मला स्पेस हवी पर्व १ - भाग २७ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग २७

मला स्पेस हवी पर्व १ भाग २७

मागील भागात आपण बघीतलं की नेहा आणि सुधीर भेटणार होते आता बघू


सुधीर आणि नेहा भेटल्यानंतर आठ दिवस कापरासारखे उडून गेले आणि साखरपुड्याचा दिवस येऊन ठेपला.

सुधीरच्या घर

सुधीरचं घर आनंदाने फुलून आले. सुधीरचे मामा,मामी आज सकाळपासून त्यांच्याकडे राह्यला आले होते. सुधीरचे काका आता नाहीत पण काकू मात्र आवर्जून आल्या. सुधीर त्यांना घेऊन आला. सुधीरच्या दोन मावश्या मुंबईहून आल्या. त्यांच्याकडचे बाकी सगळे साखरपुड्याच्या दिवशी येणार आहेत.

सुधीरचे मामेभाऊ आणि त्यांची फॅमिली पण ऐनवेळी येणार कारण ते पुण्यातच राहतात. मामा माईंना मात्र सुधीरच्या आईने एक दिवस आधी बोलावलं. तेवढ्याच गप्पा होतील. एकमेकांच्या भेटीने मनाला वेगळीच एनर्जी मिळते. बरोबरीने सुधीरला चिडवणं हाही प्रकार प्रामाणिकपणे चालू होता. मामा मामी आणि काकू यांचं चिडवणं वेगळं तर प्रियंकाचं चिडवणं वेगळं.

सुधीर या सगळ्यांच्या चिडवण्यामुळे मनोमन मोहरून उठत होता. त्याच्या डोळ्यासमोर नेहा यायची तशी तो आनंदाच्या शिखरावर असल्याचं त्याला जाणवायचं. सारखा नेहाला फोन करावा असं त्याला वाटायचं. असं वाटलं की तो एकदम सगळ्यांच्या गप्पांमधून डिलीट झाल्यासारखा व्हायचा.

सुधीर बाल्कनीत एकटाच उभा होता. बाकी सगळ्यांचा आतमध्ये हास्यविनोदाचा फंड रंगला होता.विषय अर्थातच सुधीर होता.

"मला काय वाटतं सुधीर एवढं मनात आहे नं तर करून टाक नेहाला फोन."

सुधीरने आवाजासरशी मागे वळून बघितलं.मागे मामा ऊभे होते. आपल्या वाक्यावर ते गडगडाटी हसले.सुधीर संकोचता.

"तसं नाही मामा मला एका मित्राला फोन करायचा होता. तो लागला नाही."

"तू खोटं खोटं फोन केला असशील तर कसा लागेल? अरे मघापासून तुझ्या मागे उभा आहे. तुला कुठे कळलं."
मामा त्याच्या पाठीवर थोपटत पुढे म्हणाले,

"सुधीर अरे आमचं पण लग्नं ठरलं तेव्हा मी असाच सैरभैर झालो होतो पण काय करणार आमच्या वेळी मोबाईल नव्हते. फोन करावासा वाटतो आहे नं कर बिनधास्त."

"पण मामा मी फार ऊतावीळ आहे,अगाऊ आहे असं नाही नं नेहाला वाटणार?"

"अजीबात नाही. तीसुद्धा तुझ्या सारखीच बेचैन असेल. तुला एक सांगू लग्नाआधीच हे चोरून बोलणं खूप छान असतं. नवरा बायकोमध्ये याने जवळीक वाढते. कर फोन. मी आत जातो."

एवढं बोलून हसत हसत मामा आत गेले. सुधीर क्षणभर लाजला. शेवटी हिंमत करून त्याने नेहाला फोन लावला.रिंग जात होती पण फोन ऊचलल्या गेला नाही तसा सुधीर निराश झाला पाठोपाठ घाबरून त्याने फोन बंद केला. कितीवेळ सुधीरची छाती भितीने धडधडत होती.

अचानक सुधीरच्या हाताला कंप जाणवला आणि पाठोपाठ फोनची रिंग वाजली. स्क्रीनवर नेहाचं नाव बघून सुधीरला कमालीचा आनंद झाला.त्याने घाईने फोन ऊचलला.

"हॅलो."

