मला स्पेस हवी पर्व १ - भाग २५ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २५

मला स्पेस हवी पर्व १ भाग २५

मागील भागात आपण बघीतलं की सुधीरच्या आईला प्रियंकाची आठवण आली सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. या भागापासून आपण जरा भूतकाळात डोकावणारी आहोत.


आज नेहाच्या घरी चहापोह्यांची गडबड सुरू होती. नेहाला खरंतर असं टिपीकल बघण्याचा कार्यक्रम करायचा नव्हता पण नेहाची आई शिस्तीत चालणारी असल्याने नेहाचं तिच्यापुढे आपला नकार दामटता आला नाही.

नेहाने शेवटी वडिलांकडे धाव घेतली.ही मागच्या आठवड्यातील गोष्ट आहे.

"बाबा मला हे दाखवून घेणं म्हणजे स्वतःचं प्रदर्शन मांडल्यासारखं वाटतं."

"बेटा तुझ्या आईने हा कार्यक्रम ठरवला आहे तेव्हा मी याबाबतीत तुझी काही मदत करू शकत नाही."

"हे काय बाबा मी तुमची लाडकी आहे नं!"

"हो. हे तर सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे."

"मग तुम्ही माझी मदत का करत नाही?"

"बेटा आमची अर्धांगिनी ही सिंहीण आहे. मी काय बोलणार?"

"बाबा तुम्ही सिंह आहात नं!"

"सिंहाच्या डरकाळ्या फक्त शत्रूला घाबरविण्यासाठी असतात. घराला शिस्त सिंहीण लावते. त्यामुळे तुला हा कार्यक्रम करावा लागेल."

"छे: ! मी केवढ्या आशेने आले होते."

यावर बाबा फक्त हसले. नेहा शेवटी निराश होऊन आजच्या दाखविण्याच्या कार्यक्रमाला तयार झाली.


"नेहा अगं अजून तयार नाही झालीस?"

नेहा आणि तिचे बाबा या जोडगळीला एकत्र बघून नेहाच्या आईला संशय आलाच ती म्हणाली,

"नेहा बाबांचा वशीला आणलास तरी काही उपयोग नाही. चल तयार हो."

नेहा गोंधळलेली होती. तिचे बाबा मात्र चटकन म्हणाले

"अगं मी तुझ्या आज्ञेबाहेर नाही."

"कळलं मला. नेहा तुमचा विकपाॅईंट आहे पण आज काही तुमचं चालणार नाही. मी चालू देणार नाही. चांगलं स्थळ आलंय. चल ग नेहा पटकन तयार हो."

नेहाच्या आईची पाठ वळताच तिचे बाबा हळूच म्हणाले,

"बघीतलं नेहा एक सिंहीण कशी डरकाळी फोडून गेली."

नेहा कसानुसा चेहरा करून हसली.

"मला कळतंय तुम्ही काय म्हणाला ते. मी सिंहीणच आहे. मी डरकाळी फोडते ती योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी. म्हणून आपला संसार बरा चालला आहे. चल ग. प्रणाली हिला तयार कर."

एवढं बोलून नेहाची आई इतर कामं करायला गेली.

नेहाचा मोठा भाऊ अक्षय याचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. नेहाच्या वहिनीचा नाव प्रणाली.

प्रणाली आली आणि म्हणाली,

"नेहा अगं चल तयार हो. अर्ध्या तासात येतील मुलाकडचे लोक."

"ऐ प्रणाली मी साडी नेसणार नाही."

"नको नेसू पण ड्रेस कोणता घालायचा ते तरी ठरवलं आहेस का?"

"जरा बरा घालीन."

"का? छान नवीन ड्रेस घाल."

"हे बघ मला मिरवणच आवडत नाही. "

"नेहा एवढी नाराज नको होऊस. हा तुझा पहिलाच कार्यक्रम आहे. तू छान नवीन ड्रेस घाल. कदाचित तू पहिल्याच कार्यक्रमात पसंत पडलीस तर लगेच शुभमंगल सावधान होईल. नंतर कशाला तुला कोणाला दाखवायचं"

"आणि नाही घडलं असं तर?"

"नेहा कशाला निगेटिव्ह विचार करतेस. चल पटकन."

प्रणाली नेहाचा दंड धरून तिला ओढतच तिच्या खोलीत घेऊन गेली.

हा ड्रेस नको,तो ड्रेस नको करत एकदाचा कोणता ड्रेस घालायचा ते ठरवलं. नेहाचं ड्रेस ठरविण्याचा कालावधी बघून प्रणाली हबकलीच.

