मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३३ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३३

मला स्पेस हवी पर्व १ भाग ३३

मागील भागात आपण बघीतलं की प्रियंकाला कॅंन्सर झालाय हे कळल्यावर सुधीरचेआईबाबा,नेहा तिला भेटायला तिच्या घरी जातात.आता पुढे काय होईल बघू


लंचटाईम मध्ये निशांत, सुधीर आणि नितीन जेवत असतात. निशांत आणि नितीन खूप हसीमजाक करत असतात. सुधीर मात्र शांत असतो आणि जेवणाऐवजी अन्न चिडवत असतो. नितीन डोळ्यांनी निशांतला खूण करून त्यांचं लक्ष सुधीरकडे वळतो.

"सुधीर काय झालं? "

निशांतने विचारलंं

सुधीर ढसढसा रडायला लागतो. दोघांनाही कळत नाही.

"सुधीर तू इतका रडतोयस म्हणजे नक्की काहीतरी कठीण प्रसंग आलाय. रडून मन मोकळं कर म्हणजे मनावर ताण येणार नाही."

सुधीरच्या पाठीवरून हात फिरवत नितीन म्हणाला.

थोड्यावेळाने सुधीरच्या रडण्याचा आवेग शांत झाला आणि तो म्हणाला,

"प्रियंकाला कानाचा कॅन्सर झाला आहे. लास्ट स्टेजला आहे."

"काय?" निशांत आणि नितीन दोघंही ओरडले.

"हो. ती फार तर सहामहिने जगेल असे डाॅक्टर म्हणाले."

"अरे देवा हे काय संकट आलं!"
नितीन कपाळावर हात मारून म्हणाला.

प्रियंकाला कॅंन्सर झालाय हे ऐकताच निशांत आणि नितीन दोघांनाही शाॅक बसला. दोघही सुधीरचे काॅलेजमधील मित्र असल्याने ते प्रियंकाला छान ओळखत. प्रियंकाला दोघंही आपली लहान बहीण मानत.

लहान बहिणीशी जशी चेष्टामस्करी करावी तशी ते प्रियंकाची चेष्टा करत. नितीन आणि निशांत दोघंही या बातमीने हादरले. प्रियंकाच्या लग्नाला एक वर्ष तर झालं होतं.

वर्षभरातील प्रियंकाच्या प्रत्येक सणाला नितीन आणि निशांत आपल्या कुटूंबासह उपस्थित होते. इतके घरगुती संबंध त्या दोघांचे सुधीरच्या घराशी होते.

सुधीरला कोणत्या शब्दात सांत्वना द्यावी हे या दोघांना कळत नव्हतं. या दोघांनाच कोणीतरी आपल्याला सांत्वना द्यावी असं वाटत होतं.

आज त्यांना आपल्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा कोपरा जो बहिणीसाठी खास असतो तो काही काळापुरता आहे हे लक्षात येऊन मनातच दोघं घाबरले.

"सुधीर बहिणीचं प्रेम काय असतं हे आम्हाला प्रियंकाला भेटल्यावर कळलं रे. किती आठवणीने ती आम्हा दोघांना राखी बांधायची. "

नितीन म्हणाला

"प्रियंका भेटल्यावर आम्हाला बहीण काय असते? तिचं भावाच्या आयुष्यात किती मोठं स्थान आहे हे आम्हाला कळलं. कुठेही गावाला गेलो आणि प्रियंकासाठी काही खरेदी केली नाही असं कधीच होत नव्हतं."
निशांत म्हणाला.

"छोटीशी वस्तूही तिला चालायची.आम्ही ती प्रेमाने आणली आहे याचं तिला कौतुक असायचं."
नितीन म्हणाला.

"सुधीर तू लहानपणापासून बहिणीबरोबर वाढलास त्यामुळे तुला बहिण किती महत्वाची असते हे तुला नाही कळणार. प्रियंकाची भेट होईपर्यंत आमची प्रत्येक राखी सुनी गेली. भाऊबिजेला तर कोणीच हट्टाने ओवाळून बम्पर भेटवस्तू आमच्या कडून ऊकळली नाही."

नितीनचा स्वर हे बोलताना दु:खाने भरलेला होता.

"आज प्रियंकाला कॅंन्सर झालाय हे ऐकून आम्हाला कोणीतरी दरीत ढकलून दिलय असं वाटतंय. अरे मी लहानपणापासून केलेल्या एवढ्या प्रतिक्षेनंतर आज मी बहिणीच्या प्रेमात डुंबत असताना एवढ्यात त्या प्रेमाचा क्षय होणार? मला सहनच होत नाही."

निशांत रडवेला होऊन म्हणाला.