सुधीरचा आवाजात आनंद, धडधड सगळं नेहाला जाणवलं तरी संयमाने तिने विचारलं

"फोन केला होता.?"

"हो तुला आवडलं नाही का?"

"आवडलं पण तुझा फोन वाजला तेव्हा माझे मोठे काका समोर होते.मी कसा फोन ऊचलणार?"

"मी घाबरलो."

"का?"

"मला वाटलं तुला बहुतेक आवडलं नाही मी फोन केलेला."

"मला आवडलं."

हे शब्द सुधीरच्या अंगावर आणि मनावर मोरपीस फिरवून गेले.

"मी अर्धा तास तुला फोन करू या विचाराने फोन घेऊन बाल्कनीत उभा आहे पण माझी हिंमत झाली नाही."

"खरं सांगू मला पण तुझी खूप आठवण येतेय."

"खरच? मघाशी माझे मामा म्हणाले बिनधास्त फोन कर ती पण तुझ्या सारखी बेचैन असेल."

"खरं बोलले मामा."

"मग तू का नाही केलास फोन?"

"मला सकाळ पासून कोणी एकटं सोडतच नाही."

"का ?"

"का काय? सगळे माझी मजा घेतात आहे आणि त्यातच तुझा फोन येऊन गेला मग काय…"

"मग काय?"

"मग मला चिडवण्याची स्पर्धाच लागली एकमेकांमध्ये."

"मग आता कशी तू बोलतेय?"

"प्रणालीला माझी दया आली. तिने मला जबरदस्तीने वरच्या काकूंना निरोप द्यायला पाठवलं आहे."

"कसला निरोप?"

"अरे निरोप कसला असणार? तुझ्याशी बोलायला मला एकांत मिळावा म्हणून निरोप देण्याचा बहाणा."

एवढं बोलून नेहा हसली. तिचं हसणही सुधीरला मोहीत करून गेलं.

"आता तू त्या काकूंच्या घरी आहे?"

"हो. पण मी खोलीत दार बंद करून तुझ्याशी बोलतेय."

"अगं लोकांच्या घरी तू इतकी बिनधास्त खोलीचं दार बंद करून माझ्याशी बोलतेय?"

"अरे आमची खूप घसट आहे या कुटूंबाशी. मी काकूंना येण्याचं कारण सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या प्रितीच्या खोलीत जा आणि मनसोक्त गप्पा कर सुधीरशी."

"ही प्रिती कोण?"

"प्रिती त्यांची मुलगी. तिचं मागल्या वर्षी लग्न झालं खोलीचं दार लावून ती तासन् तास आपल्या नव-याशी गप्पा मारायची म्हणून त्या असं म्हणाल्या."

"खूप चांगले शेजारी मिळाले ग तुम्हाला. नेहा तुला मी खरंच पसंत आहे नं?अजूनही साखरपुडा झालेला नाही म्हणून विचारतोय."

"सुधीर काहीतरी काय विचारतोस? आपण या आधी खूपदा भेटलो,बोललो. त्यावेळी तुला जाणवलं का मला तू पसंत नाहीस ते."

"साॅरी नेहा. मला नं उगीच एक भिती वाटतेय."

"ती तर मला सुद्धा वाटतेय."

"तुला कसली भिती वाटते?"

"तुझ्या घरी मी नीट ॲडजेस्ट होऊ शकेन की नाही.मला एकत्र कुटूंबाची सवय आहे पण हे माहेर आहे. इथे माझ्या हातून काही चुका झाल्या तरी सगळे चालवून घेतात.तुझं घर हे माझं सासर आहे. तिथे मी जर चुकले तर ?"

"नको काळजी करुस.माझ्या आईचं मन मऊ लोण्याच्या गोळ्या सारखं आहे. तुला तिचं मऊ प्रेमळ स्पर्श जाणवेल. सासुच्या ठसका नाही दिसणार."

"दादासाहेब तुम्हाला मासाहेब बोलवतात आहे."

सुधीरने दचकून मागे वळून बघितलं तर प्रियंका हसत बोलत होती.

"आलो म्हणून सांग."

प्रियंका झटकन समोर आली आणि तिने सुधीरला कळायच्या आत त्याच्या हातातील मोबाईल कानावरून काढून आपल्या दिशेने वळत फोनजवळ तोंड नेत जोरात म्हणाली

"ए वहिनी जरा माझ्याशी पण बोल."