"हुश्श झाला एकदाचा ड्रेस फायनल. घालशील कधी? एक तासानंतर?"

"नाही ग‌ घालते ."

थोड्याच वेळात नेहा तयार झाली.अगदी साधी तयार झाली. नेहा चेहे-यावर पावडरची फायनल टच देत असतानाच दारावरची बेल वाजली.

"नेहा बहुतेक मुलाकडचे आलेले दिसतात आहे. मी जाऊन बघते."

प्रणाली नेहाच्या खोलीबाहेर आली.

****

सुधीरचे आई बाबा, सुधीर, सुधीरची लहान बहीण प्रियंका आले होते. नेहाचे आईबाबा, नेहाचा मोठा भाऊ अक्षय आणि वहिनी प्रणाली सगळ्यांनी सुधीरच्या घरच्यांचं स्वागत केलं

"या बसा."

नेहाचे बाबा म्हणाले. सुधीरच्या बाबांनी ही त्यांना नमस्कार केला. सगळे बसले. हवापाण्याच्या गप्पा सुरू झाल्या. तशी प्रणाली नेहाच्या खोलीत आली.

"नेहा इतका वाईट चेहरा का करून बसलीस?"

"अगं मला आवडत नाही हे सगळं."

"आपल्याकडे अशी पद्धत आहे. तुला हे सगळं नव्हतं करायचं तर मग कोणीतरी गाठायचा."

"प्रेम विवाह?"

"हो प्रेमविवाहाबद्दलच बोलतेय. करायचा नं प्रेम विवाह मग हे सगळं टळलं असतं. तू काय बाई बाबांची लाडकी लेक आहेस त्यांनी लगेच लग्न लावून दिलं असतं."

"ऐ प्रणाली नको ग बोर करु. एकदाची दाखवून घेते स्वतःला ."

नेहा फुसफुसत होती.

"नेहा काही वेळा पुरता जरा हसरा चेहरा ठेव. नंतर बस
पुन्हा चेहरा टांगून."

प्रणाली हे बोलतच होती की नेहाची आई तिथे आली.

"अगं नेहा चल पटकन. हसरा चेहरा ठेव. काय करायचं या मुलीचं मला कळत नाही."

"जबरदस्तीने हा कार्यक्रम तू ठरवला आहे आणि मलाच हसरा चेहरा ठेव म्हणते."

नेहा चिडून म्हणाली.

"तुझे नखरे ठेव बाजूला आणि चल पटकन."

आई हुकुमास्त्र काढून खोलीतून बाहेर चालती झाली.
प्रणाली नेहाकडे बघून हसली. तशी पटकन जरा चिडूनच नेहा उठली.

बाहेर सगळे गप्पा मारत होते पण अजून मुलगी बाहेर न आल्याने त्या सगळ्यांची चुळबूळ आणि एकमेकांना नेत्रपल्लवी सुरू झाली.शेवटी सुधीरचे बाबा बोलले

"तुमची मुलगी तयार आहे नं लग्नासाठी?"

"मुलगी लग्नाला तयार आहे पण आजकालची पिढी. .तिला हे असं दाखवून लग्न करायला आवडत नाही."

साध्या स्वभावाचे नेहाचे बाबा बोलून गेले. नेहाच्या आईने समोरच्या खोलीत येता येता हे वाक्य ऐकलं तशी त्या लगेच म्हणाल्या,

"येतेय मुलगी."

तेवढ्यात तिथे चहा घेऊन नेहा आली. तिने सगळ्यांना चहा दिला आणि एका बाजूला उभी राहिली.‌हे बघून सुधीरची आई म्हणाली,

"अगं तूही बस."

तशी नेहा खुर्चीवर बसली.

"तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा."

नेहाचे बाबा म्हणाले

"आम्ही मुलीला काही विचारण्याआधी मला वाटतं आमच्या मुलाला आणि तुमच्या मुलीला एकमेकांशी बोलू द्या म्हणजे दोघं मोकळेपणाने बोलतील."

"आमची काही हरकत नाही. नेहा तुला चालेल नं."

नेहाच्या बाबांनी विचारलं. नेहाने होकारार्थी मान हलवली.

नेहा सुधीरला घेऊन तिच्या खोलीच्या बाल्कनीत घेऊन गेली.

