं दुखणं गोळ्या आणि कानात ड्राॅप्स घालून बरं होईल या समजूतीत होती. प्रियंकाच नाही आम्ही सगळेच या समजूतीत होतो. पण जे कळलं त्याने आम्ही सगळे उध्वस्त झालो. प्रियंकाला कानाचा कॅन्सर झाला आहे आणि तोही शेवटल्या स्टेजमध्ये आहे असं कळलं.

डाॅक्टर म्हणाले या फारतर चार महिने राहतील. डाॅक्टरांचे हे शब्द आमच्या सगळ्यांच्या कानात त्यांनी तप्त रस ओतला आहे असं वाटलं.

चार पाच दिवस आमच्या पैकी कोणीच रात्री झोपू शकलं नाही,जेऊ शकले नाही.

प्रियंकाच्या लग्नाला जेमतेम वर्ष झालं होतं. दोन महिन्यांपूर्वी त्यांचा पहिला लग्न वाढदिवस किती थाटात केला. सगळ्यांच्या मनात आनंदाच्या झिरमिळ्या लागल्या होत्या. सगळे सुखाच्या राशीवर लोळत होतो. आता हे दुखणं समजल्यावर आत्तापर्यंतचा आनंद म्हणजे कोणत्याही क्षणी फुटणारा बुडबुडा असल्याचं जाणवलं.

माझ्या नाजूक, समजूतदार,विचारी मुलीच्या नशीबच असं का? दैवाने असा विचित्र डाव का खेळला असेल? दोन्ही कुटुंब एकमेकांबरोबर मैत्रीचं नातं जोडून हसतमूख नवदांपत्याचा संसार बघत होती, अनुभवत होती.

आम्ही जेष्ठ मंडळी बाहेरून त्यांना मदत करायचो पण या आजाराने आमची इतकी दयनीय अवस्था केली की आम्ही कुठलीच मदत करण्याच्या लायक राहिलो नाही.

देवा आमच्या नशिबी आमच्या मुलांची ही दैन्यावस्था बघण्याची शिक्षा का दिली.

सुधीरच्या आईला दुःखाचा उमाळा सहन होत नव्हता.
शेवटी हतबल होऊन त्या ढसढसा रडू लागल्या.

तेवढ्यात सुधीरचे बाबा आले. त्यांना कळेना ही का रडतेय.
" काय ग? काय झालं? अशी रडतेस का?"

सुधीरच्या आईला राहवेना.
" प्रियंकाची आठवण आली.तिचं तसं झालं आणि आपल्या सुधीरच्या वाटेला हा वैशाख वणवा आला."
त्या रडू लागल्या.

सुधीरच्या बाबांचेपण डोळे भरून आले.त्यांनी हळूच बायकोला जवळ घेऊन थोपटलं. त्यांच्या तोंडून सांत्वनासाठी शब्द फुटेना.

__________________________________