"अरे नितीन तुम्हा दोघांना आत्ता आत्ता बहिणीच्या प्रेमानी ओळख झाली. मी तर प्रियंका अगदी तान्ही असल्यापासून तिच्या बाललीला बघतोय. इतकी छोटी बाहुली मला दादा म्हणते. माझ्यावर विश्वास ठेऊन माझ्या कडेवर येते. किती भारी वाटायचं मला. आई नेहमी म्हणायची,

"सुधीर तू जसं वागशील तशी ती वागेल बरं. तू दादा आहेस नं तिचा.तुझ्यावर तीचा खूप विश्वास आहे. तू सगळ्या गोष्टी योग्य करतो असा तिचा विश्वास आहे. तू चुकीचं लागला तरी तिला ते बरोबरच वाटेल इतका गाढ विश्वास आहे तिचा तिच्या दादावर."

तेव्हापासून मी आई जसं सांगेल तसाच वागत आलो. तिच्या मुळे मला खूप बळ मिळायचं. आता तीच नाही राहिली तर हे बळ मला कोण देणार?"

एवढं बोलून सुधीर ढसाढसा रडू लागला.

नितीन निशांत दोघंही सुधीरच्या पाठीवरून हात फिरवू लागले. दोघ सुधीरला धीर देत होते पण ते कुठे स्वस्थ होते. दोघांच्याही डोळ्यातून सतत पाणी वहात होतं.
त्यांना जेवायचीपण इच्छा होत नव्हती.

त्यांच्या भुकेच्या संवेदना मघापर्यंत ज्या तीव्र होत्या त्या अचानक मंदावल्या. त्या संवेदनेपेक्षा दु:ख टोकदार झालं होतं. दोघांचही मन त्याने खूप अस्वस्थ झालं.



त्यादिवशी तिघांचे डबे तसेच्या तसे पुन्हा बॅगेत गेले. तिघांची पावलं जडशीळ झाली होती.कसेबसे उठून तिघही आपल्या जागेवर जाऊन बसले. ऑफीसमध्ये सगळ्यांना या तिघांकडे बघून लक्षात आलं की काहीतरी झालय नक्की. नाहीतर हे तइघंजण इतक्या शांतपणे चालत बोलत नसत. नक्कीच काहीतरी गडबड आहे.

सबनीस पटकन नितीनजवळ आला आणि त्याने विचारलं,

"निशांत काही प्राॅब्लेम आहे का? तुम्ही तिघं इतके शांत कधीच नसतात? तू रडलास का? तुझा चेहरा असा का दिसतोय?"

सबनीसने सगळे प्रश्न एका झटक्यात विचारले.

निशांत दोन्ही हाताने चेहरा झाकून मान खाली घालून हळूहळू रडत होता.

सबनीस निशांतच्या पाठीवरून हात फिरवत होता.बराच वेळाने निशांतचं रडणं कमी झालं.मघाशी सुधीरसमोर त्याने स्वतःला आलेला हुंदका मोठ्या कटाक्षाने थांबवला होता.

"निशांत सांगशील का काय झालं आहे?"

सबनीस ने पुन्हा विचारलं.

"अरे सुधीरच्या बहिणीला कानाचा कॅन्सर झाला आहे.डाॅक्टर म्हणाले ती फक्त सहा महिने जगेल. खूप वाईट बातमी आहे. सुधीरच्या बहिणीमुळे आम्हाला बहिण कशी असते ते कळलं. सुधीरशी काॅलेजमध्ये आमची मैत्री झाली तेव्हाच पहिल्यांदा प्रियंकाशी ओळख झाली.मग त्याची आई प्रत्येक राखीला, भाऊबिजेला आम्हाला बोलवायची. तेव्हापासून बहिणीसाठी काहीतरी गिफ्ट आणायची संधी मिळाली. ती संधी मी आणि नितीन कितीही कामात असलो तरी सोडायचो नाही. तिच्याकडून राखी बांधून घेतांना, भाऊबिजेला ओवाळून घेताना तिला खूप चिडवायचो. प्रियंका कधीच चिडायची नाही."

"निशांत इतकं छान बाॅंडींग तुझं असेल प्रियंकाशी तर खरंच ही खूप दुःखाची गोष्ट आहे. आता तू कितीही दुःखी असलास तरी तुला सुधीरला सावरायला हवं. प्रियंका सुधीरची सख्खी बहिण आहे.त्याला तर काहीच सुधारत नसेल."

"होरे तू म्हणतोस ते बरोबर आहे. सुधीरला मी आणि नितीननेच सावरायला हवं."

निशांत दुःखी होता तिकडे नितीनची अवस्था काही वेगळी नव्हती. तोही प्रियंकाच्या आजाराबद्दल समजल्यापासून खूप अस्वस्थ होता.