"ऐ चल जा तिकडे मी येतोय."

प्रियंका हसत हसत आत गेली.

"बघीतलं आज माझ्याकडेही हेच चिडवणं सुरू आहे. ही प्रियंका फार बदमाश आहे."

"अरे मी माझ्या भाला अक्षयला पण त्रास दिला आहे."

नेहाने खळखळून हसून सांगितलं.

"नेहा तू नेहमी अशीच खळखळून हसत रहा आणि मी तुला मनसोक्त बघत राहीन."

"तू मला अशीच हसत रहा म्हणतो आणि माझी आई मी अशी हसली की नेहमी म्हणते अशी हसत राहीली तर तुझी सासू माझा उद्धार करेल.म्हणेल आईने हसण्याचा पण वळण लावलं नाही पोरीला."

यावर सुधीर हसत म्हणाला,

"तुला तुझी आई असं म्हणते मला माझी आई मी सकाळी उठल्यावर पांघरूण गोळा करून ठेवत नाही म्हणून ओरडते. म्हणते तुझी बायको म्हणेल मुलाला कसली शिस्त लावली नाही.माझा उद्धार करेल."

यावर दोघंही मनसोक्त हसले.

"नेहा तू लोकांकडून बोलतेय किती वेळ असं थांबशील? ठेऊया फोन."

"ठीक आहे. भेटू संध्याकाळी."

"नेहा तयार झालीस की फोटो काढ आणि मला पाठव."

"हो. तूपण फोटो काढशील."

अस़ म्हणून नेहाने फोन ठेवला. आणि खोलीचं दार उघडून बाहेर आली.

"झालं का अहोंशी बोलणं?"

हसतच काकूंनी विचारलंं.

"हो. काकू काका कुठे दिसत नाही. मघाशी सुधीरला फोन लावण्याच्या गडबडीत विचारायचं विसरले."

"कळतंय मला. आज तर तुझा साखरपुडा आहे. लग्न होईपर्यंत तू बघ किती गोष्टी विसरशील."

"नाही हं काकू. अशी चूक सारखी सारखी नाही होणार."


नेहाच्या गालगुच्चा घे काकू म्हणाल्या,

"अगं हेच दिवस खूप महत्वाचे आहेत. याच दिवसातील रोमान्स वेगळाच असतो.त्याला लाजरेपणाची, आनंदाची एक खुमारी असते. तीच आयुष्यभर आपल्याला आनंदी ठेवते. याच दिवसात बाकी सांसारिक काळज्या नसतात.फक्त एकमेकांबद्दलचं प्रेम असतं. एकमेकांची ओढ वाटते. म्हणून मोकळेपणानेच बोलून ही ओढ व्यक्त करायची. हे प्रेम फुलू द्यायचं असतं. तुला कधीही वाटलं तरी आमच्याकडे येत जा सुधीरशी बोलायला."

"हो काकू. प्रणाली म्हणाली की मी तुम्हाला संध्याकाळी यायचय याची आठवण करून द्यायला मी आले होते हे आईला सांगा "
यावर जोरात हसत काकूंनी मान डोलावली आणि म्हणाल्या,
"अगदी नक्की सांगेन घाबरू नकोस."

काकूंचा निरोप घेऊन नेहा घरी आली.


"काय ग किती वेळ? एवढा वेळ लागतो का काकूंना आठवण करून द्यायला?"

गालावर ओथंबून येणारं हसू कसं बसं थोपवत नेहा म्हणाली,

"आई तुला माहीती आहे नं काकू किती बडबड्या आहेत. गप्पा मारत बसल्या मला चिडवत बसल्या."

हे बोलताना नेहाने प्रणाली कडे बघून एक भुवई उंचावलीशी प्रणाली म्हणाली,

"आज काय बाई नेहाबाईंचा दिवस आहे. आम्हाला कोण विचारतो?"

"हं चला सुनबाई हात चालवा.खूप काम पडली आहेत."

नेहाच्या आईने शिस्तीचा सूर आळवून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली.

नेहा, प्रणाली दोघी हसत आपापल्या कामाला लागल्या.प्रणाली खरच कामाला लागली. नेहा सुधीरचा विचार करण्याच्या कामात गुंतली.
________________________________

साखरपुड्याचा आनंदपण लुटूया उद्याच्या भागात.