बाल्कनीत छान हिरवं आर्टिफिशियल गवत घातलं होतं. बाल्कनीच्या खालच्या वरवंडीवर मध्यम आकाराच्या कुंड्या छान पेंट करून ठेवल्या होत्या. त्या कुंड्यांमध्ये वेगवेगळी सिझनल फ्लावर्स लावलेली होती. बाल्कनीला वरती हॅंगीग कुंड्या होत्या. त्याही छान रंगवल्या होत्या. सुधीरने काही क्षणात हे निरीक्षण केलं आणि त्याला त्या आटोपशीर पण छान रंगवून मांडलेल्या कुंड्या बघून प्रसन्न वाटलं.

नेहाच्या लक्षात आलं की सुधीर बागेचं निरीक्षण करतोय. येणारा हा अनोळखी मुलगा तिच्या बागेचं निरीक्षण करतोय आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे बघून नेहाने तिच्याही नकळत एक मार्क सुधीरला देऊन टाकला.

"आवडली मला तुमची ही छोटीशी पण गोड बाग."
सुधीर म्हणाला.

"थॅंक्यू. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा."

"तुमची लग्नं करण्याची इच्छा आहे का ?"

"अं "

नेहाने गोंधळून विचारलं

"मघाशी तुम्हाला यायला उशीर झाला आणि तुमचा चेहरा मला खूप नर्व्हस दिसला म्हणून विचारलं."

"माझी लग्न करण्याची तयारी आहे पण मला असं दाखवून लग्न करायला आवडत नाही."

"अच्छा. तेवढाच प्रश्न आहे नं?"

"हो."

"तुमचा होणारा नवरा कसा असावा या बद्दलच्या काही कल्पना आहेत का?"

"हो."

"कसा असायला हवा नवरा?"

"मला समजून घेणारा. मी खूप बोलकी नाही म्हणजे जरा लाजाळू आहे. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज येत नाही तोपर्यंत मी खूप मोकळेपणाने त्याच्याशी बोलू शकत नाही."

"मी बोलका आहे. कुठेही गेलं की माझं तसं अडत नाही. पण खूप चांगली मैत्री आहे असं मी पहिल्या एकदोन भेटीत नाही बोलू शकत. मलाही खूप मोकळेपणाने बोलायला त्या व्यक्तीची चांगली ओळख व्हावी लागते म्हणजे मी खूप कमी दिवसांत माझे सगळे कार्ड्स समोरच्या व्यक्तीसमोर ओपन करत नाही."

"माझ्यासारखेच."

असं नेहाने म्हणताच सुधीरने हसून तिच्याकडे बघितलं.नेहाही हसली.

एवढ्या वेळात सुधीरच्या लक्षात आलं की नेहाच्या स्वभावात एक ठेहेराव आहे. ती खूप शांत स्वरात आपले विचार सुधीरसमोर मांडत होती.

सुधीरला एकूण तिचं व्यक्तिमत्त्व आवडलं. नेहा सुंदर यात नव्हती मोडत पण तिच्या चेहऱ्यावर एक शांत सौंदर्याची छटा होती. त्यामुळे तिचा चेहरा आकर्षक आणि नम्र वाटला. तरी सुधीरने एक शेवटचा प्रश्न विचारला

"माझे आईबाबा माझ्या जवळ राहत नाही मी त्यांच्या बरोबर त्यांच्या घरात राहतो."

"म्हणजे?"

"घर त्यांचं आहे. आता बाबा रिटायर्ड आहेत. आपल्याला त्यांच्याबरोबरच रहावं लागेल. मला लहान बहीण आहे .तिचं लग्न होईल दोन चार वर्षांत. तोवर आपल्या सगळ्यांना एकत्र राहवं लागेल. प्रियंकाच्या लग्नानंतर आपल्याला नेहमीसाठी एकत्र राह्यचं आहे तुला जमेल का तुझी तयारी आहे का?"

"माझे भाऊ वहिनी आईबाबां बरोबरच राहतात. मला इतक्या लोकांनी एकत्र राहण्याची सवय आहे. मला तुमची अट मान्य आहे."

"मी तुला पसंत आहे का तू मला पसंत आहेस. हा माझा सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे."

काही वेळ नेहा काही बोलली नाही. ती विचारात पडलेली दिसली तसा सुधीरचा धीर सुटायला लागला. त्याला नेहाला बघितल्याबरोबरच ती आवडली होती.
नेहाचं गप्प राहणं म्हणजे सुधीरला तो ऑक्सिजन वर असल्यासारखं वाटायला लागलं. तो घाबरून नेहाकडे बघायला लागला.
___________________________________
सुधीरचा धीर सुटायच्या आत नेहा बोलेल का? बघू पुढील भागात.