निशांतचं लक्ष नितीनकडे गेलं. तो हळूच आपल्या खूर्चीवरून उठला आणि अत्यंत थकल्या पावलाने तो नितीन जवळ गेला. त्याच्या बाजूची खूर्ची ओढून तो बसला. नितीनचा चेहरा निशांतसारखाच दुःखाने काळवंडून गेला होता.

"नितीन आपणच दुःखात इतकं बुडालो तर सुधीरला कोण सावरेल? सुधीरची अवस्था आणखी बिकट आहे. प्रियंका त्याची सख्खी बहिण आहे आणि आपण तिला बहिण मानतो हा फरक आहे."

"आपण तिला बहिण मानतो पण ती आपली सख्खी बहिण नाही ही रेषा कधीच पुसट झालेली आहे. ती आता आपली सख्खी बहिण आहे."

"हो रे पण आपणच सुधीरला धीर द्यायला हवा."

"कळतंय मला. पण आज मला खरंच काही सुधारत नाही. "

दोघांचं लक्ष सुधीरकडे जातं. त्याची कुठेतरी तंद्री लागलेली असते. दोघंही सावकाश त्याच्याजवळ जातात.

"सुधीर घरी जातोस का? तुला खूप थकवा आलेला दिसतो आहे. "
नितीनने विचारलंं.

"घरी जाऊन काय करू? घरी आईबाबांकडे तर बघवत नाही. ते खूप कोलमडले आहेत. ते प्रियंकाचे आईबाबा आहेत. त्यांनी केवढी स्वप्न बघीतली होती प्रियंकासाठी. निरंजन आणि प्रियंका या दोघांचं इतकं छान बाॅंडींग झालेलं बघून इतकं समाधान मिळालं त्यांना. हे समाधान मात्र फारकाळ टिकलं नाही रे."

सुधीरला एक जबरदस्त हुंदका फुटला. नितीनने हळूच सुधीरच्या पाठीवर थोपटलं.

"मला घरी जावसंच वाटत नाही रे. "

"सुधीर तू घरी गेला नाहीस तर तुझ्या आईबाबांचं काय होईल? तू कुठे गेलास या चिंतेने त्यांना अजून त्रास होईल. त्यांची सगळी भिस्त आता तुझ्यावर आहे."
निशांत म्हणाला.

"हो रे सुधीर तू आता वाटेल तसं नाही वागू शकणार.तू आमच्या जवळ रड पण आईबाबांच्या समोर मात्र कणखर रहा. "
नितीन सुधीरच्या पाठीवर थोपटत म्हणाला.

"तुम्हाला माहित आहे प्रियंका लहान होती तेव्हा तिला आईने काही खाऊ दिला तर ती मी शाळेतून यायची वाट बघत बसायची. मी घरी आलो की मला गच्च मिठी मारत असे. आई म्हणायची दादाला आधी पाय धू दे,शाळेचे कपडे बदलू दे. तिला तिच्या जवळचा खाऊ कधी मला देते असं तिला व्हायचं. मी हातपाय धुवून कपडे बदलून आलो की आपल्या इवल्याशा हातांनी आईने तिला दिलेला खाऊ मला भरवायची."

"सुधीर प्रियंका आजही आम्हाला सुद्धा इतक्या प्रेमाने खायला देते. आमच्या आवडीचा पदार्थ काकूंनी केला तर आमची वाट बघत बसते. ही आत्ता आत्ताची गोष्ट आहे तिचं लग्न होईपर्यंतची."

नितीन म्हणाला.

" हो नं. हे आमच्या नशिबात आलेलं सूख आता काहीच काळ राहणार आहे. खरं नाही वाटत रे.परमेश्वर एवढा कृर कसा झाला रे?"

नितीनने कितीही संयम राखला तरी त्याच्या डोळ्यांचा संयम संपला आणि ते घळघळ वाहू लागले.


"माझ्या शाळेतील प्रत्येक दिवस तिच्यामुळे खास असायचा. सण तर खूप छान व्हायचा. आता पुढची राखी भाऊबीज अगदी सुनी जाईल. "

" सुधीर तुझ्या बरोबर आम्ही दोघं या कठीण काळात तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहोत. तू काळजी करू नकोस. तू निरंजनच्या सतत बरोबर रहा."

निशांत म्हणाला.

" सुधीर पैशांची अजीबात काळजी करू नकोस. आम्ही पण प्रियंकाचे भाऊ आहोत. पैसे लागले तर संकोच करायचा नाही. वेळीअवेळी कधी मदत लागली तर लगेच आम्हाला फोन कर.प्रियंकाशिवाय आम्हाला काहीही महत्वाचं नाही. कळलं."
नितीन म्हणाला.
" हं."
सुधीरचा हुंकार खोल गुहेतून आल्यासारखा वाटला.
दोघंही त्याच्याजवळ बसले. तिघही दुःखाच्या गर्तेत कोसळले होते.

____